रसाहार | best fruit juice | best vegetable juice | healthy juice | best vegetables to juice | vegetable drinks | fruit and vegetable juice | juicing veggies and fruits

रसाहार – घ्यावा की नाही ? | वैदेही नवाथे | Juice – Whether to take or not? | Vaidehi Navathe

रसाहार – घ्यावा की नाही ?

डाएट किंवा ट्रेंड म्हणून अनेक जण फळे किंवा भाज्या थेट न खाता रसस्वरूपात (ज्यूस) त्यांचे सेवन करताना दिसतात. ज्यूसच्या रूपात भाज्या-फळांचे सेवन करणाऱ्यांची ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एखादे वेळेस आवड म्हणून किंवा सोय म्हणून रसाहार घेणे चांगले असले, तरी नियमित स्वरूपात भाज्या आणि फळे त्यांच्या मूळ रूपातच सेवन करणे अधिक योग्य ठरते. याचे कारण म्हणजे त्यातील पोषकतत्त्वांचे प्रमाण आणि फायबरचे महत्त्व.

आपल्या शरीरात चर्वण किंवा मिक्सरचे काम दात आणि पोट करत असतात. इथे तयार झालेला अन्नरस मग आपल्या रक्ताद्वारे सर्व अवयवांपर्यंत पोहोचविला जातो. पण सध्या ‘डिटॉक्सिफिकेशन’ साठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बेचव किंवा मसाल्यांचा अति मारा करून बनविलेले चविष्ट (?) ज्यूसेस किंवा स्मूदी पिण्यावर अनेकांचा भर असलेला पाहायला मिळतो आहे. या सगळ्यात आहारातील ‘फायबर’चे महत्त्व दुर्लक्षिले जात आहे. तंतुमय पदार्थ ज्यावेळी मिक्सरमध्ये बारीक करून आणि गाळून प्यायले जातात त्यावेळी फायबर पूर्णपणे नष्ट होतो. पोषकतत्त्वे नसलेला असा रसाहार करून त्याचा कोणताही फायदा शरीराला होत नाही. त्यामुळेच रसाहार कोणी, कधी, किती वेळा आणि कसा घ्यावा किंवा तो घ्यावा की घेऊ नये हे सर्व आहारशास्त्राच्या दृष्टिकोनातून जाणून घेऊया.

रसाहाराचे फायदे :

१. ज्यूसेसमधील पोषकतत्त्वांचे शरीरामध्ये सहजपणे शोषण होते.

२. फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात असणारे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीराला सहजरीत्या उपलब्ध होऊ शकतात.

३. यातील अँटिऑक्सिडंटस रोगप्रतिकारशक्ती वाढवितात.

४. शरीरातील दाहकता कमी करण्यासाठी तसेच पचनसंस्था सुधारण्यासाठी उपयुक्त.

५. रक्तातील आम्लता संतुलित ठेवणे.

६. शरीरातील पाण्याचे प्रमाण अबाधित ठेवणे, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळून चयापचय क्रिया नियंत्रित राहते.

रसाहार करताना हे लक्षात ठेवाः

१. ज्यूसेसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे अति प्रमाणात ज्यूस घेणे टाळा, जेणेकरून मधुमेह किंवा लठ्ठपणा वाढणार नाही.

२. भाज्यांचा किंवा फळांचा रस काढल्यामुळे यातील तंतुमय पदार्थ (फायबर) नष्ट होतात, जे आरोग्यासाठी फायदेकारक आहेत.

३. फळे-भाज्यांच्या सालींमध्ये असणारे फ्लेवोनॉइड्स (हृदयाच्या आरोग्यासाठी उपकारक असणारे पोषक घटक) त्यांचा रस काढण्यामुळे नष्ट होतात.

४. प्रक्रिया केलेल्या ज्यूसपेक्षा घरी बनविलेला ताजा रस घेणे अधिक योग्य.

भाज्यांचा ताजा रस शरीरासाठी हितकारक आहे. नवीन पेशींची निर्मिती, रक्तशुद्धीकरण, आतड्यां-मधून मलपदार्थ काढून टाकणे तसेच हार्मोन्सचे काम व्यवस्थित सुरू ठेवणे यासाठी ह्या रसाचे फायदे होतात. पण आजारी व्यक्तींनी अशा प्रकारचा कोणताही रस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा / तज्ज्ञांचा सल्लाजरूर घ्यावा. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीप्रमाणे भाज्या-फळांच्या रसांच्या सेवनाने मिळणारे परिणाम वेगवेगळे असतात. म्हणूनच तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ज्यूस थेरपी असे प्रयोग करू नये, खास करून इतर काही आजार असताना तर अजिबातच नाही.

फळांच्या रसांचे फायदे :

सफरचंदाचा रस : यात अॅन्सेटालकोलीन नावाचे रसायन असते, जे स्मरणशक्ती वाढविते व मेंदूची कार्यप्रणाली सक्षम ठेवते. सफरचंद फायबरचा चांगला स्रोत आहे. यामुळे पचनक्रिया सुधारून अपचनाची समस्या दूर होते.

संत्र्याचा रस : यात मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. यामुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात. परिणामी, हृदयविकार होण्याची शक्यता मंदावते.

अननसाचा रस : यातील ब्रोमेलेन एन्झाइम आहारातील प्रोटिन्स पचविण्यासाठी मदत करतात. रिकाम्या पोटी हा रस प्यायल्यास यातील ब्रोमेलेन एन्झाइम अँटिइन्फ्लेमेटरी एजंट म्हणून काम करतात. यामुळे सांध्यात येणारी सूज आणि दुखण्याची समस्या कमी होते.

नारळपाणी : हे एखाद्या एनर्जी ड्रिंकपेक्षा कमी नाही. अधिक शारीरिक श्रम केल्यानंतर घामावाटे बाहेर पडलेल्या पाण्याचे प्रमाण शरीरात कायम राखण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. यातील इलेक्ट्रोलाइट्स शरीराला मिठाचा पुरवठा करतात.

गाजराचा रस : यात असणाऱ्या व्हिटॅमिन ‘अ’मुळे डोळ्यांची कार्यक्षमता वाढते.

पुढील काही आजारांवर उपयुक्त ठरणारे फळांचे रस

१. पित्त : द्राक्षे, संत्री, मोसंबी, गाजर, पालक.

२. मुरुमे : पेर, आलुबुखार, टोमॅटो, काकडी.

३. पंडुरोग ( Anaemia )  : मनुका, खजूर, लाल द्राक्षे, बीट, कोथिंबीर, स्ट्रॉबेरी, गाजर, पालक.

४. रक्त घट्ट होणे : ग्रेपफ्रूट, अननस, डाळिंब, पालक, कोथिंबीर.

५. अस्थी आजार : अननस, ग्रेपफ्रूट, काकडी, बीट, पालक.

प्रकृतीला अपाय होऊ न देता ज्यूस थेरपी करायची असेल, तर पुढील कॉम्बिनेशन करता येतील :

  • भाजी : दुधी, गाजर, काकडी, टोमॅटो, कोथिंबीर, पालक, कोबी, कारले, बीट, कोहळा, लाल मुळा.

  • फळे : संत्रे, मोसंबी, डाळिंब, सफरचंद, ऊस, आलुबुखार, जांभूळ, अननस, किवी, ड्रॅगन फ्रूट, पपई, पेरू, लिची, आंबा, कलिंगड, खरबूज, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, कोकम, रातांबे, नासपती, चेरी, नारळपाणी.

  • बिया : अळशी, भाजलेले तीळ, शेवगा पल्प/बिया, वाफविलेले मक्याचे दाणे, खसखस, सब्जा, सूर्यफूल-भोपळ्याच्या बिया, अनारदाणा, अंकुरित मेथीदाणे, धणे.

  • चवीसाठी : आवळा, लिंबू, हिरवी मिरची, लाल मिरची बिया, आले, हिरवा लसूण, बडीशेप, लेमनग्रास, पुदिना, दालचिनी, जिरे/  मिरी  पावडर.

  • ताकदीसाठी : खजूर, बदाम, जर्दाळू, मनुका, अक्रोड/काजू पावडर.

ज्यूस थेरपी करताना साधे (फ्रीजमधले नाही) पाणी भरपूर प्यावे. तहान भागत नसेल, तर छोटासा गुळाचा खडा खाऊन मग पाणी प्यावे म्हणजे तहान शमेल.

इतर काही प्रवाही पदार्थ :

१. उन्हाळ्यातील स्पेशल चहाः धणे, वेलची, जिरे आणि बडीशेप एकत्र करून उकळून घ्या. चवीसाठी यात गूळ घाला. थोडीशी दालचिनी किंवा सुंठ घाला. यामुळे पचन तर सुधारते, शिवाय उन्हाळ्यातील त्रासांपासून मुक्ती होते.

२. शिकंजी : मध्य प्रदेशातील एक अतिशय उपयुक्त पेय! भाजलेले जिरे, काळे मीठ, पुदिना आणि लिंबू ह्या पदार्थांपासून बनविलेले एक पेय. काही वेळा चिमूटभर त्रिफळा पावडरही यात घालतात. चवीप्रमाणे साखर घालावी. साखरेऐवजी मध वापरले तरी चालेल. चवीसाठी किसलेले आलेही यात घालता येईल. शरीरातील क्षारांचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी ह्या पेयाची मदत होते.

३. अमृत पेय : निरशा दह्याचे ताक करून त्यात भाजलेले धणे-जिऱ्याची पूड, चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर, सैंधव मीठ घाला.

४. मधुर लस्सी : घट्ट ताकामध्ये साखर, वेलची पूड आणि गुलाब पाणी, चिमूटभर सैंधव घालून लस्सी तयार करायची.

तात्पर्य : आपला आहार असा असला पाहिजे जेणेकरून मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा यांसारखे आजार होणार नाहीत व मेंदूला सतत पण योग्य प्रमाणात ग्लुकोजचा पुरवठा होत राहील.

हे लक्षात ठेवा :

१. कुठलाही रस काढल्यावर तो त्वरित प्यावा.

२. कोणताही रस एकदम घटाघटा पिऊ नये.

३. रस काढण्यासाठी ताज्या भाज्या व फळे यांची निवड करावी. तसेच भाज्या व फळे नीट धुऊनच रस काढावा.

४. रस काढण्यासाठी भाज्या पूर्ण वाढलेल्या व फळे पूर्ण पिकलेली असावीत.

५. रस काढल्यावर त्यात साखर घालू नये.

६. शक्यतो आपल्या प्रकृतीला मानवेल अशाच ज्यूसची निवड तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी.

 

फळे-भाज्या यांच्या ज्यूसमधून मिळणारी पोषकतत्त्वे
रसाचा प्रकार मिळणारी पोषकतत्त्वे
गाजर + सफरचंद + संत्रे व्हिटॅमिन अ, ब-५ आणि क, पोटॅशियम,फॉलिक अॅसिड
पालक + कोथिंबीर लोह, कॅल्शिअम, व्हिटॅमिन अ, ब-५ आणि क
भोपळ्याच्या बियांचे दूध व्हिटॅमिन अ, ब-६ आणि क, मॅग्नेशिअम, झिंक
स्ट्रॉबेरी + पुदिना + आंबा व्हिटॅमिन अ, मॅग्नेशिअम, झिंक, फॉलिक अॅसिड
कलिंगड व्हिटॅमिन अ आणि क, मॅग्नेशिअम, झिंक
बीट + गाजर + आले + हळद पावडर व्हिटॅमिन अ, इ आणि क, लोह, कॅल्शिअम
टोमॅटो + संत्रे व्हिटॅमिन अ आणि क, लायकोपिन

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


वैदेही नवाथे

(लेखिका भक्तिवेदांत हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट येथे प्रमुख आहारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.