मूळव्याध: अवघड जागेचे दुखणे!
जीवनशैलीशी निगडित आजारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातलाच एक आजार म्हणजे मूळव्याध ! ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही,’ अशी अवस्था करून टाकणाऱ्या या आजाराचा रुग्णाच्या जीवनमानावर मोठा परिणाम होत असतो. शरीररचनाशास्त्राच्या दृष्टिकोनातून मुळव्याध म्हणजे गुदद्वाराच्या आतल्या आवरणात असलेल्या शिरांवर आलेली सूज. या शिरा ताणलेल्या असतात. खरे तर मूळव्याध जगभरातील सगळ्याच व्यक्तींमध्ये असतात; अगदी सुदृढ वा निरोगी व्यक्तींमध्येही. पण ज्या रुग्णांमध्ये याची लक्षणे दिसून येतात, त्यांना हा आजार असल्याचे समजले जाते. गुदद्वाराच्या मार्गामध्ये जेव्हा मूळव्याध विकसित होते तेव्हा त्याला ‘अंतर्गत मूळव्याध’ म्हणतात. तर जे मूळव्याध गुदद्वाराच्या त्वचेच्या आतल्या बाजूला विकसित होते त्याला ‘बाह्य मूळव्याध’ म्हणतात. उच्च सामाजिक आर्थिक स्तर असणाऱ्या वर्गात मूळव्याधीच्या आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
उदरपोकळीत ताण वाढल्याने मूळव्याध बळावते. आहारात तंतुमय पदार्थांचा अभाव असल्यास पोटातून मल बाहेर पडण्याचा कालावधी वाढतो, परिणामी मल कठीण होतो. त्यामुळे शौचास अधिक जोर द्यावा लागतो आणि मग मूळव्याध होते. ४५ ते ६५ या वयोगटातील व्यक्तींना हा आजार होण्याचे प्रमाण अधिक आहे. वयाच्या पन्नाशीच्या आधी ५० टक्के लोकांना आयुष्यात कधी ना कधी मूळव्याध झालेले असते. तर सुमारे ४० टञ्चके रुग्णांना मूळव्याधीचा फार त्रास होत नाही. मूळव्याधीची लक्षणे दिसण्याचे जे प्रमाण आहे, त्यापेक्षा प्रत्यक्ष मूळव्याध असण्याचे (रुग्णांची संख्या) प्रमाण खूप अधिक आहे.
गुदद्वाराशी संबंधित सर्व आजारांना सरसकट मूळव्याध म्हटले जाते, कारण या सर्व व्याधी समजून येण्याची लक्षणे साधारण सारखीच असतात.आंतरिक मूळव्याधीमध्ये मलविसर्जनातून गडद लाल रक्तस्राव होऊ शकतो. तो बहुधा वेदनारहित असतो. या स्थितीत गुदाशयात जडपणा जाणवतो.रुग्णांना घट्ट मलाचा आणि मलविसर्जन करताना जोर काढावा लागण्याचा त्रास असतो. मोठ्या मूळव्याधीमुळे गुदद्वाराच्या मार्गाच्या बाहेरील बाजूस सूज येते. मूळव्याधीला झालेला संसर्ग, मूळव्याध पुढे सरकणे किंवा रक्तस्राव कमी होणे यामुळे रुग्णाला वेदना होते.
मूळव्याधीचे प्रकार:
१. अंतर्गत मूळव्याध म्हणजे म्युकोसा हे आतल्या पडद्यावर आच्छादलेले असतात आणि त्याने वेदना होत नाही. हे म्युकोसा गुदद्वाराच्या मार्गाच्या परिघाभोवती घड्याळातील ३, ७, आणि ११ वाजताच्या स्थितीत असतात.
अंतर्गत मूळव्याधीचे टप्पे
* पहिला टप्पा: हे मूळव्याध गुदद्वाराच्या बाहेर येत नाही, पण प्रॉक्टोस्कोपने पाहिले असता रक्तवाहिन्यांचा आकार वाढलेला दिसतो.
* दुसरा टप्पा: मलविसर्जन करताना किंवा ताण दिल्यावर हे मूळव्याध बाहेर येते, पण पटकन कमीसुद्धा होते.
*तिसरा टप्पा: मलविसर्जन करताना किंवा ताण दिल्यावर हे मूळव्याध बाहेर येते आणि हाताने आत ढकलावे लागतात.
*चौथा टप्पा: हे मूळव्याध बाहेर आलेले असतात आणि काही केल्या कमी केले जाऊ शकत नाहीत.
२. बाह्य मूळव्याध गुदद्वाराच्या बाहेर असतात आणि आंतरिक मूळव्याधीशी संबंधित असू किंवा नसूही शकतात. या रक्तवाहिन्या असतात, ज्या त्वचेवर आच्छादलेल्या असतात आणि म्हणून त्यांच्याशी संबंधित आजार असेल तर वेदनादायी असतो. मोठ्या बाह्य मूळव्याधींमुळे वेदना होतात, अस्वस्थता निर्माण होते, सूज येते, त्रास होतो आणि कंड (खाज) सुटते.
मूळव्याधीची कारणे:
* तंतुमय पदार्थांचा आहारात कमी समावेश असणे.
* उदरपोकळीतील दाब वाढणे. परिणामी, मलविसर्जन करताना ताण द्यावा लागणे.
* गंभीर स्वरूपाची बद्धकोष्ठता आणि अतिसार
* नियमितपणे जास्त वजन उचलणे
* गरोदरावस्था
मूळव्याधीची लक्षणे:
* रक्तस्राव: मलविसर्जनासह गडद लाल, वेदनारहीत रक्तस्राव होतो आणि कधी कधी जळजळ होते. हा प्रकार काही वेळा गुदद्वाराच्या बाहेरील बाजूस नसलेल्या मूळव्याधीमध्येही दिसून येतो.
* गुदद्वाराच्या बाहेरील बाजूस सूज येते: मूळव्याध बाहेर येते. सूज आली असेल किंवा संसर्ग झाला असल्यास मूळव्याधीत वेदना होते. अशा स्थितीत बसता येत नाही आणि मलविसर्जनाला अडथळा निर्माण होतो. काही वेळा ताणामुळे मूळव्याधीतील रक्तवाहिनीला चीर जाते आणि त्यात गुठळी तयार होते. पारंपरिक उपाय करून ही सूज आपोआप उतरते.
* स्राव येणे आणि खाज सुटणे: अंतर्गत श्लेष्मल त्वचा उघडल्यामुळे, चिकट श्लेष्मल स्राव होऊ शकतो, ज्यामुळे खाज सुटू शकते.
* Prolapse, thrombosis or gangrene: प्रोलॅप्स (मूळ स्थितीतून सरकणे), थ्रोम्बोसिस (रक्त गोठणे) किंवा गँगरीन (सडणे) : मोठ्या आकाराच्या दुर्लक्षित मूळव्याधींना संसर्ग होऊ शकतो. तसेच तीव्र वेदना, सूज, रक्तस्राव, मूळव्याधीवर जखम किंवा तो भाग सडणे आणि गुदद्वारामध्ये गोळा येणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे मलविसर्जन करताना तीव्र त्रास होऊ शकतो.
गुदाशयातून होणारा रक्तस्राव हे एक भीतिदायक लक्षण आहे. पण हा रक्तस्राव मूळव्याधीमुळेच होत असेल, असे गृहित धरू नये. यासाठी तत्काळ डॉक्टरची भेट घ्यावी. वैद्यकीय तपासणीनंतर यामागचे कारण समजू शकेल आणि मोठ्या आतड्यात काही आजार झालेला नाही ना, हे पडताळण्यासाठी ‘कलोनोस्कोपी’ नावाची प्रक्रिया करावी लागते.
विष्ठेमधील नियमितता वा रंगात झालेला बदल किंवा मलविसर्जनाच्या वेळांमध्ये झालेला बदल किंवा वारंवार अतिसार व बद्धकोष्ठता होणे ही मोठ्या आतड्याच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये.
मूळव्याधीतून दीर्घकाळ होणाऱ्या रक्तस्रावामागे रक्तक्षय किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे या समस्या कारणीभूत असू शकतात. म्हणूनच त्यावर तात्काळ उपचार करायला हवेत.
गरोदरपणा आणि मूळव्याध:
गर्भधारणा झाल्यावर गर्भाशयाच्या दाबामुळे गरोदरपणात मूळव्याध तयार होऊ शकते वा ते वाढू शकते.
या कालावधीत बद्धकोष्ठता टाळावी. अशा वेळी स्त्रियांनी विरेचक व तंतूंचे प्रमाण अधिक असलेला आहार घ्यावा. तसेच द्रव पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढवावे. काही वेळा हे बदल पूर्ववत केले जाऊ शकतात. शस्त्रक्रिया करणे आवश्यक असेल, तर दुसरी तिमाही म्हणजेच चौथा ते सहावा महिना यासाठी सुयोग्य असतो. या काळात गर्भाला किमान जोखीम असते.
मूळव्याधीवरील उपचार:
पारंपरिक: मूळव्याधीवरील उपचारांसाठी व्यक्तीच्या आहारातील बदल हा प्रमुख उपाय आहे. हे दीर्घकालीन बदल असतात, ज्यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असते. पुरेसा द्रव आहार घेणे, पुरेसा तंतुयुक्त आहार घेणे आणि तुमच्या शरीराला फार न रुचणारे पदार्थ टाळणे. तसेच आवश्यकता असेल तर तात्पुरते विरेचक घेता येईल. यासोबत मूळव्याधीच्या जागेवर मलम लावावे, कोमट पाण्यामध्ये बसावे जेणेकरून गोळा निघून जाईल. डॉक्टरने सांगितल्यास अँटिबायोटिक्स आणि वेदनाशामक औषधे घ्यावीत. रक्तस्रावामुळे झालेल्या रक्तक्षयावर उपचार करावे. काही औषधांमुळे विशेषतः लोहपूरक (आयर्न सप्लिमेंट) वा पार्किन्सन या आजारावरील औषधांमुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.
तुमच्या शरीराचा आदर करा. शौचास जाण्याची भावना झाली, की लगेच जाणे आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास मल कठीण होऊ शकतो आणि त्यानंतर मलविसर्जन कठीण वा वेदनादायक असू शकते.
शस्त्रक्रिया उपचार: हे दोन प्रकारे होऊ शकतात.
१. किमान छेद देऊन: हे उपचार ऑफिस प्रोसिजर म्हणून करण्यात येतात. यात खालील प्रक्रियांचा समावेश होतो :
* इंजेक्शन स्क्लेरोथेरपी, ज्यात आकाराने लहान असलेल्या, रक्तस्राव होणाऱ्या मूळव्याधीत स्क्लेरोसन्ट सोल्युशन इंजेक्ट करण्यात येते. त्यामुळे फायब्रॉसिस होऊन मूळव्याध आकुंचन पावते.
* क्रायोथेरपीमध्ये अत्यंत (कमी) थंड तापमानात एका बोथट उपकरणाद्वारे नायट्रस ऑक्साइड वापरून मूळव्याधीपर्यंत पोहोचविण्यात येते, ज्यामुळे ते आकुंचन पावते.
* मूळव्याधीतून होणारा रक्तस्राव थांबविण्यासाठी रबर बँडने गाठ मारली जाते आणि हे मूळव्याध आकुंचन पावते.
२. शस्त्रक्रिया करूनः शस्त्रक्रिया उपचारांसाठी हॉस्पिटल-मध्ये दाखल होणे आणि भूल देणे आवश्यक असते. यात खालील प्रक्रियांचा समावेश होतो :
* मूळव्याध कापण्यात येते आणि रक्तप्रवाह थांबविण्यासाठी विशिष्ट धाग्याने गाठ मारण्यात येते. ही काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेली शस्त्रक्रिया आहे. आकाराने मोठी असणारी मूळव्याधी कापण्यात येते. मूळव्याधीवरील शस्त्रक्रियेनंतरचा काळ काहीसा वेदनादायक असू शकतो. पण वेदनाशामक औषधे व त्या जागेवर मलम वगैरे लावून त्याला बरे करता येऊ शकते.
* मूळव्याधीसाठी किमान छेद देण्याच्या शस्त्रक्रियेमध्ये गुदद्वाराच्या आत स्टेपलर वापरण्यात येते. मूळव्याधीचा परीघ जास्त असेल तर ही शस्त्रक्रिया उपयोगी असते. मूळव्याध कापण्याच्या प्रक्रियेपेक्षा या शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या वेदना कमी असतात.
* लेझर हॅमऱ्हॉइडेक्टोमीमध्ये मूळव्याध आकुंचित करण्यासाठी लेझरचा उपयोग करतात.
या लेखातून उपचारपद्धतींविषयी ढोबळ माहिती दिलेली आहे, प्रत्येक उपचारपद्धतीचे फायदे वा तोटे जागेअभावी येथे नमूद करता आलेले नाहीत.त्याचप्रमाणे रुग्णाची स्थिती, मूळव्याधीची तीव्रता आणि उपचार करणाऱ्या शल्यविशारदाची सुविधा यानुसारही उपचार पद्धती ठरत असते. म्हणूनच मूळव्याधीवर ज्यांना शस्त्रक्रिया करायची असेल त्यांनी डॉक्टरांशी सविस्तर आणि स्पष्ट चर्चा करून त्याबद्दल निर्णय घ्यावा.
सारांश
मूळव्याध ही जीवनशैलीशी संबंधित समस्या आहे. उपचारांनंतर आहारावर नियंत्रण ठेवले नाही, तर ते पुन्हा उद्भवू शकते. म्हणूनच पुरेसे तंतुमय व द्रव पदार्थ आहारात समाविष्ट करावेत. तसेच बद्धकोष्ठता निर्माण करणारे पदार्थ आहारातून वर्ज्य करावे. शस्त्रक्रियेनंतर मूळव्याध पुन्हा उद्भवत नाही असे नाही, पण त्याला काही वर्षे लागू शकतात. आहारातील पथ्य पाळले तर ही समस्या टाळता येऊ शकते.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
डॉ. अश्विनी वाघ
(लेखक अनुभवी कन्सल्टंट जनरल सर्जन आहेत.)