समर्थ स्मरण १ आनंदाचा कंद , देवाचिये द्वारी

धर्मजागृतीतून स्वराज्य स्थापना (समर्थ स्मरण : १)

श्रीसमर्थ रामदासस्वामी हे आपल्या सगळ्या संतपरंपरेत त्यांच्या वेगळेपणामुळे उठून दिसतात. ज्या काळात महाराष्ट्र मोगलांच्या आक्रमणामुळे हतबल झाला होता. जनसामान्यांमध्ये लोकजागृतीची जाणीव करून देणे अत्यावश्यक होते, त्या काळात श्रीसमर्थांनी देश आणि धर्म याबद्दलचा अभिमान लोकमानसात चेतवला.

वन्ही तो चेतवावा रे । चेतविताच चेततो । ।

हे आपलेच म्हणणे समर्थांनी प्रत्यक्ष कृतीने खरे करून दाखविले. समर्थांच्या आधीच्या काळात आणि समर्थांचे समकालीन असे जे संत-सज्जन होऊन गेले त्या सर्वांचा भर ईश्वरोपासना, योग, समाधी, स्वर्गप्राप्ती, मोक्ष किंवा कर्मकांड अशा गोष्टींकडे विशेष होता. त्यांना परमेश्वराच्या प्राप्तीची तीव्र ओढ लागून राहिली होती. समर्थांना ही ओढ नव्हती असे नाही, पण त्याचबरोबर देव, धर्म नीटपणे चालवावयाचा असेल तर राज्य – शासन परकीय असून चालणार नाही, ते आपलेच पाहिजे आणि आपले म्हणजे आपल्या धर्माबद्दल अभिमान बाळगणारे असले पाहिजे ही गोष्ट समर्थांनी बरोबर हेरली होती, असे दिसते. म्हणूनच समर्थ हे संतपरंपरेत वेगळे दिसतात असे म्हटले. समर्थांनी देव, धर्म या विषयांना दिलेली राष्ट्र भक्तीची जोड पुढील काळात निर्माण झालेल्या संतांनी तेवढ्या प्रमाणात दाखविलेली दिसत नाही. म्हणूनच पारमार्थिकांनी रामदासांचा पराभव केला, असेही काही विचारवंत म्हणतात. समर्थांना महाराष्ट्र हा सद्‌गुणपंडित झालेला पाहावयाचा होता. त्यांना महाराष्ट्र राज्य जिकडेतिकडे व्हावे, अशी प्रेरणा द्यावयाची होती. या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी ज्ञानसंपन्न असावेत, गुणसंपन्न असावेत, अशी आंतरिक तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

म्हणूनच

उत्तम गुण तितुके घ्यावे । घेऊन जनास सिकवावे । उदंड समुदायें करावे । परी गुप्तरूपें । ।

असे त्यांनी दासबोधाच्या अकराव्या दशकाच्या दहाव्या समासात म्हटले. मोगलांची बेरकी नजर .आणि मोगलांच्या ताटाखालची मांजरे झालेल्या आपल्याच भाऊबंदांची सततची कटकारस्थाने ह्यामुळे  जे काही करावयाचे ते गुप्तरूपे केले पाहिजे हा समर्थांचा कटाक्ष होता. म्हणूनच ‘ गुप्त ते गुप्त  जाणावे, आनंदवनभुवनी ’ असे त्यांनी बजावले. समर्थांना लागलेला महाराष्ट्राच्या कल्याणाचा ध्यास, समर्थांना वाटणारी स्वातंत्र्याची आस ही इतकी तीव्र होती की, त्याच काळात शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्याच्या आनंदोत्सवात समर्थ प्रसन्नचित्त झालेले दिसतात. शिवाजी महाराज आणि समर्थांचे संबंध नेमके कसे होते त्याचा विशेष तपशील इतिहास आपल्याला सांगत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थांचे पट्टशिष्य होते इथपासून समर्थांची व शिवाजी महाराजांची भेटच झाली नव्हती इथपर्यंत मतमतांतरे नमूद झालेली आहेत. समर्थांनी आणि तत्कालीन समर्थ पंचकातील इतर संत, तसेच तुकोबांसारखे श्रेष्ठ विठ्ठलभक्त यांनी जी धर्मजागृतीची पार्श्वभूमी तयार केली होती, हिंदू धर्माबद्दल जो अभिमान जनसामान्यांच्या मनात निर्माण केला होता, चेतविला होता त्याचा फायदा निश्चितपणे हिंदुपदपातशाही निर्माण होण्यात झाला असला पाहिजे याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही.

समर्थांना आणि त्यांच्या काळातील इतर संतांना किमान एवढे श्रेय निर्विवादपणे देता येते आणि हे श्रेय फारच महत्त्वाचे आहे. मोगलांच्या आततायी छळाला तीव्र विरोध करण्याची प्रबळ शक्ती या शिकवणूकीतून सर्वांना प्राप्त झाली आणि त्यामुळेच शिवप्रभू करीत असलेले कार्य हे देवाधर्माचे कार्य आहे ही श्रद्धा माणसामाणसांच्या मनात दृढावली हे कोण नाकारू शकेल? समर्थांनी त्या काळात जनसामान्यांसमोर आदर्श ठेवला तो प्रभुरामचंद्र आणि महाबली हनुमान यांचा. हाच आदर्श लोकांसमोर ठेवण्यात समर्थाचा काही विशेष उद्देश असेल काय?

(क्रमश:)

 ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर ( आनंदाचा कंद , देवाचिये द्वारी : भाग ४ मधून )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.