राहून गेलेल्या गोष्टी

माणसाचं वय जसजसं वाढत जातं तसतसं त्याला आपल्या हातून कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या यापेक्षा कुठल्या राहून गेल्या याचीच अधिक चुटपूट लागून राहते. सर्वांच्याच बाबतीत असं असेल असं नाही मी म्हणत. पण आयुष्याची गाडी उताराला लागते, नवं वळण काय घ्यावं ते सर्वस्वी आपल्या हातात राहत नाही. आता कासरा आपल्या एकट्याच्याच हाती नाही हे ध्यानात येतं आणि ही गोष्ट राहून गेली असं फार वेळा वाटायला लागतं. अशा राहून गेलेल्या गोष्टींत काही वैयक्तिक असतात, तर काहींचं समाजात आवश्यक असलेल्या घडामोडींशीही नातं असतं. आयुष्यात काही वैयक्तिक भोगाच्या आणि आनंदाच्या गोष्टी असतात तशा सामाजिक जबाबदाऱ्या स्वेच्छेनं उचलायच्याही गोष्टी असतात. त्या जबाबदाऱ्याही आनंदानं पार पाडायचं कर्तृत्व, म्हणूनच अंगावर घ्यायच्या असतात. ताजमहाल पाहायचा राहून गेला किंवा काशीयात्रा राहून गेली ही वैयक्तिक गोष्ट झाली. तसल्या हौशी पुरवण्याच्या गोष्टींना अंत नाही. मनात जे जे आलं ते ते साध्य झालं असं जगात कुठल्याच माणसाला म्हणता येणार नाही.

‘तबलजी’ डॉक्टर


माझ्या परिचयाचे एक डॉक्टर  आहेत. रोग्यांना औषधं देणारे डॉक्टर. साहित्य किंवा संगीताचे डॉक्टर नव्हे. कुठल्याही यशस्वी डॉक्टराचं असावं तसंच त्यांचं धावपळीचं जीवन. गळ्यातल्या स्टेथास्कोपशिवाय मी त्यांना कधीच पाहिलं नाही. प्रचंड प्रॅक्टिस. घरातून केव्हा जातात आणि रात्री केव्हा परततात, त्याचा त्यांच्या मुलांनाही पत्ता नसतो. बायकोला असावा. पण एकदा त्यांनी त्यांच्या दवाखान्यात कुणाचा तरी निरोप सांगायला आलेल्या आपल्या बायकोलाचबोला, काय होतंय?’ असं विचारलं होतं, असं म्हणतात. कदाचित हा प्रश्न ऐकून त्यांच्या बायकोनं आश्चर्यानंवासल्यावर त्यांनी जीभ बाहेर काढा असंही म्हटलं असेल. ते जाऊ दे. नाहीतर सांगायची गोष्ट राहून जायची.

त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मी माझी प्रकृती दाखवायला गेलो होतो. बाहेर हीऽऽ गर्दी. माझा नंबर आल्यावर आत गेलो. तपासणी वगैरे झाली. मला म्हणाले, ‘ बसा!’ मी म्हटलं, ‘ बाहेर गर्दी आहे. ‘ तसे म्हणाले, ‘ बसा हो! गर्दी नेहमीचीच आहे. ‘ मी म्हणालो,  ‘ डॉक्टर, रविवारीसुद्धा तुम्ही परगावी प्रॅक्टिसला जाता, मग विश्रांती वगैरे कधी घेता?’ ते म्हणाले, ‘ विश्रांतीचं मला फारसं वाटत नाही. मला विश्रांतीची हौसच नाही. ‘

खरंच! तुमच्यासारखे रुग्णसेवेला व्रत मानणारे डॉक्टर फार थोडे असतील. ‘ हे माझं वाक्य बरंचसं अभिनंदन किंवा सत्काराच्या सभेतल्या वाक्यावर गेलं हे माझ्या लक्षात आलं होतं. पण भरपूर फी घेणाऱ्या या डॉक्टरचा व्रताबिताशी संबंध नव्हता हे मला ठाऊक असल्यामुळे मनातल्या कृत्रिम भावनेला साजेसंच कृत्रिम वाक्य माझ्या तोंडून बाहेर पडलं. ‘ कसलं व्रत आलंय हो! दुकान आहे दुकान. ते एकदा जोरात चालायला लागलं की आपल्या आयुष्याची दिशा गिऱ्हाईकंच ठरवायला लागतात. ‘ गावातल्या प्रत्येक डॉक्टरनं हेवा करावा अशी प्रॅक्टिस आणि वैद्यकीय क्षेत्रात एवढा मान असणाऱ्या या डॉक्टरचं दुखणं काय आहे ते मला कळेना. पण तेच म्हणाले, ‘ खरं सांगू का? एक गोष्ट राहून गेल्याचं मला खूप वाईट वाटतं. ‘

कुठली गोष्ट हो?’

मला उत्तम तबला वाजवणारा व्हायचं होतं. थिरखवाखाँसाहेबासारखं !’

काय म्हणता?’

खरंच सांगतो, माझ्या मोटारीत टेपरेकॉर्डर आहे. बहुतेक सगळ्या टेप्स तबला सोलोच्या आहेत. कॉलेजात असताना मी शिकत होतो तबला आमच्या म्हम्मूखाँसाहेबांकडे. ‘ आणि खरोखरीच ते शिकले असले पाहिजेत. कारण खाँसाहेबाच नाव घेताना त्यांनी शागीर्दांच्या रिवाजाप्रमाणे स्वतःच्या कानाची पाळी पकडली होती. ‘ खरं सांगतो, एवढा बंगला आहे, हजारो रुपयांचं फर्निचर आहे…,

शिवाय मुख्य म्हणजे डॉक्टरसाहेब तुमच्या हातात एवढा चांगला गुण आहे. ‘

ते हात तबल्यावर पडत नाहीत हे दुःख आहे. माझा तबला डग्गा धूळ खात पडलाय ना, तो मला सारखा खिजवत असतो. राहून गेली गोष्ट. आता या चक्रातून सुटका नाही. ‘

मग तबला आणि तबलजी या विषयावर आम्ही बराच वेळ बोलत होतो. बाहेर ताटकळत बसलेल्या लोकांना, मला बराच गंभीर आजार झाला आहे, असंच वाटलं असणार. त्याशिवाय हा एवढा मोठा डॉक्टर इतका वेळ कोणाला कशाला तपाशील! पण इथे हा डॉक्टर मला आपलं दुखणं सांगत होता आणि स्वतःच्या व्यथा सांगायला आलेल्या रोग्यांचा त्याला पार विसर पडला होता. जणू काय त्या स्टेथास्कोपचा भाग झालेलं यंत्र होऊन ते जगत होते आणि माणूस होऊन जगण्याची गोष्ट तबल्यात गुंडाळली गेली होती.

राहून गेलेल्या गोष्टींची आपणा सर्वांनाच रुखरूख असते. कधी अनवधानानी राहून जातं. कधी का राहून जातं ते कळत नाही. कधी योग जुळून आल्यामुळे राहून जातं. लहान गोष्टी असतात. उगीच खुपत असतात. अगदी क्षुद्र गोष्टी. आपल्याला गौरीशंकराचं शिखर चढायचं होतं ते राहून गेलं अशा मापाच्या नसतात. पण राहून गेलेली क्षुद्र गोष्टदेखील साधायचा योग आला तर गौरीशंकर चढल्याचा आनंद आणि हा आनंद यात फरक राहत नाही.

आगगाडीच्या इंजिनातला प्रवास

माझीच गोष्ट सांगतो. खूप वर्षांपूर्वी बेळगावला होतो. गाण्याच्या प्रेमामुळे तिथल्या स्टेशनमास्तरांशी माझी दोस्ती जमली. आता सगळ्याच स्टेशनातली गर्दी वाढली. पण एके काळी कमी गर्दीचं स्टेशन हे माझं उगीचच चक्कर मारून यायचं आवडतं ठिकाण होतं. मी मास्तरांशी गप्पा मारत बसलो होतो. मास्तर सहज म्हणाले,  ‘ काय घेणार?’ मी म्हणालो, ‘ मास्तर, माझ्या मनातली एक गोष्ट फार दिवस राहून गेली आहे. मला एकदा आगगाडीच्या इंजिनात बसून प्रवास करायचा आहे. ‘

हात्तिच्या! त्यात काय आहे? आत्ता बशिवतो की. गोकाकपर्यंत जा. तिथं क्राशिंग आहे. उलट गाडीनं परत या. ‘ तेवढ्यात गाडी आली. मास्तरांनी मला ड्रायव्हरच्या पायावर घातलं. मी चांगला पस्तिशीतला माणूस. मला इंजिनात बसायची हौस आहे हे ऐकून तो ड्रायव्हरसुद्धा चमकला. मग इंजिनानं सुरुवातीचा जोरदार श्वास घेऊन भसाककन सोडला आणि जे सुटलंवा! माझी अवस्था जत्रेतल्या चक्रीपाळण्यात बसलेल्या पोरासारखी! ड्रायव्हरही बेरकी निघाला. मला म्हणतो, ‘ साब और क्या आप चाहते है?’ मी म्हटलं, ‘ ड्रायव्हरसाब हसना नही, हमको इंजनका शिट्टी बजानेका है!’ त्यानं, गर्दीतली माणसंआदमी पीयेला है, जाने दोम्हटल्यावर जशी एखाद्या दारुड्याकडे अतीव करुणेनं पाहतात तसं पाहिलं आणि म्हणाला, ‘ थोडा ठरोआणि ठरावीक अंतर काटल्यावर म्हणाला, ‘ अब जी चाहे उतना बजाव. ‘ मी मनसोक्त शिट्टी वाजवून घेतली. त्या दिवशी त्या गाडीत बसलेला प्रत्येक प्रवासी म्हणाला असणार, ‘म्हशींचे तोडेच्या तांडे रुळावर मोकाट सुटलेले दिसतायत!’

 राहून गेलेले सामाजिक कार्य


पण या झाल्या वैयक्तिक गोष्टी. काही सामाजिक कार्यही असतात. चटकन आपल्या डोळ्यांपुढे येतात आणि वाटतं इथे आपण काहीतरी करायला पाहिजे होतं. राहून गेलं. दारिद्र्यरेषेच्या खालीच कोट्यवधी लोक ज्या देशात राहतात तिथे तर अशा लोकांच्या जीवनात आनंदाची क्षेत्र निर्माण करायची कितीतरी कामं आहेत. आपण असंच एखादं काम हाती घ्यायला हवं होतं. त्या कामाच्या मागे लागायला हवं होतं. त्यातली एक गोष्ट राहून गेल्याचं मला फार वाईट वाटतं. एके काळी मी गात असे. गळाही वाईट नव्हता. आज वाटतं, गरिबांच्या वस्तीत जाऊन तिथल्या पोरांना जमवून आपण गायला हवं होतं आणि त्यांना गायला लावायला पाहिजे होतं. असं केलं असतं तर आयुष्य आणि निसर्गानं दिलेला तो गाणारा गळा सार्थकी लागला असता.

मनाला लागून राहिलेली खंत


कधी प्रवासात असताना एखाद्या खेड्यात गावाबाहेरच्या वडाखाली पोरं सूरपारंब्या खेळताना दिसली की, माझ्या आयुष्यातल्या राहून गेलेल्या गोष्टींची मनाला फार चुटपूट वाटते. आता गळाही गेला आणि पायातली हिंडायची आणि पोरांबरोबर नाचायची शक्तीही गेली. सुसज्ज रंगमंचावर रांगेत उभं राहून गायन मास्तरच्या इशाऱ्याबरोबर गाणारी मुलंमुली छान दिसतात. पण तसला गाण्यांचा कार्यक्रम मला करायचा नव्हता. तहानभूक विसरून नाचणाऱ्या आणि गाणाऱ्या पोरांचा ताफा घेऊन मला गायचं होतं. त्या हॅ मलिनच्या पिपाणीवाल्यासारखं. एखाद्या खेड्यात जावं आणि पिंपळाच्या पारावर हातातली दिमडी वाजवीत पोरांची गाणी सुरू करावी. भरभर पाखरांसारखी पोरं जमली असती. फाटक्यातुटक्या कपड्यांतली, शेंबडी, काळीबेंद्री. पण एकदा मनसोक्त गायला लागल्यावर तीच पोरं काय सुंदर दिसली असती. आणि त्याहूनही रंगीबेरंगी कपडे घालून गावोगाव हिंडत त्यांच्यात नाचणारा आणि गाणारा मी अंतर्बाह्य सुंदर होऊन गेलो असतो.

आयुष्यात पोरांचं मन गुंगवणारं आपण काही करू शकलो नाही, याची माझ्या मनाला फार खंत आहे. मुलांच्या मेळाव्यात लोक मला साहित्यिक, कलावंत वगैरे म्हणतात त्या वेळी मी ओशाळून जातो. आयुष्यात मनाला खूप टोचून जाणारी अशी राहून गेलेली कुठली गोष्ट असेल तर मुलांच्या मेळाव्याला आनंदानं न्हाऊ घालणारं असं आपण लिहू शकलो नाही, गाऊ शकलो नाही, नाचू शकलो नाही हीच आहे. आता फक्त ती गोष्ट राहून गेली असं म्हणण्यापलीकडे हातात काही नाही!

 – पु.ल. देशपांडे 

 

One comment

  1. अगदीच राहून गेले असेही नाही पू. लं.
    आपले “वयम् मोठंम् खोटंम्” आहे की 🙂

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.