फिटनेस अँप | Fitness App | Weight Loss App | Fitness Tracker App | Best Health Apps | Health Tracker App | Fitbit Inspire | Bfit

मोबाइलमय जीवन आणि ‘अँप’ला फिटनेस | रोहन जुवेकर

 

मोबाइलमय जीवन आणि फिटनेस ‘अँप’

            हल्ली दिवसाची सुरुवात आणि शेवट मोबाइल बघून होते. धावपळीचे जीवन, वेळी-अवेळी खाणे, फास्ट फूड, कोल्डड्रिंक्स यामुळे तब्येतीच्या तक्रारी वाढत आहेत. त्यातच आता दररोजचे व्याप आणि मोबाइलचे नोटिफिकेशन बघण्याची सवय यामुळे नव्या ताणतणावाची भर पडू लागली आहे. पैसे आहेत पण व्यायाम करण्यासाठी, जिममध्ये जाण्याकरिता वेळच नाही अशी तक्रार अनेक जण करू लागले आहेत. या सर्व अडचणींवर उपाय म्हणजे स्मार्टफोनमधील स्मार्ट अँप!

एकाच जागेवर अनेक तास बसून काम करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यांच्या कामाच्या वेळाही अनिश्चित झाल्या आहेत. अशा परिस्थितीत अँपच्या मदतीने फिटनेसची काळजी घेणे शक्य आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की, अँप फिटनेससाठी मदत करू शकतात कारण आपली इच्छाशक्ती असते. त्यामुळे फिटनेस जपण्यासाठी आपली इच्छा किती आहे, हे महत्त्वाचे आहे. या अँप व्यतिरिक्तही इतर काही चांगली अँप असू शकतील. शोधा, वापरून बघा आणि फिटनेसची काळजी घ्या…

अँप कसे वापराल ?

अँड्रॉईड फोन असल्यास गुगल प्ले स्टोअर आणि आयफोन असल्यास अँप स्टोअरमध्ये Fitness App असे सर्च करताच अनेक उत्तमोत्तम अँप आपल्यासमोर येतील. प्रत्येक अँप ची माहिती मिळेल. या माहितीआधारे आपल्यासाठी उपयुक्त अँप कोणते, हे ठरवून ते डाऊनलोड करून वापरता येईल. फिटनेस अँप मध्ये स्वतःची माहिती भरा, मग फिटनेस जपण्यासाठी अँप तुम्हाला मदत करेल. अँप चे सर्व फिचर फ्री असल्यास त्यासाठी पैसे मोजावे लागणार नाही. पण विशिष्ट अँप किंवा विशिष्ट अँप ची निवडक फिचर पेड असतील आणि ती आपल्याला हवी असतील, तर मोबाइलद्वारे ऑनलाइन पेमेंट करून आपण पेड फिचरचा लाभ घेऊ शकता.

प्ले स्टोअर आणि अँप स्टोअरवर उपलब्ध साहित्य :

फिटनेस जपण्यासाठी प्ले स्टोअर आणि अँप स्टोअरवर अँप, ऑडिओ बुक, ई-बुक अशा स्वरूपात भरपूर साहित्य ‘फ्री’ आणि ‘पेड’ या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यातील आपल्यासाठी उपयुक्त काय, हे तपासून त्याची निवड करता येईल.

वैद्यकीय सल्ला घ्या :

फिटनेस अँप चा वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्यावा. डॉक्टरांनी काही तपासण्या सांगितल्या असल्यास करून घ्याव्या. पण परस्पर स्वतःच्या मर्जीने एखादे अँप वापरणे टाळावे.

महत्त्वाचे काही अँपस :

१. माय फिटनेस पल :

प्ले स्टोअर आणि अँप स्टोअरवर उपलब्ध.

फिटनेसची काळजी करणाऱ्यांनी हे अँप वापरून बघावे. कारण अनेक तज्ज्ञ हे अँप वापरण्याचा सल्ला देतात. या अँपमध्ये स्वतःची माहिती दिल्यावर फिटनेस जपण्यासाठी व्यायाम, विश्रांती, डाएट असे सर्व प्रकारचे सल्ले उपलब्ध आहेत. दररोज यात जेवणाची माहिती दिल्यावर आपल्या शरीरात किती कॅलरी गेल्या आणि फिटनेस राखण्यासाठी पुढे काय करायचे, हे सांगितले जाते. प्रोग्रेस टॅबमध्ये दररोजची प्रगती आपल्याला समजते. यात फिटनेससाठी महत्त्वाचे असलेले असे काही रिमाइंडर सेट करता येतात. इथे कम्युनिटी सेक्शनमध्ये इतरांच्या यशोगाथा वाचून आपण प्रेरणा घेऊ शकता.

२. माय प्लेट :

प्ले स्टोअर आणि अँप स्टोअरवर उपलब्ध.

फिट राहण्यासाठी व्यायामासोबतच योग्य आहार घेणेही महत्त्वाचे आहे. या अँप मध्ये स्वतःची माहिती दिल्यावर आपल्यासाठी योग्य डाएट प्लॅन सुचवला जातो. अँपमध्येच फिटनेस, लाइफस्टाइल, डाएट अशा विषयांवर अनेक लेख वाचायला उपलब्ध आहेत.

३. इंटरव्हल टाइमर :

प्ले स्टोअर आणि अँप स्टोअरवर उपलब्ध.

व्यायाम करताना ब्रेक घेणे महत्त्वाचे असते. कोणता व्यायाम किती वेळ करायचा, नंतर कशा प्रकारे विश्रांती घ्यावी याचे मार्गदर्शन ‘इंटरव्हल टाइमर’ या अँपमध्ये केले जाते.

४. नाइके ट्रेनिंग क्लब :

प्ले स्टोअर आणि अँप स्टोअरवर उपलब्ध.

या अँप मध्ये स्वतःची माहिती अपलोड केल्यावर आपण नेमका कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा, यासाठी मार्गदर्शन मिळेल. यात व्यायामाचे व्हिडीओ आहेत. हे व्हिडीओ बघून त्याचे अनुकरण करत शास्त्रोक्त पद्धतीने व्यायाम करता येईल. घरात स्मार्ट टीव्ही असल्यास अँप मधील व्हिडीओ टीव्हीवर बघता येतील. फीड सेक्शनमध्ये फिटनेसबाबतची माहिती वाचता येते.

५. सात मिनिट वर्कआऊट :

प्ले स्टोअर आणि अँप स्टोअरवर उपलब्ध.

वेळ नाही, पण फिटनेस जपायचा आहे या कोंडीत सापडलेल्यांसाठी हे चांगले अँप आहे. ‘गुगल फिट’ किंवा ‘फिटबिट’सोबत हे अँप जोडू शकता. यात फक्त सात मिनिटांत व्यायाम करून फिटनेस जपण्यासाठी मार्गदर्शन करणारे अनेक व्हिडीओ आहेत.

६. हेल्दीफायमी :

अँप स्टोअरवर उपलब्ध.

हे अँप फिटनेस जपण्यासाठी भारतीय आहार पद्धतीच्या आधारे डाएट प्लॅन सुचवते. यात स्वतःची माहिती नोंदवल्यानंतर अँप कडून वेळोवेळी आपल्याला सल्ले दिले जातात, तसेच आपल्याला चवदार भारतीय डाएटही सुचवते.

७. पेडोमीटर :

प्ले स्टोअर आणि अँप स्टोअरवर उपलब्ध.

आपण चालत असताना हे अँप आपली पावले मोजत असते. त्यामुळे दिवसभरात किती चालल्याने केवढ्या कॅलरी खर्ची झाल्या, हे आपल्या लक्षात येते.

८. गुगल फिट :

प्ले स्टोअरवर उपलब्ध.

हे फिटनेस ट्रॅकर अँप आहे. मोबाइलमध्ये हे अँप असेल, तर त्यात दररोज स्वतः नोंदी कराव्या लागतात किंवा दिवसभर इंटरनेट कनेक्शन ऑन ठेवून मोबाइल खिशात बाळगावा लागतो. या अँप मध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या तसेच दररोज केलेल्या शारीरिक हालचालींच्या नोंदी असतात. त्याद्वारे पोटात किती कॅलरी गेल्या आणि त्यातल्या किती दिवसभरात खर्ची झाल्या, याचे गणित अँप मध्येच उपलब्ध होते. आपला रक्तदाब, हृदयाचे ठोके अशा नोंदीही याअँप मध्ये करता येतात. त्यामुळे अँप च्या मदतीने तब्येतीची व्यवस्थित काळजी घेणे शक्य आहे.

९. फिटबिट

प्ले स्टोअर आणि अँप स्टोअरवर उपलब्ध.

हे अँप ‘गुगल फिट’प्रमाणेच एक फिटनेस ट्रॅकर अँप आहे. यात इंटरनेट आणि जीपीएस सुरू ठेवल्यास आपण किती चाललो, धावलो, किती वेळ व्यायाम केला, किती वेळ योगासने केली आणि नेमकी कोणती योगासने केली याच्या नोंदी ठेवणे सोपे होते. आपण काय खाल्ले आणि किती खाल्ले याची तसेच शारीरिक हालचालींच्या नोंदी झाल्यानंतरच हे अँप आपल्याला कॅलरीचे गणित सांगते. आणखी किती कॅलरीज जाळायला हव्या ते स्पष्ट करते. जर आपण फिटनेस बँडच्या मदतीने स्वतःच्या नोंदी ‘फिटबिट’मध्ये अपडेट करत असाल तर सतत बँड आणि मोबाइल जवळ बाळगा आणि ब्लू-टूथद्वारे फिटनेस बँडमधील नोंदी ‘फिटबिट’मध्ये ट्रान्सफर करा. ‘फिटबिट’मध्ये आपण किती तास झोपलो त्या तासांच्या नोंदी करता येतात, तसेच हृदयाच्या ठोक्यांची नोंद ठेवता येते. महत्त्वाचे म्हणजे अँप द्वारे स्वतःची माहिती शेअर करता येते तसेच नातलग किंवा मित्रमंडळींनी तुमच्याबरोबर शेअर केलेले त्यांच्या तब्येतीचे अहवाल बघता येतात. या अँपद्वारे एकमेकांना फिटनेस चॅलेंजही देता येते.

१०. फिटनेस बँड :

बाजारात स्मार्ट मोबाइलप्रमाणेच स्मार्ट वॉच आणि फिटनेस बँड या उत्पादनांना मागणी आहे. त्यातही भारतात स्मार्ट मोबाइलखालोखाल फिटनेस बँडसाठी मोठी मागणी आहे. फिटनेस बँड हे आपल्यासाठी फिटनेस ट्रॅकरचे काम करतात. प्रत्येक फिटनेस बँडचे स्वतःचे एक अँप असते किंवा हा बँड ‘फिटबिट’ अथवा ‘गुगल फिट’ यासारख्या एखाद्या लोकप्रिय ट्रॅकरला जोडता येतो. फिटनेस बँड आपल्या हृदयाचे ठोके, रक्तदाब, आपल्या शारीरिक हालचाली यांची अचूक नोंद ठेवतो. ज्या-ज्या वेळी फिटनेस बँड आणि मोबाइलमध्ये असलेले अँप दोन्ही एकमेकांशी ब्लू-टूथद्वारे जोडले जातात, त्यावेळी बँडमधील माहिती अँप मध्ये ट्रान्सफर होते.

११. ड्रिंक वॉटर रिमाइंडर :

प्ले स्टोअरवर उपलब्ध.

हल्ली अनेक तास एसीमध्ये बसून काम करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. काम करताना खाण्यापिण्याचे भान राहत नाही. एसीमध्ये असल्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण कमी असते. या उलट चहा-कॉफी पिण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीराला पुरेसे पाणी मिळत नाही आणि बैठे काम केल्यानंतरही थकवा जाणवतो. यावर उपाय म्हणून ठराविक वेळेने पाणी पित राहणे आवश्यक आहे. ‘ड्रिंक वॉटर रिमाइंडर’ हे अँप आपल्याला विशिष्ट माहिती दिल्यानंतर दररोज पाणी पिण्याची आठवण करून देते. यात झोपेची वेळ नमूद करून ठेवल्यास त्या कालावधीत पाण्याचा रिमाइंडर येत नाही. आपण जागे असतानाच्या कालावधीचा विचार करून हे अँप पाणी पिण्याची आठवण करून देते.

१२. डेली वॉटर :

अँप स्टोअरवर उपलब्ध.

हे अँप ही आपल्याला विशिष्ट माहिती दिल्यानंतर दररोज पाणी पिण्याची आठवण करून देते. ‘ड्रिंक वॉटर रिमाइंडर’ आणि ‘डेली वॉटर’ या दोन्ही अँप चे वैशिष्ट्य म्हणजे आपण एका वेळेला किती पाणी पिणार हे ठरवून तसे नमूद केले असल्यास दिवसभरात त्या विशिष्ट प्रमाणात किती वेळा पाणी प्यायचे याचे गणित करून ही दोन्ही अँप आपण जागे असतानाच्या कालावधीत ठरावीक कालावधीनंतर प्रत्येक वेळी न विसरता आपल्याला पाणी पिण्याची आठवण करून देतात. आपल्या शरीरात दोन तृतीयांश भाग पाणी आहे. त्यामुळे शरीराला दररोज किमान दोन ते चार लिटर पाणी आवश्यक आहे. अति उष्णता असलेल्या भागात काम करणारे तसेच जे भरपूर शारीरिक श्रम करतात, त्यांना चार लिटरपेक्षा अधिक पाणी पिण्याची गरज भासू शकते. त्यामुळे अँपने पाण्याची आठवण करून दिल्यावर ठरल्याप्रमाणे पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरात क्षमतेपेक्षा कमी पाणी असल्यास आपल्याला थकवा जाणवू शकतो आणि जास्त पाणी झाल्यास ते घाम किंवा लघवीवाटे बाहेर टाकले जाते. पण पाणी हे शरीराच्या दैनंदिन चलनवलनासाठी तसेच शरीराचे अंतर्गत तापमान नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असल्यामुळे रिमाइंडर सेट करून वेळच्या वेळी पाणी प्यायलाच हवे. गरोदर महिला आणि बाळंत झालेल्या माता यांनी पाणी पिण्याच्या बाबतीत हयगय करू नये. त्यांच्यासाठी पाणी पिण्याची आठवण करून देणारे अँप अतिशय उपयुक्त ठरू शकते.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


रोहन जुवेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.