एकनिष्ठ बलवंत मारुती

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   April 10, 2017 in   Festivals
Spread the love

हनुमान – मारुतीचे व्यक्तिमत्त्व लोभसवाणे आहे. आजकालच्या काळात आपण जे राजकारण पाहतो त्या पार्श्वभूमीवर तर मारुतीचे कर्तृत्व खूपच उठून दिसते. मारुती हा मुळात सुग्रीवाचा सेनापती, सुग्रीवाचा मित्र. पुढे सीतेचा शोध करायला त्याने रामाला बहुमोल मदत केली. मारुतीची मदत नसती तर सीतेला परत रामाकडे आणणे तर सोडाच, पण सीतेचा शोधसुद्धा लागणे अवघड होते. समुद्र पार करून लंकेत जाऊ शकेल, असा हनुमान हा एकच वीर आहे, असे जांबुवंत म्हणतो त्यात फार मोठा अर्थ आहे.

लंकेत जाण्यासारखे सामर्थ्य त्या काळात तरी दुसऱ्या कोणापाशी नव्हते. रावणाच्या राज्यात एकटे जाण्याइतपत मारुतीचे मनोधैर्य प्रभावी होते. त्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकणाऱ्या कोणत्याही संकटाशी मुकाबला करण्याची त्याची तयारी होती. सीतेपर्यंत मारुती पोहोचला, त्याने रामाची अंगठी तिच्या दृष्टीस पडेल असे केले. सीतेच्या अत्यंत मलूल आणि प्रतिकूल मनःस्थितीत मारुतीने तिला केवढा तरी मोठा आधार दिला. हे सर्व त्याच्यापाशी तसे सामर्थ्य होते आणि ते सामर्थ्य चांगल्या कामासाठी उपयोगात आणण्याचा त्याचा संकल्प होता म्हणून घडले. मारुतीला स्वतः ला काहीच नको होते. त्याला घर ना दार, ना बायको ना संसार म्हणूनच तो सर्व सामर्थ्यानिशी आधी सुग्रीवाच्या आणि नंतर रामाच्या मागे भक्कमपणे उभा राहिला. त्याच्या नावाचा उच्चार करताना ‘ रामभक्त, ‘ रामदूत ‘ अशी विशेषणे लावली जातात. त्याने रामाच्या जीवनाशी आपल्या जीवनाचा प्रवाह जणू एकरूप करून टाकला होता. त्याला वेगळे अस्तित्वच नव्हते. कोणत्याही मोठ्या अडचणीच्या प्रसंगातून रामाला कसे बाहेर काढावयाचे, हा एकच विचार मारुतीच्या मनात घोळत असे आणि त्यामुळेच की काय मारुतीबद्दल एक वेगळ्या प्रकारचा भक्तिभाव सर्वत्र आढळून येतो.

समर्थ रामदासस्वामी व अकरा मारुती

अनेक प्रकारच्या आपत्तींच्या विनाशासाठी म्हणून हनुमंताची उपासना केली जाते. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सैनिकांच्या दंडावर मारुतीची प्रतिमा असलेला ताईत बांधावा, असे समर्थ रामदासस्वामींनी सांगितल्याचे नमूद आहे. रामदासस्वामींनी महाराष्ट्रात जागोजागी मारुतीची मंदिरे उभारली. तसेच त्या काळात महाराष्ट्रात खूप लोकांनीही आपणहून मारुतीची मंदिरे बांधली. समर्थ रामदासस्वामींनी स्थापन केलेले अकरा मारुती तर प्रसिद्धच आहेत.

समर्थांनी स्थापन केलेल्या मारुतीचे वैशिष्ट्य असे सांगतात की, त्या मारुतीच्या मूर्तीच्या पायाखाली राक्षस असतो. मारुती राक्षसावर पाय ठेवून उभा राहिलेला दिसतो. समर्थांना मारुती हवा होता तो शत्रूच्या दमनासाठी. आक्रमकावर विजय मिळविण्यासाठी आणि म्हणून समर्थांनी या राक्षसमर्दन मारुतीची स्थापना केली असावी.

बलोपासना वाढविण्यासाठी, शरीर धष्टपुष्ट आणि चपळ होण्यासाठी मारुतीची उपासना आवश्यक आहे, हे जसे समर्थांना अभिप्रेत होते तसेच रामाला मोठे करण्यासाठी हनुमानाने स्वतः च्या सर्व आशाआकांक्षांकडे पाठ फिरवून आपले संपूर्ण जीवन त्याच्या चरणी अर्पण केले. तोच आदर्श नजरेसमोर ठेवून स्वार्थाची कोणतीही भावना मनात न ठेवता महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे म्हणून लढणाऱ्या वीरांनीही व्यक्तिगत आशाआकांक्षांच्या मागे न लागता त्यागी भावनेने वागावे, स्वामीनिष्ठ मारुतीचा आदर्श सर्वांनी मनासमोर ठेवावा, असे तर समर्थांना सुचवावयाचे नसेल?

कुठलेही राज्य टिकावयाचे असेल, मोठे व्हावयाचे असेल तर त्या राज्यासाठी झटणारे लोक निःस्वार्थी असावे लागतात आणि तेवढेच निष्ठावंतही असावे लागतात. आपला स्वार्थ साधतो म्हणून वारंवार निष्ठा बदलणाऱ्या लोकांना इतिहास क्षमा करीत नाही. ते क्षणकाल मोठे होतात, पण त्यांच्या मोठेपणाची जात अळवावरच्या पाण्यापेक्षा फारशी वेगळी नसते आणि निःस्वार्थी, निष्ठावंत अनुयायी जर मिळाले नाहीत तर कोणाचीही राजसत्ता स्थिरपणे राहाणे आणि शाश्वत स्वरूपाचे कार्य तिच्या हातून घडणे दुरापास्तच होत जाते. राम हा जसा कोणत्याही काळात समाजासमोर एक आदर्श उभा करतो तसाच मारुतीसुद्धा कोणत्याही काळात उपयुक्त ठरेल, असा एक आदर्श आपल्यासमोर ठेवतो.

 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (देवाचिये व्दारी पुस्तकामधून)