आंबुशी ची डाळ
मराठी नाव : आंबुशी
इंग्रजी नाव : Creeping woodsorrel
शास्त्रीय नाव : Oxalis corniculata
आढळ : ओलसर जागेत, रस्त्याच्या कडेने, कुंड्यांमध्ये वाढणारे हे तण आहे.
कालावधी : जून ते सप्टेंबर
वर्णन : नाजूक खोड असलेली आंबुशी जमिनीवर पसरत वाढते. तजेलदार हिरव्या रंगाची हृदयाकृती पाने संयुक्तरीत्या फुलांच्या पाकळ्यांसारखी जोडलेली असतात. पानांची चव आंबट असल्यानेच हिला आंबुशी हे नाव पडले आहे. आंबुशीची कोवळी पाने भाजी करण्यासाठी तसेच वरणाला आंबटपणा देण्यासाठी वापरली जातात.
साहित्य : १ वाटी तूर, मूग किंवा मसूरचीडाळ, वाटीभर आंबुशीची पाने, १ चमचा गोडा मसाला, १ चमचा चिरलेला गूळ, २ चमचे फोडणीसाठी तेल, १ छोटा चमचा मोहरी, १ छोट चमचा जिरे, १ छोटा चमचा हिंग, १ चमचा तिखट, १ चमचा हळद, ५-६ पाने कढीपत्ता, चवीनुसार मीठ.
कृती : आंबुशीची फक्त पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. कोणतीही एक डाळ शिजवून घ्यावी, पण घोटू नये. डाळीत गोडा मसाला आणि गूळ घालून डाळ उकळत ठेवावी. त्यातच आंबुशीची पानेही घालावीत. फोडणीसाठी तेल गरम झाल्यावर त्यात प्रथम मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, हळद, तिखट या क्रमाने घालावे. ही डाळ घट्टसर ठेवावी. जास्त पाणी घालू नये. ही आंबट-गोड डाळ भाकरीबरोबर छान लागते. यात गोडा मसाला न घालता लसणीचीही फोडणी देऊ शकता.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
– प्रेरणा अणेराव
Thank you so much.