मराठी भाषेचे राज्य

१५ ऑगस्ट, १९४७ या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यापूर्व काळात असलेली भारत-देशाची प्रांतरचना ही निश्चित योजना आखून केलेली नव्हती. भाषावर प्रांतरचनेचा आग्रह स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू होता. स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर दहा-बारा वर्षांनी जी भाषावर प्रांतरचना झाली, त्यात महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांचे व्दिभाषिक राज्य झाले. पुढे त्या व्दिभाषिक राज्याला सगळीकडून विरोध झाल्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात ही वेगवेगळी राज्ये झाली. म्हणजेच महाराष्ट्र हे मराठी भाषिक लोकांचे, मराठी भाषेचे राज्य म्हणून स्थापन झाले. या राज्याची मराठी भाषा ही फार मोठी परंपरा घेऊन जन्माला आलेली आहे. जवळपास पंधराशे वर्षांहून अधिक काळ या प्रदेशात मराठी भाषा बोलली जाते. ज्ञानेश्र्वरीच्याही आधी मुकुंदराज विरचित विवेकसिंधु ग्रंथात, वेदशास्त्राचा मथितार्थु मऱ्हाटिया होय फलितार्थु तरी चतुरीं परमार्थु का न घेयावा।। असा प्रश्न विचारला गेला आहे. मुकुंदराजांच्या विवेकसिंधूचा काळ हा सव्वाआठशे वर्षांपूर्वीचा आहे. मराठी भाषेचा अभिमान मुकुंदराजांच्या शब्दाशब्दांतून ओसंडतांना दिसतो. कल्पतरूची फळे जर घरीच येत असतील तर घराच्या आवारातच तशी झाडे का लावू नयेत असा दृष्टांत देऊन मराठी भाषेतही उपनिषदांचा अर्थ सांगता येतो ही गोष्ट मुकुंदराजांनी स्पष्टपणे मराठी भाषिकांच्या निदर्शनास आणून दिली आहे. ज्ञानोबारायांनी तर मराठी भाषेचे सामर्थ्य अमृतालाही पैजेवर जिंकू शकेल इतके प्रभावशाली आहे, असे सांगितले. ‘रुक्मिणी स्वयंवर’लिहिणाऱ्या नरेंद्र कवींनी ‘मराठी भाषा पुण्यपावन आहे’ असा गौरव करून मराठी भाषा जे बोलतात, ऐकतात त्यांना संसार-चिंता राहणार नाही, अशीही फलश्रुती सांगितलेली आहे. कृष्णनाथ नांवाच्या कवींनी ‘उत्तम पवित्र महाराष्ट्र वाणी’ अशा शब्दांत मराठी भाषेचे पावित्र्य वर्णन केले आहे. किती बोलणार, किती सांगणार संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषांची तुलना करून मराठीचा अभिमान असलेल्या जुन्या कवींनी मराठी भाषा संस्कृत भाषेपेक्षाही अधिक संपन्न आणि अधिक सुंदर आहे, असे म्हटले आहे. बाराशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका प्राकृत ग्रंथात ‘मराठी भाषा सुंदर,’ रमणीय स्त्रीसारखी आहे. एखाद्या कमनीय कामिनीची चाला डौलदार असावी तशी मराठी भाषेची शब्दरचनाही डौलदार असावी अशी असते. मराठी भाषा हे रम्य उपवन आहे आणि या उपवनात सर्व प्रकारच्या वृक्षवेली फळाफुलांनी बहरलेल्या आहेत’, असे म्हटले आहे. पन्नास-साठ वर्षांपूर्वी मराठी भाषेबद्दल बोलताना, नसो आज ऐश्र्वर्य या माऊलीला यशाची पुढे दिव्य आशा असे।। असा आशावाद कविवर्य माधव ज्यूलियनांनी व्यक्त केला होता. हिला बैसवू वैभवाच्या शिरी असाही मनोदय त्यांनी बाळगला होता. मराठी भाषेचे राज्य झाल्यानंतर तिला वैभवाच्या शिरी बसविण्याचे प्रयत्न किती झाले, त्यातले किती सफल ठरले हा संशोधनाचाच विषय आहे. मराठी भाषा विपन्नावस्थेत आहे, इथपासून मराठी भाषा टिकू शकणार नाही. यापुढील काळात ती लोप पावणार आहे, अस्तंगत होणार आहे, इथपर्यात विविध मते आणि मतांतरे या विषयात व्यक्तविली जातात. मराठी भाषेचे पूर्ववैभव सुसंपन्न आणि ऐश्र्वर्यमंडित होते, याची तेवढीशी जाण सांप्रतच्या पढितपंडितांना नाही. आपल्या साधुसंतांनी मात्र मराठी भाषेला वैभवाच्या शिरी केव्हाच बसवून ठेवले आहे आणि त्याचा अनुभव देवाचिये व्दारी उभे राहून आपण नित्य घेत आहोत.

( आनंदाचा कंद – देवाचिये द्वारी ४- १ मे, १९९८ )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.