हरितालिका

हरितालिका हे व्रत सवाष्णींच्याबरोबरच विधवा स्त्रियाही करतात. हे ह्या व्रताचे एक वैशिष्टय म्हणावे लागेल. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी प्रथम आपण हे व्रत करीत आहोत – असा संकल्प करुन मग पूजा करावी.

  • पूजेचे स्थान स्वच्छ आणि सुशोभित करावे.
  • (सत्यनारायणाच्या पूजेच्यावेळी लावतात तसे-) केळीचे खांब चौरंगाच्या चारही बाजूंना लावून तो फुलांनी सजवावा.
  • स्वतः व्रतकर्त्या स्त्रीने रेशमी वस्त्रे आणि विविध अलंकार घालून मग पूजेला प्रारंभ करावा.
  • त्या चौरंगावर कलश ठेवून पूर्णपात्रात अथवा चौरंगावर कोरे रंगीत वस्त्र घालून त्यावर तांदूळ पसरवून पार्वतीमातेची वाळूची अथवा शाडूची मूर्ती शिवलिंगासह स्थापन करावी.
  • संकल्प, गणेशपूजन, शिवपार्वतीचे ध्यान करुन त्यांची षोडशोपचारी पूजा करावी.
  • उपलब्ध फळे-फुले अर्पण करुन

‘‘शिवायै शिवरुपायै मड्गलायै महेश्र्वरी । शिवे सर्वार्थदे नित्यं शिवरुपे नमोस्तुते ॥

नमस्ते सर्वरुपिण्यै जगद्धात्र्यै नमो नमः । संसारभयसन्यस्तां पाहि मां सिंहवाहिनी ॥’’

  • ह्या मंत्रासह त्यांची प्रार्थना करावी.
  • ह्यावेळी शिव-पार्वती मानून एका दाम्पत्याचीदेखील पूजा करावी.
  • आपल्या ऐपतीनुसार त्यांना अन्न, वस्त्र, दक्षिणा द्यावी.
  • स्त्रियांना हळदीकुंकू आणि वायनदान द्यावे.
  • ह्या दिवशी केवळ फलाहार घ्यावा.
  • देवीची धुपारती करावी. कथा ऐकावी.
  • दुसऱ्या दिवशी देवीची पंचोपचारी पूजा करुन तिला खिचडीचा नैवेद्य दाखवावा.
  • अक्षता वाहून तिचे विसर्जन करावे.

कालनिर्णय मंगलमूर्ती आरास(घरगुती) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा व उत्कृष्ट भेटवस्तू जिंका! 

ह्या पूजाविधीत थोडाफार फरक काही ठिकाणी आढळतो. काही ठिकाणी पार्वतीबरोबर तिच्या सखीचीही पूजा केली जाते. कुमारिकांना मनासारखा पती मिळावा म्हणून त्या हे व्रत करतात. तर सवाष्णी अखंड सौभाग्य आणि सुखसंपत्तीसाठी हे व्रत आचरितात. शंकराचे कोणतेही व्रत अर्धवट सोडू नये असा संकेत असल्याने वृद्धा, विधवा स्त्रियादेखील हे व्रत करतात. हिमालयकन्या पार्वती हिने तिला आवडलेल्या शिवशंकरांशीच आपला विवाह व्हावा म्हणून अतिशय निग्रहाने हे व्रत केले.

ह्या व्रताच्या प्रभावाने तिचा हा प्रीतिविवाह निर्विघ्नपणे पार पडला – अशी ह्या व्रतामागची कथा आहे.

सद्यःस्थितीः

आपला धर्म जेवढा प्राचीन आहे तेवढाच उदात्त आचारविचारांमुळे तो प्रगत, प्रगल्भदेखील आहे. ह्याचे सुंदर उदाहरण म्हणजे शिव-पार्वतीचा प्रीतिविवाह ! आपल्या मनासारखा वर निवडण्याची मुभा पुराणकाळातही आपल्या मुलींना होती हे पार्वतीमातेच्या उदाहरणावरुन कळून येते. आजही अनेक घरांमधून मुलींवर लग्नाची सक्ती केली जाते. त्यांचे वय, इच्छा, स्वप्ने ह्यांचा विचारही केला जात नाही. अशा समाजात हे उदाहरण देऊन संबंधित मंडळींचे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. मुलींना शिक्षणाची, अर्थार्जनाची आणि त्याबरोबरीने त्यांना आवडेल त्या मुलाशी लग्न करण्याची संधी दिली पाहिजे. त्यासाठी वडीलधाऱ्यांनी मुलींना प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि आवश्यक ते सहकार्यही दिले पाहिजे – तरच समाज अधिकाअधिक प्रगती करु शकेल. कौटुंबिक आणि सामाजिक मानसिकता सशक्त आणि निरोगी असणे ही काळाची गरज आहे. आपणही आपल्या संपर्कातील मुलींना त्यांना हवी ती मदत देऊ केली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.