विजयादशमी

आश्र्विनाच्या शुक्ल पक्षातील ही दशमी श्रवण नक्षत्राच्या योगावर ‘विजयादशमी’ होते. ही विजयादशमी श्रवण नक्षत्रयुक्त आणि सूर्योद्यव्यापिनी असल्यास सर्वोत्तम मानली जाते. ह्या दशमीलाच आपण ‘दसरा’ म्हणतो. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ह्या दिवशी कुठल्याही कार्यासाठी वेगळा मुहूर्त बघावा लागत नाही. (तरीदेखील अपराण्हकाळी म्हणजे दुपारी एक ‘विजयमुहूर्त’ असतो.) दसऱ्याला शेतीतील पहिले पीक वाजतगाजत घरी आणून आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आजही गावोगावी पाळली जाते. ह्या नव्या धान्याच्या काही लोंब्या, झेंडूची फुले आणि आंब्याची पाने ह्यांनी बनविलेल्या तोरणात बांधतात. हे सुखसमृद्धीचे प्रतीक आहे. ह्या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितादेवीची पूजा आणि शस्त्रपूजा हे चार विधी पूर्वी राजेरजवाडे, सरदारदरकदार करीत असत.

विजयादशमी व कथा: 

  • पांडव व शमी वृक्ष: अज्ञातवासात असताना पांडवांनी आपली शस्त्रे शमी वृक्षावर लपवून ठेवली होती, अशी कथा महाभारतात आहे. त्यामधून दसऱ्याला शमी वृक्षाखाली शस्त्रपूजा करण्याची प्रथा सुरु झाली.
  • रामायण व विजयादशमी: रामाने रावणाशी युद्ध करण्यासाठी विजयादशमीला प्रस्थान ठेवले होते, हे कारणही सीमोल्लंघनासाठी महत्त्वपूर्ण ठरले.
  • कौत्स व कुबेर: कौत्साने दक्षिणा म्हणून कुबेराकडून सुवर्णमुद्रा मिळविल्या. त्यापैकी गुरुदक्षिणा देऊन उरलेल्या सुवर्णमुद्रा कौत्साने शमीच्या वृक्षाखाली आणून ठेवल्या, तो दिवसही विजयादशमीचाच होता.

त्याची आठवण म्हणून आजही आपण दसऱ्याला एकमेकांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून देतो. ह्या दिवशी अधिककरुन राजेरजवाडे, पराक्रमासाठी निघालेल्या मंडळींसाठी व्रतविधी सांगितलेले आहेत. आपण तो ‘सण’ म्हणून साजरा करतो.

सद्यःस्थितीः

ह्या निमित्ताने नातलगांनी, स्नेहीमंडळींनी एकत्र येऊन सामूहिकरीतीने आपटयाचे सोने लुटण्याचा उपक्रम आसपासच्या देवळांमधून आणि आपल्या परिसरातील एखाद्या मैदानावर आयोजित करावा. मात्र त्यात कुठलाही उच्छृंखलपणा येणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. पूर्वी मंडळी आवर्जून एकमेकांच्या घरी जाऊन आपटयाचे सोने देत-घेत असत. शमी वृक्ष हा सर्वत्र उपलब्ध होऊ शकत नाही ह्याची कल्पना असल्यामुळे शमी वृक्ष नसल्यास आपटयाच्या वृक्षाची पूजा करावी, असा धर्मशास्त्रीय संकेत आहे. परिणामी आपटयाच्या पानांचे ‘सोने’ एकमेकांना देण्याची गोड प्रथा सुरु झाली. मुळात शमी वृक्षाच्या समिधा यज्ञकर्मात अग्नी प्रदीप्त करण्यासाठी होत असल्याने त्याच्या संवर्धनाची गरज लक्षात येऊन आपल्या पूर्वजांनी धर्मकार्याया त्याची सांगड घालून हे वृक्ष वाचविण्याचे फार मोठे कार्य केले. (शमी वृक्ष हा औषधी गुण असलेला वृक्ष आहे. दूर्वांप्रमाणेच शमीचा एक गुणविशेष सुलभ प्रसूतीच्या संदर्भातील आहे. तो आपल्या ऋषी-मुनींना, पूर्वजांना ज्ञात होता हे आता नव्याने जगासमोर येत आहे.) त्या कार्याचे आपण हे ‘सोने’ दसऱ्याला एकमेकांना देऊन ‘सोने’ करणे गरजेचे आहे.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर ( ‘धर्मबोध’ पुस्तकामधून )

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.