धर्म जागृती आणि देशभक्ती (समर्थ स्मरण : २)

समर्थांनी प्रभुरामचंद्र आणि महाबली हनुमान यांचा आदर्श लोकांसमोर ठेवला त्याच्यी सर्व कारणे आपल्याला या घडीला समजू शकली नाहीत. या  काळात राम आणि हनुमंताचा आदर्श हा आवश्यक होता एवढे आपण ठामपणे म्हणू शकतो,कारण रामाने देवांना रावणाच्या कैदेतून मुक्त केले. कर्तव्यपालनासाठी सर्व प्रकारच्या ऐहिक सुखांकडे पाठ फिरवून हा मर्यादापुरुषोत्तम विविध प्रकारचे कष्ट आनंदाने सोसत राहिला.

समर्थांच्या काळात विलासी यवन राजे आणि त्यांच्या पदरी असलेले हिंदू सरदार, दरकदार हे कर्तव्य भावना विसरून केवळ ऐषारामात मग्न होते. आजचा दिवस आनंदात घालवावा एवढीच कोती दृष्टी बाळगून कर्तृत्वसंपन्न पराक्रमी मराठे  वीर मोगलांची हांजी हांजी करण्यात धन्यता मानीत होते. त्यांच्यामधील स्वाभिमानाचा लोप झाला होता. अशा वेळी रामाचा आदर्श तर उपयुक्त होताच, पण सत्यासाठी झगडणाऱ्या आणि देवाधर्माच्या रक्षणासाठी लढणाऱ्या, तसेच प्राणपणाने दुर्जनांचे पारिपत्य करू इच्छिणाऱ्या लोकनायकाचे दास्यत्व पत्करल्यानंतर स्वतंत्र अधिकाराची अपेक्षा न बाळगता किंवा स्वत:चे राज्य निर्माण करण्याची आकांक्षा न ठेवता प्रभूची सेवा हेच सर्वस्व असे मानणारा हनुमान हासुद्धा तेवढाच आदर्श होता. राजकारणात स्वार्थी हेतूने रोज पक्षांच्या टोप्या बदलणाऱ्या मतलबी पुढाऱ्यांसमोर आजही हनुमंताचा आदर्श असता तर किती बरे झाले असते!

स्वामीनिष्ठा व त्याग यांचा आदर्श – दासमारुती

हनुमंताने मनात आणले असते तर त्याला किष्किंदेचे राज्यही सहज मिळाले असते. त्याने मनात आणले असते तर त्याला आणखीही विविध प्रकारे सत्ता संपादन करता आली असती. तेवढे शरीरबळ आणि बुद्धिबळ हनुमंतापाशी निश्चित होते. पण आपले हे सर्व सामर्थ्य, सर्व शक्ती त्याने रामाच्या चरणी वाहिली आणि राम यशस्वी व्हावा, रामाने हाती घेतलेल्या कार्यात त्याला मनाजोगे यश मिळावे म्हणून हनुमंत वीरमारुतीचा दासमारुती झाला. स्वामीनिष्ठा आणि त्याग या दोन गोष्टींचा एवढा उच्च आदर्श दुसरीकडे कुठे मिळणार? श्रीराम आणि हनुमान ही दोन दैवते जनसामान्यांसमोर ठेवण्यात त्या काळच्या परिस्थितीच्या हिशेबाने समर्थांनी फार मोठी दूरदृष्टी दाखविली यात शंका नाही. रामाचे आकर्षण समर्थांना प्रथमपासूनच होते. लौकिक अर्थाने समर्थांना कोणी परंपरागत गुरू नाही, त्यांना प्रत्यक्ष रामाकडूनच मंत्रदीक्षा मिळाली असे नमूद आहे.

समर्थ नाशिकच्या पंचवटीत पुर:श्र्चरणासाठी राहिले हेही आपणास माहीत आहे. वयाच्या बाराव्या वर्षी विवाहाच्या बोहल्यावरून पळाल्यानंतर समर्थांनी नाशिक गाठले ते मनात कोठेतरी असलेल्या रामाबद्दलच्या श्रद्धेपोटी आणि आकर्षणापोटीच असले पाहिजे, याबद्दल संदेह बाळगण्याचे कारण नाही. पंचवटीच्या परिसरात बारा वर्षे म्हणजे एक तप व्यतीत केल्यानंतर दुसरे तप समर्थांनी तीर्थयात्रा करण्यात घालविले. या काळात समर्थ गावोगाव फिरत असतांना समाजजीवनाचे बारकाईने निरीक्षण करीत असले पाहिजेत. हे आपण समजू शकतो. कारण समर्थांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीची जी जबरदस्त छाप दासबोधात दिसते ती पाहाता आपल्या परिभ्रमण काळात समर्थ बारकाईने समाजनिरीक्षण करीत होते. समाजाच्या सुखदुःखाची आपल्या मनःपटलावर नोंद करीत होते. ह्या समाजाला योग्य मार्गावर आणले पाहिजे. ह्याला काहीतरी सांगितले पाहिजे ह्या गोष्टीची तळमळ, कळकळ समर्थांना स्वस्थ बसू देत नव्हती.

आपल्या मनातला महाराष्ट्र प्रत्यक्षात यावयाचा असेल तर त्यासाठी धर्मजागृती आणि देशभक्ती या दोन्ही गोष्टींचा आधार घेतला पाहिजे. राम आणि हनुमान ह्या दोन दैवतांचा आदर्श समाजासमोर ठेवणे त्यासाठी उपयुक्त, तसेच आवश्यक आहे, असा समर्थांचा दृष्टिकोन असला पाहिजे.

(क्रमश:)

 ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर ( आनंदाचा कंद , देवाचिये द्वारी : भाग ४ मधून )

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.