गणपती | anant chaturdashi story | Anant Chaturdashi

अनंतचतुर्दशी

 

गणपती


१. अनंतचतुर्दशी : श्रीगणेशविसर्जन :

ह्या दिवशी अनेक घरांमधील गणपतींचे तर चाळीस हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सवांचे विसर्जन केले जाते.

श्रीगणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून गणपती ची सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळा पंचोपचारी पूजा केली जाते. अनंतचतुर्दशीलादेखील सकाळी अशी पंचोपचारी पूजा करावी. नंतर नैवेद्य दाखवावा. उत्तरपूजा करावी. गणपती च्या शेजारी ठेवलेल्या श्रीफळांना जागेवरून हलवावे. नंतर आपल्याला घरच्या अथवा मंडळाच्या प्रथेनुसार दुपारपर्यंत मूर्ती विसर्जनासाठी बाहेर आणावी. ह्यावेळी मूर्तीचे मुख घराच्या, मंडपाच्या दिशेकडेच हवे. वाजत-गाजत मिरवणुकीने ती ठरलेल्या ठिकाणी जलाशयावर आणावी. तिथे मूर्तीला पंचखाद्याचा नैवेद्य दाखवावा. पुन्हा एकदा आरती करावी. नंतर तिचे श्रद्धापूर्वक-काळजीपूर्वक सन्मानाने विसर्जन करावे, असा सर्वसाधारणपणे ह्या विसर्जनाचा विधी आहे.

सद्य:स्थिती : घरचा असो वा सार्वजनिक आपापल्या गणपती चे विसर्जन करताना इतरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही; तसेच मूर्तीला आणि भक्तांना कुठल्याही तऱ्हेची इजा होणार नाही; सारे काही सुरळीत, निर्विघ्नपणे पार पडेल ह्याची डोळ्यात तेल घालून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

सध्या संपूर्ण जगाला विविध प्रदूषणांनी त्रस्त करून सोडले आहे. गणेशचतुर्थीसारखे उत्सव साजरे करताना ध्वनी, वायू आणि जलप्रदूषण होऊ नये, पर्यावरणाला धोका पोहोचू नये म्हणून आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. गणपती च्या मूर्तीच्या उंचीचा अतिरेक आज अनेक प्रश्नांना आणि वादांना निमंत्रण देताना दिसतो. लोकांची गर्दी व्हावी म्हणून मंडळे मूर्तीची उंची वीस-बावीस फुटांहून अधिक करतात. धर्मशास्त्रानुसार हे अयोग्य आहेच, शिवाय मूर्ती उत्सवासाठी आणताना, उत्सवकाळात आणि विसर्जनाच्या वेळी तिला दुखापत होऊन ती भंगू नये म्हणून फार जपणे गरजेचे असते. विसर्जनाच्यावेळी योग्य तऱ्हेने विसर्जन करणे शक्य होत नाही. त्यातच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे पाण्यात विघटन होत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी वजनाला हलके असल्याने मूर्तींचे अवयव किनाऱ्यावर विखुरल्याचे दु:ख़द दृश्य बघावयास मिळते. देवाचे, उत्सवाचे, धर्माचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक भाविकाचे परमकर्तव्य आहे. त्यात चालढकल होणे, दुर्लक्ष होणे हे अक्षम्य आहे. ह्या चुका होऊ नयेत म्हणून मुळात मूर्तीची उंची माफक ठेवावी. शक्यतो धर्मशास्त्राने संगिल्याप्रमाणे शाडूची मूर्ती असावी. ती नैसर्गिक रंगाने रंगविली जावी. ह्या सर्व दक्षता घेतल्याने जलप्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. मूर्तीचे विसर्जन पाण्यामध्येच करावे, असा धर्मसंकेत आहे. जिथे मोठे जलाशय, समुद्र, नद्या नाहीत तिथे तलाव-विहिरींमध्ये घरगुती गणपती चे विसर्जन करता येते. पण मोठ्या गणपतींचे विसर्जन कुठे करावयाचे ही समस्यादेखील उग्र रूप धारण करीत आहे. त्यावर तात्पुरते कृत्रिम तलाव निर्माण करणे हा उत्तम उपाय आहे. तर घरगुती गणपती चे मोठ्या बादलीत विसर्जन करून ते पाणी नंतर दुसऱ्या दिवशी घराभोवतीच्या झाडांना घालावे. हा विचार मी दोन वर्षांपूर्वी मांडला आणि तो अनेकांनी आचरणातही आणला. त्याचा विचार इतरांनीही जरूर करावा. मूर्तीचे पावित्र्य राखणे आणि पर्यावरणात बाधा येऊ न देणे ह्या दोन्हींचे भान प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. उत्साहाच्या भरात आपल्या कर्तव्याचा विसर पडू न देण्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. गणेशमूर्तीप्रमाणेच निर्माल्याच्या विसर्जनाची समस्या देखील अनेकांना भेडसावत असते. पाण्यात निर्माल्य टाकल्याने पाणी अधिकच दूषित होईल. म्हणून आता निर्माल्य कलशांची पर्यायी व्यवस्था शहरांमधून केली जाते. ती खेडोपाडीही केली गेली पाहिजे. ह्या निर्माल्यापासून खत करण्यात येते. तो प्रकल्पदेखील गावपातळीवर सुरु करण्याची गरज आहे.

प्रत्येकजण आपापल्या परीने सामाजिक बांधिलकी मानून त्याप्रमाणे वागू लागला, तर सर्वांना आनंद देणारा गणेशोत्सव अधिकाधिक आनंददायी ठरेल ह्यात शंका नाही.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने इतर अनेक गोष्टी दरवेळी नव्याने कळतात. गणपती साठी जो खर्च असतो तो थोडा कमी करून त्यामधील पाच टक्के रक्कम आपल्याला आवडेल त्या धर्मकार्यासाठी वापरली जावी. ह्यामध्ये देवळांच्या जीर्णोद्धारासाठी देणगी, अन्नदानासाठी मदत, शाळेला देणगी, हुशार मुलांच्या शिक्षणाला आवश्यक त्या वस्तूंचे वाटप अशी अनेक कामे करता येतात.

मी स्वत: बराच विचार करून गणेशाचे पूजन, त्याची सेवा जरा वेगळ्या प्रकारे कशी करता येईल त्याबद्दल पंचवीस वर्षांपूर्वी ‘मोरया! असे या!’ हा लेख लिहिलेला. भरमसाट खर्च करून, दिव्यांची रोषणाई, ढोलतशांवर नाच करून गणेशाचे पूजन झाले असे मानावयाचे का? गणेशाचे जे गुण, जी गुणवैशिष्ट्य, त्याच्या ज्या आवडीनिवडी त्यांचा प्रचार-प्रसार करणे, ते गुण ज्यांच्यामध्ये आहेत त्यांचा जाहीर सत्कार करणे, गणपती ला जी आवडणारी क्षेत्रे आहेत – त्यापैकी एक म्हणजे रणांगण. तो स्वत: लढवय्या, देवांचा सेनापती म्हणून सैनिकी शाळा काढून तरुणपिढीतून देशासाठी उत्तम पराक्रमी असे लष्करी अधिकारी घडविले जाणे, ज्यांनी युद्धभूमीवर प्रभावी कामगिरी केली असेल अशा मंडळींचा गौरव करणे हे एकप्रकारे गणेशपूजनच आहे. तर मराठी रंगभूमीवरील त्या त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट नाटकाला एक लाखाचे बक्षीस देऊन ती रक्कम त्या नाटकाशी संबंधित अशा सर्व कलाकार आणि साहाय्यकांमध्ये वाटून दिली जावी. त्यामध्ये पडद्याच्या पाठीमागे राहून काम करणाऱ्यांनादेखील सामवून घ्यावे आणि राजकारणाशी संबंधित असे उत्तम लेखन करणारे पत्रकार, संपादक ह्यांना त्यांच्या संशोधनपर लेखनासाठी पुरस्कार देणे अशा तीन क्षेत्रांतील मान्यवरांचा, योग्य व्यक्तींचा सत्कार करावा असा माझा विचार होता. ह्या कृतीतून गणेशोपासनेच्या निमित्ताने आपण केवढे मोठे कार्य करू शकतो हे जगाला कळावे हा माझा हेतू होता आणि आहे. गणेशोपासनेला विधायक वळण लावणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. त्यासाठी संघटित होऊन एकत्रितपणे अथवा स्वतंत्रपणे सामाजिक कार्य करणे ही काळाची गरज आहे.

आडगावी एखादे रुग्णालय बांधणे, गरीब मुलांना व्यावसायिक शिक्षण देऊन स्वावलंबी बनविणे, गरजू विद्यार्थ्यांची निदान त्या एका वर्षाची शैक्षणिक जबाबदारी उचलणे, मोफत वाचनालय सुरु करणे, विविध प्रकारची आरोग्य शिबिरे भरविणे, महिलांसाठी वेगवेगळे लघुउद्योग सुरु करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून देणे, वृद्धाश्रमांना देणग्या, अनाथाश्रमांना आवश्यक वस्तू भेट म्हणून देणे, आपल्या गावात विविध उपयोगी वृक्षांची लागवड करणे, रोपवाटिका तयार करून रोपांचे मोफत वाटप करणे, विविध स्पर्धांचे आयोजन करून आपल्या विभागातील गुणी मुला-मुलींना प्रगतीची संधी मिळवून देणे, त्यांच्या कलागुणांना उत्तेजन देणे, अशी अनेक कामे करूनही गणपती ची एका वेगळ्या तऱ्हेची पूजा आपल्याला करता येईल.

गणपती हा महाभारत लिहिणाऱ्या महर्षी वेदोव्यासांचा लेखनिक झाला होता. तो संदर्भ लक्षात घेऊन तरुणांना लघुलेखन कला (स्टेनोग्राफी) शिकविण्याचे वर्ग मोफत चालविले तरीही ती गणेशपूजाच ठरेल. संगणक शिक्षण आर्थिक परिस्थिती तितकीशी बरी नसलेल्यांना इच्छा असूनही परवडत नाही म्हणून घेता येत नाही. ते लक्षात घेऊन मोफत संगणक शिक्षणाची व्यवस्था करता येईल. अथवा अशा विद्यार्थ्यांना जी मदत करता येईल, ती तशी जरूर करावी.

 

२. अनंत व्रत : एकूणच सर्व व्रत-वैकल्यांमध्ये जी व्रते अत्यंत महत्त्वाची समजली जातात, त्यामध्ये हे भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला केले जाणारे ‘अनंत व्रत’ देखील आहे. इतर व्रतांप्रमाणे हे व्रत सरसकट सर्व मंडळी करीत नाहीत. कारण हा एक ‘वसा’ आहे. तो आचरणात आणणे काहीसे कठीण आहे. म्हणून काही कुटुंबांपुरते हे व्रत मर्यादित राहिले आहे. हे व्रत कोणी करावे ह्याचेदेखील काही संकेत आहेत.

अनंताचे व्रत हे प्राय: पुरुषांनी करावयाचे काम्यव्रत आहे. हे व्रत सलग चौदा वर्षे करावे लागते. गेलेले वैभव परत मिळावे म्हणून हे व्रत करण्याची प्रथा आहे. एखाद्या वडिलधाऱ्या अधिकारी व्यक्तीने सांगितल्यास अथवा अनंताचा दोरा अचानक सापडल्यास हे व्रत केले जाते. एकदा हे व्रत करण्यास प्रारंभ केला की, ते कुळामध्ये अखंडितपणे केले जाते. चौदा वर्षानंतर उद्यापन करून न थांबता, पुन्हा ते चालूच ठेवले जाते. ह्या व्रताची अनंत म्हणजे विष्णू ही प्रमुख देवता आहे. तर शेषनाग आणि यमुना ह्या गौण देवता आहेत. ह्या व्रताचे विधी अतिशय काटेकोरपणे केले जातात. प्रारंभी चतुर्दशीला प्रात:काळी व्रतकर्त्याने शुचिर्भूत व्हावे. नंतर आधीच सजविलेल्या मंडपात अथवा चौरंगावर प्रथम सर्वतोभद्र मंडल काढावे. त्या मंडलावर उपलब्ध असेल त्याप्रमाणे तांब्याचे अथवा चांदीचे पूर्णपात्र ठेवावे. ह्या पूर्णपात्रात अष्टदल काढून त्यावर दर्भांच्या अंकुरांपासून केलेला सातफण्यांचा शेषनाग ठेवावा. त्याच्यासमोर चौदा गाठी बांधलेला अनंताचा दोरा ठेवावा. एक कलश घेऊन तो पाना-फुलांनी सजवावा. त्या कुंभात भरलेल्या पाण्याला ‘यमुना’ मानून तिची पूजा करावी. आधी शेषाची आणि कुंभातील यमुनेची यथासांग पूजा करावी. नंतर त्याच पूर्णपात्रात अग्न्युत्तारण करून स्थापना केलेल्या अनंतमूर्तीचे पूजन करून ध्यान करावे. ह्या ध्यानाचा

“नवाम्रपल्लवाभासं पिङ्गभ्रूश्मश्रुलोचनम् । पिताम्बरधरं

पद्मशङ्खचक्रगदाधरम् । अलंकृतपयोराशिं विश्वरूपं विचिन्तये ॥”

अर्थात ‘नवीनच आलेल्या आंब्याच्या पानांप्रमाणे ज्याची अंगकांती आहे, ज्याच्या भुवया, मिश्या आणि डोळे पिंगट रंगाचे आहेत, ज्याने पीतांबर नेसून शंख चक्र गदा धारण केली आहे आणि ज्याने समुद्राला भूषविले आहे, अशा विश्वरूप असलेल्या विष्णूचे मी ध्यान करतो-’ हा मंत्र म्हणावा. ज्यांना संस्कृत श्लोक म्हणता येणार नाही त्यांनी केवळ भावार्थ प्राकृतात उच्चारला तरी चालेल. त्यानंतर अंगपूजा, आवरणपूजा, अष्टोत्तर शतनामपूजा ह्या अंगभूत पूजांसह षोडशोपचारे पूजा करावी. शेवटी पुष्पांजली झाल्यानंतर अर्घ्य द्यावे. त्यानंतर चौदा गाठींच्या दोऱ्याची पूजा करून तो व्रतकर्त्याने आपल्या हातात बांधावा. त्यापूर्वी हातातील आधीच्या दोऱ्याचे विसर्जन करावे. व्रताच्या सांगतेच्यावेळी दाम्पत्याला भोजन घालावे. व्रताची चौदा वर्षे पूर्ण झाल्यावर जे उद्यापन करावयाचे त्याचा विधी पुढीलप्रमाणे –

त्रयोदशीला व्रतकर्त्याने एकभुक्त राहावे. चतुर्दशीला तीळ आणि आवळ्याचा गर लावून स्नान करून शुचिर्भूत व्हावे. त्यानंतर अनंताची पूजा करावी. त्या रात्री अश्वत्थ्याच्या समिधा, तीळ, यव, व्रीही, घृत ह्यांनी व्रतदेवतांसाठी हवन करावे. नंतर सर्वांनी कथा श्रवण करावी. पौर्णिमेला पुन्हा अनंताची विधिवत पूजा करावी. आचार्यांची पूजा करून त्यांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी. शेवटी सर्व ब्रह्मवृंद, वडीलधाऱ्या मंडळींकडून आशीर्वाद घ्यावेत. ब्राह्मण, आप्तेष्ट, अपंग, दुर्बल आदी सर्वांना आदरपूर्वक प्रेमाने अन्नदान करावे. अखेरीस भगवान विष्णूंचे स्मरण करून व्रतकर्त्याने पारण्याचे भोजन करावे.

ह्या व्रताची कथा अशी – कौरव-पांडवांमध्ये जेव्हा द्यूत खेळले गेले तेव्हा धर्मराज युधिष्ठिर आपल्याकडील सर्व संपत्ती, वस्तू हरला. सर्वस्व हरलेल्या पांडवांना त्यानंतर बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षांचा अज्ञातवास पत्करावा लागला. त्या काळात भगवान श्रीकृष्णांनी त्यांची वनवासात भेट घेऊन युधिष्ठिराला ह्या संकटातून मुक्तता व्हावी म्हणून हे अनंतचतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले. विशेष म्हणजे श्रीकृष्णाने त्याला ह्या व्रताची एक कथा सांगितली. ती कथा अशी – कृतयुगात सुमंतू नामक गुणी ब्राह्मण होता. त्याला एक मुलगी होती. तिचे नाव शीला. ह्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच तिची आई मरण पावली. त्यामुळे सुमंतू ब्राह्मणाने पुन्हा लग्न केले. मात्र त्याची ही दुसरी पत्नी अत्यंत कजाग, भांडखोर होती. यथाकाल शीलाचे लग्न कौंडिण्यमुनीबरोबर झाले. लग्नानंतर ती सासरी जाण्यास निघाली त्यावेळी सुमंतूने पत्नीकडे शीलाला काही वस्तू आंदण म्हणून देण्याचा मनोदय व्यक्त केला. मात्र त्याच्या पत्नीने काहीही देण्यास नकार दिला. उलटपक्षी मुलीचा आणि जावयाचा विनाकारणच अपमान मात्र केला. अपमानित शीला मनोमनी दु:खी झाली. ती तशीच पतीबरोबर सासरी जाण्यास निघाली. वाटेत तिने नदीच्या किनारी काही स्त्रिया एकत्रितपणे पूजा करीत असल्याचे बघितले. ते अनंताचे व्रत असल्याचे चौकशी केल्यावर तिला कळले. तिनेदेखील लगेचच त्या व्रतपूजेत भाग घेऊन ते व्रत मनोभावे केले. व्रतात सांगितल्याप्रमाणे तिनेही स्वत:च्या हातात अनंताचा दोरा बांधून घेतला. नंतर ती सासरी आली. त्या व्रताचे फळ म्हणून तिच्या संसारात समृद्धी आली, सर्व तऱ्हेची सुख, संपदा तिला प्राप्त झाली. कौंडिण्यमुनीला ह्या अचानकपणे प्राप्त झालेल्या भरभराटीचा गर्व झाला. एकदा एकांतात असताना काहीही कारण नसताना त्याने शीलाच्या हातातील तो अनंताचा दोरा तोडून अग्नीत टाकला. परिणामी अनंताचा त्याच्यावर कोप झाला. हां हां म्हणता अचानकपणे आलेली समृद्धी तशाच वेगाने निघूनही गेली. पुन्हा दारिद्र्याचे दु:खाचे दिवस आले. शीला मुळातच समजूतदार होती. तिने पतीला त्याची चूक समजावून सांगितली. त्यावेळी कौंडिण्य अनंताचे व्रत करण्याच्या निश्चयाने वनात निघाला. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक प्राण्याला तो ‘मला अनंत कुठे भेटेल?’ असे विचारत होता. पण त्या कोणालाच त्याचे उत्तर माहीत नव्हते. निराश होऊन कौंडिण्याने आत्महत्या करण्याचे ठरविले. त्यावेळी मात्र अनंताने ब्राह्मणाच्या रुपात त्याला दर्शन दिले. मग आनंदून तो घरी परतला. यथावकाश अनंतचतुर्दशीला त्याने अनंताचे व्रत केले. कालांतराने त्याला त्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त झाले.

सद्य:स्थिती :अनेकांना हे अनंताचे व्रत म्हणजे महाभारतातील प्रक्षिप्त भाग वाटतो. स्वबळावर कर्तृत्व गाजवून धनसंपत्ती मिळविण्याऐवजी अनंताचे व्रत करून आपल्याला वैभव प्राप्त होईल हा दैववाद अनेकांना पटत नाही. अशी मत-मतांतरे ही होतातच. विचारमंथनासाठी त्यांची आवश्यकतादेखील आहे. त्यामधूनच तर मानवाच्या प्रगतीला पूरक अशा अनेक गोष्टींचे नवनीत निघत असते. विविध प्रांतांत विविध तऱ्हेने हे व्रत केले जाते. ह्यामधील चौदा गाठींचा काहींच्या मते चौदा भुवने असा अर्थ होतो, तर काहींना चौदा मन्वंतरांचे ते प्रतीक वाटते. काही ठिकाणी म्हणूनच चौदा प्रकारची फळे, चौदा प्रकारची फुले, चौदा प्रकारच्या मिठाया असे सारे पूजा उपचार चओदाच्या संख्येत वापरले जातात. ज्याला जे योग्य वाटेल त्याने ते करावे. ज्याला ते रुचणार नाही त्याने ते करू नये, एवढेच आपण ह्याबद्दल सांगू शकतो. करण्यास काहीसे कठीण असल्यामुळेच हे व्रत सरसकट सर्व मंडळी करीत नाहीत. कुठलेही बदल काही व्रतांमध्ये करणे उचित नसते. अशा व्रतांपैकी हे एक व्रत! अत्यंत संयमित, सदाचारी जीवनक्रम असलेली मंडळी हे व्रत विशेषत्वाने करतात. दुर्व्यसनी, चंचल मंडळी ह्या व्रतापासून चार हात दूर राहतात असे प्रकर्षाने दिसून येते. हे व्रत चौदा वर्षे करावे लागते. पुढील पिढीतील मंडळींची शाश्वती नसेल तर चौदा वर्षानंतर व्रतसमाप्ती करावी. अनंताच्या रूपाने विष्णूची आणि नागांची ही पूजा आपल्या धार्मिक संचयाचा एक महत्त्वाचा भाग आहे, एवढे मात्र निश्चित! नागपंचमीला सुरु झालेली नागपूजा अनंतचतुर्दशीपर्यंत विविध तऱ्हेने सलगपणे सातत्याने होत राहाते. गणपती च्या आणि महादेवाच्या अंगावर असंख्य नाग खेळत असतात. कृषिप्रधान भारतात नाग हे शेतकऱ्यांचे मित्रच म्हणावयास हवे. त्यांचा कोप होऊ नये म्हणून कोणत्या ना कोणत्या निमित्ताने त्यांची पूजा पुन:पुन्हा करण्याची प्रथा पूर्वापार चालू आहे हे विशेष!

 

३. इंद्रपूजा :आपल्याकडे जसे अनंताचे व्रत करण्याची प्रथा आहे, साधारण तशीच बंगालमध्ये इंद्रपूजेची प्रथा आहे. तिथे भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला इंद्राच्या मूर्तीची पूजा केली जाते. ही पूजा स्त्रियांनी करावयाची असते. ह्या पूजेत इंद्राला चौदा लाडू आणि चौदा फळांचा नैवेद्य दाखविला जातो. सूर्यास्तानंतर ह्या पूजलेल्या इंद्रमूर्तीचे विसर्जन केले जाते.

सद्य:स्थिती :ब्रह्मदेवाप्रमाणेच इंद्राची नित्य पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे अस्तित्वात नाही. देवांचा राजा असूनही इंद्राची नित्यपूजा केली जात नाही. ह्याला एक कारण म्हणजे ऋग्वेदकाळात इंद्रासाठी अनेक यज्ञ केले जात. पूजाविधी हा प्रकार नंतर आला हे असावे. मात्र भाद्रपदातील इंद्रध्वजोत्सवात त्याची विशेष पूजा केली जाते. पूर्वी पैठणक्षेत्री हा उत्सव मोठ्या प्रमाणात होत असे. (महाराष्ट्राला अपरिचित अशी ही इंद्रपूजा केवळ माहिती व्हावी म्हणून येथे दिलेली आहे.) आपल्या देशातील ‘विविधतेमधील एकता’ इंद्रपूजेसारख्या व्रतांमधून ठळकपणे दिसून येते. आपण महाराष्ट्रात अनंताचे व्रत करतो, त्यामध्येदेखील चौदा ह्या संख्येला अतिशय महत्त्व आहे. फळे, फुले, मिठाई हे सारे उपचार चौदाच्या संख्येत लागतात. साधारणत: तशाच प्रकारची पण तितकेसे कडक नियम नसलेली अशी ही इंद्रपूजा आहे. मात्र अनंतव्रतामध्ये आणि ह्या इंद्रपूजेमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे, तो म्हणजे अनंतव्रत हे पुरुषांनी करावयाचे व्रत आहे, तर इंद्रपूजा हे स्त्रियांचे व्रत आहे.

 

४. कदली व्रत :भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला स्त्रिया केळीच्या झाडाची पूजा करतात. विशेषत: गुजरात प्रांतात हे व्रत केले जाते. श्रद्धाभक्तिपूर्वक केळीच्या झाडाची पूजा करून नंतर त्या झाडाला रोज पाणी घालावे. पुढे यथाकाल ह्या केळीच्या झाडाला घड आल्यावर ह्या व्रताचे उद्यापन करावे. त्यावेळी तिळा-तुपाचे हवन करावे. ब्राह्मणाला सन्मानपूर्वक वाणाचे दान द्यावे. एका दाम्प्त्याला भोजन घालावे. आयुष्यभर अन्न-वस्त्र-निवारा ह्यांची ददात पडू नये म्हणून स्त्रिया हे व्रत पूर्वी करीत असत. ह्या व्रताला महाभारतकालीन एका कथेचा आधार दिला जातो. त्या कथेनुसार भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून हे व्रत रुक्मिणीमातेने केले. पुढील काळात कौरवांकडून भर सभेमध्ये द्रौपदी वस्त्रहरणाचा दुर्धर प्रसंग ओढवला. तेव्हा द्रोपदीने भगवंतांचा धावा केला. त्यावेळी पुन्हा भगवंतांच्या सांगण्यावरून रुक्मिणीने मागे केलेल्या ह्या कदली व्रताचे फळ दौपदीला दिले. परिणामी जसे केळीला एकात एक असे अनेक पदर असतात, तसेच द्रौपदीच्या नेसत्या वस्त्राखाली वस्त्रांचे अनेक पदर तयार होत गेले. त्यामुळे तिचे लज्जारक्षण होऊ शकले. त्यामुळे दुर्योधन दु:शासनाचा कुटिल हेतू निष्फळ ठरला.

सद्य:स्थिती : गुजराती समाज वगळता हे व्रत इतर प्रांतात प्रचलित नाही. आता काळ बदलला आहे. स्त्रिया सक्षम झाल्या आहेत. स्त्री-शक्तीची विविध रूपे आपण रोज ऐकतो-पाहतो. त्यामुळे हे व्रत तसे कालबाह्य झाले असले तरीही केळीच्या झाडाची निगा राखण्यासाठी, तिचे धार्मिक विधींमधील महत्त्व ओळखून आपल्या पूर्वजांनी योजलेले हे कृतज्ञतादर्शक व्रत केवळ जाणून घेतले तरीही पुरेसे आहे. सहजपणे करता येणारी गोष्ट म्हणजे ज्यांच्या बागेत केळीची झाडे असतील त्यांनी शेजाऱ्यांना, आप्तेष्टांना ह्या दिवशी अगत्याने बोलावून केळीच्या झाडाची पूजा करून, केळ्यांचे विविध प्रकार तसेच पदार्थ पाहुण्यांना खाऊ घालावे. हे सर्वांनाच शक्य होणार नसेल तर इतरांनी निदान एकमेकांना, आजूबाजूच्या मंडळींना, सोसायटीमधील बालगोपाळांना निदान एक-एक केळे प्रेमाने द्यावे-घ्यावे. ही गोष्ट तसेच व्रत-प्रथा त्यांना आवर्जून सांगावी. जेणेकरून हा वारसा पुढे चालू राहील.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.