Samarth Smaran 5

समर्थांचा शिष्यपरिवार (समर्थ स्मरण :५)

उपलब्ध माहिती, कागदपत्रे यांच्या साहाय्याने समर्थभक्त कै. शंकर श्रीकृष्ण तथा नानासाहेब देव यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, समर्थ एकूण १०२९ गावी गेले होते. ज्या काळी वाहनांची, रस्त्यांची सोय नव्हती, त्या काळी समर्थांनी केलेले हे भ्रमण आहे. लोक काशी-रामेश्वराच्या तीर्थयात्रेला निघतांना घरच्यांचा निर्वाणीचा निरोप घेत. तीर्थयात्रेवरून जिवंत परत येणे हे त्या काळी जवळजवळ अशक्यच मानले जाई. अशा काळात समर्थ स्वत: निर्भयपणे हिंडले आणि त्या वेळी ज्यांच्याशी संपर्क आला त्यांना निर्भयतेचे धडेही त्यांनी दिले.

विशेष गोष्ट म्हणजे ह्या सर्व गावी त्यांनी मठ स्थापन केले. समर्थांचे एक प्रमुख चरित्रकार गिरिधर ह्यांनी समर्थांचे रुद्रशत म्हणजे ११०० मठ होते असे म्हटले आहे. त्यापैकी फारच थोडे मठ सध्या अस्तित्वात आहेत, असे सुमारे ६५ वर्षांपूर्वी नानासाहेब देवांचे मत होते. एकंदरीत बघता, संपूर्ण महाराष्ट्रच त्या वेळी जणूकाय समर्थमय झाला होता. समर्थांचे वैराग्य, बुद्धिमत्ता, वागणे, बोलणे, ईश्वरभक्ती, राष्ट्र-उभारणीची तळमळ या साऱ्या गोष्टींनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अलौकिक झळाळी प्राप्त झाली होती. समर्थांचे काही प्रमुख शिष्य आणि शिष्या आपल्याला माहीत आहेत. ‘ समर्थप्रताप ‘ कर्ते गिरिधर गोसावी हे समर्थांचा सहवास लाभलेले एक प्रमुख शिष्य. त्यांनी स्वतःचीच साक्ष देऊन

आक्का पिढ्या समर्थे देखिल्या । पूर्वावतारें किती जाल्या । चंद्र सूर्ये असतील मोजिल्या । वज्रदेहपरंपरा । ।

असे म्हटले आहे. समर्थांनी आपल्या संप्रदायाचा वृक्ष चारी अंगांनी बहरलेला पाहिला होता, असे म्हणतात. म्हणजे काय? तर आपल्या संप्रदायाच्या पुढच्या अकरा पिढ्यांचे पुरुष समर्थांनी ह्याचि देही, ह्याचि डोळा पाहिले होते. त्यांच्या हयातीतच त्यांच्याकडून अनुग्रह घेऊन एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला अशा रीतीने दहाव्याने अकराव्याला अनुग्रह दिला होता. असे असले तरीही त्यांचा सततचा दीर्घ सहवास लाभूनदेखील गिरिधर गोसावी यांनाही समर्थांचे सर्व शिष्य माहीत नव्हते.

ते सांगतात, समर्थे कित्तेक गुप्त शिष्य केले । ते ते समर्थांसी विदित भले । । म्हणजे समर्थांनी गुप्तपणे कितीजणांना शिष्य म्हणून अनुग्रहित केले ते एक समर्थच जाणोत. त्यामुळेच एकवेळ आकाशातील तारे मोजता येतील, पण समर्थांचे शिष्य मोजणे कठीण, असे गमतीने म्हटले जाई. समर्थांची सावली बनून वावरलेले त्यांचे पट्टशिष्य कल्याणस्वामी यांनादेखील हे सारे समर्थ शिष्य मोजता आले नाहीत. एकदा गडावर उपस्थित मंडळींमध्ये त्या काळच्या समजुतीप्रमाणे पुत्र नसला तर स्वर्ग नाही या लोकसमजावर चर्चा चालली होती. इथे तर समर्थ बोहल्यावरून पळून गेलेले. मूर्तिमंत वैराग्याचा पुतळाच. संततीचा प्रश्नच नाही. तेव्हा ह्यांना आता स्वर्ग कसा मिळणार?

मंडळी विचारात आणि काळजीत पडली असतांनाच अचानक एक बातमी आली की, महंतपदी असलेला समर्थांचा एक शिष्य सातारच्या किल्यापासून लोटांगणे घालीत समर्थांच्या दर्शनाला येत आहे. तो येऊन पोहोचल्यावर त्या चिंतातुर मंडळींसमोर समर्थांनी त्या महंताला ‘ तू कितव्या पिढीचा? ‘ म्हणून विचारले. तेव्हा त्याने ‘ मी अकराव्या पिढीचा ‘, असे उत्तर दिले. ते ऐकून ती मंडळी खजील झाली. शिष्यपरंपरा ही जणू आपल्या वंशाचीच परंपरा असते, हे समर्थांनी जाणवून दिले.

एवढा सारा संप्रदायाचा परिवार नीट सांभाळावयाचा, चालवावयाचा म्हणजे शिस्त ही हवीच. म्हणूनच मनाने लोण्यासारखे मऊ असूनही समर्थांची शिस्त कडक होती. शिस्तभंग झाल्यास ते शिष्यांवर रागावत क्वचित शिक्षाही देत. याला अपवाद होता तो केवळ कल्याणस्वामींचा. कल्याणस्वामी समर्थांचा प्रत्येक शब्द इतक्या तत्परतेने झेलीत की, त्यांनी आपल्यावर रागावण्याची वेळच समर्थांवर कधी येऊ दिली नाही. समर्थांनी आपल्या शिष्याला तूं मज सिंहाचे पिलू असे कौतुकाने म्हटले असल्याची नोंद आहे. हे पिल्लू नक्की कल्याणस्वामीच असणार, यात काय शंका?

  – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर ( आनंदाचा कंद , देवाचिये द्वारी : भाग ४ मधून )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.