रथसप्तमी

माघ शुक्ल सप्तमीला ‘रथसप्तमी’ असे विशेष नाव आहे. ह्या दिवसाला धर्मकार्यात तसेच सूर्योपासनेतही अतिशय महत्त्व आहे. ‘व्रतासाठी ही सप्तमी अरुणोद्यव्यापिनी घ्यावी’ – असे धर्मधुरिणांनी लिहून ठेवले आहे.

  • व्रतकर्त्याने आदल्या दिवशी म्हणजे षष्ठीला एकभुक्त (एक वेळ जेवून-) राहावे.
  • सप्तमीला पहाटेच शुचिर्भूत व्हावे.
  • नंतर शक्य होईल त्या धातूचा दिवा लावावा.
  • सूर्याचे ध्यान करुन तो दिवा वाहत्या पाण्यात (प्रवाहात) सोडावा.
  • ह्या विधीनंतर स्वतःच्या घराच्या अंगणात रक्तचंदनाचे गंध उगाळून त्या गंधाने सारथी अरुणासह सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्याचे चित्र काढावे.
  • त्या चित्राचे ‘ध्येयः सदा सवितृमंडल मध्यवर्ती’ ह्या मंत्राने ध्यान करावे.
  • नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी.
  • शेणीच्या (गोवऱ्यांच्या) विस्तवावर मातीच्या पात्रात केलेल्या खिरीचा नैवेद्य सूर्यप्रतिमेला दाखवावा.
  • शेवटी सात रुईची पाने, सात प्रकारचे धान्य, सात बोरे वाहून अष्टांग अर्घ्य द्यावे.
  • ब्राह्मणभोजन घालावे.
  • स्त्रियांनी संध्याकाळी हळदीकुंकू समारंभ करावा.

पूजेमध्ये थोडाफार फरक असलेली इतर अनेक सप्तमी व्रते ह्या तिथीला सांगितलेली आहेत.

सद्यःस्थितीः

ह्या सप्तमीला आपल्याकडे ‘रथसप्तमी’ असे नाव आहे, तर भारतात विविध प्रांतांत ती जयंती सप्तमी, मंदार सप्तमी, विधान सप्तमी, विशेष सप्तमी, पुत्रसप्तमी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. संपूर्ण वर्षातील सप्तम्यांपैकी ह्या सप्तमीला विशेष महत्त्व असल्यामुळे तिला ‘महासप्तमी’ म्हणूनही गौरविले गेलेले आहे.

  • सूर्योपासक मंडळींमध्ये हे व्रत आवर्जून केले जाते. मात्र सध्याच्या काळात प्रत्येकालाच जलाशयात स्नान करणे वा दिवा वाहत्या पाण्यात सोडता येणे शक्य नाही.
  • अशावेळी बादलीतील पाण्यालाच आपण वास्तव्यास असलेल्या राज्यातील एखादी नदी समजून स्नान करावे.
  • शुचिर्भूत झाल्यावर पाण्याने भरलेला नवीन टब वा परात गच्चीत नेऊन तिच्यामध्ये तेवता दिवा सोडावा.
  • तसेच जवळच्या देवळात दिवा नेऊन तिथे तो दीपमाळेवर वा झाडाच्या बुंध्याशी ठेवनू प्रज्वलित करावा.
  • पूर्वी ‘चूल’ अस्तित्वात असताना गोवऱ्यांवर खीर शिजविणे शक्य होते. आता त्याला पर्याय म्हणून नित्य वापरातील गॅसची शेगडी आदल्या रात्रीच अतिशय स्वच्छ धुऊनपुसून लख्ख करावी.
  • सकाळी तिची प्रथम पूजा करावी.
  • नंतर त्यातल्या त्यात नव्या स्टीलच्या वा पितळेच्या भांड्यात ही खीर शिजवावी.
  • ब्राह्मण भोजनाऐवजी परिचितांपैकी कोणालाही जेवणासाठी निमंत्रण द्यावे.
  • कामाचा दिवस असल्यास डब्यातून खीर, पुऱ्या, भाजी बरोबर घेऊन जाऊन आपल्या सहकाऱ्यांना प्रसाद म्हणून द्याव्यात.
  • ह्यापैकी काहीही करणे शक्य नसेल तर निदान बारा वाजण्यापूर्वी यथाशक्ती गायत्री मंत्राचा जप, सूर्याचे ध्यान, नामस्मरण, अर्ध्य देणे सर्वांनाच शक्य आहे.
  • खीर करुन तिचा नैवेद्य मात्र जरुर दाखवावा.

रथयात्रेला निघालेल्या सूर्यनारायणांचे गोड खिरीसह स्वागत करणे आपले कर्तव्यच आहे. हे कर्तव्यकर्म ‘धर्म’ म्हणून शक्य तेवढे केलेच पाहिजे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.