विरुद्ध आहार | The opposite diet: the cause of modern diseases | Dr Ashwin Sawant | Diet issues | Diet Problems

विरुद्ध आहार : आधुनिक आजारांचे कारण | वैद्य अश्विन सावंत | The opposite diet: the cause of modern diseases | Dr Ashwin Sawant

विरुद्ध आहार म्हणजे काय?

आयुर्वेद शास्त्रानुसार ‘जो आहार शरीरामध्ये वात-पित्त-कफ या घटकांना विकृत करतो, मात्र त्यांना शरीराबाहेर न काढता शरीरातच राहू देतो तो विरुद्ध आहार’. या विरुद्ध आहाराबाबत व्यापक मार्गदर्शन आयुर्वेदात केलेले आहे.

देशविरुद्ध : देश म्हणजे भूमी वा प्रदेश. जी व्यक्ती ज्या भूमीमधील असते, तिथलेच अन्नपदार्थ त्या व्यक्तीला सात्म्य असतात, परंतु ज्या भूमीशी त्या व्यक्तीचा वा तिच्या पूर्वजांचा दूरान्वयानेही कधी संबंध आला नसेल तिथल्या भूमीमधील अन्नपदार्थ आरोग्यासाठी अनुकूल नाहीत. उदाहरण म्हणजे ओट्स. दूर अमेरिकेतील एक तृणधान्य, ज्याचे बी आपल्या भारतात कुठेही टाकल्यास रुजण्याची सुतराम शक्यता नाही, ते कधीही आपल्या आरोग्याला अनुकूल होणार नाही. 

कालविरुद्ध : जो ऋतू सुरू आहे, त्या ऋतूसंबंधित वातावरणाला अनुरूप आहार न घेता विरोधी आहार सेवन करणे, हे कालविरुद्ध आहे. कडक उन्हाळ्यात शीत आहार घेण्याऐवजी (स्पर्शाला थंड नव्हे, तर शरीरासाठी थंड पदार्थ जसे- नाचणी, तांदूळ, मूग, मसूर, मटकी, भोपळा, दोडका, काकडी, केळी, कलिंगड, सीताफळ वगैरे) मसालेदार आहार सेवन करणे. हिवाळ्यात-पावसाळ्यात सभोवतालचे वातावरण थंड असतानाही थंड पाणी पिणे, आइस्क्रीम खाणे हेसुद्धा कालविरुद्ध असून रोगांना आमंत्रण देणारे आहे.

अग्निविरुद्ध : आयुर्वेदानुसार प्रत्येकाचा अग्नि (शरीराची पचनशक्ती व सेवन केलेल्या अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर करणारी चयापचयशक्ती) वेगवेगळा असतो. ज्याला वारंवार तीव्र भूक लागते व भूक सहन होत नाही तो पित्तप्रकृती व्यक्तीचा तीक्ष्णाग्नी, तर ज्याला सावकाशीने भूक लागते व जो भूक सहन करू शकतो तो कफप्रकृतीचा मंदाग्नी. पित्तप्रकृती व्यक्तीने दिवसभरातून दोन वेळाच अन्न सेवन केले तर शरीरामध्ये पित्तप्रकोप होईल. तीक्ष्णाग्नी हा वारंवार भडकणारा असल्याने त्याला दिवसभरातून साधारण चार वेळा अन्नरूपी इंधन द्यावे लागते. तसे न झाल्यास अग्नि शरीरधातूंचेच भक्षण करू लागेल.

मात्राविरुद्ध : आहार हा मात्रेमध्ये म्हणजे किती प्रमाणात सेवन करावा, याचे काही नियम आहेत. आपल्या पोटाचे चार भाग कल्पून त्यामधील दोन भाग हे घन आहाराने, एक भाग द्रव आहाराने तर एक भाग पचनक्रिया सुलभ होण्यासाठी मोकळा ठेवावा. लोक मात्र जठराचे चारही भाग आहारानेच भरतील एवढे अन्न सेवन करतात. अशा अन्नाचे पचन नीट होत नाही आणि आजारांना आमंत्रण मिळते. याशिवाय जो आहार पचायला जड असतो, तो अर्धे पोट भरेल इतकाच खावा आणि जो आहार पचायला हलका असतो तोसुद्धा अतितृप्ती होईपर्यंत खाऊ नये, असे शास्त्राचे मार्गदर्शन आहे.

सात्म्यविरुद्ध : सात्म्य म्हणजे जे आपल्या शरीराला व आरोग्याला अनुकूल आहे ते. जसे की कोकणामधील लोकांना नाचणी आणि नारळ सात्म्य आहे, तर देशावरील लोकांना बाजरी आणि शेंगदाणे! मात्र तरीही लोक आपल्याला सात्म्य काय याचा विचार न करता आहार घेतात. याचे सध्याचे उदाहरण म्हणजे ऑलिव्ह तेल. भारतामध्ये ऑलिव्हचे झाड पाहायलाही मिळत नाही. आपल्या  चार-पाचशे पिढ्यांनीही कधी ऑलिव्ह तेलामध्ये अन्न शिजवलेले नाही. स्वाभाविकरीत्या ते आपल्या जनुकांना सात्म्य नाही. साखर, मैदा आणि तत्सम कृत्रिम पदार्थ हे भारतीयांनाच नव्हे, तर २० लाख वर्षांच्या आहार-इतिहासाचा विचार करता अखिल मानवजातीलाच सात्म्य नाहीत. मधुमेह आणि स्थूलत्व याबरोबरच विविध आजारांचेही ते मूळ आहे.

दोषविरुद्ध : वात-पित्त-कफ हे तीन मूलभूत घटक प्राकृत असताना शरीर संचालक आहेत आणि विकृत झाले तर शरीरास घातक आहेत, म्हणूनच त्यांना ‘दोष’ म्हणतात. विशिष्ट कारणांमुळे काही व्यक्तींमध्ये वात वाढतो, तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये कोरडेपणा वाढतो. अशा व्यक्तीच्या मोठ्या आतड्यामधील स्राव घटून कोरडेपणा वाढतो व मलावरोधाचा त्रास होतो. अशा व्यक्तीने तेल-तूप, लोणी असा स्निग्ध आहार घेणे अपेक्षित असते. मात्र तसे न करता दही, सफरचंद, कॉफी, सुकामेवा, चणे, बेकरीचे पदार्थ, थंड पाणी घेतल्यास वाताचा कोरडेपणा अधिकच वाढून मल अधिक शुष्क व कठीण होतो आणि समस्या गंभीर होऊन बसते. हेच पित्ताबाबत. ऑक्टोबर हिटमध्ये निसर्गतः पित्तप्रकोप झालेला असताना पित्तप्रकृती व्यक्तीने बाजरी, अळशी, ओवा, आले, लसूण, मिरे, खजूर, कोलंबी, खेकडा, बांगडा वगैरे उष्ण पदार्थांचे सेवन केले तर शरीरामध्ये उष्णता वाढून ती व्यक्ती तोंड येणे, नाकामधून वा गुदमार्गावाटे रक्त पडणे, अंगावर पित्त उठणे वगैरे पित्तविकारांनी ग्रस्त होते.

वीर्यविरुद्ध : पदार्थाचा शीत आणि उष्ण गुण आयुर्वेदात ‘वीर्य’ म्हणून ओळखला जातो. दुधासारख्या शीत पदार्थाबरोबर माशासारख्या उष्ण पदार्थाचा संयोग हा वीर्यविरुद्ध असल्याने आरोग्यास बाधक आहे.

कोष्ठविरुद्ध : कोष्ठ याचा अर्थ कोठा म्हणजे मोठे आतडे. काही व्यक्तींचा कोठा इतका हलका असतो की दूध वा ताक जरी अधिक प्रमाणात घेतले तरी त्यांचे पोट साफ होते. हा झाला मृदू कोठा; याउलट ज्यांना रेचक औषध घेऊनसुद्धा पोट साफ होत नाही, त्यांचा कोठा कडक म्हणजे क्रूर असतो. अशा क्रूर कोठा असलेल्या व्यक्तीला पोट साफ करण्याचे हलके औषध देणे आणि मृदू कोठा असलेल्या व्यक्तीला तीव्र रेचक देणे हे झाले कोष्ठविरोधी.

अवस्थाविरुद्ध : व्यक्ती ज्या स्थितीमध्ये आहे, त्या स्थितीला अनुरूप आहार सेवन करायला हवा. जसे – एखादी व्यक्ती दूरवरून उन्हातान्हातून चालत घरी आल्यास तिला सर्वप्रथम पाणी, ताक, गूळपाणी वा सरबत देणे हे त्या अवस्थेला अनुरूप होईल. याउलट त्यावेळी त्या व्यक्तीला गरमगरम चिकन सूप, तिखट भेळ वा मसालेदार बिर्याणी देणे हे अवस्थाविरुद्ध होईल.

क्रमविरुद्ध : भूक असतानाही न खाणे आणि भूक लागलेली नसतानाही केवळ जेवायची वेळ झाली म्हणून खाणे हे क्रमविरुद्ध असून आरोग्यास बाधक आहे. एखाद्या व्यक्तीला भूक आणि तहान दोन्ही लागलेली असताना प्रथम थोडे पाणी पिऊन तहान शमवावी आणि मग त्यानंतर भूक लागली की अन्नसेवन करावे, हा आयुर्वेदाने सांगितलेला क्रम आहे. जेवणाची सुरुवात गोड पदार्थांनी करावी आणि जेवणाच्या शेवटी गोड खाऊ नये. असे क्रमविरोधी खाणे नित्यनेमाने होत राहिले, तर स्थौल्य आणि मधुमेहास आमंत्रण मिळणारच! 

परिहारविरुद्ध : एखादा विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर त्यावर काही पदार्थांचे सेवन वर्ज्य मानले जाते. फळ खाल्ल्यावर पाणी पिणे, मधावर गरम पाणी पिणे ही परिहारविरुद्धची उदाहरणे आहेत.

उपचारविरुद्ध : एखाद्या रोगाचा उपचार सुरू असताना सांगितलेले पथ्यपालन न करणे हे उपचारविरुद्ध होते. मधुमेहामध्ये साखर, साखरयुक्त गोड पदार्थ व मैदा यांचे सेवन न थांबवता केलेली मधुमेहाची चिकित्सा ही उपचारविरुद्ध असल्याने यशस्वी होणार नाही.

पाकविरुद्ध : पाक म्हणजे पचन. व्यवस्थित शिजलेले अन्न खाल्ले तरच ते शरीराला पर्याप्त पोषण देते. मात्र ज्याचा नीट पाक झालेला नाही असे अन्न पोषण तर देत नाहीच, उलट आरोग्य बिघडवते. व्यवस्थित न भाजलेली चपाती किंवा करपलेली चपाती खाणे आरोग्यासाठी वाईट असते. कुकरमध्ये शिजवलेला तांदूळ शरीरामध्ये पाणी वाढवून शरीराला स्थूल बनवतो.

संयोगविरुद्ध : मासे आणि दूध, दूध आणि आंबट फळे, दूध आणि मीठ, सम मात्रेमध्ये मध आणि तूप, दूध वा बासुंदीसह मटकी-कुळीथ-उडीद-पावटे यांची उसळ किंवा आंबट फळे दुधात एकत्र घुसळून तयार केलेले मिल्कशेक आणि मांस किंवा मासे यासोबत मलई वा चीज एकत्र केलेले पिझ्झा-बर्गर हेसुद्धा संयोगविरोधीच आहेत. 

हृद्विरुद्ध : हृद् म्हणजे रुची. बंगाल प्रांतामध्ये अन्न शिजवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर होतो, मात्र महाराष्ट्रामधील लोकांना मोहरीच्या तेलामध्ये शिजवलेले अन्न रुचत नाही.

विधिविरुद्ध : आनंदी वृत्तीने मन लावून शांतपणे जेवावे, जेवताना बोलू वा हसू नये, घाईघाईत वा फार सावकाश जेवू नये, जेवण गरम असतानाच जेवावे, अन्न शिजवण्याची-वाढण्याची भांडी व साहाय्यक/वाढपी हे स्वच्छ असावेत आदी प्राथमिक नियम न पाळता जेवणे म्हणजे विधिविरुद्ध. कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये जेवता-जेवता महत्त्वाच्या विषयांवर चर्चा-वाद केले जातात. समाजामधील विविध बऱ्या-वाईट घटना व त्यावरील वादविवाद, अपघात, खून, आत्महत्या, बलात्कार, अत्याचार यांसारखे अभद्र विषय टीव्हीवर बघत-बघत लोक जेवत असतात. ही विधिविरुद्धची उदाहरणे आहेत. रस्त्यावरील वा हॉटेल्समधील खाद्यपदार्थ खाताना कितीजण संबंधित स्वच्छतेची चौकशी करतात?

संपद्विरुद्ध : प्रत्येक पदार्थाची एक अवस्था अशी असते, जेव्हा त्या पदार्थामधील सर्व गुण उत्कर्षावस्थेमध्ये असतात (संपद्-स्थिती). या अवस्थेत सेवन केल्यास तो पदार्थ शरीराला सर्वोत्तम पोषण देतो. याउलट केलेले अन्नपदार्थाचे सेवन म्हणजे संपद्विरुद्ध होय. जसे की शिळे जेवण, जे शरीराला पोषण तर देत नाहीच उलट शरीराला सुजट व निबर बनवते. बेकरीचे पदार्थ, परदेशातून येणारी फळे-भाज्या आणि महत्त्वाचे म्हणजे हॉटेलमधील खाद्यपदार्थ ही संपद्विरोधी आहाराची उदाहरणे आहेत.

विरुद्ध आहार सेवन केल्यामुळे पोट बिघडते, अपचन होऊन उलट्या- जुलाब होतात, तसेच अनेक आजारांना आमंत्रण मिळते. इसवी सनापूर्वी दीड हजार वर्षे इतक्या प्राचीन काळामध्ये रचल्या गेलेल्या चरकसंहितेमध्ये विरुद्ध आहाराचे सेवन केल्यामुळे कोणकोणते आजार संभवतात त्यांची यादीच दिली आहे. यात आम्लपित्त, सर्दी, ताप यांसारखे किरकोळ आजार, गिळण्याचा त्रास, ग्रहणी, जलोदर, भगंदर असे पचनासंबंधितचे आजार, रक्तक्षयासारखे कुपोषणजन्य आजार, पांढरे डाग वगैरे विविध त्वचाविकार, अंधत्व, वंध्यत्व यांसारख्या गंभीर विकारांचा समावेश होतो. मुळात विरुद्ध आहार सेवनामुळे शरीरामध्ये असे अन्नकण तयार होतात, जे शरीराला सात्म्य नसल्याने शरीर त्यांना विजातीय समजते. अशा विजातीय अन्नकणांच्या विरोधात शरीराची रोगप्रतिकारशक्ती उद्दिपित होते. दुर्दैवाने त्या स्थितीमध्ये आपली रोगप्रतिकारयंत्रणा आपल्याच शरीरकोषांच्या विरोधात जाते. रोगप्रतिकारशक्ती आणि शरीरकोष यांच्यामधील लढाईचा परिणाम म्हणजे स्व-रोगप्रतिकारक्षमताजन्य आजार (ऑटो-इम्युन डिसॉर्डर्स), ज्यामध्ये सोरायसिससारखे त्वचाविकार, ऱ्हुमेटाइड आर्थ्ररायटीस, एसएलई वगैरे संधिविकार, लहान मुलांना होणारा मधुमेहाचा प्रकार-१, अल्सरेटिव्ह कोलायटीससारखे आतड्याचे विकार अशा गंभीर आजारांचा समावेश होता. या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यामागचे नेमके कारण लक्षात येत नसले, तरी विरुद्ध आहार हे त्यामागील एक महत्त्वाचे कारण आहे, यात शंका नाही.


वैद्य अश्विन सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.