हाडांचे विकार | Bone Diseases | Joint Pain | Muscle Disease | Osteoporosis

हाडांचे विकार – डॉ.ए.के.सिंघवी

हाडांचे विकार


बदलती जीवनशैली आणि शहरीकरणामुळे स्नायू व हाडांच्या(हाडांचे विकार) व्याधींचे प्रमाण सध्या वाढलेले पाहायला मिळते. अलीकडील काळात आयुर्मान वाढले आहे, पण या वाढत्या वयानुसार अनेक वृद्धांना ऑस्टीओपोरोसिस, फ़्रॅक्चर, सांधेदुखी अशा हाडांच्या विकारांना तोंड द्यावे लागत आहे.

ऑस्टिओआर्थ्रायटिस

नितंबांच्या आणि गुडघ्याच्या सांध्यांना होणारा ऑस्टिओआर्थ्रायटिस हा आजार जगभरातील वृद्धांच्या हालचालींवर बंधने येण्याचे प्रमुख कारण ठरत आहे. कास्थींच्या ह्रासामुळे (Cartilage degeneration) सांध्यांना सूज येऊन ऑस्टिओआर्थ्रायटिस होतो. वृद्धत्व, अपघात / इजा किंवा एखाद्या आजारामुळे ऑस्टिओआर्थ्रायटिसशी गाठ पडू शकते. याचबरोबर स्थूलपणा, संधिवात, मधुमेह, जन्मापासून असलेले संप्रेराकांसंबंधितचे विकार या समस्यासुद्धा ऑस्टिओआर्थ्रायटिस होण्यास कारणीभूत ठरू शकतात. साधारणपणे ४५ ते ५५ या वयोगटातील व्यक्तींना ऑस्टिओआर्थ्रायटिसची समस्या ग्रासण्यास सुरुवात होते.

या आजारात हात, पाय, पाठीचा कणा आणि गुडघे आणि नितंब यांसारख्या अधिक वजन पेलणाऱ्या सांध्यांवर रोगाचा परिणाम होतो. एखाद्या सांध्याचा वारंवार वापर केल्यानंतर होणारी सांधेदुखी, सांध्यांना येणारी सूज, सांध्यामध्ये ताठरता येणे, संध्यामध्ये चीर जाणे, सांध्यांची हालचाल करता न येणे (हाडांचे विकार) ही ऑस्टिओआर्थ्रायटिसची सर्वसाधारण लक्षणे असतात. पण रुग्णानुरूप या आजाराची लक्षणे बदलू शकतात. ऑस्टिओआर्थ्रायटिससाठी कोणत्याही प्रकारची रक्तचाचणी अस्तित्वात नाही.

सांधेदुखी आणि सांध्यांना आलेली सूज कमी करणे, त्याचबरोबर सांध्यांच्या कार्यामध्ये सुधारणा करणे हे ऑस्टिओआर्थ्रायटिसवरील उपचारांचे धेय्य असते.

ऑस्टिओआर्थ्रायटिस हा ह्रुमेटॉइड आर्थ्रायटिसपेक्षा वेगळा असतो. ऑस्टिओआर्थ्रायटिस हा कास्थींचा दीर्घकालीन आजार आहे. तर ह्रुमेटॉइड आर्थ्रायटिसमध्ये प्रामुख्याने सांध्यामधील संधिकला (सिनोव्हिअम) या भागावर परिणाम होतो. फुप्फुसे इत्यादी सर्व शारीरिक अवयवांवर आघात करतो. सांध्यांचा क्षकिरण अहवाल (एक्स रे रिपोर्ट) पाहून ऑस्टिओआर्थ्रायटिसचे निदान करता येऊ शकते. सांध्यांच्या कास्थींचा ह्रास, दोन हाडांच्या सांध्यामधील अंतर कमी होणे, हाडे ठिसूळ होणे ही ऑस्टीओआथ्रायटीसची साधारण लक्षणे असतात.

ऑस्टिओआर्थ्रायटिसवरील वैदकीय उपचार : सांधेदुखी आणि सांध्याची सूज कमी करणे, त्याचबरोबर सांध्यांचे कार्य सुरळीत ठेवणे हे ऑस्टिओआर्थ्रायटिसवरील उपचारांचे प्रथम धेय्य असते. विश्रांती, व्यायाम, आहार नियंत्रणासोबत वजन कमी करणे, फिजीकल थेरपी, त्याचबरोबर स्प्लिंट आणि ब्रेसेससारखे मेकॅनिकल सपोर्ट आदी उपचार या (हाडांचे विकार) विकारांवर डॉक्टर्स सुचवतात. औषधे तोंडावाटे आणि त्वचेवर लावण्यासाठी देण्यात येतात. तर ग्लुकेसेमिन आणि कॉन्ड्रो

टिनसारखे घटक तयार होण्याच्या प्रक्रियेच्या ह्रासास कारणीभूत ठरणाऱ्या रसायनांच्या निर्मितीचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी पूरक आहाराचा वापर करण्यात येतो त्याचबरोबर डॉक्टरांनी सांगितलेल्या फिजिकल थेरपीमुळे सांध्याभोवतीच्या स्नायूंमध्ये बळकटी येण्यास मदत होते. सांध्यांची हालचाल करत राहिल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि सांध्यांची सहनशक्ती वाढते. व्यायाम करण्यापूर्वी सांध्यांना उबदार शेक दिल्याने आणि व्यायामानंतर बर्फाच्या पिशवीने शेक दिल्याने वेदना आणि सूज यापासून दिलासा मिळतो. या विकारादरम्यान जलतरण आणि पाण्यातील व्यायामांचा उपयोग अधिक होतो, कारण ते करताना रुग्णाच्या सांध्यावर फार ताण न येता व्यायाम होतो. इतर व्यायाम प्रकारांमध्ये चालणे, सायकलिंग, हलकी वजने उचलणे इत्यादींचा समावेश आहे.

सांध्यांमध्ये इंजेक्शन :ज्या रुग्णांना पुढील टप्प्यातील ऑस्टिओआर्थ्रायटिस झाला आहे. आणि त्यांच्याकडून पारंपारिक उपचारांना प्रतिसाद मिळत नसेल, तर त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाते. जेव्हा कास्थींना धक्का पोहोचण्याची शक्यता असेल तेव्हा ऑर्थोस्कोपीचा उपयोग होऊ शकतो. काही निवडक रुग्णांमध्ये पायातील व्यंग किंवा धनुराकार झालेले पाय सरळ करण्यासाठी ऑस्टिओनॉमी ही शस्त्रक्रिया करण्यात येते. सांध्यांमध्ये गंभीर प्रकारचा ह्रास झाला असेल, तर कृत्रिम सांध्यांचे प्रत्यारोपण हाच उत्तम पर्याय असतो.

ऑस्टिओआर्थ्रायटिस शेवटच्या टप्प्यात असेल, तर ‘टोटल हिप अँड नी’ (संपूर्ण कंबरेची आणि गुडघ्यांची आर्थोप्लास्टी हाच परिणामकारक आणि सुरक्षित मार्ग असतो. सांधे प्रत्यारोपणामुळे (हाडांचे विकार) वेदनेपासून प्रचंड दिलासा मिळतो आणि कार्यक्षमतेत सुधारणा होते.

भविष्य :ऑस्टिओआर्थ्रायटिसमुळे होणाऱ्या कास्थींच्या ह्रासाला नियंत्रित करण्यासाठी भविष्यात औषधे उपलब्ध होऊ शकतात. कास्थींच्या जैवसंशोधनातून ऑस्टिओआर्थ्रायटिसच्या व्यवस्थापनासाठी नव्या प्रकारचा आणि रोचक मार्ग निघू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येतो आहे.

पाठदुखी

बहुतेक व्यक्तींना आयुष्यातील कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर पाठदुखीला सामोरे जावे लागते. किंबहुना डोकेदुखीनंतर पाठदुखी हे वेदनेचे सर्वाधिक आढळणारे कारण आहे. पाठदुखीसाठी, विशेषत: पाठीच्या खालील भागातील दुखण्यासाठी ऑस्टिओपोरोसिस हे एक महत्त्वाचे कारण आहे.

ऑस्टिओपोरोसिस (हाडांचे विकार)

हाडांच्या निर्मितीपेक्षा हाडांच्या पुन:शोषणाचे (resorption) प्रमाण अधिक असते. या प्रकारामध्ये हाडांचे वस्तुमान कमी होते परिणामी हाडे बारीक किंवा ठिसूळ होतात. महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर संप्रेरकांमध्ये (हार्मोन्स) झालेल्या बदलांमुळे ऑस्टिओपोरोसिस होण्याचे प्रमाण अधिक आढळून येते. ऑस्टिओपोरोसिसचा संबंध वयाशीही असतो. आतड्यांकडून कॅल्शिअम अपुऱ्या प्रमाणात शोषले जाणे आणि ‘ड’ जीवनसत्त्व अपुऱ्या प्रमाणात मिळणे यामुळे ऑस्टिओपोरोसिस होतो. हा विकार असलेल्या रुग्णाचेवर्णन म्हणजे रजोनिवृत्ती झालेली आणि पाठदुखी असलेली महीला, जिची उंची काही प्रमाणात कमी झालेली आहे आणि तिला काही प्रमाणात थोरॅसिक कायफोसिस आहे.

क्षकिरण चाचणी, हाडांच्या घनतेची आणि रक्ततपासणी करून ऑस्टिओपोरोसिसचे निदान करता येऊ शकते. ऑस्टिओपोरोसिसला प्रतिबंध करण्यात ‘ड’ जीवनसत्त्व हा महत्वाचा घटक असतो. ९० टक्के भारतीयांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असते. जेव्हा सूर्यकिरण तुमच्या त्वचेला स्पर्श करतात, तेव्हा तुमचे शरीर ‘ड’ जीवनसत्त्वाची निर्मिती करते. नैसर्गिक सूर्यप्रकाश काचेच्या आत येऊ शकत नाही. त्यामुळे कारमध्ये किंवा घरात बसून तुमचे शरीर ‘ड’ जीवनसत्त्व तयार करू शकत नाही. आपल्या आहारात ‘ड’ जीवनसत्त्वाची किमान पातळी गाठण्यासाठी दिवसातून दहा ग्लास ‘व्हिटॅमिन डी फोर्टिफाइड  दूध’ प्यावे लागेल. आतड्यामध्ये कॅल्शिअम शोषले जाण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्व अत्यावश्यक असते. शारीरिक हालचाल नसणे, हेही ऑस्टिओपोरोसिस होण्यासाठी कारणीभूत असते. चालणे, सायकलिंग, योगासने, नृत्य, हलका व्यायाम यामुळे ऑस्टिओपोरोसिसला प्रतिबंध होतो.

दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, फळे, सुका मेवा यांचा आहारात समावेश असेल तर ऑस्टिओपोरोसिसला प्रतिबंध करता येऊ शकतो.

औषधे : कॅल्शिअम किंवा ‘ड’ जीवनसत्त्व तोंडावाटे, नाकावाटे, तोंडावाटे घेण्यात येणाऱ्या स्प्रेच्या माध्यमातून, इंजेक्शनच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून ऑस्टिओपोरोसिसला प्रतिबंध किंवा त्याच्यावर उपचार करता येऊ शकतात.

वयोवृद्धांमध्ये ऑस्टिओपोरोसिसमुळे नितंबांच्या, मनगटाच्या आणि पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर होणे आदी समस्या वरचेवर आढळून येतात.

स्पाँडिलायसिस, ऑस्टिओआर्थ्रायटिस आणि स्लिप डिस्क (हाडांचे विकार) :

सातत्याने होणारी पाठदुखी ही बहुदा दैनंदिन दगदगीमुळे होते. क्वचितच तिचा संबंध एखाद्या मोठ्या विकाराशी असू शकतो. वयाच्या तिशीनंतर अनेक व्यक्तींचे वजन वाढते आणि व्यायामही अनियमित होतो. ज्या महिलांची अनेक वेळा प्रसूती झाली आहे आणि ज्यांचे वजन अनेकदा वाढले आहे, अशा महिलांमध्ये पाठीच्या खालच्या भागात वेदना होण्याची समस्या सर्वसाधारणपणे आढळते. चुकीचा व्यायाम केल्यामुळे स्नायूरचनेचे संतुलन बिघडते, स्थूलपणा येतो आणि दीर्घकालीन पाठदुखीची समस्या सुरु होते. पाठदुखीचा त्रास सुरु झाल्यापासून सहा आठवड्यांच्या कालावधीत बहुतेकांची पाठदुखी बरी होते. त्याहून अधिक काळ ज्यांना पाठदुखी जाणवत असेल त्यांनी मात्र योग्य निदान करून घेणे आवश्यक आहे.

स्लिप्ड डिस्क किंवा हर्निएटेड डिस्क :

२५ ते ५० या वयोगटातील व्यक्तींमध्ये स्लिप्ड डिस्क किंवा हर्निएटेड डिस्क ही समस्या आढळून येते. कटिभागातील L4 आणि L5 या क्रमांकाच्या डिस्कवर बहुधा परिणाम झालेला असतो. वारंवार त्या ठिकाणी आघात झाल्यामुळे हर्निएशन ऑफ डिस्क हा प्रकार होतो. शिंकणे, खोकणे, वाकणे, यामुळे तीव्र वेदना होतात. क्वचित मल वा मूत्रविसर्जनावरील नियंत्रण जाते. कटिभागातील हर्निएटेड डिस्कशी सायटिकाचा संबंध नेहमी जोडला जातो. एक किंवा अधिक नसांवर येणाऱ्या दाबामुळे सायटिक नसेवर दाब येऊन वेदना होतात, जळजळ होते, मुंग्या येतात किंवा पाय बधीर होतो. बहुधा यात एका बाजूवर परिणाम होतो.

सर्व्हायकल स्पाँडिलायसिस :

सर्व्हायकल स्पाँडिलायसिस हा आजार वयाशी निगडित आहे. या आजारात सर्व्हायकल स्पाइनच्या म्हणजेच मानेच्या संध्यांमध्ये आणि मणक्यांवर परिणाम होतो. कस्थी आणि हाडांना झालेल्या इजेमुळे हा आजार उदभवतो. बहुधा हा आजार वाढत्या वयामुळेच होतो, पण काही वेळा इतरही घटक यासाठी कारणीभूत असतात. वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या ८५ टक्के व्यक्तींमध्ये हा आजार आढळतो. पण काही व्यक्तींमध्ये हा आजार असूनही त्याची लक्षणे दिसून येत नाहीत. काहींना या आजारामुळे तीव्र वेदना होते आणि ताठरपणा येतो. सर्व्हायकल स्पाँडिलायसिससाठी वाढते वय कारणीभूत असते. वाढत्या वयामुळे मणक्यांना चीर जाणे, डिहायड्रेशन, हाडांभोवती जमा होणारे प्रक्षेप या समस्या निर्माण होतात.

इतर घटकांमध्ये मानेला होणारा आघात, कामाशी संबंधित कृती, दीर्घकाळासाठी तुमची मान अवघडलेल्या स्थितीत राहणे उदा. संगणकासमोर बसणे, आनुवंशिक घटक, धूम्रपान, प्रमाणापेक्षा अधिक वजन असणे आणि शारीरिक हालचाल नसणे, दुचाकी चालविताना जड हेल्मेट वापरणे या सर्वांमुळे मानेवर परिणाम होतो. रुग्णाची तपासणी, क्षकिरण अहवाल, सीटी स्कॅन, एमआरआय, ईएमजी आणि चेतासंस्थे संबंधित अभ्यास करून याचे निदान करण्यात येते.

यावरील उपचार नॉनसेर्जिकल प्रकारचे असतात.

आराम, वेदनाशामक, स्नायूंनाशिथिल करणारी औषधे, फिजिकल थेरपी आणि सर्व्हायकल कॉलरचा वापर करून यावर उपचार करण्यात येतात. पारंपारिक उपचारांना यश मिळाले नाही किंवा चेतान्यूनता आली असेल, तर शस्त्रक्रिया करण्यात येते. पाठदुखी आणि मानेच्या दुखण्याबाबत जे रुग्ण खूप तक्रार करत आहेत त्यांच्यामध्ये हिस्टेरिया, नैराश्य, हायपोकॉन्ड्रायसिस आणि नाटकी किंवा सहानुभूतीला आकर्षित करणारी वागणूक असल्याचे दिसून येते. अशा रुग्णाच्या बाबतीत कदाचित कामाच्या ठिकाणी इजा झाली असेल किंवा काही वाद ओढवून घेतला असेल वा आर्थिक नुकसान इत्यादी प्रसंग घडले असण्याची शक्यता आहे. या रुग्णांना खात्र/दिलासा देणे, मानसोपचार, व्यायाम इत्यादींची आवश्यकता असते.

मुलांमध्ये कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे हाडे वाकतात किंवा सांध्यांमध्ये व्यंग (रिकेटस) निर्माण होते. आहारामध्ये ‘ड’ जीवनसत्त्व असलेले पदार्थ आणि कॅल्शिअमयुक्त औषधांमुळे रिकेटसच्या व्यंगावर उपचार करता येऊ शकतात.

इतर घटकांमध्ये स्प्लिंटिंग, फिजिकल थेरपी आणि क्वचित प्रसंगी शस्त्रक्रिया करून या व्यंगांवर उपचार करण्यात येतात.


डॉ..के.सिंघवी

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.