Diabetes – स्वीट, सायलंट किलर

दरवर्षी २५ दशलक्ष व्यक्तींवर हल्ला करणारा हा किलर नेणत्याही पूर्वसूचनेशिवाय तुमच्यावर हल्ला करू शकतो. त्याला ना कोणती जात आहे, ना वय, वंश, ना वर्ण. त्याला संहारक म्हटले जाते, त्याच्या प्रवासात अनेक आजारांना खतपाणी घालणारा आणि त्यामुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना नष्ट करणारा हा आजार. त्यावर योग्य उपचार केले नाहीत तर तो तुमचे प्राण घेऊ शकतो. विचार करा, कोण असेल हा किलर?
त्याला म्हणतात मधुमेह, अशी स्थिती ज्यात रक्तातील साखरेचे प्रमाण अनैसर्गिकरीत्या उच्च पातळीवर असते. या रोगाने ग्रस्त माणसे अनैसर्गिकरीत्या अधिक प्रमाणात मूत्रविसर्जन करतात, त्यामुळे त्यांना अधिक प्रमाणात तहान लागते आणि परिणामी त्यांच्या वजनात मोठ्या प्रमाणावर घट होते.

मधुमेहाची सुरुवात कशी होते?


शरीरातील संप्रेरकांपैकी एक असलेल्या किंवा रासायनिक ‘निरोप्या’ असलेल्या इन्सुलिनच्या निर्मितीतील अक्षमतेचा परिणाम म्हणून मधुमेह होतो. या संप्रेरकाचे काम असते रक्तातील शर्करेला पेशींमध्ये पाठवून नियमित करणे, जिथे, ऊर्जा निर्माण करण्यासाठी ‘इंधन’ या सुयोग्य उपयोगासाठी ती वापरली जाते. इन्सुलिनअभावी, रक्तात शर्करेचे प्रमाण उच्च असूनही शरीरातील पेशींना शर्करेची कमतरता भासते.
टाइप १ – प्रकारचा किंवा बाल्यावस्थेतील मधुमेह हा इन्सुलिनच्या निर्मितीसाठी जबाबदार असणाऱ्या शरीरातील अवयवाच्या निष्क्रियतेमुळे होतो. हा अवयव म्हणजे आणि त्यातील इन्सुलिन निर्मिती करणाऱ्या पेशी नष्ट झाल्यामुळे ही निष्क्रियता येते.

टाइप २ – मधुमेह किंवा वयस्क मधुमेहामध्ये, स्वादुपिंडामध्ये अनेकदा योग्य प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती होते, मात्र शरीरातील पेशी याबाबतीत निष्क्रिय होतात. त्यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते. ही स्थिती अनेकदा वजन वाढण्याला सोबत घेऊन येते आणि त्यामुळे ही समस्या आहार नियंत्रित करून सोडवता येते. त्यामुळे साखरेचे प्रमाण कमी केले जाते. साधारणपणे या आहाराला गोळ्यांच्या स्वरूपात औष धाची जोड दिली जाते. ज्यामुळे स्वादुपिंड सक्रिय होतात आणि अधिक इन्सुलिनची निर्मिती करतात.

मधुमेह- पूर्व स्थिती जाणून घ्या


तुम्ही ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयस्कर असाल, विशेषत : जर तुमचे वजन अधिक असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला मधुमेह-पूर्व चाचण्या करण्याचा सल्ला देऊ शकतात. वजन अधिक असणे, त्याला अक्रियाशीलतेची जोड मिळणे, हे मधुमेह-पूर्व परिस्थितीला कारणीभूत असे महत्त्वाचे घटक आहेत. तुमचे वजन अधिक असल्यास, वय ४५ पेक्षा कमी असेल तरीही मधुमेह पूर्व चाचण्या करून घ्या.

मधुमेह – पूर्व स्थिती म्हणजे तुमच्या रक्तातील ग्लुकोज, ज्याला आपण साखरही म्हणतो, तिचे प्रमाण सामान्यपेक्षा अधिक असते. मात्र त्याला मधुमेह म्हणावे इतके अधिक नसते. ग्लुकोज म्हणजे ऊर्जेसाठी आपल्या शरीरातर्फे वापरल्या जाणाऱ्या साखरेचा प्रकार. रक्तात ग्लुकोजचे प्रमाण अधिक असल्याने कालांतराने तुमच्या शरीराला हानी पोहोचू शकते. तुम्हाला मधुमेह- पूर्व त्रास असेल, तर तुम्हाला टाइप २ प्रकारचा मधुमेह हृदयविकार आणि स्ट्रोकचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

वजन कमी करणे


तुमच्या वजनाच्या किमान ५ ते १० टक्के वजन कमी केल्यामुळे मधुमेह होणे टाळता येते किंवा ते पुढे ढकलता येते किंवा काही वेळा मधुमेह-पूर्व स्थिती परतवूनही लावता येते.

मधुमेहाची गंभीरता


हा आजार दोन कारणांसाठी गंभीर असू शकतो. प्रथमत : इन्सुलिनच्या इंजेक्शनअभावी, तरुण मधुमेही रुग्णाच्या वजनात सातत्याने घट होऊन तो/ती कोमात जाऊ शकते किंवा त्यांचा मृत्यू ओढवू शकतो. दुसरे म्हणजे, मधुमेहामुळे अनेक प्रकारची गुंतागुंत होऊ शकते – म्हणजेच, त्यांच्या या स्थितीमुळे नव्या तक्रारी उद्‌भवू शकतात.
स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर, रक्तातील साखरेचे प्रमाण जितके नियंत्रित केले जाईल तितकेच गुंतागुंत होण्याची शक्यता कमी. सर्वात गंभीर गुंतागुंत म्हणजे, या आजाराचा रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन डोळे आणि मूत्राशयावर परिणाम होतो. साधारणपणे, बराच काळ मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णाच्या डोळ्यांतील रक्तवाहिन्यांमध्ये बदल दिसून येतो, आणि काही रुग्णांमध्ये, ही स्थिती अधिक घातक बनून अगदी रुग्णाची एका किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी जाण्यापर्यंत परिणाम होतो.
त्याचप्रमाणे, इतर अनेक त्रासाबरोबरच मधुमेह रुग्णाच्या नसांमध्येही पोहोचू शकतो. त्यामुळे, हात किंवा पायामधील संवेदना नष्ट होऊ शकतात. अंतिमत : मधुमेहामुळे दुर्दैवाने धमन्यांना इजा पोहोचण्याची शक्यता असते, त्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. या कारणामुळे, मधुमेहींना विशेषत : धूम्रपानापासून दूर राहण्यास सांगितले जाते, कारण त्यामुळे धमन्यांचे विकार बळावण्याची शक्यता असते.

मोजमापाचे तंत्र


काळजीपूर्वक आखलेले इन्सुलिन इन्जेक्शन्सचे वेळापत्रक आणि कर्बोदकाचे नियमित सेवन याबरोबरच अनेक मधुमेही त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी काही मोजमाप तंत्र वापरतात. विशेष टेस्टिंग स्टिक्सच्या साह्याने रक्तातील साखरेची पातळी थेट तपासता येते. या स्टिकमध्ये साखरेला प्रतिसाद देणारी रसायने असतात आणि बोटाला फक्त बारीकसे टोचून रक्त घेतले जाते.

मधुमेहामुळे कोमात जाण्याची कारणे


मधुमेह कोमा ही एक दुर्दैवी संकल्पना आहे, जी दोन अगदी वेगवेगळ्या परिस्थितीसाठी वापरली जाते. हायपोग्लिकेमिया यात रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याने शुद्ध हरपते. हायपोग्लिसेमियामध्ये इन्सुलिनवर आधारित मधुमेह होऊन रक्तातील साखरेची पातळी वाढते.
या दोन्ही परिस्थितींमध्ये लोकांचा गोंधळ होत असला तरी या दोन्हींमध्ये फरक आहे, हे स्पष्टच आहे.? ‘ हायपो ‘ अटॅकमध्ये हा त्रास अगदी काही मिनिटांमध्ये होऊ शकतो आणि त्यावर फक्त साखर खाऊन नियंत्रण मिळवता येते. तर, साखरेची उच्च पातळी असल्यास हा त्रास होण्यास काही तास किंवा दिवस जाऊ शकतात आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठीही वेळ लागतो. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे साखरेची पातळी वाढल्यास पेशींना इंधनाची कमतरता भासते. या पेशींना जिवंत राहण्यासाठी ऊर्जा मिळविण्यासाठी काहीतरी जाळावे लागते आणि त्यामुळे त्या चरबी जाळण्यास सुरुवात करतात. चरबीच्या वापरातून केटोन्स हा टाकाऊ पदार्थ तयार होतो आणि केटोन्सच्या वाढत्या प्रमाणामुळे रक्तातील आम्लांची पातळी वाढते. ही परिस्थिती इन्सुलिनच्या साहाय्याने पूर्ववत न  केल्यास मृत्यू ओढवू शकतो.


  – डॉ. प्रदीप गाडगे ( कालनिर्णय आरोग्य | डिसेंबर २०१६) 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.