स्वामी विवेकानंद

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   January 12, 2018 in   मराठी लेखणीव्यक्तीचरित्र

‘ज्ञान हा जीविताचा आदिहेतू आहे. दुसरा हेतू सुखप्राप्ती हा आहे. या दोहोंच्या सांगडीनें हा विश्र्वसमुद्र तरुन पैलतीरास तुम्ही जातां आणि तीच मुक्ती ! पण ही मुक्ती एकटयालाच मिळवितां येत नाही. जगातील कीडमुंगीसारखे प्राणी मुक्त होतील तेव्हाच तुम्हांस खरा मुक्तिलाभ होईल. सर्व सुखी होईपर्यंत आपण एकटे सुखी आहोंत असे म्हणण्याचा अधिकार कोणासही नाही. तुम्ही कोणाला दुःख देत असतां तेव्हा स्वतःच्या दुःखाचा पाया तुम्ही खणीत असतां हें लक्षात ठेवा. कारण, तुम्ही आणि तुमचे बांधव वस्तुतः परस्परांपासून भिन्न नव्हेत. जो स्वतःला साऱ्या विश्र्वात आणि विश्र्वाला स्वतःत पाहतो तोच खरा योगी.’

हा विश्र्वप्रेमाचा संदेश स्वामी विवेकानंद यांनी दिलेला आहे. इसवीसनाच्या तारखेप्रमाणे आज स्वामी विवेकानंद जयंती आहे. विवेकानंदांची जयंती काही ठिकाणी बंगाली कालगणनेप्रमाणे साजरी केली जाते. तर बऱ्याच ठिकाणी ती इसवीसनाच्या गणनेप्रमाणे १२ जानेवारी या तारखेला मानली जाते. विवेकानंदांनी वरील अवतरणात आपल्या धर्मसंस्कृतीतील भक्तिप्रेमाचे तत्त्वज्ञान सरळ शब्दांत मांडलेले आहे. हा विवेकानंदांचा विचार म्हणजे ज्ञानेश्र्वरमाऊलींच्या पसायदानाचेच एक स्वरुप आहे, असे म्हटले पाहिजे. सर्व प्राणिमात्रांचे कल्याण इच्छिणाऱ्या ज्ञानेश्र्वरांची सर्वांप्रती असलेली समदृष्टी या अवतरणातूनही प्रकट झालेली आपणाला आढळून येईल.

जो वांछिल, तो ते लाहो । प्राणीजात । असे ज्ञानोबांनी म्हटले आणि जगातील सर्व प्राणिमात्र, अगदी कीडमुंगीसुद्धा जेव्हा मुक्त होतील तेव्हाच मानवजातीलाही मुक्ती लाभेल, असे विवेकानंद मानतात. हा विचार माणसाच्या मनात जर पुरतेपणी रुजला तर सर्व जग सुखी होण्यास मुळीच विलंब लागणार नाही. पण इथे एक मेख आहे. विशेषतः सध्याच्या काळात तर ही मेख जरुर समजून घेतली पाहिजे. तुम्ही ज्या माणसांशी भलेपणाने वागता, सौजन्याचा व्यवहार ठेवता ते जर तुमच्याशी कपटीपणाने वागले, तुमच्या सौजन्याचा त्यांनी गैरफायदा घेऊ पाहिला तर कसे होईल ?

सौजन्य म्हणजे दुर्बलता नव्हे. तुकोबांनी दयेची व्याख्या करतांनासुद्धा दया तिचे नाव, भूतांचे पालन । आणिक निर्दालन । आणिक निर्दालन । कंटकांचे ॥ असे म्हटले आहे. म्हणजे सर्व प्राणिमात्रांचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे, हे आम्ही मान्य करतो, पण त्याबरोबरच या प्राणिमात्रांपैकी जे दुष्टदुर्जन असतील त्यांना योग्य अद्दल घडविल्याशिवाय आम्ही राहणार नाही. भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे काठी । हाणू माथां ॥ असा इशारा तुकोबा रोखठोक शब्दांत देतात.

ज्ञानोबामाऊली खळांची व्यंकटी सांडो या शब्दांत दुष्टांनी आपल्या वागण्यातील वाकडी प्रवृत्ती सोडून द्यावी, ती दुष्टता सांडली जावी, आपोआप नाहीशी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करतात. तर विवेकानंदांनी वरील अवतरणात प्रत्येक मानवप्राणी आणि हे विश्र्व यामधील एक अतूट धागा आपल्याला उलगडून दाखविला आहे आणि त्या धाग्याचा संदर्भ देऊन आपण सगळे एकच आहोत, सगळेच बांधव आहोत आणि हे विश्र्व म्हणजे एक प्रकारे तुमचेच रुप आहे, हा मुद्दा अधिक प्रभावीपणे मांडला आहे. दुसरा सुखी असल्याशिवाय तुम्ही सुखी होऊ शकत नाही, असे विवेकानंदांचे म्हणणे आहे आणि हे म्हणणे आधी सांगितल्याप्रमाणे सर्वांनीच मान्य केले पाहिजे. अन्यथा साध्या, सरळ माणसाच्या भलेपणाचा फायदा घेण्यासाठी मतलबी, कावेबाज ठिकठिकाणी टपून बसलेले आहेतच.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर | देवाचिये व्दारी