फाल्गुन पौर्णिमा – होळी पौर्णिमा व धूलिवंदन

प्रल्हादाची आत्या आणि हिरण्यकशिपूची बहीण ढुंढा (हिलाच काहीजण होलिका म्हणतात. ह्याबद्दल मतमतांतरे आहेत.) हिला अग्नीपासून अभय होते. त्यामुळे भावाच्या सांगण्यावरून ती प्रल्हादाला जाळून ठार मारण्यासाठी स्वत:च्या मांडीवर घेऊन बसली. मग तिच्याभोवती लाकडे रचून आग लावण्यात आली. मात्र झाले ते उलटेच! भगवान श्रीविष्णूच्या कृपेमुळे प्रल्हाद सुरक्षित राहिला तर ढुंढा राक्षसी मात्र जळून खाक झाली त्या प्रीत्यर्थ हा होलिकादहन विधी करण्याची प्रथा पडली. (इतरही काही कथा ह्मा होळीसंबंधात सांगितल्या जातात.)

‘होळीची’ अनेक रूपे

संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो. विशेष म्हणजे ओरिसा प्रांतात होळी पेटविण्याची प्रथा अजिबात नाही. तेथे केवळ कृष्णाला पालखीतून मिरवणुकीने गावातून फिरवून आणतात. घरोघरी त्याची पूजा केली जाते. आपल्याकडे मुंबई. कोकण, गोवा ह्या पट्ट्यात होळी ( शिमगा) हा सण म्हणून अतिशय उत्साहाने साजरा करतात. होळीच्या निमित्ताने घरोघरी पुरणपोळी केली जाते. होळीशी संबंधित अशी इतर प्रांतांमध्ये अकराहून अधिक व्रते, विधी केले जातात. काही प्रथा, परंपरा पिढ्यानुपिढ्या मोठ्या निष्ठेने पाळल्या जातात. गुजरातमध्ये ‘ अहली – पहली ‘ ही खास मुलींशी संबंधित प्रथा, ‘ गेडी दडा ‘ हा मुलांचा खेळ, ‘ गोल – गधडो ‘ हा जेस्सावडा तालुक्यातील भिल्लांचा उत्सव होळीपौर्णिमेशी नाते सांगतात. तसेच राजस्थानातील ‘ ढूंढ ‘ आणि  ‘ ढूंढना ‘ हे दोन गोड सोपस्कार नवजात शिशूंशी संबंधित असून ते थेट ढुंढा राक्षसीणीशी म्हणजेच प्रल्हादाच्या आत्तेशी निगडित आहेत. होळी हा जनसामान्यांच्या सण असून तो वर्षातील शेवटचा सण आहे. त्यात धूलिवंदन म्हणजे मातीला, पृथ्वीला नमस्कार करण्याला महत्त्व आहे. होळीला अग्नी पेटविला जातो, तो अग्नी घरी आणून त्यावर स्नानासाठी पाणी तापविण्याची प्रथा होती.

होळीचा दुसरा दिवस धूलिवंदनाचा. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुळवडीचे दिवस असेही म्हणतात आणि फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. या सणाच्या दिवसांत एकमेकांवर रंग उडविण्याची प्राचीन प्रथा असली तरी होळीचा दुसरा दिवस मात्र धूलिवंदनाचाच. होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो आणि दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते, तेच धूलिवंदन. पूर्वी होळीचा अग्नी आपल्या घरी आणून त्या अग्रीवर पाणी तापवून खान करण्याची प्रथा होती. होळी हा जनसामान्यांचा सण आहे आणि त्यात धूलिवंदनाला म्हणजे जमिनीला-मातीला नमस्कार करण्याला विशेष महत्त्व आहे. प्राणिमात्राचा देह ज्या पंचमहाभूतांपासून बनतो त्या पंचमहाभूतांत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असा क्रम आहे. पृथ्वीपासून प्रारंभ होणारे आणि आकाशापर्यंत नाते भिडविणारे हे पंचक आहे.

होळी हा वर्षातील शेवटचा सण. त्या दिवशी भूमातेला म्हणजे पृथ्वीला वंदन करावयाचे आणि त्या दिवसानंतर पंधरवड्याने सुरू होणाऱ्या नवसंवत्सराच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आभाळात उंच उज्ज्वल भविष्याची गुढी उभारावयाची अशी आपली विचारगर्भ परंपरा आहे.

‘ माती असशी मातीस मिळशी ‘ हा सृष्टीचा नियम. आसमंतात जे जळण्यासारखे असेल, त्याग करण्यासारखे असेल त्याचा नायनाट होळीच्या दिवशी व्हावा. मनातील कुविचार, दु:शब्द यांना होळीच्या दिवशी वाट करून द्यावी आणि दुसऱ्या दिवशी पंचमहाभूतांतील पहिल्या तत्त्वाला म्हणजे पृथ्वीला नमस्कार करून आपापल्या कामाला लागावे.’ पृथिवी विश्र्वस्य धारिणी ‘ असे नारायणोपनिषद् म्हणते. तुमचे-आमचे जग हे पृथ्वीपुरतेच मर्यादित आहे.

‘ बहुरत्ना वसुंधरा । ऐसा पदार्थ कैचा दुसरा । । असा सवाल समर्थांनीही विचारला आहे. अवधूताच्या २४ गुरूंपैकी पहिला मानाचा गुरू पृथ्वी हाच आहे. आपण या पृथ्वीच्या आधारानेच जगतो. तीच आपल्याला अन्न, पाणी पुरविते. शेतकरी तर जमिनीला काळी आईच म्हणतो. वर्षातील शेवटच्या पौर्णिमेनंतर लागलीच या भूमातेला कृतज्ञतापूर्वक वंदन करणे आणि ‘ विष्णूपत्नी, नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे ‘ अशी जी प्रात:स्मरणाची प्रार्थना असते ती प्रत्यक्ष कृतीत आचरणे हाच या धूलिवंदनाचा हेतू असावा. नाही तर रंग उडविण्याला विशेष महत्त्व असलेल्या या सणाला ‘ धूलिवंदन ‘ का म्हटले असते. ‘ जननी जन्मभूमिश्र्च स्वर्गादपि गरीयसि ‘ असे रामायणातच म्हटले आहे.

धरतीमातेला वंदन करणारा हा सण म्हणूनच आपल्या मातृभूमीवरील प्रेमाचा, आपल्या देशभक्तीचा द्योतक आहे. या दिवशी जे धूलिवंदन केले जाते, त्याच संदर्भात समर्थांनी आपल्या होळीपंचकात ‘ धुळी टाकिती मस्तकीं ‘ असे म्हटले असेल काय?

 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (धर्मबोध व देवाचिये व्दारी पुस्तकांमधून)