Fathers Day | Kalnirnay Blog

जन्म बाबाचा

पूर्वी वडिलांची भूमिका सुरू व्हायची ती शाळा प्रवेशापासून. शाळा प्रवेश, शाळेची फी, प्रगती पुस्तकावर सही करणे आणि शिक्षणासाठी पैसा पुरविणे ही कामे वडील करायचे. पण कालांतराने सामाजिक, कौटुंबिक परिस्थिती बदलली आणि आईसुद्धा चाकरीच्या निमित्ताने ‘घराबाहेर’ पडू लागली. बाबांच्या इतकीच तीही बिझी होऊ लागली, तेव्हापासून दोघांच्या जबाबदाऱ्या बदलल्या. मुलांना पाळणाघरात सोडण्यापासून ‘डॅड पेरन्टिंग’ची सुरुवात झाली.

आईच्या उदरात वाढणारे मूल ही भावनिक पातळीवरची गुंतागूंत असते तर वडिलाच्या डोक्यात व्यावहारिक पातळीवरची विचार प्रक्रिया सुरू होते. आमच्या लहानपणी बाबांचा प्रचंड धाक वाटायचा, पण आजकाल मी आजूबाजूला जी मुले पाहतो त्यांच्यासाठी त्यांचा बाबा जिवलग मित्र झालेला असतो इतक्या वर्षांत या ‘बाबा’ मध्ये केवढा फरक पडला आहे. तुम्ही तुमचे वडील आठवून पाहा आणि आता नुकताच ‘बाप’ झालेल्या तुमच्या ओळखीतल्या तरुणाला आठवून पाहा. ‘बाबा’ किती बदलला आहे, हे तुम्हाला आपोआपच कळेल.

डॅड पेरन्टिंग चे महत्त्व

आजकाल वडिलांची भूमिका ही खरोखरच आईइतकीच महत्त्वाची ठरू लागली आहे. पितृसत्ताक पद्धती आपल्याकडे असली तरी आता पिता हा केवळ घरात सत्ता गाजविणारा राहिला नसून घरातील इतर जबाबदाऱ्याही समर्थपणे पेलू लागला आहे. ‘बाबा’च्या भूमिकेत आता अनेक स्वागतार्ह बदल घडू आहेत. पूर्वी ‘बाळाच्या जन्मानंतर सगळी जबाबदारी आईकडे सुपूर्द केली जायची. भरवणे, अंघोळ घालणे, दुखले-खुपले बघणे, अंगाई गाऊन झोपवणे, एवढेच नाहीतर अभ्यासाचे दिवस सुरू झाले की शाळेतील पालक सभेला हजर राहण्यापासून ते गृहपाठ करून घेण्यापर्यंत इत्यादी अनेक कामांत आईचा दिवस निघून जायचा. ती चाकरी करणारी असली तर तिची तारेवरची कसरत असायची. पण आता चित्र बदलू लागले आहे. बाळाच्या आजारपणात एक-दोन दिवसांची सुट्टी आता बाबाचीही असते आणि शाळेच्या पहिल्या दिवशी सोडायला येणाऱ्या पालकांमध्ये, पेरन्ट्स मीटींग्ज ‘अटेन्ड’ करण्यामध्ये बाबांची संख्याही आता वाढू लागली आहे. ‘डॅड पेरन्टिंग’ चे महत्त्व आणि गरज ओव्या खासगी कंपन्यांमध्ये तर आजकाल बाळाच्या जन्मानंतर या ‘ नव्या ‘ बाबासाठीही एक महिन्याच्या सुट्टीची खास तरतूद असते.

बाबांच्या आधी सकाळी आई घराबाहेर पडू लागल्यामुळे बाबांची नवीन ड्युटी सुरू झाली. ‘डॅड पेरन्टिंग’ हा नवीन शब्द आईबाबांच्या शब्दकोशात येऊन दाखल झाला. घरोघरी हा विषय फावल्या वेळात चर्चिला जाऊ लागला. ऑफिसच्या कॉमन रूममध्ये या विषयी चर्चा होऊ लागल्या. त्याच्या पुढची पायरी म्हणजे खास महिलांसाठी असणाऱ्या मासिकातून ‘डॅड पेरन्टिंग ‘बाबत भरभरून लिहून यायला लागले. मग वेगवेगळे सेलिब्रेटिज आपण कसे ‘डॅड पेरन्टिंग’ करतो याबाबत सचित्र माहिती अभिमानाने सांगू लागले. वर्तमानपत्रांनी दर रविवारी या विषयाचे रकानेच्या रकाने नांगरून काढले.

संसारातील सुवर्णमध्य

‘जरा बघ गं यांच्याकडे/हिच्याकडे’ किंवा ‘जा आईला जाऊन सांग’ ही वाक्ये आता बदलू लागली आणि आधुनिक बाबा ‘काय हवंय तुला, ममा कामात आहे ना, मला सांग ‘ या वाक्यांत परावर्तित होऊ लागली. बदललेल्या जीवनशैलीमध्ये भलेमोठे वेगवेगळे मासिक हप्ते फेडण्यासाठी दोघांना अधिकाधिक वेळ काम करणे भागच आहे. हा झाला एका घरातला कॅनव्हास. तर दुसऱ्या घरातल्या आई बाबांनी सुवर्ण मध्य गाठण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दोघांची कामे वाटून घेण्यावर आणि समजून-उमजून पूर्ण करण्यावर भर दिला. यातूनच ‘डॅड पेरन्टिंग’ ही संकल्पना विस्तृत होत गेली. ऑफिसात दोघेही मिळून काम करतात, सारखेच पैसे कमावतात. मानसिक, भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या दोघेही सारखेच थकतात. घर दोघांचे असल्याने घरातील कामे ही दोघांनी मिळनच करायची ही संकल्पना रुजली. मग त्यात पालकत्वाचा भाग अपरिहार्य होता. विशेषत: मुलाचे उरकताना ‘हे काम माझे आणि हे काम फक्त तुझे ‘ असे न करता ‘बाबा ‘ बाळाचे शी-शूचे कपडे बदलण्यापासून ते त्याला स्वच्छ करण्यापर्यंत, त्याच्यासाठी खाऊ तयार करून भरविण्यापर्यंत सगळी कामे आनंदाने करू लागला. बाळाची अंघोळ असो की त्याच्यासाठी दूध गरम करून ते बाटलीत भरून देणे असो-एकमेकांना कामात मदत करीत. मुलांचे बालपण आपणही एन्जॉय करायची मानसिकता आली. यातूनच बाबा आणि मुलांमधील भावनिक जवळीक वाढते आणि बाबाबद्दलचा दरारा मित्रत्वाच्या नात्यात बदलतो आहे. पूर्वी वडिलांची चप्पल मुलाला होऊ लागली की वडील-मुलात मित्रत्वाचे नाते निर्माण व्हायचे, पण ‘डॅड पेरन्टिंग’मुले आता चप्पल प्रमाण मानण्याची गरज उरली नाही.

स्त्री-पुरुष यांच्यात निसर्गत: जे भावनिक, मानसिक वेगळेपण असते ते तर विज्ञानानेसुद्धा सिद्ध केले आहे. मातृसुलभ भावना स्त्रीच्या ठायी उपजत असते तर घराचे, कुटुंबीयांचे पालन पोषण चागल्या प्रकारे करण्यासाठी आवश्यक मानसिकता पुरुषाच्याठायी असते. पण परिस्थिती आणि आजूबाजूचे संदर्भ बदलले, तशा दोघांच्या सांसारिक भूमिका बदलत गेल्या.

बाबा – हक्काचा मित्र

‘डॅड पेरन्टिंग’ या शब्दाचा अर्थ खूप खोल आहे. या संकल्पनेचा आयाम मोठा आहे. ‘डॅड पेरन्टिंग’ म्हणजे केवळ नॅपी बदलणे नाही  तर मुलांशी वडिलांची मैत्री होणे, आईच्या मध्यस्थीशिवाय वडिलांशी कुठल्याही विषयावर बोलता येणे, संकट समयी आईइतकाच वडिलांचा ( धाक कमी) आधार वाटणे, चुकीची कबुली वडिलांपाशी देता येईल असे बंध दोघांमध्ये निर्माण होणे, कधीही वडिलांच्या जवळ जाता येईल, हितगुज करता येईल, मनातले सांगता येईल हा विश्वास मुलांच्या मनात निर्माण होणेहा सुद्धा ‘डॅड पेरन्टिंग’चाच भाग आहे. एकमेकांना गुणदोषांसकट स्वीकारणे म्हणजे ‘डॅड पेरन्टिंग’. हे करायला कठीण वाटेल पण अशक्य मात्र नाही. बाबा म्हणजे धाक नाही तर बाबा म्हणजे हक्काचा मित्र.

काही घरात कामांना लेबलिंग  केलेले असते.  म्हणजे ही कामे पुरुषांची तर ती कामे फक्त बायकांची. प्रश्न इथेच निर्माण होतात. ‘डॅड पेरन्टिंग’ म्हणजे केवळ मुले वाढविणे किवा सजगपणे मुलाचे संगोपन करणे, पुरुषांनी स्वयंपाकघरात काम करणे इतकाच मर्यादित नाही. मुलाना गुणदोषांसकट स्वीकारत, त्यांचा आत्मसन्मान राखत त्यांच्यासोबत एक पाऊल पुढे जाणे हे होय. आपला घरातील सहभाग आणि सहवास याचे महत्त्व आजच्या बबाबांनी ओळखलंय आणि म्हणूनच जेव्हा ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हे गाणे लागते तेव्हा तो बाबाही हळवा होतो. प्रेमात लेबलिंग नाही आणि तुझे-माझे तर नाहीच नाही. जे काही आहे ते आपलेच.

तरच ‘डॅड पेरन्टिंग’ खऱ्या अर्थाने आनंददायी होईल!

 – राजीव तांबे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.