अप्रिय कोरोना,
पत्र लिहिताना कुणाला असं ‘अप्रिय’ लिहायची ही पहिलीच वेळ. पण तुझ्यामुळे जगावर ओढावलेली परिस्थिती पाहता ‘प्रिय’ लिहून तुझं स्वागत करण्याची ही वेळ निश्चितच नाही. तुझ्याशी बोलायची वेळ कधी येईल, असं अजिबात वाटलं नव्हतं. असो…
तसा तू नवखा माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठीच. तुझ्याबद्दल विचार करणं तर लांबची गोष्ट. तुला माहीत आहे का, तू आल्यापासून सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत. दरोडे, खून, चोरी, मारामारी अशी कोणतीच तक्रार येत नाही हल्ली पोलिसांकडे. आता तर ओला आणि सुका कचरासुद्धा वेगळा करून महानगरपालिकेपर्यंत पोहोचवला जातो, जे आधी कित्येकदा सांगूनही लोक ऐकत नव्हते. सध्या भाजलंय, दुखतंय- खुपतंय असे रुग्णही डॉक्टरकडे येत नाही. प्राणी-पक्ष्यांचा मुक्त संचार हल्ली वाढलेला दिसतो. मोकळ्या रस्त्यांवरून फिरणाऱ्या प्राण्यांना पाहिल्यावर मनाला बरं वाटतं. पण या मुक्या बिचाऱ्या जनावरांना खायला कोण देणार, या प्रश्नाने जीव गलबलून उठतो. पृथ्वीचा कब्जा घेऊन प्राणी-पक्ष्यांना त्यांच्याच घरात बंदिस्त करणाऱ्या माणसांनाच गेल्या काही दिवसांत मी पाहिलेलं नाही.
सगळ्यांना ‘कम्पल्सरी’ घरातच बसावं लागत असल्यामुळे कुठेतरी प्रदूषणाची पातळी कमी झालेली असली, तरी हे चित्र फारच थोड्या काळासाठी असणार, याची जाणीव मन खंतावून टाकते. वसंत ऋतू सुरू झाला, पण सुस्तावलेल्या वातावरणाची मरगळ अजूनही तशीच आहे. नववर्षाची गुढी या माणसाने उभारली खरी, पण नवचैतन्याची सळसळ, उत्साह काही पाहायला मिळाला नाही. डोक्यावर तळपणारा सूर्य वसंत ऋतूतही शांत शांतच भासतोय.
तुझा संसर्ग होऊन जगभरात अनेक माणसांचा मृत्यू झाला, तर कित्येकांचे भूकबळी गेले. अनेकांचा उदरनिर्वाह थांबला तो तुझ्यामुळेच. हिरवीगार नटलेली वनराई, माणसांची लगबग… सगळंच कसं पार कोलमडून गेलंय. झाडावर लगडलेली फळं-फुलं फक्त शोभेपुरता उरली आहेत. देवाच्या चरणी लीन होताना फुलांना वाटणारा तो आनंद, आबालवृद्धांच्या तोंडची चव वाढवताना फळांना वाटणारा अभिमान गेल्या कित्येक दिवसांत पाहायलाच मिळालेला नाही. जंगलात राहणारे पशुपक्षी माझ्याशी बोलू लागतात तेव्हा मन प्रसन्न वाटतं, पण हल्ली हा संवादसुद्धा थांबल्यासारखा झालाय, जंगलेही ओसाड वाटू लागली आहेत. पिकांवर फवारल्या जाणाऱ्या, अन्नपदार्थात वापरल्या जाणाऱ्या रसायनांची जागा आता सॅनिटायझर आणि हँडवाॅशने घेतली आहे. त्रास होतोय या सगळ्याचाच. कुणी म्हणतंय, प्रकोप झाला, तर कुणी म्हणतंय माणसाच्या कर्माचीच ही फळं-‘करावं तसं भरावं’. प्रदूषणाची पातळी कमी झाली, ओझोनचा स्तर खालावतोय आणि आॅक्सिजनची पातळी वाढत असली, तरी माणसाला उर भरून मोकळा श्वासही आज घेता येत नाही. तोंडावर मास्क बांधल्याशिवाय श्वास नाकात भरून घेण्याची त्याला फार मोठी किंमत मोजावी लागतेय. पण इतक्या सहज हरेल तो मनुष्यप्राणी कसला? त्याची इच्छाशक्ती, जीवन जगण्याची मनिषा तुझ्यापेक्षा ‘स्ट्राँग’ आहे. रणांगणात उतरल्याशिवाय युद्ध कधीच पूर्ण होत नाही, हे कटू सत्य. तुझा सामना करताना मैदानात उतरण्याची माणूस आता तेवढीच तयारी करू लागला आहे.
माणूस चुकला. त्याला त्याच्या चुकीची शिक्षाही मिळत आहे. यानिमित्ताने सगळीकडे शांतता पसरली असली, तरी ती मरणासन्न आहे. यातून मला सुख लाभणार नाही. माणसाने जंगलं तोडून इमारती बांधल्या, म्हणून त्यांची अशी अवस्था व्हावी, हे मला मुळीच मान्य नाही. माझी उत्पत्ती फक्त देण्यासाठी, कोणालाही जीवे मारण्यासाठी नाही. आता खूप झालं… खूप मोठा नरसंहार तू घडवत आहेस. तू जा आता या सृष्टीतून. तुला हवे असणारे बळी तू घेतले आहेस.
माणूस कितीही लाचार झाला, तरी तो या भूतलावरचा सगळ्यात हुशार प्राणी आहे. तो यातून नक्की मार्ग काढेल आणि तुला हरवेलही. मला हवं असणारं सुख मी थोड्या काळासाठी उपभोगलं आहे आणि मला हवा असणारा मोकळा श्वास मीही कित्येक युगासाठी मनात भरुन घेतला आहे. पण आता मी अस्वस्थ झालोय. पुरे झाला हा तुझा खेळ. माणसाला त्याची चूक समजली असून या संकटातून बाहेर पडल्यावर तो पुन्हा एकदा जोमाने कामाला लागेल आणि सर्वत्र हिरवाई पसरवण्याचा संकल्प करेल. पण त्याआधी तुझ्या कचाट्यातून सुटून माझा माझे जग नक्कीच जिंकेल आणि पुन्हा एकदा स्वाभिमानाने उभे राहील!
तुझेच जग.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
कोमल दामुद्रे
Very nice ???
माणसाने निसर्गावर केलेले अन्याय व त्याची त्याला मिळणारी फळे यावर उत्तम लेख लिहला आहे आपण कोरोनामुळे खरंच माणसाच्या मनाचा कोंडवाडा झाला आहे. उत्कृष्ठ लेखणी.