शेपू | dill seed | planting dill | dill herb | dill pickle seasoning | dill powder | shepu leaves | shepu bhaji | shepu recipes

नावडती, पण बहुगुणी ‘शेपू’ | डॉ. वर्षा जोशी | Unflattering, But Versatile Sheep | Dr. Varsha Joshi

नावडती बहुगुणी शेपू

मुळात अनेकांना पालेभाज्या आवडत नाहीत. नाव जरी काढले तरी अनेक जण तोंड वेंगाडतात. पण त्यांना हे माहीत नसते, की शेपू ही भरपूर पोषणमूल्यांनी युक्त अशी बहुगुणी पालेभाजी आहे.

शेपूची भाजी ‘क’ आणि ‘अ’ जीवनसत्त्व, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच लोह यांनी परिपूर्ण आहे. काही प्रमाणात ‘ब’ जीवनसत्त्वही तिच्यामध्ये असते. यातील ‘क’ जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, तर ‘अ’ जीवनसत्त्वामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. कॅल्शियम, मॅग्नेशियममुळे हाडे मजबूत होण्यास, तसेच लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. या भाजीत सूक्ष्मजीवविरोधी आणि अंतर्दाह दूर करणारे गुणधर्म आहेत. तसेच शेपूमध्ये कमी कॅलरीज असल्या तरीही पोषणद्रव्य अधिक प्रमाणात मिळते. पूर्वीच्या काळी जखमेवर संसर्ग होऊ नये, म्हणून शेपूच्या बिया जखमेवर लावत. शेपूची भाजी रेचक, पचायला हलकी असल्याने ती खाल्ल्यास पचनाचे विकार दूर होण्यास मदत होते. लहान बालकांना होणाऱ्या कोलिकवर अनेक वर्षांपासून शेपूचा वापर केला जातो. शेपूचा सगळ्यात मोठा गुणधर्म म्हणजे पोटात वायू होऊ न देणे. त्यामुळे पचनक्रियेचा मार्ग मोकळा आणि स्वच्छ राहण्यास मदत होते. एका संदर्भानुसार संशोधनातून असे आढळले आहे, की शेपूच्या बिया पचनमार्गातील बाहेरील स्तर स्वच्छ व सुरक्षित ठेवतात. अपचनामुळे छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी शेपूचा चांगला उपयोग होतो. शेपूमुळे मासिक पाळीच्या वेळी पोटात येणाऱ्या कळा कमी होतात आणि हार्मोन्सचे संतुलन चांगले राहते, असेही काही संशोधनातून आढळले आहे. शेपूमध्ये असणाऱ्या विविध अँटीऑक्सिडंट्समुळे कर्करोग, हृदयविकार, यकृतासंबंधीचे रोग, मूत्रपिंडाचे रोग यांना प्रतिबंध होतो. रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. कॅल्शियम अधिक प्रमाणात असल्यामुळे गुडघेदुखी, हाडांची झीज टाळण्यासाठी व हाडे मजबूत राहण्यासाठी शेपूचा उपयोग होतो.

शेपू मेंदूसाठीही उत्तम समजला जातो. शेपूमुळे शांत झोप लागण्यास मदत होते. प्राण्यांवरच्या संशोधनातून असे आढळले आहे, की शेपू आहारात ठेवल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. शेपूच्या भाजीत अगदी कमी उष्मांक व भरपूर पोषणमूल्ये असल्याने वजन कमी करणाऱ्यांसाठी ती लाभदायक समजली जाते.

शेपूच्या भाजीप्रमाणे तिच्या बियांमध्येही भरपूर पोषणमूल्ये आहेत. त्यामुळे या बिया अत्यंत औषधी समजल्या जातात. या बिया म्हणजेच बाळंतिणीला दिल्या जाणाऱ्या ‘बाळंतशोपा’ होय. जेवण झाल्यावर बाळंतशोपा विड्यामध्ये घालून बाळंतिणीला दिल्या जातात किंवा खास बाळंतिणीसाठी बनविलेल्या सुपारीत घालतात. त्यामुळे तिचे आणि बाळाचे पोट साफ राहण्यास मदत होते. आयुर्वेदात शेपूला ‘शतपुष्पा’ असे म्हणतात. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये बाळंतशोपांचा उपयोग केला जातो. डॉक्टर म्हणून काम सुरू करताना जी शपथ घ्यावी लागते, तिचा जनक हिपोके्रटीस एक मजेशीर औषध तोंड आलेल्या आपल्या रुग्णांना देत असे. ते म्हणजे बाळंतशोपा वाइनमध्ये उकळवून त्या वाइनने चूळ भरायला ते अशा रुग्णांना सांगत असत.

शेपूचा उपयोग स्वयंपाकात विविध प्रकारे करता येतो. मुगाची डाळ भिजवून शेपूच्या बारीक चिरलेल्या भाजीबरोबर शिजवून तिला कांदा, लसूण व मिरचीची फोडणी देतात. किसलेले पनीर, काकडी, शेपूची बारीक चिरलेली भाजी एकत्र करून टोस्टवर लावून खातात किंवा हे सारण भरून सँडविचेस बनवली जातात. चीजमध्ये शेपू, काकडी, टोमॅटो घालूनही सँडविचेस बनवली जातात. तुरीच्या डाळीबरोबर शिजवून डाळमेथीसारखी भाजी बनवता येते. कोशिंबिरीत किंवा सलाडमध्ये कोथिंबिरीऐवजी शेपू वापरता येतो. डोसा-इडलीच्या पिठात बारीक चिरलेला शेपू घालून डोसा, इडली बनवली जाते.

मेथीच्या पराठ्यासारखा पराठाही बनवू शकतो. कर्नाटकात तांदळाच्या पिठात शेपू घालून थालीपीठ / भाकरीसारखा पदार्थ बनवला जातो. बटाटा, गाजर, लसूण, मिरची आणि शेपू यांची सुकी भाजी बनवली जाते. पीठ (बेसन) पेरून शेपूची परतून भाजी केली जाते. बेसन, तांदळाचे पीठ, बारीक चिरलेला शेपू आणि मिरची व पाणी एकत्र कालवून भजी केली जातात. मेदूवड्याच्या पिठात मिरची आणि शेपू बारीक चिरून घालून

उत्तम वडे बनवता येतात. रस्सम-मध्ये कधीकधी शेपू घातला जातो. सूपमध्ये, चिकनमध्येही घालतात. गार्लिक बटरसारखे शेपू बटर बनवून टोस्टला लावून खाल्ले जाते.

परदेशांमधील पदार्थांमध्येही शेपू भरपूर प्रमाणात वापरला जातो. रशियामध्ये तर शेपू लोकप्रिय आहे. असे म्हणतात, की पोटात वायू होऊ न देण्याच्या शेपूच्या गुणधर्मामुळे त्याचा उपयोग रशियन अंतराळवीरांनी अवकाशप्रवासादरम्यान आहारात करावा असे सुचविण्यात आले होते. सूप, सलाड यावर घालण्यासाठी त्याचा भरपूर उपयोग रशियात करतात.

उकडलेल्या किंवा भाजलेल्या बटाट्यांवर बटरबरोबर शेपू घालून खातात. बऱ्याच युरोपीय देशांमध्ये व्हाइट सॉसमध्ये किंवा चीज सॉसमध्ये शेपू बारीक चिरून

घातला जातो. सूपमध्ये तसेच माशांच्या पदार्थांमध्येही घातला जातो. चीनमध्ये तांदळाच्या शेवयांबरोबर, अंड्याच्या पदार्थांमध्ये, मांसाच्या पदार्थांमध्ये घातला जातो. अरब देशांमध्ये बाळंतशोपांचा उपयोग मसाल्याचा पदार्थ म्हणून केला जातो.

शेपूचे इंग्रजीतील नाव ‘डिल’ हे जुन्या जर्मन भाषेतील डिला या शब्दावरून पडले आहे. डिलाचा अर्थ जोजवणे, शांत करणे असा आहे. आपल्याकडे शेपूला फारशी पसंती लाभत नसली, तरी ग्रीक नागरिकांमध्ये दारी शेपू असणे हे ऐश्वर्याचे लक्षण मानले जाते!

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. वर्षा जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.