अॅप…तुमचा फोन खरंच स्मार्ट करण्यासाठी!

व्हॉट्‌स अॅपवरच्या टवाळक्या, कँडी क्रश, टेम्पल रन अशा मोबाईल गेम्सची लागलेली सवय, इअर फोनमुळे इतरांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अनेक घरांत स्मार्ट फोन हा चिडचिडीचा, वैतागाचा विषय झाला आहे. हा त्रागा काहीसा खरा असला तरी स्मार्ट फोनमध्ये यापेक्षा बरेच काही आहे. तो इतका उपयोगी आहे की, तुमचा हक्काचा, फुकटचा सेक्रेटरीच जणू! तुम्हाला थोडीफार कल्पना आली असेल, की ही विषयाची गाडी अॅप्सकडेच जाणार आहे. पण, होते काय की अनेकदा आपल्याला उपयोगी पडणाऱ्या अॅप्सबद्दल माहिती तरी नसते किंवा समोर एवढी अॅप्स असतात की हे निवडू की ते, असे होऊन जाते. अनेकदा तर वाट्टेल तशी अॅप्स डाऊनलोड केल्याने फोनची मेमरी तर कमी होतेच पण त्याच्या स्पीडवरही परिणाम होतो. म्हणूनच दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील अशी काही निवडक, मोजकी आणि चकटफू अॅप्सची माहिती इथे देत आहोत. आजकाल बहुतेक लोकांकडे अँड्रॉईड फोन असल्याने अँड्रॉईड मार्केटवर मिळणाऱ्या अॅप्सची माहिती देत आहोत. अर्थात, खालील बहुतेक अॅप्स अॅपल आयफोनसाठीही उपलब्ध आहेत.

एक्स्पेन्स मॅनेजर (Expense Manager)

विसरा तुमची हिशोबाची वही! मोबाईलवर आणा हे एक्स्पेन्स मॅनेजर अॅप.

या अॅपमुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या जमाखर्चाचा आठवड्याचा, महिन्याचा आणि अर्थातच वर्षाचा हिशोब ठेवू शकता. पेपरवाला, दूधवाला, लाँड्री, दैनंदिन भाजी, वस्तूखरेदी, कामवाल्याबाई अशा ठराविक आणि अन्य खर्चांच्या नोदींची इथे सोय आहे. या सर्वांचा हिशोब तुम्हाला हव्या त्याप्रकारे मिळू शकतो. इतकेच काय, पण टेलिफोन, वीज बिल, घरकर्जाचे हप्ते भरण्याची पूर्वसूचनाही हे अॅप तुम्हाला देते.

हेल्थकार्ट प्लस (Healthcart Plus)

हे अॅप म्हणजे आधुनिक आजीबाईंचा बटवा आहे.

या अॅपद्वारे तुम्हाला विविध आजारांवरील औषधांची फक्त माहिती मिळते असे नाही, तर जेनेरिक म्हणजे संबंधित औषधे ब्रँडेड कंपन्या सोडता, तेच औषध अन्य कोणत्या कंपनीकडून स्वस्त उपलब्ध आहे, याचीही माहिती मिळते. औषधांमधील घटक, गुणधर्म, घेण्यासंबंधीची काळजी हेही इथे पाहायला मिळते. प्रिस्क्रिप्शऩ अपलोड करून औषधे घरी मागविण्याची सुविधाही इथे आहे. एक काळजी मात्र नक्की घ्या, की आरोग्यासंबंधीच्या कोणत्याही माहितीचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा.

मराठी रेसिपीज बुक (Marathi Recipes Book)

या अॅपला ‘चव’ आहे! अहो, म्हणजे हे अॅप तुम्हाला किचनमध्ये मदत करणारे आहे.

अॅपचे नाव जरी मराठी रेसिपीज बुक असले तरी भारतीय पाककृतीचे असंख्य प्रकार इथे तुम्हाला मिळतील. आपल्या जेवणातल्या प्रत्येक पदार्थासाठी इथे सेक्शन आहे. ज्यात त्या पदार्थाचे अनेक प्रकार दिले आहेत. उदा. आमट्या, कढी, कोशिंबिरी, चटण्या, न्याहारी, पोळ्या- भाकऱ्या, भाज्या, भाताचे प्रकार आणि मराठी पदार्थांचा वेगळा सेक्शनही! चटण्यांच्या शौकिनांसाठी तर इथे पर्वणीच आहे.

फॅमिली जीपीएस ट्रॅकर किड्स कंट्रोल (Family GPS tracker Kid Control)

आपल्या मुलांबाबत पालकांना सतत चिंता असते. आपली मुले कुठे जातात, काय करतात, त्यांचे मित्र कोण आहेत अशा अनेक प्रश्नांनी पालक चिंताग्रस्त असतात. हे अॅप यासाठीच आहे. फॅमिली जीपीएस ट्रॅकर किड्स कंट्रोल ह्या अॅपच्या माध्यमातून तुम्ही आपल्या मुलांवर लक्ष ठेवू शकता. हे अॅप मुलाच्या आणि पालकांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले जाते. ह्या अॅप्स अॅपच्या माध्यमातून तुमचा मुलगा कोठे जातो, त्याचे मित्रमंडळी कोण आहेत, त्यांच्यात काय चर्चा होते, या सर्वांची माहिती मिळते.

याशिवाय तुमचा मुलगा जर का कोणत्या संकटात सापडला असेल त्याचीही माहिती या अॅपच्या माध्यमातून मिळते. संकटकाळात या मधील अलार्म बटन दाबले की त्याचे ठिकाण आणि त्याचा संदेश पालकांपर्यंत पोहोचतो.

मराठी डिक्शनरी (Marathi Dictionary)

हे अॅप कॉलेज करताना का मिळाले नाही? असेच तुम्ही म्हणाल कारण, शब्द मराठी असो की इंग्रजी त्याचा अर्थ दोन्ही भाषेत देणारे हे अॅप भन्नाटच आहे. महत्त्वाचे म्हणजे हे अॅप वापरण्यासाठी इंटरनेट सुरू असण्याची गरज नाही. ऑफलाईनही या अॅपचा वापर तुम्ही करू शकता.

कालनिर्णय अॅप (Kalnirnay)

मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबर अन्य भाषांमध्येही हे उपयुक्त अॅप मोफत उपलब्ध आहे. या अॅपमध्ये तुम्हाला महिन्याचे भविष्य पाहायला मिळते. महत्त्वाच्या तारखा व नोंदीसुद्धा करता येतात. त्याचबरोबर वैयक्तिक यादीदेखील तयार करू शकता. दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त असे हे अॅप आहे.

मराठी न्यूज डेली पेपर्स (Marathi News Daily Papers)

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मराठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांना एकाच ठिकाणी पाहण्यासाठी हे अॅप अत्यंत उपयोगी आहे. या विनामूल्य अॅपमुळे बातम्या वाचनाची मोठीच सोय झाली आहे. या अॅपमध्ये आवडीच्या विषयाच्या बातम्या निवडणे, नंतर वाचण्यासाठी बातम्या साठवून ठेवणे, सात दिवसांपर्यंतच्या बातम्या उपलब्ध असणे अशी उपयोगी वैशिष्ट्य आहेत.

या शिवाय आज जवळपास सर्वच बँका, सरकारी कार्यालये, सरकारी सेवा, कंपन्या, हॉटेल्स, मल्टिप्लेक्स यांनी आपापली अॅप्स सुरू केली आहेत. सर्व अॅप्स विनामूल्य आहेत. अॅप्सचा जास्तीत जास्त चांगला वापर करण्यासाठी तुमचा स्मार्टफोन जेवढा जास्त लेटेस्ट आणि मेमरी, प्रोसेसरबाबतीत दर्जेदार असेल तितका चांगला. ही अॅप्स जरी असली तरी मोबाईलवर डाऊनलोड करताना अनेक प्रकारच्या परवानग्या त्यांना द्याव्या लागतात. तेव्हा, त्यांच्या वापराच्या अटी आणि नियम वाचून मगच त्यांचा वापर करावा.

तुम्हाला ही अशी  दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी अॅप्स ठाऊक असल्यास कमेंट बॉक्समध्ये त्याचे नाव व लिंक इतरांसाठी नक्की शेअर करा.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.