गीता जयंती

मार्गशीर्ष शुद्ध एकादशी या दिवशी कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. गीतेचा या दिवशी जन्म झाला म्हणून मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा दिवस गीताजयंती म्हणून साजरा केला जातो. या एकादशीला मोक्षदा एकादशी असे नाव आहे आणि भगवद्गीता ही मोक्षदा आहे, अशी अनेक साधुसंतांची साक्ष आहे.


“श्रीमद्‌भगवद्‌गीता हा आमच्या धर्मग्रंथांपैकी एक अत्यंत तेजस्वी व निर्मळ हिरा आहे. पिंडब्रह्मांडज्ञानपूर्वक आत्मविद्येची गूढ व पवित्र तत्त्वे थोडक्यात, पण असंदिग्ध रितीने सांगून त्यांच्या आधारे मनुष्यमात्रास आपल्या आध्यात्मिक पूर्णावस्थेची म्हणजे परम पुरुषार्थाची ओळख करून देणारा आणि त्याबरोबरच भक्तीची ज्ञानाशी व अखेर या दोहोंचीही शास्त्रतः प्राप्त होणाऱ्या व्यवहारांशी सांपत्तिक व सुंदर जोड घालून संसारात भांबावून गेलेल्या मनास शांत आणि विशेषतः निष्काम कर्तव्याचरणास प्रवृत्त करणारा यासारखा दुसरा ग्रंथ संस्कृतातच काय पण जगातील इतर वाड्मयातही सापडणे दुर्मिळ होय. केवळ काव्य या दुष्टीने जरी याचे परीक्षण केले, तरी आत्मज्ञानाचे अनेक गहन सिद्धान्त प्रासादिक भाषेने आबालवृद्धांस सुगम करणारा आणि ज्ञानयुक्त भक्तिरसाने भरलेला हा ग्रंथ उत्तम काव्यात गणला जाईल. मग सकल वैदिक धर्माचे सार श्रीभगवंतांच्या वाणीने ज्यात साठविले गेले त्याची योग्यता काय वर्णावी?”

आपल्या ‘ गीतारहस्य ‘ या अजरामर ग्रंथाच्या प्रारंभीच लोकमान्य टिळकांनी वरील शब्दांत गीतेचे माहात्म्य सांगितले आहे. तर

“माझ्या बालपणींच आयुष्यात मोहाच्या आणि कसोटीच्या प्रसंगी अचूक मार्गदर्शन करणाऱ्या शास्त्र-ग्रंथाची गरज मला भासली. मी कोठेतरी वाचले होते कीं, अवघ्या सातशे श्लोकांच्या मर्यादित गीतेने साऱ्या शास्त्रांचे व उपनिषदांचे सार ग्रंथित केले आहे. माझ्या मनाचा निश्चय झाला. गीता वाचता यावी म्हणून मी संस्कृत शिकलो. आज गीता माझे बायबल किंवा कुराण तर काय, परंतु त्यापेक्षांही अधिक, प्रत्यक्ष माताच झाली आहे.”

या शब्दांत गीतेची थोरवी राष्ट्रपिता महात्मा गांधींनी व्यक्त केली आहे.

बाबू अरविंद घोष यांनीदेखील

“महाभारतांत गीतेचा समावेश झाला तेव्हाइतकी आजही ती नाविन्यपूर्ण व स्फूर्तिदायक प्रत्यक्ष अनुभवाने ठरते. गीतेच्या शिकवणीचा प्रभाव हा केवळ तात्त्विक किंवा विद्वच्चर्चेचा विषय नसून, आचारविचारांच्या क्षेत्रांत जिवंत आणि लगेच जाणवणारा आहे. एका राष्ट्राचें आणि संस्कृतीचें पुनरुज्जीवन गीतेची शिकवण प्रत्यक्ष घडवीत आहे. जगातील श्रेष्ठ शास्त्रग्रंथांत तिचा एकमताने समावेश झाला आहे.”

या विचारांद्वारे गीतेचा गौरव केला आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर अखिल विश्वातील सर्वश्रेष्ठ विचारवंत म्हणून मान्यता पावलेल्या अनेक विद्वानांनी ज्ञानार्जनाच्या उत्सुकतेपोटी गीतेच्या अभ्यासात स्वतःला तन-मन- धनाने झोकून दिलेले दिसते. या प्रत्येकानेच आपापल्या वकुबानुसार गीतेचे स्वतःला समजलेले रूप इतरांना समजेल अशा रितीने शब्दांतून साकार केले आहे. आज गीतेवर जगातील बहुतेक भाषांमध्ये ग्रंथनिर्मिती झालेली दिसते. केवळ सातशे श्लोकांच्या एका महान ग्रंथाने वर्षानुवर्षे संपूर्ण जगावर घातलेली ही मोहिनी हे जगातील एक आश्चर्यच म्हटले पाहिजे. गीतेवरून स्फूर्ति घेऊन गीतेनंतरच्या पुढील काळात पिंगलगीता शपांकगीता, मंकिगीता, बोध्यगीता विचरव्युगीता, हारीगीता, वृत्रगीता पराशरगीता, हंसगीता, ब्राह्मणगीता, अवधूतगीता सूर्यगीता, ब्रह्मगीता, अष्टावक्रगीता, ईश्वरगीता, उत्तरगीता, कपिलगीता, व्यासगीता, गणेशगीता, देवीगीता, पांडवगीता, भिक्षुगीता, शिवगीता, रामगीता, सूतगीता अशा असंख्य गीता एवढेच काय पण यमगीतादेखील लिहिली गेली.

यावरूनही मानवी मनावर, जीवनावर, विचारांवर गीतेचा किती प्रभाव पडलेला आहे ते कळते. मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला गीताजयंती म्हणून सन्मानिताना तिला ‘ मोक्षदा ‘ म्हणजे मोक्ष प्राप्त करून देणारी. म्हणून गौरविणे किती यथार्थ आणि उचित आहे, नाही?


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (देवाचिये व्दारी पुस्तकामधून)

संदर्भ टीप –

प्रस्तुत लेखातील विचारवंतांचे गीतेविषयीचे विचार हे गीतारहस्याच्या प्रारंभी दिलेले आहेत. त्यावरुन ते येथे घेतले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.