भोंडला – महाराष्ट्राचा पारंपारिक खेळ

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थापनेसोबतच ‘भोंडला’ या खेळास सुरुवात होते. ‘भोंडला’ हा  प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.

या खेळात समवयस्क मुली एकत्र येतात. संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. हत्ती हा समृद्धीचे प्रतीक आहे तसेच वर्षन शक्तीचे देखील! म्हणून एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते. त्या चित्राभोवती फेर धरून गाणी म्हटली जातात. ‘ऐलोमा पैलोमा गणेश देवा’ ह्या गाण्यापासून सुरु होऊन रोज एक-एक गाणे वाढवत दसऱ्याला दहा गाणी म्हटली जातात. सासु-सासरे-नणंद, भावजय, पती-दीर आणि माहेरच्या माणसांबद्दल स्तुतीचे बोल बोलणारी गाणी गाऊन स्त्रिया या खेळात आनंद साजरा करीत असतात.

ज्या मुलीच्या घरी भोंडला असेल तिची आई खिरापत करते. रोज बहुधा वेगळे घर आणि त्यामुळे वेगळी खिरापत असते. गाणी म्हटल्यावर ‘खिरापत ओळखणे’ हा मोठा मजेशीर कार्यक्रम असतो. त्यामुळे पटकन न ओळखू येणारी खिरापत करणे ह्यात घरातील गृहिणीचे पाककौशल्य पणाला लागते.

‘भोंडला’ प्रमाणेच ‘हादगा’ हा देखील खेळ नवरात्रीच्या दिवसांत अनेक ठिकाणी खेळला जातो. ह्यात मात्र स्त्री-पुरुष दोघेही स्सःभागी होतात.

आश्विन महिना आला की अशा खेळांच्या माध्यमातून भोंडला,हळदीकुंकू वगैरेमुळे विरंगुळा मिळत असे. घरोघरीच्या स्त्रिया, मुली एकत्र खेळायला आल्याने त्यांच्यातील संवाद,ओळख वाढत असे. रोजच्या कामांमध्ये थकून गेल्यानंतर या खेळांमुळे त्यांना नवा उत्साह मिळत असे. आता आजच्या आधुनिक युगात, गतिमान आयुष्यात व स्पर्ध्येच्या जमान्यात महिलांना अजिबात वेळ मिळत नाही. ताणतणाव दिवसेंदिवस वाढतोय.  अशावेळी दोन घटका आनंद प्राप्तीच्या हेतूने का होईना  ‘पारंपरिक पद्धतीचा भोंडला’ सर्वत्र खेळण्यास हरकत नाही.

भोंडल्याचे प्रसिद्ध गाणे:

ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय पारावरी
मांडला ग मांडला  वेशीच्या दारी,
पारवळ घुमतं बुरजावरी
गुंजावनी डोळ्यांच्या साजीव टिक्का,
आमच्या गावच्या भुलोजी नायका
एवीन गाव तेवीन गाव,
कांडा तिळूबाई तांदूळ घ्या
आमच्या आया तुमच्या आया,
खातील काय दूधोंडे
दूधोंड्यांची लागली टाळी,
आयुष्य दे रे ब्रम्हाळीं
माळी गेला शेता भाता
पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोंथेंबी
थेंबाथेंबी आळव्या लोंबी
आळव्या या लोंबती अंगणा
अंगणात होती सात कणसं
हादग्या तुझी सोळा वर्ष
तुम्ही खेळलात का कधी भोंडला? खेळला असाल तर या पारंपारिक खेळाची अधिक माहिती व गाणी या पोस्टखाली कमेंट करून नक्की सांगा. 
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.