पोषण | newborn baby diet chart | newborn diet | food chart for newborns | nutrition for newborn baby | newborn mother diet | food chart for newborn baby

नवजात बालकांचे पोषण | डॉ. लीना राजे | Nutrition for New Born Babies | Dr. Leena Raje

नवजात बालकांचे पोषण

घरात येणारे बाळ प्रत्येकासाठीच खास असते. आपला जीव की प्राण असणाऱ्या या बाळाच्या सुदृढ वाढीसाठी जन्मापासूनच त्याला योग्य पोषण मिळेल, हे पाहायला हवे. डब्लू.एच.ओ. (जागतिक आरोग्य संघटना) आणि युनिसेफ या आहाराशी निगडित असलेल्या दोन जागतिक मान्यताप्राप्त संस्था आहेत. या संस्थांच्या सांगण्यानुसार बाळाच्या आयुष्यातील पहिले १००० दिवस फार महत्त्वपूर्ण असतात. याचाच अर्थ, गरोदरपणातील २७० दिवस आणि जन्मानंतरची पहिली दोन वर्षे बाळाच्या सुयोग्य पोषण आणि वाढीसाठी निकडीची ठरतात. बाळाची वाढ आणि विकासामध्ये त्यांच्या पोषणाचा असलेला कार्यभाग आज जगमान्य झालेला आहे.

नवजात अर्भकाला मातेने जन्मास आल्यापासून स्तनपान देणे फार आवश्यक आहे. कारण मातेच्या स्तनामधून सुरुवातीच्या काळात स्रवणाऱ्या चिकासारख्या द्रवामध्ये, ज्याला ‘कोलोस्ट्रॉम’ म्हणतात, त्यात बाळाला रोगप्रतिकारकशक्ती प्रदान करण्याचे सामथ्र्य असते. यामुळे बाळाच्या पुढील आयुष्यात मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे काठिण्य, पोटाचे व श्वसनाचे विकार, लठ्ठपणा तऱ्हेतऱ्हेचे जंतुसंसर्ग यापासून संरक्षण करण्याची क्षमता प्रदान केली जाते. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य विकास संस्थेच्या सर्वेक्षणामध्ये असे निदर्शनास येते, की सुमारे १२ दशलक्ष बालकांना पुरेसे आणि वेळेवर दूध व इतर आहार मिळत नाही. तर २० दशलक्ष मुलांना अपुऱ्या पोषणाअभावी सर्व क्षमता असून विकासातील अडचणींचा सामना करावा लागतो.

बाळाच्या प्रथम सहा महिन्यांच्या आयुष्यकाळामध्ये मातेने त्याला केवळ स्तनपानच दिले पाहिजे, असा दंडक जागतिक आरोग्य संघटनेने घातला आहे. आईच्या दुधामधून बाळाला योग्य प्रमाणात प्रथिने, ऊर्जा, चरबी, कर्बोदके, जीवनसत्त्वे व खनिजे मिळतात. गाईच्या व म्हशीच्या दुधात या पोषकमूल्यांचे प्रमाण कमी-अधिक असल्याने मातेचे दूध बाळासाठी परिपूर्ण असते. रोगप्रतिकारकशक्ती देण्याव्यतिरिक्त ते संतुलित आहाराच्या दृष्टीनेही मातेचे दूध बाळासाठी अतिशय उपयुक्त असते.

सहा महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाची पचनशक्ती सुधारते व त्याची पोषणाची गरज वाढते. म्हणून या वेळी त्याला मातेच्या दुधाबरोबरच पूरक आहार द्यायला सुरुवात करावी. ज्यामध्ये तृणधान्ये (गहू, तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी), डाळी विशेषतः मूगडाळ, मोड आलेले मूग याचबरोबर अंड्यातील पांढरा भाग, भाज्यांचे सूप, फळांचा रस, कुस्करलेले केळे, बटाटा अशा गोष्टींचा बाळाच्या आहारात समावेश करावा. टोमॅटो, पालक, बीट या भाज्यांचे सूप करणे हा आणखी एक आरोग्यदायी पर्याय तुमच्याकडे आहे. पुरेशी ऊर्जा देण्यासाठी तेल, तूप, गूळ, साखर यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करावा. हे सर्व करत असताना मातेच्या दुधाला अनन्यसाधारण महत्त्व असते, हे विसरून चालणार नाही.

एकंदर नवजात शिशुला पहिले सहा महिने फक्त मातेचे दूध द्यावे. सहा महिन्यांनंतर मातेच्या दुधाबरोबरच इतर पूरक पोषक पदार्थांचा आहारात योग्य प्रकारे समावेश करावा. हे करताना बाळाची पचनशक्ती, त्याची नाजूक अवस्था लक्षात घ्यायला विसरू नये. त्याचबरोबर बाळाच्या आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे सर्व प्रकारची स्वच्छता, साफसफाई यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. निर्जंतुकीकरणावर भर देऊन बाळाच्या आहारात योग्य मात्रांमध्ये हा आहार सुरू करावा. सुरुवातीला थोड्या प्रमाणात अन्न द्यावे. हळूहळू प्रकृतीला मानेल त्याच प्रमाणात शिशुला अन्न द्यावे. पातळसर व मऊ पदार्थ जास्त द्यावेत.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. लीना राजे, पीएच.डी. (फूड सायन्स अँड न्यूट्रिशन)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.