समाज | Tradition, society and patriotism | Bhalchandra Nemade

परंपरा, समाज आणि देशीवाद | डॉ. भालचंद्र नेमाडे | Tradition, society and patriotism | Bhalchandra Nemade

परंपरा, समाज आणि देशीवाद

१९व्या शतकातील मराठी समाज हा २०व्या शतकातील मराठी समाजापेक्षा बराच पुढारलेला होता. विचारात, चिंतनात, राजकारणात सगळ्याच क्षेत्रात मोठमोठ्या व्यक्ती आपल्याकडे  झाल्या. पण २०व्या शतकाच्या मध्यानंतर आपल्या समाजात असे काही विखार निर्माण झाले, की या सगळ्याला खीळ बसली. आपण आपली ताकद पाहिजे तितकी, पाहिजे त्या पद्धतीने वापरत नाही, असे लक्षात आले. १९८० साली हा विचार मी पहिल्यांदा मांडला. या विचाराला अतिशय विरोध झाला, कारण मी इंग्रजीचा प्राध्यापक असल्यामुळे तो इंग्रजीच्या एका परिषदेमध्ये मांडला. भारतीयांनी जे इंग्रजी लेखन केले आहे, ते अतिशय टाकाऊ व कमी दर्जाचे आहे, हा मुद्दा मी मांडला. हे इंग्रजी भाषेतील धुरीणांना सहन होणारे नव्हते. अजूनही इंग्रजीच्या परिषदांमधून यावर चर्चा चालते. मी असे कसे म्हणू शकतो, असा मुद्दा या चर्चांमधून उपस्थित केला जातो. एखाद्याची आवडीची भाषा इंग्रजी असू शकते, तर तो इंग्रजीतच लिहिणार ना? हिंदुस्थानात इंग्रजी लिहिणे, यात काहीही गैर नाही, अशा चर्चा अजूनही इंग्रजीच्या भारतीय विद्वानांत होतात.

ही परिस्थिती महाराष्ट्राबाहेर अधिक प्रमाणात पाहायला मिळते. महाराष्ट्रात सुदैवाने तथाकथित ‘इंटरनॅशनल’ लेखक फारसे झालेले नाहीत. त्यामुळे मराठी साहित्य बरेच मौलिक समजले जाते. एकदा का तुम्ही ‘इंटरनॅशनल’ झालात, की तुम्ही मागे पडायला लागता, अशी परिस्थिती सध्या आहे. कारण हे ‘इंटरनॅशनॅलिझम’, ‘ट्रान्सनॅशनॅलिझम’, ‘मल्टीकल्चरलिझम’ आणि ‘कॉस्मो-पॉलिटिनिझम’ या सगळ्या अलंकार शास्त्राचा वेढा तुम्हाला पडतो. पण यात फार काही दम नसतो. कधी-कधी असे म्हटले जाते, की अमुक-अमुक माणूस जगप्रसिद्ध आहे किंवा तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. प्रत्यक्षात त्या व्यक्तीला बाहेर कोणीही विचारत नाही. तुमची खरी लायकी ही तुमच्या भाषिक समाजात असते, असा माझा नेहमीचा आवडता सिद्धांत आहे. हा सिद्धांत सगळ्यांना पटत नाही. पण मी हा सिद्धांत बदलावा, अशी परिस्थिती अद्याप आलेली नाही.

मुंबईच्या देसानी नावाच्या गृहस्थांनी ‘ऑल अबाउट एच्. हॅट्टर’ ही एकच अतिशय चांगली कादंबरी इंग्रजीत लिहिली आहे. या कादंबरीत दिल्लीच्या रामलीला मैदानावर साधूंचा एक मोठा मेळावा भरला होता, त्याचे वर्णन आहे. तिथे आलेल्या साधूंच्या तंबूंवर ‘ऑल इंडिया साधू’, ‘इंटरनॅशनल साधू’ अशा पाट्या लावलेल्या होत्या. आज ही परिस्थिती इतकी वाढत गेली आहे, की ‘कॉस्मोपॉलिटिन साधू’ अशी आणखी एक पाटी लावायची गरज निर्माण झाली आहे की काय, असे वाटते.

प्रत्यक्षात माणसाला अशा ‘सुपर स्ट्रक्चर’ची गरज नसते. तो फक्त त्याच्या समाजापुरता मोठा असावा. तिथेच त्याची खरी लायकी असते आणि ही लायकी त्या त्या समाजातच कसाला लागते.

या खोट्या ऊर्ध्वरचनांमुळे, ‘सुपर स्ट्रक्चर’मुळे, दिवसेंदिवस आपण सगळे महाराष्ट्रीयच काय भारतीयसुद्धा राहिलेलो नाही. सध्या तर भारतीय समाज अशा खोट्या मृगजळामागे धावणाऱ्या मृगमरीचिकासारखा कोठेही भलतीकडे वाहत चाललेला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे आपले कोणतेही प्रश्न आपल्याकडून सुटत नाहीत. अगदी अन्नवस्त्रनिवारा, आरोग्य, कुपोषण, स्त्रियांना मिळणारा पशुतुल्य दर्जा – असे कुठलेही प्रश्न गेल्या अनेक वर्षांत आपण सोडवू शकलेलो नाही.

या मुद्द्याकडे वळण्यापूर्वी आणखी एक गोष्ट मांडायला पाहिजे. ती म्हणजे ही समाजाची बिघडवलेली ‘पॅथॉलॉजी’ आहे – हे जे काहीतरी बिनसल्यासारखे वाटत आहे ते केवळ शहरी समाज मध्ये नाही, तर एकूणच मराठी समाजात हे चित्र पाहायला मिळते. कारण माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे आज शहरी आणि ग्रामीण किंवा आपल्या प्राचीन काव्यशास्त्रात ‘मार्गी’ आणि ‘देशी’ अशा ज्या काही अतिशय शास्त्रीय कसोट्या होत्या, त्या मोडत चाललेल्या दिसत आहेत. याला कारण म्हणजे आजची माध्यम व्यवस्था. एखाद्या कुठल्यातरी स्टुडिओतून, एखाद्या कुठल्यातरी संकुचित प्रचारकी केंद्रातून ‘विचार’, ‘मूल्ये’ सगळ्या समाज मध्ये पसरवणे, असा एक विचित्र प्रकार सध्याच्या या काळात सुरू असलेला नजरेस पडतो आहे.

खरे तर हे पूर्णपणे वास्तवाच्या उलट आहे, मानववंशशास्त्राच्या विरुद्ध आहे. बहुधा कुठलीही मूल्ये समाज च्या खालच्या स्तरातून तयार होतात व ती वरपर्यंत जातात आणि मग वरून पुन्हा तळागाळातील लोकांमध्ये पक्की होत जातात. त्यांना एक ‘सँक्शन’ मिळत जाते. अशी एक खालून वर, वरून खाली जाणारी विचारांची साखळी होय, अशी परिस्थिती आपल्याकडे अगदी अलीकडेपर्यंत होती. याबाबतचे माझे गृहीतक असे की – देशी जाणिवा विसरल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आपल्यासमोर नको त्या गोष्टी, नको त्या जाणिवा येत चालल्या आहेत. त्यामुळे आपल्या देशी जाणिवा गुदमरत चाललेल्या आहेत.

माणूस काय असतो? सर्वप्रथम  तो त्याच्या कुटुंबाशी जोडलेला असतो. म्हणजे आईवडील, बायकोमुले यांच्याशी तो एकरूप झालेला असतो. नंतर शेजारीपाजारी, नंतर आपल्या धंद्यातले लोक, व्यावसायिक सहकारी यांच्याशी तो जोडला जातो. त्याचा प्रथम संपर्क येतो त्या समाजधारेशी, विचारांशी त्याची नाळ जुडलेली असते. इथे जन्मलेला माणूस अमेरिका, इंग्लंडमधल्या किंवा युनोमधल्या एखाद्या विचारवर्तुळाशी जोडलेला नसतो. (दूरच्या विचारवर्तुळांशी तो नंतर जोडला जाऊ शकतो. यात काही चुकीचे नाही, मात्र मुळात तो कुठल्या तरी एका समाजाशी जोडलेला असतो, असे मानववंशशास्त्र म्हणते.) माणूस हा कधीच एकटा नसतो. एवढेच नाही, तर एकटा माणूस हा माणूसच नसतो असे म्हटले जाते. कारण तो सारखा कशाबरोबर तरी जोडलेला असतो. आजच्या समाज मध्ये नसेल, तर तो जुन्या समाजाशी तरी नक्कीच जोडलेला असतो. आपल्याच भूमीतल्या अनेक गोष्टींशी तो जोडलेला असतो. आपली सगळीच माणसे ही कुटुंब, झाडे-झुडपे, पशू-पक्षी-प्राणी, डोंगर-नद्या-समुद्र, निसर्ग या सगळ्या परिसराशी अगदी आनंदाने आपले जीवन जोडून एकत्र कुटुंबासारखे जगत असतात.

आपली संस्कृती (म्हणजे, आपण मानतो ती मूल्ये, भाषा, खान-पान, साहित्य-कला, आचार-विचार, संस्कार याची जी परंपरा) समाजाने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत संक्रमित करत आणलेली असते. यातूनच माणूस अनेक संस्था निर्माण करतो, त्या संस्था आपापले काम करत राहतात. लग्न ही संस्था घेतली, कुटुंब ही संस्था घेतली, तर त्या प्राचीन काळापासून आपापले काम पद्धतशीरपणे करत आलेल्या असतात आणि आपल्याला त्यात काही फार बदल करता येत नाही. काळानुरूप जेव्हा या प्रथेत बदल करायचे असतात किंवा बदल करणे आवश्यक असते (उदा.- सतीची चाल) तेव्हा लोक हिरिरीने पुढे येऊन ते काम करतात. याचाच अर्थ जेव्हा आपण अशा परंपरेचे घटक असतो, तेव्हा आपण या परंपरेला निरोगी आणि खळखळते ठेवणे, तिच्यात शेवाळे होऊ न देणे ही आपली जबाबदारी असते.

भारतावरील इंग्रजी सत्तेचा दीडशे वर्षांचा इतिहास पाहिल्यास ‘इंग्रजांनी भारतात अमुक सुधारणा केल्या’ असे आपल्याकडून (भारतीयांकडून) लिहून घेतले. इतिहासही असेच खोटे लिहून घेतले आहेत. पण हे सगळे आपण भारतीयांनी त्यांच्याकडून करून घेतले आणि गरज संपली तेव्हा त्यांना दूर केले, अशी भूमिका कोणी घेत नाही. तेव्हाच्या काळात आधुनिक विचार असणारे लोकहितवादी यांनी, ‘व्याकरण, वेद आणि पाठांतर, घोकंपट्टी हे सगळे मुलांना शिकविण्यापेक्षा लाकडे फोडायला शिकवले तर ते अधिक उपयुक्त ठरेल,’ असे म्हटले हे त्यांच्याच ‘शतपत्रां’च्या आधारे दिसते. राजा राममोहन रॉय हेसुद्धा प्रचंड हुशार व्यक्तिमत्त्व! त्या काळात युरोपातही इतका हुशार माणूस कदाचित दुसरा कोणी नसेल. त्यांनीसुद्धा संस्कृतपेक्षा इंग्रजी शिक्षण आवश्यक असल्याचे सांगितले. लोकहितवादी काय किंवा रॉय काय, संस्कृतवर वाढलेल्या या व्यक्तींनाही जुन्या गोष्टी परत यायला नको होत्या. त्यांची देशीवादी भूमिका आपल्या लक्षात यायला पाहिजे. आंबेडकरांच्या क्रांतीमध्येही आपल्याला देशीवाद पाहता आला पाहिजे. इतर अनेक प्रलोभने असताना त्यांनी शेवटी बौद्ध धर्मच का स्वीकारला? कारण हजारो वर्षे चालत आलेली परंपरा बरीच अडगळ सहन करते, नंतर तिच्यात आपोआप बंड करण्याची ताकद तयार होते आणि ती कात टाकून पुन्हा सतेज होते.

गेल्या पाच हजार वर्षांचा आपला इतिहास पाहिला तर आपल्याकडे अनेक आर्यपूर्व सिंधु संस्कृतीतील पंथ जाऊन वेद आले, वेद मागे पडून उपनिषदे आली, उपनिषदे आत्मसात करून बौद्ध धर्म आला, बौद्ध धर्म गिळून ब्राह्मण धर्म आला, ब्राह्मण धर्म जाऊन पुन्हा भक्ती संप्रदाय आले. तेही मागे सारून आपण पुन्हा नेहरूंच्या काळातील ‘सेक्युलॅरिझम’कडे वळलो. ही अशी सारखी वाहती गंगा आहे. यासाठी उदाहरण फुले-आगरकरांचे घेऊ या. अतिशय टोकाला जाऊन त्यांनी हा लढा चालवला, ही अभिमानाची गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट ही नाही, की आपण टिकून राहिलो. अभिमानाची गोष्ट ही आहे,की आपण सतत नाथ, चक्रधर, नामदेव, ज्ञानदेव, तुकाराम यांसारखे बंड करत राहिलो आणि त्यामुळे टिकून राहिलो. परंपरेचा विचार करता लक्षात येते, की अनेक पिढ्यांपासून संक्रमित झालेली परंपरा मोडणे हे फार कठीण असते. आपल्याला माहीत आहे, की  हे सगळे आनुवंशिक आहे. इंग्लंडमध्ये अनेक स्तरांवर डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत पुन्हा पुन्हा वादग्रस्त ठरला आणि शेवटी धर्मविरोधी असला तरी तो बरोबर असल्याचे सर्वमान्य झाले. ही पृथ्वी परमेश्वराने एका दिवसात निर्माण केली आणि नंतर हे केले, ते केले हे सगळे त्यांच्या यहुदी, ख्रिस्ती, महंमदी परंपरेत सांगितलेले चुकीचे आहे आणि डार्विनचेच म्हणणे बरोबर आहे, हे  ‘चर्च ऑफ  इंग्लंड’नेसुद्धा मान्य केले. दुसरे उदाहरण कनेडियन पार्लमेंटने अलीकडे पास केलेला बहुचर्चित ठराव : “We are sorry” – एवढाच तीन अक्षरी. गेली दोनशे वर्षे तिथले गोरे-ख्रिस्ती मिशनरी हे गरीब, असहाय्य, आदिवासी एस्किमो भटक्या ‘फर्स्ट नेशन’च्या कोवळ्या मुलांना लहानपणापासून बळजबरीने त्यांच्या ‘अडाणी’ आईबापांपासून जबरदस्तीने हिसकून त्यांना ‘सुसंस्कृत’ वगैरे करण्यासाठी इंग्रजी शिकवून चर्चच्या कान्वेंटांमध्ये मोठे होईपर्यंत डांबून ठेवीत. ह्या दुर्दैवी पोरापोरींमधून एकही कोणी नावाजला नाही, हे लक्षात आल्यावर ही क्रूर प्रथा ह्या तीन अक्षरी कायद्याने लाजेकाजेस्तव बंद करण्यात आली. जगभरच्या देशी संस्कृती नष्ट करणारे हे लोक आता थोडेतरी देशीवादी होताहेत, हेही काय कमी आहे ?

आता तुम्ही म्हणाल की, मी असाच विचार का करतो किंवा अमुक गोष्टीच्या बाबतीत का आग्रही असतो? तर ह्या प्रश्नाचे उत्तरही आपल्या परंपरेतच असणार. शेवटी आपण पृथ्वीवरच्या सर्वात प्राचीन अशा एका परंपरेचे पाईकच तर आहोत. आपण टिकून आहोत, कारण आपण जितके आधुनिक होतो, तितकेच प्राचीनही राहतो. ह्यालाच मी ‘देशीवाद’ म्हणतो.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. भालचंद्र नेमाडे

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.