श्रीदत्त जयंती

मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्र असताना बुधवारी प्रदोषकाळी दत्तात्रेयाचा जन्म झाला. म्हणून सर्व प्रमुख दत्तक्षेत्री तसेच जेथे दत्तमंदिर असते तेथे ह्या दिवशी प्रदोषकाळी दत्तजन्म सोहळा केला जातो. ह्या निमित्ताने अनेक कुटुंबामध्ये कुळाचार म्हणून मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीपासून दत्त नवरात्र पाळले जाते. तसेच दत्तजयंतीच्या निमित्ताने ‘श्रीगुरुचरित्र’ ह्या ग्रंथाचे पारायण सामूहिक रीतीने अथवा घरोघरी व्यक्तिगत पातळीवर केले जाते. दत्तजयंतीच्या दिवशी जन्मसोहळ्याच्यावेळी सायंकाळी दत्तजन्माचे कीर्तनही होते. दक्षिणेतही आंध्र, कर्नाटकामध्ये तसेच तामिळनाडूमध्ये दत्तजयंती साजरी केली जाते.

सद्यःस्थितीः


एकीकडे शैव आणि वैष्णव ह्या दोन प्रमुख संप्रदायांमध्ये श्रेष्ठत्वाचा वाद मिटता मिटत नव्हता, तर दुसरीकडे हिंदू-मुस्लिमांमध्ये निर्माण झालेली तेढ समाजात, देशात अशांतता, असंतोष निर्माण करीत होती, नेमक्या अशा स्फोटक परिस्थितीत सर्व समाजात शांती प्रस्थापित करणारा दत्तसंप्रदाय उद्यास आला. नाथसंप्रदाय, महानुभाव पंथ हे दत्तसंप्रदायाशी नाते जोडून आहेत. साहजिकच ज्ञानोबा, एकनाथ महाराज हे वारकरीपंथाचे अध्वर्यू, भागवतसंप्रदायातील प्रमुख संत दत्तसंप्रदायाशी गुरु-शिष्य परंपरेने जोडलेले दिसतात. परिणामीच शैव-वैष्णव ह्यांच्यामधील दुरावा लयाला गेलेला दिसतो.

अत्रि-अनसूया ह्या दाम्पत्याचा पुत्र मानल्या गेलेल्या दत्तात्रेयाचा जन्म ब्रह्मा-विष्णू-महेश ह्यांचा अंश एकत्रित होऊन झाल्याची कथा सुपरिचित आहे. ह्या तिघांचा अंश म्हणून दत्तात्रेयाची त्रिमुखी आणि सहा हातांची सगुणमूर्ती सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे. तुकोबांनीही ‘तीन शिरे सहा हात’ अशाच दत्तस्वरूपाला नमन केले आहे. हे आपण सर्वच जाणतो. मात्र मुळात पुराणात एकमुखी आणि व्दिभुज अथवा चतुर्भुज अशा दत्ताचे वर्णन आढळते. विशेष म्हणजे दत्तोपासनेत ध्यानासाठी त्रिमुखी दत्ताचे सगुणरुप आणि पूजाविधीसाठी पादुकांना महत्त्व दिले गेलेले दिसते. नरसोबाची वाडी, औदुंबर, गाणगापूर ह्या सर्व प्रसिद्ध दत्तक्षेत्री अशा पादुकांचीच स्थापना केलेली आढळते.

योगसाधनेत दत्तात्रेयाला ‘गुरु’ मानले गेले. सर्वांचे ‘गुरु’ म्हणून मान्यता पावलेल्या दत्तात्रेयांनी स्वतः चोवीस गुरु केले. त्यांचा हा गुणग्राहकतेचा आदर्श आपणही आपल्या सर्वांगीण विकासासाठी अंगीकारणे योग्य ठरेल. जसे सर्वगुणसंपन्न कोणीच नसते, तसेच प्रत्येकामध्ये एखादा तरी गुण असतोच, हे जाणून दत्तात्रेयांसारखा विशाल दृष्टिकोन ठेवला तर आपला व्यक्तिमत्त्वविकास होण्यास मदत होईल, समाज अधिक निरोगी, निकोप होईल, ह्यात शंका नाही.

ह्या दिवशी गुरुचरित्राचे वाचन, पारायण अनेक दत्तभक्तमंडळी करतात. ज्यांना काही कारणाने ते शक्य नसेल त्यांनी निदान दत्तात्रेयांचा नामजप आपल्याला जमेल तेवढा जमेल त्यावेळी (शक्यतो प्रदोषकाळी) जरुर करावा. ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल त्यांनी गुरुंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. दत्तमंदिरामध्ये यथाशक्ती धन दानपेटीत घालावे. भुकेलेल्यांना (शक्य असेल ते) एखादे फळ द्यावे. आजूबाजूच्या मंडळींना प्रसाद म्हणून साखरफुटाणे, बत्तासे वाटले तरी चालेल. घरी दत्तावरील पदरचनांची ध्वनिफीत लावून ती ऐकावी. दत्ताचे वास्तव्य औदुंबर वृक्षाच्या तळी असते अशी पूर्वापार श्रद्धा आहे. म्हणून केवळ ह्याच दिवशी नव्हे, तर वर्षभर दर गुरुवारी औदुंबराला प्रेमपूर्वक पाणी घालावे. त्याचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे.

गेल्या शतकातील समर्थ संप्रदायातील एक थोर विभूती म्हणजे प. पू. श्रीधरस्वामी ! स्वामींचा जन्मदेखील दत्तजयंतीच्या दिवशीच झाला. त्यामुळे स्वामींचे अनुयायी, भक्त आणि समर्थ संप्रदायी स्वामींची जयंती भक्तिपूर्वक साजरी करतात. ह्या निमित्ताने आपणही स्वामींच्या जीवनचरित्राचा परिचय करुन घेतला पाहिजे असे ज्यांना वाटेल त्यांनी स्वामींचे चरित्र वाचावे. इतरांना सांगावे.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (धर्मबोध पुस्तकामधून)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.