मूक | Silent pain of the heart | Dr. Tanay Padgaonkar

हृदयाची मूक वेदना | डॉ. तनय पाडगावकर | Silent pain of the heart | Dr. Tanay Padgaonkar

हृदयाची मूक वेदना

आयुष्य, अनियमित जीवनशैली, जंक फूडचे सेवन, व्यायामाचा अभाव आदी गोष्टींचा दुष्परिणाम म्हणजे आज खूपच कमी वयात मधुमेह, रक्तदाब, हायपर टेन्शन आदी अनेक आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परिणामी, हृदयाचे आरोग्यही धोक्यात आले असून खूप कमी वयात हृदयविकाराचा सामना करावा लागत आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला वेगवेगळ्या लक्षणांमार्फत धोक्याचा इशारा देत असते. काही जण या लक्षणांची गांभीर्याने दखल घेतात, तर काही जण कामाच्या व्यापात या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण यामुळे हे दुखणे जीवघेणेसुद्धा ठरू शकते. काही जणांना तर ‘सायलेंट हार्ट अॅटॅक’ही (हृदयविकाराचा मूक झटका) येऊन गेलेला असतो. हृदयविकाराचा झटका येत असल्याचे जेव्हा समजत नाही, तेव्हा त्या झटक्याला हृदयविकाराचा मूक झटका म्हणतात. हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर काही काळाने वैद्यकीय तपासणी केली असता ही बाब लक्षात येते.

हृदयविकाराचा हा मूक झटका कधी येऊन गेला हे तोपर्यंत (वैद्यकीय चाचणी होईपर्यंत) रुग्णांना माहीतही नसते. वैद्यकीय भाषेत याला ‘सायलेंट इस्केमिया’ (हृदयातील स्नायूंमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासणे) असे म्हणतात. सर्वसामान्यपणे हृदयविकाराचा झटका येताना छातीत दुखते किंवा अस्वस्थ वाटते, असा आपल्यापैकी अनेकांचा सर्रास समज असतो. पण काहींच्या बाबतीत असे घडत नाही. छातीत दुखण्याची, अस्वस्थ वाटण्याची किंवा इतर कोणतीच तक्रार त्यांना जाणवत नाही आणि त्यामुळेच हृदयविकाराचा मूक झटका आपल्याला येऊन गेल्याचे त्यांना कळतही नाही.परिणामी, हृदयविकाराचा असा मूक झटका दुर्लक्षिला जाऊ शकतो. पण ही गोष्ट दुर्लक्ष करण्याजोगी अजिबात नाही. हृदयविकाराच्या मूक (सायलेंट) झटक्यांचेही आरोग्यावर तेवढेच गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी जाणवणाऱ्या पारंपरिक लक्षणांकडे जेवढ्या गांभीर्याने पाहिले जाते, तेवढ्याच गंभीरतेने या मूक झटक्यांकडेही पाहायला हवे. हृदयविकाराचा असा झटका वेदनेशिवाय आला, तरी त्यामुळे होणारी आरोग्याची हानी ही नेहमीसारख्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे होते तशीच असते.

कोणत्याही व्यक्तीला जेव्हा हृदयविकाराचा धक्का बसतो, तेव्हा त्याच्या हृदयाच्या काही भागातील रक्तपुरवठा हा अपुऱ्या प्रमाणावर होत असतो.परिणामी, हृदयाची रचना बिघडते. हृदयाचा एखादा भाग ज्या रक्तवाहिनीद्वारे होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर अवलंबून आहे, त्या रक्तवाहिनीमध्ये गुठळ्या होणे हे हृदयविकाराचा झटका येण्यामागचे सर्वसामान्यपणे आढळणारे कारण आहे. रक्तवाहिनीला छेद जाऊन त्यात प्लाक जमा होऊन रक्त साकळल्याने रक्तवाहिनीमध्ये गुठळी तयार होते आणि त्यामुळे ही परिस्थिती उद्भवते. सामान्यपणे हृदयविकारासाठी जे घटक कारणीभूत असतात, तेच घटक हृदयविकाराच्या मूक झटक्यासाठीही कारणीभूत ठरत असतात. मधुमेह, स्थूलपणा, उच्च रक्तदाब, धूम्रपान, तंबाखूसेवन, या आधी येऊन गेलेला हृदयविकाराचा झटका, बैठी जीवनशैली आणि हृदयविकाराची कौटुंबिक पाश्र्वभूमी हे हृदयविकार येण्यासाठी सर्वसामान्यपणे आढळणारे घटक आहेत.मधुमेह असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते.

हृदयविकाराचा झटका येताना अशा व्यक्तींना सामान्यपणे आढळणारी लक्षणे किंवा छातीत दुखणे आदी कोणतीही तक्रार जाणवत नाही. तर काही जणांमध्ये अशी लक्षणे दिसून आली, तरी ही लक्षणे हृदयातून येत असल्याचे त्यांना जाणवत नाही. अपचनाचा त्रास आणि / किंवा स्नायू दुखावल्यामुळेहोणारी वेदना असे समजून या लक्षणांकडे बहुधा दुर्लक्ष होते. पण ही कदाचित हृदयविकाराच्या मूक झटक्याचीही लक्षणे असू शकतात. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता शक्य तितक्या तातडीने वैद्यकीय मदत घ्यायला हवी. दिसत असणारी लक्षणे ही हृदयविकाराच्या झटक्याची असली किंवा नसली तरीसुद्धा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर्स या लक्षणांचे अचूक निदान करून योग्य उपचार करू शकतील. अनेक रुग्णांमध्ये हृदयविकाराच्या सामान्य झटक्याची लक्षणे (जसे – श्रमाचे काम केल्यावर छातीत दुखणे, धाप लागणे, दरदरून घाम फुटणे) दिसतात, तशी कोणतीही लक्षणे मूक झटका येताना दिसत नाहीत. पण रुग्णांना हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यावर दिसणारे दुष्परिणाम अनुभवास येतात. विशेषतः हार्ट फेल्युअर (हृदय निकामी) झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, पायाला सूज येणे आणि थकवा यासारखे परिणाम दिसू लागतात.

हृदयविकाराच्या झटक्यांच्या संदर्भात पुरुष व स्त्रियांमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांमधील फरकांविषयीसुद्धा अजून बरेच काही जाणून घ्यायचे आहे.हृदयविकाराचा मूक झटका बसतो तेव्हा स्त्रियांमध्ये, विशेषतः तरुणींमध्ये पारंपरिक लक्षणे दिसण्याची शक्यता कमी असते आणि म्हणूनच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे जाणवत नाही. त्यामुळे ज्या रुग्णांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचा धोका असू शकतो, त्या रुग्णांची तपासणी करताना हृदयविकाराच्या मूक झटक्याची शक्यता डॉक्टरांनी लक्षात घेणे आवश्यक असते.

ज्या व्यक्तींना हृदयविकाराचा त्रास असेल किंवा हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल, त्यांनी नियमितपणे हृदरोगतज्ज्ञांकडून आपल्या हृदयाची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे, त्या व्यक्तींना दुसरा हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते आणि हृदरोगतज्ज्ञ ही जोखीम कमी करण्यासाठी मदत करू शकतात. हृदयातील रक्तवाहिनीमध्ये गुठळ्या झाल्या आहेत का, हे पाहण्यासाठी नियमितपणे कोरोनरी अँजिओग्राफी करण्यात येते. हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अनेक गुठळ्या असलेल्या रुग्णांवर अत्याधुनिक कोरोनरी स्टेंट्सचा वापर करून सुरक्षितपणे उपचार करता येतात. ओसीटी (ऑप्टिकल कोहेरेन्स टोमोग्राफी) आणि आयव्हीयूएस (इंट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासाउंड) यासारख्या आधुनिक इंट्रा-कोरोनरी इमेजिंग तंत्रांच्या साहाय्याने हृदयविकाराचा मूक झटका आलेल्या रुग्णांना दीर्घकालीन चांगले परिणाम साध्य करता येऊ शकतात. हृदयविकाराच्या मूक झटक्याचे निदान झाल्यावरही ड्रग एल्युटिंग स्टेंटचे (औषध हळूहळू सोडणाऱ्या) रोपण करून रक्तपुरवठा सुरळीत करता येऊ शकतो. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना जोखीम घटकांवर नियंत्रण करणाऱ्या उपचारांसोबतच रक्त पातळ करणारी आणि अँटि-कोलेस्ट्रॉल औषधे देण्यात येतात. हृदयविकाराच्या मूक झटक्यामुळे हार्ट फेल्युअर (हृदय निकामी) झालेल्या रुग्णाला कार्डिअॅक रिसिन्क्रोनायझेशन थेरपी उपलब्ध करून देण्यात येते.

हृदयविकाराच्या झटक्याला प्रतिबंध करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल घडविणे आणि नियमित आरोग्य तपासणी करून घेणे. सकस आहार घेणे, नियमित व्यायाम करून सक्रिय जीवनशैलीचा अंगीकार करणे, वजन प्रमाणात राखणे आणि तंबाखूचे सेवन टाळणे आदी बदल जीवनशैलीत करायला हवेत. नियमित आरोग्य तपासणी करून घेतल्यामुळे आरोग्यासाठी जोखमीच्या असणाऱ्या घटकांचे (क्रद्बह्यद्म स्नड्डष्ह्लश्ह्म्ह्य) वेळीच निदान होऊ शकते आणि उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी, मधुमेह आदी गुंतागुंतीही टाळता येऊ शकतात. नियमित आरोग्य तपासणी करताना रक्त तपासणी, ईसीजी, २डी इकोकार्डियोग्राम आणि रुग्णामध्ये हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित काही घटक आधीपासून असतील तर स्ट्रेस टेस्टही करून घ्यावी.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. तनय पाडगावकर  

(लेखक इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.