थोरली माऊली | म. वा. धोंड - कालनिर्णय निवडक

थोरली माउली

ज्ञानेश्र्वरीला माउली मानतो, तो मराठी माणूस. माउली का तर तिच्यात आईची माया आहे आणि तिची रचना आईने गायिलेल्या ओवीछंदात आहे म्हणून ज्ञानदेवांना आपल्या ओवीछंदाचे अप्रूप आहे. त्यांनी मोजून दहा वेळा या ओवीछंदाचा निर्देश केला आहे. त्यांतील एक ‘तैसी गाणीव तें मिरवी । गीतेंविण रंगु दावी । ते लोभाचां बंधु ओवी ।केली मियां ॥’असा आहे. ज्ञानदेव ओवीला ‘लोभाचा बंधू ’ म्हणतात, कारण वयाच्या पहिल्या पाच-सहा वर्षात मुलाची जगाशी ओळख होते, ती आईने गायिलेल्या ओव्यांतूनच. आईच्या गोड गळयातून निघालेल्या या स्वरांना भोवतालचा परिसर, तिने पाजलेले दूध वा भरवलेले अन्न, तिच्या अंगाचा गंध आणि तिच्या मायेचा उबदार स्पर्श यांची जोड असते. सर्व इंद्रियांना तृप्त करणारा हा अनुभव ! ओवीछंद या तृप्तीची आठवण देतो, म्हणून तो ‘लोभाचा बंधू’.

आईने गायिलेल्या ओव्यांत भोवतालचा सर्व परिसर येतो. ज्ञानेश्र्वरीतही दृष्टान्तांच्या निमित्ताने परिसर येतो; पण त्याची व्याप्ती घरदार आणि गाव यांच्या पुरतीच मर्यादित न राहता ती अखिल विश्व आपल्या कवेत घेते. आई जिव्हाळा, समजूतदारपणा आणि व्यवहारया दृष्टींनी परिसराची ओळख करून देते, तर ज्ञानदेव आधीच परिचित असलेली सृष्टी आणि माणसाची वागणूक यातून अध्यात्माची नवी जाण देतात. एकच उदाहरण देतो – दया या दैवी गुणाचे ज्ञानदेव ‘निम्न भरलेयां उणें । ते पाणी ढलों चि नेणे । तेवि अनतोखौनि जाणे ।सामोरेया ॥’ असे रूप करतात. वाहत्या पाण्याच्या मार्गात खड्‌डा आला, तर ते पाणी त्याला वळसा घालून पुढे जात नाही. तो खड्‌डा पुरा भरूनच ते पुढे वाहते. खड्डा भरला नाही, तर ते तिथेच मुक्काम करते. तसा दयाशील माणूस समोर आलेल्या माणसाचे दुःख पुरे निरसूनच पुढे जातो.

हा दृष्टान्त एकदा वाचला की, दयेची ‘ बृहद्‌भक्तस्तोत्राचेच रूप आले आहे. विशेष म्हणजे ज्ञानदेव हे स्तोत्र भगवंतांच्या मुखाने गातात आणि त्यामुळे भगवंताचे भक्तावरील उत्कट प्रेम आणि त्यांची भक्ताच्या भेटीविषयीची आर्त व्याकुळता या स्तोत्राला व्यापून राहते. तेयाचें मिं काइसोनि न लजें, जिवें जीवो । माझेनि तो, “तो वल्लभा मी कांतुं” आम्ही करूं तेयाचें ध्यान । तो आमचे देवतार्चन,‘ते या संगाचेनि सुरवाडें । आम्हां देहधरणे घडे, ‘दो वरि दोनि ।भुजा आलों घेउनि । आलिंगावे या लागौनि ।तेयाचें आंग॥’ अशी किती स्थळे दाखवितात? भगवंतांनी अर्जुनाला दिलेल्या गाढ आलिंगनानेच हे स्तोत्र संपन्न होते. भक्तांनी गायिलेली दैवतस्तोत्रे अगणित आहेत; देवाने गायिलेले भक्तस्तोत्र ज्ञानेश्र्वरी हेच एकमेव जगातील भक्तिकाव्यात हे स्तोत्र अपूर्व तसेच अजोडही आहे!

अपूर्व आणि अजोड तर खरेच, पण त्यात एक उणीव राहिली होती. हे स्तोत्र गाणाऱ्या श्रीकृष्णाचे अर्जुनावर जेवढे प्रेम होते, तेवढे इतर भक्तांवर नक्कीच नव्हते. गोकूळ सोडल्यावर तो राजकारणात एवढा रमला की, गोप-गोपी, नंद-यशोदाच काय, राधेलाही भेटण्याकरिता तो गोकुळात फिरकला नाही. सुदामा हा त्याचा परमभक्त मानला जातो, पण याचक म्हणून तो भेटायला येण्यापूर्वी दारिद्रयाने गांजलेल्या या आपल्या गुरुबंधूची त्याने चुकूनही वास्तपुस्त केल्याचे दिसत नाही. मग त्याची भक्ताच्या भेटीची आर्तता खरी कशी मानायची ? ज्ञानेश्वरीच्या श्रवणाने प्रभावित झालेल्या नामदेवादी संतांनी ज्ञानेश्वरीतील ही उणीव भरून काढायचे ठरविले.

ही उणीव भरून काढायची तर ज्ञानेश्र्वरीतील भक्तप्रेमाला साजेसा देव हवा होता. हा संपूर्णपणे काल्पनिक नको होता, तसाच पौराणिकही. काल्पनिक लोकांना मानवला नसता आणि पौराणिक ज्ञानेश्र्वरीला पटला नसता. त्यांनी आपले आराध्यदैवत विठ्ठल याचीच या भूमिकेकरिता निवड केली. ही निवड फार सोयीची होती. हा देव लोकांना परिचित होता आणि पुराणांना संपूर्ण अपरिचित होता. आपला भक्त पुंडलीक याला भेटण्याकरिता श्रीकृष्ण व्दारकेहून पंढरपुराला आला आणि पुंडलीक आईवडिलांच्या सेवेत गुंतलेला असल्यामुळे त्याची वाट पाहत विटेवर उभा राहिला, एवढीच कथालोकांना ठाऊक होती. विठ्ठलाला उभ्याउभ्याच डुलकी लागली असावी, कारण त्यानंतर अठ्ठावीस युगे त्याने काही केल्याचे ऐकिवात नाही. ही युगे अर्थात माणसाची, देवाची काही पळेच!

विठ्ठलाची ही कथा तीन दृष्टींनी ज्ञानेश्र्वरीशी मिळतीजुळती आहे.(१ )विठ्ठल हा गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाचा अवतार आहे. (२) ‘तेयालागि रूपा येणें’ ।तेयाचेनि एथ असणें ।’ या देवाच्या भक्तप्रेमाचे हे उत्तम उदाहरण आहे. (३) ‘तेया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्म कुसुमाची वीरा । पूजा केली होये अपारा । तोखा लागि ॥’ या ओवीतील ‘अपार तोषा’ चे यात प्रत्यंतर येते. ज्ञानेश्र्वरीतील भक्तियोगाचे विवरण आणि ही कथा यांतील हे अपार साम्य पाहून नामदेवांनीचही कथा रचली असावी, असा संशय येतो तर मधली डुलकीची अठ्ठावीस युगे गाळून संतांनी स्वतःच्या काळातील विठ्ठलाचे चरित्र रचायचे ठरविले. यात त्यांना जरासेही कष्ट पडले नाहीत. बालपणापासून ऐकलेला आणि आता ज्ञानदेवांनी नव्याने ऐकविलेला ओवीछंद त्यांच्या कानामनात एवढा रुजलेला होता की, ‘श्र्वास ही प्रबंध होआवे’ एवढ्या सहजतेने ते ओव्या रचूलागले. अभंग म्हणजे चार-पाच ओव्यांचा स्वयंपूर्ण बंध.असे हजारो अभंग त्यांनी रचले. आपली भक्तिमार्गावरील वाटचाल, त्यात आलेले आशानिराशेचे, हर्षखेदाचे नानाविध अनुभव, त्या अनुभवांच्या अनुषंगाने केलेले आत्मपरीक्षण, या प्रवासात भेटलेले साधुसंत, त्यांनी दिलेली शिकवण, इत्यादी अनेक गोष्टी त्यांनी या अभंगांत गुंफल्या. हे अभंग म्हणजे त्यांनी अध्यात्मिक आत्मचरित्रेच म्हणाना. याचबरोबर त्यांनी इतर संतांचीही चरित्रे  गायिली. या सर्व अभंगांत त्यांनी विठ्ठलाला असे गुंतवले की, त्यांतूनच विठ्ठलाचे बृहच्चरित्र सहजच सिद्ध व्हावे.

विठ्ठल या दैवताचा विशेष हा की, दुष्टांच्या संहाराकरिता तो अवतरला नाही, तर भक्तांच्या भेटीसाठी. याला शत्रू नसल्यामुळे याच्या हातात कसलेही शस्त्र नाही. याला स्वतःचा संसार नसल्यामुळे स्वतःचे असे निवासस्थानही नाही. तो देवळातच राहतो आणि भक्तांच्या संगतीत रंगतो, तो जनीला घरकामात मदत करतो, तिच्याशी गुजगोष्टी बोलतो आणि तिने रचलेले अभंग लिहूनही काढतो; सेना न्हाव्या करिता बादशहाची हजामत करतो; दामाजीकरिता महाराचे सोंग घेतो;एकनाथांकरिता त्यांचेच रूप घेऊन राणूमहाराकडे जेवायला जातो;आणि इंद्रायणीच्या डोहात वह्या बुडवून तुकाराम तेरा दिवस धरणे धरतो, तेव्हा त्या वह्या कोरडया राखण्याकरिता तिथेच पाण्यात उभाराहतो. सर्वांत नवलाची गोष्ट म्हणजे हे भक्त जेंव्हा विठ्ठलाचे कीर्तन करतात, तेंव्हा तोही त्यांच्यात सामील होतो. या विठ्ठलाचे चरित्र म्हणजे ज्ञानदेव-नामदेवांपासून तुकोबा-निळोबांपर्यंतच्या चारशेवर्षातील वारकरी संतांची चरित्रे. या संतांविना विठ्ठलाला स्वतःचे असे वेगळे अस्तित्व नाही ! ज्ञानेश्र्वरीतील उणीव नामदेवादी संतांनी भरून काढली ती ही अशी.

विठ्ठलाच्या या बृहच्चरित्राचा विशेष हा की, यातील केवळ भक्तच नव्हेत, तर खुद्द देवही भक्तीचे रहस्य शिकतात ते ज्ञानेश्र्वरीच्या श्रवण-चिंतनाने. विठ्ठलानेही ज्ञानदेवांपासून संथा घ्यावी. हे सहज पटण्याजोगे नव्हे, म्हणून याविषयी जनाबाईचीच साक्ष काढतो.

जनाबाईने ‘मग हांसोनि सकाळी’ या अभंगात एक लक्षणीय प्रसंग निवेदिला आहे. एके दिवशी ज्ञानदेवादी भक्त मंदिरात गेले असता विठ्ठल गाभाऱ्यात नसल्याचे त्यांना दिसून येते. तो त्या वेळी नामदेवाच्या घरी जनीबरोबर जात्यावर बसलेला असतो. त्याचा शोध घेत हे भक्त तिथे येत असलेले विठ्ठलाला दिसतात आणि पुढे ‘देख ज्ञानेश्वरां । देव जालासे घाबरा । तेव्हा ‘जनी म्हणे पंढरिनाथा ।जाय राउळासी आता ।।’भक्तांच्या भेटीच्या वेळी आपण मंदिरात न राहता जनीच्या संगतीत रमलो, हे ज्ञानदेवांना कळले म्हणून विठ्ठल घाबरा होतो आणि मंदिराच्या दिशेने पळ काढतो, यावरून त्याला ज्ञानदेवांचा केवढा धाक होता, ते सहज कळून येते.

‘जनीचे बोलणे’या अभंगाची अखेर ‘पांडुरंग म्हणे ऐक ज्ञानदेवा । ऐसा वर द्यावा जनीसाठी ॥’ अशी आहे. वर द्यायला तो ज्ञानदेवांनी, विठ्ठल केवळ मध्यस्थ !

‘विठो माझा लेकुरवाळा’ या सुप्रसिद्ध अभंगात विठ्ठल नामदेवादी भक्तांना संगे घेऊन जात असल्याचे वर्णन आहे. हे भक्त विठ्ठलाच्या खांद्यावर, कडेवर, हात धरून, बोट धरून वा त्याला लगटून चालले आहेत. ज्ञानदेव आणि मुक्ताई मात्र ‘पुढे चाले ज्ञानेश्वर । मागे मुक्ताईसुंदर ॥’ अशी मोकळेपणी, विठ्ठलापासून काही अंतराने चालली आहेत. ज्ञानदेव पुढे का, तर विठ्ठलाला मार्ग दाखविण्याकरिता. मुक्ताई मागे का, तर यांतील कुणी आडवाटेला लागला, रेंगाळलावा थकून बसला, तर त्याला सांभाळण्याकरिता. मुक्ताईचा तोअधिकारच होता. नामदेवाचे मडके कच्चे असल्याचा निर्णय तिनेच नव्हता का दिला?

ज्ञानेश्र्वरीप्रमाणेच विठ्ठलालाही मराठी माणूस माउलीच मानतो. ही दोन्ही ज्ञानदेवांचीच लेकरे, म्हणून ज्ञानदेवही माउली थोरली !


म. वा. धोंड – कालनिर्णय निवडक (१९७३ -२०००)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.