शिंपियाचे कुळीं जन्म माझा झाला । परि हेतु गुंतला सदाशिवीं ॥
रात्रिमाजि शिवीं दिवसामाजि शिवीं । आराणूक जीवीं नाहीं माझ्या ॥
सुई आणि सातुळी कात्री गज दोरा । मांडिला पसारा सदाशिवीं ॥
नामा म्हणे शीवीं विठोबाचे अंगीं । त्याचेनि मी जगीं धन्य झालों ॥
संत नामदेवांचा जन्म शिंप्याच्या घरात झाला आणि आता तर नामदेव शिंपी या नावाने ती पोटजातच त्यांच्या नावावरून ओळखली जाते. नामदेव हे शिंपी म्हणून जन्माला आले असले तरी त्यांनी समाजपुरुषाचे फाटके, तुटके, विटके वस्त्र नीट कसे होईल त्याचीच चिंता वाहिली. नामदेव संत होते, ईश्र्वराचे अनन्यभक्त होते, पण त्याबरोबरच समाजसेवकही होते. समाज-कल्याणाची चिंता वाहणारे होते. नामदेवांच्या चरित्रात केवढी तरी अद्भुतरम्यता आहे. नामदेव आपल्या तरुण वयात दरोडेखोर झाले होते आणि पुढे विरक्ती येऊन संत झाले, अशीही एक कथा आहे. नामदेवांच्या जीवनात पांडुरंग अनेक रूपाने वावरतो. पांडुरंग हा नामदेवांचा सखाच आहे. नामदेवांचा भक्तीवर अपार विश्र्वास आहे. त्यांना भक्त म्हणून जगणे आणि भक्त म्हणूनच स्वतःला ओळखले जाणे, महत्त्वाचे वाटते. त्यांना ब्रह्माची, ब्रह्मज्ञानाची कशाचीही आवश्यकता नाही, अपेक्षा नाही ! ते म्हणतात,
नामदेव म्हणे देवा । ब्रह्मज्ञान पोटीं ठेवा ॥
तुम्ही माये संगें गूढ । ज्ञान जाणिवेचे आड ॥
आम्हां नाही याची चाड । वाटे संत भेटी गोड ॥
संत भेटी प्रेम फावे । प्रेमें देवाशी भेटावें ॥
प्रेम आहे पोटभरी । देव त्यासी पोटीं धरी ॥
नामदेवा ठायीं प्रेम । मार्गी आडविलें ब्रह्म ॥
देवा तुमचे ब्रह्मज्ञान तुमच्यापाशीच ठेवा. माया आणि ब्रह्म हे सगळे आमच्या मार्गात आड येणारे आहे. आम्हांला देवाला भेटावयाचे आहे, प्रेम आमच्या पोटात दाटून आले आहे आणि त्याच बळावर देव आम्हाला पोटाशी धरणार याची आम्हाला खात्री आहे. नामदेवांच्या मनात उफाळून येणारे प्रेम ब्रह्माला पार करूनही उसळी घेत आहे. आम्हाला ब्रह्मज्ञान नकोच, आम्हाला हवा आहे तो आमचा पांडुरंगच. नामदेवांची विठ्ठलभक्ती ही केवळ अजोड आणि अव्दितीय अशी आहे. नामदेवांचे सगळे कुटुंब इतकेच नव्हे तर त्यांच्या घरची दासी जनी ही सुद्धा पांडुरंगाची भक्त होती. या प्रत्येकाने काही ना काही तरी अभंगरचना केली आहे. जनीचा तर परमार्थातही अधिकार फार मोठा होता. नामदेवांनी महाराष्ट्रात जन्माला आलेली भागवत सांप्रदायाची परंपरा अगदी दूर पंजाबपर्यंत नेऊन पोहोचवली. शिखांचा परमपवित्र ग्रंथ जो ‘ग्रंथसाहेब’ त्यातही नामदेवांची पदे अंतर्भूत आहेत आणि शीखबांधवसुद्धा नामदेवांचे भक्त आहेत. सुगंधाचें माप, चाले वाऱ्या हातीं । असे तुकोबांनी म्हटले आहे. नामदेवांचा कीर्तिसुगंध जणूं वाऱ्यावर स्वार होऊन दाही दिशांना पसरला.
– ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (देवाचिये व्दारी, भाग १ मधून )
संदर्भ टीपा –
१) शिंपियाचे कुळीं – संत नामदेव, ससंगा, आपटे, व्दितीयावृत्ती. पृ. २०९, रचना – १२४४.
२) नामदेव म्हणे देवा – उपरोक्त ग्रंथ, पृ. २०७, रचना १२३१.
संतशिरोमणी नामदेव महाराज तरुण वयात दरोडेखोर होते. अशी कथा कोणत्या साहित्यात उपलब्ध आहे ?