तुम्हाला यशस्वी व्हायचंय?

Published by दत्तप्रसाद दाभोळकर on   October 9, 2017 in   Readers Choiceमराठी लेखणी

आपल्या भोवतालचे जग पूर्णपणे बदललंय. आज आपल्याभोवती आहे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. या तीनही शब्दांचा खरा अर्थ आहे स्पर्धा! आपल्या भोवताली आज सर्वत्र आहे एक जीवघेणी स्पर्धा. या स्पर्धेत जो टिकेल तो तरेल.

यापूर्वी आपल्या देशात काय होते हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय. ते म्हणालेत, ‘‘आमच्या जातिव्यवस्थेत अनेक वाईट गोष्टी आहेत. पण या जातिव्यवस्थेने नकळत एक फार मोठी गोष्ट केली. जाती म्हणजे विस्तारित परिवार होता आणि व्यवसाय जातींसाठी राखीव होते. म्हणजे दोन वाण्यांची दुकाने समोरासमोर असली तरी ते एकाच परिवारातले होते. त्या दुकानांची आपापसांत स्पर्धा नव्हती तर सहकार्य होते. त्यातून एका दुकानदाराचे काही बरे-वाईट झाले तर त्याचे दुकान हडप न करता त्याच्या मुलाला दुकान चालवायला सक्षम बनवणे ही दुसऱ्या दुकानदाराची जबाबदारी होती. स्पर्धा थांबल्यामुळे विकासदर शून्यावर आला. मात्र त्याच वेळी मानसिक आनंदाचा, मानसिक समाधानाचा क्रमांक फार वर गेला.’’

आज ते जग बदललंय. आज प्रत्येक दिवशी तुम्ही स्पर्धेत उतरताय आणि स्पर्धेत टिकायचे असेल तर मंत्र आहे, ‘थांबला तो संपला’! या मंत्राचा खरा वैज्ञानिक अर्थ आहे, तुम्हाला थांबून संपायचे नसेल तर प्रश्नांना उत्तरे विचारुन थांबू नका. उत्तरांना प्रश्न विचारत पुढे जा.

व्यवहारात या उत्तरांना प्रश्न विचारण्यामुळे काय फायदे होतात ते पाहूया. आपल्या काश्मीरप्रमाणेच आल्प्स पर्वतात पण हिमवर्षाव होतो. काश्मीरप्रमाणे तेथेही सफरचंदे होतात. एका वर्षी प्रचंड हिमवर्षाव होत होता. त्या कडाक्याच्या थंडीने सफरचंदांच्या झाडांची पाने गळून पडत होती, सफरचंदे मात्र तशीच होती. त्यांचा आकार वाढला किंवा कमी झाला नव्हता. मात्र त्यांची साल काळीनिळी झाली होती. आता अशी सफरचंदे फेकून द्यावी लागणार म्हणून सारे शेतकरी चिंतेत होते.

काळ्यानिळ्या रंगाची सफरचंदे

मात्र उत्तरांना प्रश्न विचारा, हे मनात पक्के बसलेला एक मुलगा विचार करत होता. ही सफरचंदे अशी का झालीत ? त्याच्या लक्षात येत होते. या भयावह हवामानात झाड घाबरले होते. त्याला फक्त तग धरुन राहावयाचे होते. ज्यांच्याशिवाय चालू शकेल अशा फांद्या आणि पाने झाड फेकून देत होते. मात्र सफरचंदे त्याची मुले होती. त्याच्या वंशवृद्धीसाठी त्याची ही बाळे, म्हणजे सफरचंदे जगावीत म्हणून झाड त्या फळांना अतिरिक्त जीवनसत्त्वे व साखर पुरवत होते. म्हणून त्या फळात व्हिटॅमिन्स आणि ग्लुकोज मोठया प्रमाणात असणार. त्या मुलाने त्या सफरचंदाचे पृथक्करण केले. त्या वेळी त्याचा अंदाज खरा आहे हे त्याला समजले. त्याने ती सफरचंदे शेतकऱ्यांकडून फार कमी दरात विकत घेतली. मात्र बाजारात जाहिरात केली ‘दुप्पट साखर आणि जीवनसत्त्वे असलेली. लहान मुले व म्हातारी माणसे यांना खावयास मऊ अशी खास सफरचंदे या वर्षी आम्ही बनवलीत. ती ओळखायला सोपी असावीत म्हणून त्यांची साल काळ्यानिळ्या रंगाची आहे. दुप्पट जीवनसत्त्वे असलेली ही सफरचंदे आम्ही मात्र दीडपट अधिक किंमतीत विकतोय. कारण आम्ही सामाजिक बांधिलकी मानतो.’

आणि आज हे भोवताली सर्वत्र घडायला लागलंय हे लक्षात घ्या.

गोगलगाईंचे अर्थकारण

आपले ‘बेकारो स्टील प्लँट’ रांचीला आहे. त्यांची एक प्रचंड मोठी सुनियोजित वसाहत आहे. बंगले, सदनिका, बागा यांनी ती वसाहत गजबजलेली आहे. अर्थातच सर्वत्र खूप हिरवळ, फुलझाडे व झाडे आहेत. तेथे दरवर्षी पावसाळ्यात एक प्रचंड संकट यायचे. मोठया प्रमाणात गोगलगाई निर्माण व्हायच्या. त्यांना नाहीसे करण्यासाठी मोठया प्रमाणात कीटकनाशके वापरायला लागायची. तो प्रचंड खर्च, हवेत सहन न होणारा कीटकनाशकांचा वास आणि तरीही हिरवळीचे नुकसान हे सारे सहन करावयास लागायचे.

संगणकासमोर बसून एक मुलगा उत्तरे आणि प्रश्न यांची भेंडोळी सोडवत होता. भारतात मांसाहारी लोक कोळंबी आवडीने खातात. मग जगात कुठेतरी गोगलगाई पण आवडीने खाणारे लोक असणार. त्यांच्या लक्षात आले जपानपासून अनेक देशांत हे रुचकर, पौष्टिक अन्न आहे. फार महाग दरात ते विकत घेतले जाते. त्यांनी तेथील गोगलगाईंचे रासायनिक पृथक्करण मागवले. ‘मानवाचे अंती गोत्र एक’ त्याचप्रमाणे जगभरच्या गोगलगाई एकदम सारख्याच आहेत हे त्याच्या लक्षात आले. तो वसाहतीच्या प्रमुखाला भेटला. म्हणाला, ‘‘या वर्षी गोगलगाई पर्यावरण अजिबात न बिघडवता पूर्णपणे नाहीशा करण्याचे कंत्राट मला द्या. मी नेहमीच्या दरापेक्षा फक्त निम्म्या दरात घेतो.’’ त्याने ते कंत्राट घेतले. कामगारांना रोजगार देऊन त्या गोळा केल्या आणि त्या विकून त्याने खूप पैसे मिळविले.

आपल्या भोवताली पूर्णपणे बदललेले आणि दर दिवशी बदलणारे एक जग आहे. ‘थांबला तो संपला’ असा आता येथील नियम आहे. मात्र ‘विश्र्वाचा विस्तार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा’ हे लक्षात ठेवून उत्तरांना प्रश्न विचारीत पुढे जाणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एक मंत्र तयार होईल. त्याच्यासमोर असलेली अलिबाबाची गुहा उघडण्याचा मंत्र !


 – दत्तप्रसाद दाभोळकर | कालनिर्णय ऑक्टोबर २०१७