कला | lack of communication | media and communication | great communication skills | effective speaking | dialogue between two friends

संवाद: पंधरावी विद्या आणि पासष्टावी कला! | मुग्धा गोडबोले | Dialogue: 15th Grade and 65th Art | Mugdha Godbole

संवाद: पंधरावी विद्या आणि पासष्टावी कला!

भाषा ही भावना आणि विचार मांडण्यासाठीचे मूलभूत साधन आहे. जे सोपे असते, ते लोकप्रिय होते. लिहिण्यापेक्षा बोलणे सोपे आणि नैसर्गिकही. त्यामुळे अर्थातच, ‘बोलण्याचा’ प्रसार फारच झपाट्याने झाला असावा. पण बोलणे वाढले किंवा विस्तारले, ह्याचा अर्थ प्रत्येकाला ‘संवाद’ साधता येऊ लागला असे अजिबात नाही. किंबहुना ‘संवादाचा अभाव’ किंवा ‘lack of communication’ हा सध्याच्या जगातला जवळजवळ सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. जग जवळ आलेय, communication  ची साधने अमर्याद वाढली आहेत. माणसे जवळ आली आहेत, पण ‘संवाद’ वाढलेला नाही. कारण त्यासाठी मुळात इच्छा असावी लागते आणि संवाद साधण्याची एक विशिष्ट हातोटी किंवा कौशल्य असावे लागते.

‘जी आनंद देते, ती कला,’ अशी कलेची साधी व्याख्या संस्कृत पंडितांनी करून ठेवली आहे. बोलण्यातून माणसाला बऱ्याचदा किंवा मुळात, आनंद मिळण्याची अपेक्षा असते. पण चांगले संभाषण किंवा संवाद साधता येणे ह्यालाही साधना लागते. म्हणून ‘संभाषण किंवा संवादकला’ असे शब्द प्रचलित झाले असावेत. जगातली कुठलीच कला कुणालाच पूर्णपणे आत्मसात होत नाही. आपण फक्त प्रयत्न करत असतो, शिकत असतो. कला हे एक असे शिखर आहे, जे कधीच सर करता येत नसते. संवादकलेचेही असेच आहे. ह्याला काही नियम नाहीत, पण काही ठोकताळे नक्कीच आहेत. आपल्याकडे ज्या चौसष्ट कला मानल्या जातात, त्यात ‘शब्द-छंद यांचे ज्ञान असणे’, ‘दुसऱ्यांवर विजय मिळवणे’, ‘लहानथोरांचे मनोरंजन करणे’, ‘पशुपक्ष्यांशी बोलणे’, ‘विविध भाषांवर प्रभुत्व असणे’ अशा अनेक कलांचा उल्लेख आढळतो. पण ह्या सगळ्यांचा मिळून एक परिपाक, म्हणजे ‘संवाद’ ह्याला काही पारंपरिक ग्रंथांमध्ये तरी, कलेचे स्थान मिळालेले नाही. खरे तर संवाद साधता आला तर आपण समोरच्याला जिंकून घेऊ शकतो, मनोरंजन करू शकतो आणि बरेच काही. पण तरी ह्याला कलेचे स्थान का नसेल दिले गेले?

तर मुळात, बोलणे म्हणजेच संवाद साधणे हा समज चुकीचा आहे. बोलणे ही एक क्रिया आहे. ‘संवाद’ ह्यामध्ये बोलणे, ऐकणे आणि समजून घेणे, ह्या तीन गोष्टी अभिप्रेत आहेत. बोलणे संपूर्णपणे एकतर्फी असते, तर संवादामध्ये दोघांची गरज असते. मग ती एकाच माणसाची दोन मने, दोन प्रतिमासुद्धा चालतात. ‘एक मन असे म्हणतेय आणि दुसरे मन असे म्हणतेय’ अशा अर्थांनी थोडी नाटकी वाक्ये आपण जुन्या काळच्या कथा-कादंबऱ्या-चित्रपटांमध्ये ऐकली व वाचली आहेत. थोडक्यात, दोन भिन्न विचार एकमेकांशी संवाद साधताहेत! चांगले, प्रसंगाला साजेसे, सुसूत्र, मोजके, समजायला सोपे आणि नेमके बोलणे हे फार मोठे कौशल्य आहे. ज्याला हे साध्य होते त्याला माणसे साध्य होतात. ह्यासाठी स्वतःवर आणि स्वतःच्या विचारांवर, भावनांवर ताबा मिळवणे गरजेचे असते. अर्थातच, ते सगळ्यात कठीणही असते. अव्याहत बडबड करणारी माणसे आणि मुद्दा सोडून भरकटत गेलेली भाषणे ह्यांच्यासारखा छळ नाही. चारचौघांमध्ये चतुर चमकदार वाक्ये आणि बहारदार किस्से सांगून इतरांवर छाप पाडणे वेगळे आणि अभ्यासपूर्ण मुद्देसूद विचारपूर्वक बोलणे वेगळे. दोन्हीच्या जागा वेगळ्या. पण दोन्हीची सरमिसळ झाली, तर मानहानी होण्याची शक्यताच जास्त. अनेक थोर माणसे ‘मितभाषी’ आणि गरजेला अतिशय मार्मिक असे एखादेच वाक्य बोलणारी म्हणून प्रसिद्ध झालेली दिसतात.

शब्द किंवा बोलणे हे कधी कधी अनेक अर्थाने धोकादायकही असते. एकदा आपल्या तोंडून शब्द बाहेर पडला, की त्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होते. त्याचा एक प्रवास सुरू होतो. अनेक कानांवरून, अनेक मुखांमधून तो जातो.

त्याचे स्वरूप, तो उच्चारण्यामागचा हेतू, सगळेच बदलते. साधारणपणे कुणीही व्यक्ती भेटली, की आपण सगळ्यात आधी त्याचा चेहरा आणि मग बोलणे जोखतो. मग त्या बोलण्याविषयी इतर कुणाशीतरी बोलणे होते. उदाहरणार्थ, ‘काल अमुक व्यक्ती भेटली, ती असे म्हणाली’. मग त्याविषयी चर्चा होतात, नवीन प्रश्न उभे राहतात. मूळ वाक्य बाजूला राहून त्याच्या अत्यंत विरुद्ध अर्थाचे एक नवीन वाक्य उदयाला येते, प्रचंड खळबळ माजते आणि समाज दमूनभागून नवीन काहीतरी शोधल्यासारखा ग्लानी येऊन झोपतो. दुसऱ्या दिवशी ही द्रौपदीची थाळी पुन्हा नवीन विषय घेऊन सज्ज असते, नव्या चर्चेसाठी! ह्या सगळ्यात आपण फक्त ‘बोलणे’ ह्या क्रियेचा अवलंब केलेला असतो. ‘संवाद’ ह्या कलेचा नाही.

जगात ‘मी’ हा शब्द सर्वात जास्त वापरला जातो, हे सिद्ध झाले आहे. खरे तर संवाद साधायचा असेल, तर हा शब्द सगळ्यात कमी वापरला जायला हवा, पण तसे होत नाही. ‘तू’ ह्या शब्दाचा वापर साध्यासरळ मानसिक अवस्थेत कमीच होतो. दोष देताना, चुका सांगताना, अधिकार गाजवताना हा शब्द जास्त वापरला जातो. तज्ज्ञांच्या मते, स्त्री आणि पुरुष दोघांना वाटणारी संवादाची गरज वेगवेगळी असते. स्त्रिया सगळे ‘व्यक्त करतात’. पुरुष त्यामानाने ‘अव्यक्त’ राहतात, असा एक सर्वसामान्य समज आहे. एक निरीक्षण असेही आहे, की पुरुष स्वतःबद्दल जास्त बोलतात तर बायका सगळ्यांबद्दल बोलतात. बोलण्याचा इंधनासारखा वापर होऊन त्यावर काही यंत्र किंवा वाहन चालवता येते का, ह्याचा खरेच आता शोध लावायला हवा.

काही माणसे खूप भरभर बोलतात, काही माणसे समोरच्याचे अजिबात न ऐकता बोलतात, काही माणसे दुसऱ्याचे वाक्य मध्येच तोडून बोलतात, काही बोलताना सतत विषय बदलतात, काही खूप मोठ्याने बोलतात, काही अतिशय हळू बोलतात, काही अजिबात एकाग्रचित्त नसतात, काही खूप अडखळत बोलतात, तर काहींच्या बोलण्यात ‘प्रत्येक ह्या शब्दावरी माझा ठसा माझा ठसा’ म्हणावे इतका अधिकार दिसतो, काही अर्वाच्य भाषेत, असभ्य शब्दांत बोलतात, काही निर्णयात्मक स्वरात बोलतात, हे सगळेच ‘संवादाला’ सुरुंग लावते.

संवाद हा फक्त बोलणे आणि ऐकणे एवढ्यापुरताच मर्यादित नसतो. नजरेतून असतो, स्पर्शातून असतो. परीक्षेच्या वेळी वर्गातील मुले चोरून एकमेकांकडे बघतात त्या एका नजरेतून केवढा महत्त्वाचा संवाद होत असतो! आई मुलाच्या पाठीवर हात ठेवते तो स्पर्श कोणत्याही संवादाच्या पलीकडचा असतो. चांगले रंगलेले गाणे, वेगळ्या उंचीवर चढलेला नाट्यप्रयोग, समुद्राकाठची शांतता, पाळीव प्राणी हे सगळे आपल्याशी संवाद साधतात, कारण संवादाला गरजेची शांतता ते निर्माण करतात. ‘शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले,’ हा संवाद खरे तर सर्वोच्च प्रतीचा असतो.

एखाद्या वेळी कानाला मशीन लावलेली आणि खाणाखुणांनी गप्पा मारत हसत खिदळत जाणारी मित्रमंडळी किंवा जोडपी बघितली, की एक गोष्ट फार प्रकर्षाने जाणवते, ‘भाषा’ ही माणसाची गरज नाहीये. ‘संवाद’ ही गरज आहे. म्हणून झटपट भाषा किंवा ‘संभाषणकला’ शिकण्यापेक्षा येत असलेल्या भाषेत संवाद कसा साधायचा ह्याचे वर्ग घ्यायला हवेत. ती काळाची गरज आहे आणि त्यातून एक आनंदी समाज निर्माण होईल हे नक्की!

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


मुग्धा गोडबोले

(लेखिका अभिनेत्री व संवाद लेखिका आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.