आचारी पनीर टिक्का
साहित्य: ५०० ग्रॅम पनीरचे चौकोनी तुकडे, २ ढोबळी मिरच्या (चौकोनी आकारात कापलेल्या), २ कांदे (चौकोनी आकारात कापलेले), २ मोठे चमचे घट्ट दही, २ छोटे चमचे आले-लसूण पेस्ट, १/२ चमचा गरम मसाला, २ मोठे चमचे लिंबाचा रस, २ मोठे चमचे मोहरीचे तेल, १ छोटा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, २ मोठे चमचे आचारी मसाला/ लोणचे मसाला व लाकडी शीग (ह्यद्मद्ग२द्गह्म्) (३० मिनिटे पाण्यात भिजवून घ्या).
मॅरिनेट करण्याची कृती: सर्वप्रथम एका भांड्यात दही चांगले फेटून घ्या. त्यात आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, लिंबाचा रस, मोहरीचे तेल, काश्मिरी लाल मिरची पावडर व लोणचे किंवा आचारी मसाला घालून मिश्रण चांगले एकजीव करा. नंतर त्यात कांदा, ढोबळी मिरची व पनीरचे चौकोनी तुकडे घाला. मिश्रण पुन्हा एकजीव करा.
पनीर स्मोक करण्यासाठी साहित्य: १ अॅल्युमिनिअम बाऊल, २-३ निखाऱ्याचे तुकडे, कांद्याच्या साली व आवश्यकतेनुसार तूप.
स्मोकी पनीरची कृती: अॅल्युमिनिअम बाऊलच्या मध्यभागी मॅरिनेटेड पनीर ठेवा. त्यात निखारे, कांद्याच्या साली व तूप घालून झाकण लावा. १० ते १५ मिनिटांनंतर लाकडी शीगमध्ये तयार स्मोकी पनीर, ढोबळी मिरचीचे तुकडे व कांद्याचे तुकडे घाला.
टिक्के ग्रील करण्याची पद्धतः ओव्हनमध्ये पनीर टिक्का करण्यासाठी : ओव्हन १८० अंश सेल्सिअसवर प्रि-हिट करा. बेकिंग ट्रेवर अॅल्युमिनिअम फॉइल ठेवा. ट्रेमध्ये लाकडी शीगला लावलेले स्मोकी पनीर ठेवून ब्रशने तेल लावा. पंधरा-वीस मिनिटे ग्रील करा. लाकडी शीग उलट सुलट करून दहा मिनिटे पुन्हा ग्रील करा. ओव्हनचे तापमान पाच मिनिटांसाठी वाढवून टिक्के काळसर होईपर्यंत ग्रील करा.
तव्यावर पनीर टिक्का करण्यासाठी: तव्यावर पनीर टिक्का करण्यासाठी ग्रील तवा किंवा साधा तवा गरम करा. लाकडी शीग ठेवून तेल लावून घ्या. मंदाग्नीवर दहा मिनिटे शिजवून घ्या. गॅसची आच मोठी करून दोन्ही बाजूने दोन मिनिटे पनीर काळसर होईपर्यंत भाजा. पुदिन्याची चटणी, चाट मसाला भुरभुरून सलाडसोबत पनीर टिक्का सर्व्ह करा.
टीप: पनीर घोळवताना पनीरचे तुकडे होणार नाही अशा प्रकारे घोळवा. अॅल्युमिनिअम बाऊलमधील मिश्रण पुढील वापरापर्यंत फ्रीजमध्येही ठेवू शकता.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
गिरीजा नाईक