मराठी साहित्याला आधुनिकतेची जोड
१) Bookshelf – Marathi YouTube channel (मराठी)
चार वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे ‘किरण क्षीरसागर, भारतेंदू शर्मा, हिनाकौसर खान-पिंजार आणि सूरज क्षीरसागर’ , हे तरूण एकत्र आले ते पुस्तकांच्या वेडातून. पुस्तकांच्या जिव्हाळ्याने त्यांना एकत्र बांधलं आणि त्यातून साकारलं “बुकशेल्फ” नावाचं एक युट्युब चॅनेल. अगदी अल्पावधीत या चॅनेलने पाच हजारांच्या वाचक-रसिकांना एकत्र आणले आणि पुस्तकांच्या अनोख्या जगाची ”ऑनलाईन” सफर सुरू झाली.
आजच्या पिढीला व्हिज्युअल माध्यम हे अधिक आकर्षित करते. पुस्तकं वाचण्याची आवड असली तरी पुस्तकांसाठी वेगळी उसंत काढणं, आजच्या काळात सगळ्यांना जमतंच असं नाही. अशा वेळी ऑडियो-व्हिडीयोमध्ये पुस्तकाचा परिचय निश्चित होऊ शकेल. चांगल्यारितीने एखाद्या पुस्तकाविषयी आपल्याला कळलं तर ते पुस्तक वाचण्याची आपली गोडी वाढते. शिवाय व्हिडीओजच्या माध्यमातून नव्या दम्याच्या चांगल्या लेखकांनाही आपल्या पुस्तकाविषयी सांगण्याची संधी मिळू शकेल. वाचकांचीही नव्या लेखकांशी ओळख होईल, ही बुकशेल्फची मूळ संकल्पना आहे.
या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून पुस्तकांचा परिचय, लेखकाची ओळख, साहित्यिक- प्रकाशकांशी संवाद, भाषेविषयीच्या गमंतीजमती, माहितीपर लेख असे जे जे काही पुस्तकं, नियतकालिके, सुट्या कथा, सुटे लेखन असेल ते सारं काही यात सामावून घ्यायचे “”बुकशेल्फ”ने ठरविले आहे.
२३ एप्रिल २०१७ रोजी पुस्तक दिनाचे औचित्य साधून पहिला व्हिडीओ बुकशेल्फवर अपलोड करण्यात आला. हा व्हिडीओ डॉ. श्रीराम लागू यांच्या ‘रूपवेध’ या पुस्तकावर करण्यात आला. श्रीराम लागू यांच्या विविध भूमिका, त्या साकारताना त्यामागची त्यांची विचारप्रक्रिया, सहकलाकारांसोबतच्या दृढ बंधांपासून सेन्सॉरसोबतच्या वादापर्यंतच्या घडामोडी असा मराठी रंगभूमीचा कालखंड उलगडणारं पुस्तक म्हणून “रुपवेध” चे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे या पुस्तकाने सुरूवात केली आणि अगदी अल्पावधीतच चॅनेलचे साडेसहा हजारांहून अधिक सबस्क्राईबर झाले. यापुढे दर पंधरा दिवसांनी येणार्या रविवारी व्हिडीओ अपलोड केले जातील. पुढचा व्हिडीओ हमीद दलवाई यांचे ‘जमीला जावद’ व ‘इस्लामचे भारतीय चित्र’ या पुस्तकांवर आधारित असतील. तेव्हा या आगळ्यावेगळ्या बुकशेल्फला भेट द्यायला विसरु नका.
[youtube https://www.youtube.com/watch?v=42P0TcBfbNw]
२) Bronato.com – EPub Publisher
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रादेशिक भाषांमधील साहित्य जगभर पोहचविण्यात “ई-बुक” चा मोलाचा वाटा आहे. मराठी भाषेला समृद्ध साहित्यसंपदा लाभली आहे. परंतु मराठीमध्ये ईपुस्तक म्हणजे PDF (पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट) हे समीकरण पक्क झालं होतं आणि ते देखील ‘फ्री’. यामुळे झालं असं होतं कि ‘ईपुस्तक’ क्षेत्र हे उद्योग म्हणून विकसित होण्याऐवजी त्याची ‘सेवा’ झाली व एक चांगला उद्योग उभारी घेण्याच्या काळात ‘सेवा’ पुरवत राहिला व उद्योगासाठी लागणारे जागतिक मापदंड, गुणवत्ता, संशोधन, समस्या निवारण या गोष्टींचे संघटीत किंवा स्पर्धात्मक प्रयत्न झाले नाही. याचा जितका तोटा प्रकाशकांना सहन करावा लागला तितकाच लेखकांना देखील करावा लागला.
Pdf ऐवजी कोणत्याही स्मार्टफोनवर मजकूर ऑटोमॅटिक ऍडजस्ट होणाऱ्या व वाचकांना उत्तम वाचनानुभव देणाऱ्या EPUB (Electronic PUBlications) प्रणालीचा वापर सुरू करण्याची मराठी साहित्यात नितांत आवश्यकता होती. हे शिवधनुष्य bronato.com या वेबसाईटच्या माध्यमातून शैलेश खडतरे व टीम तसेच हेमंत आठल्ये यांनी पेलले. या दरम्यान लेखकांच्या गाठीभेटी घेणे, त्यांना EPUB बद्दल जागरूक करणे, काम मिळवणे ही धडपड त्यांना करावी लागली . मराठी पुस्तकांबद्दल म्हणायचं झालं तर बहुतेक पुस्तके युनिकोड फॉन्ट मध्ये नाहीत त्यामुळे प्रिंट पुस्तकांची ई-आवृत्ती करणे इथून हे काम सुरु होतं.
ई-पब ही संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचं bronato ने ठरवलं. त्यामुळे २०१६ च्या मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने होणाऱ्या पहिल्या #ट्विटरसंमेलन मध्ये त्यांना मोठी संधी मिळाली. #ट्विटरसंमेलन च्या कवितांचे पहिले ईपुस्तक तयार करण्यात आले. सोबतच EPUB फाईल कशी वाचायची याची माहिती प्रसारित केली. याचा फायदा २०१७ च्या ट्विटरसंमेलनाच्या वेळी झाला.
bronato टीमने याची सुरुवात ‘गुगल प्ले बुक्स’वर पुस्तक प्रकाशनापासून केली. १९ सप्टेंबर २०१६ ला १००० डाउनलोडचा टप्पा गाठला. आणि येत्या मे महिन्यात एकूण २६ देशांमध्ये २०,००० डाउनलोड्सचा टप्पा गाठलेला असेल. २८ फेब्रुवारील २०१७ ला Bronato.com या नावाने नवीन संकेतस्थळ सुरू केले.
आता परिस्थिती थोडी वेगळी आहे. स्मार्टफोन व किंडलच्या युगात आपला वावर तिथे देखील असावा हे काही प्रकाशकांनी हेरले आहे. EPUB बाबत जागरूकता मूळ धरू लागली आहे. मराठी ईपुस्तक उद्योग अजून बराच बाल्यावस्थेत आहे पण भविष्य उज्वल आहे.
पेपरलेस शिक्षणाच्या दृष्टीनेही EPUB खूप महत्वाचे आहे. भारतीय भाषांवर आधारित एक खुप मोठी बाजारपेठ आहे. व्यावसायिकता, जागतिक दर्जा व सृजनशीलाता यांवर आधारित व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे. मराठी ई पुस्तक उद्योग यात आपले कर्तृत्व नक्कीच सिद्ध करेल. तोपर्यंत तुम्ही ई पुस्तके (EPUB) वाचा आणि इतरांना देखील सांगा.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
वाचनाची आवड पण सवड नसलेल्यांना एक उत्तम संधी एव्हढंच म्हणेन मी !
सुरेश जोशी काका