वेदना | menstrual disorder | best pain relief for endometriosis | getting pregnant with endometriosis | i got pregnant with endometriosis | endometriosis can be cured | endometriosis pain treatment

स्त्रीजन्मा ही तुझी वेदना! | डॉ. प्रियांका देशपांडे | Birth is your pain! | Dr. Priyanka Deshpande

स्त्रीजन्मा ही तुझी वेदना!

स्त्रियांच्या आरोग्याची चर्चा होते तेव्हा पीसीओएस (पॉलिसायटिक ओव्हरिअन सिण्ड्रोम), मासिक पाळीत होणारा अधिक प्रमाणावरील रक्तस्राव, वंध्यत्व आदी समस्यांचीच सर्वाधिक चर्चा होते. त्यात गेल्या दशकापासून ‘एंडोमेट्रिऑसिस’ या आजाराची भर पडली आहे.

मासिक पाळी सुरू होणे हा कोणत्याही मुलीच्या शारीरिक व मानसिक विकासातील महत्त्वाचा टप्पा असतो. मासिक पाळीची शारीरिक आंतर्रचना व शरीरशास्त्र यांचा विचार करता, एस्ट्रोजेन व प्रोजेस्टरॉन या संप्रेरकांची निर्मिती करण्यासाठी मेंदू अंडाशयाला संकेतांची एक शृ्ंखलाच पाठवतो.गर्भाशयाचे (एंडोमेट्रियम) अस्तर वाढण्यासाठी एस्ट्रोजेन प्रक्रिया करतात आणि प्रोजेस्टरॉन ते स्थिर करण्यासाठी काम करते. दर ३०-४५ दिवसांच्या कालावधीत ही संप्रेरके काढून घेतली जातात व हे अस्तर गळून पडते आणि पुन्हा नवे चक्र सुरू होते. ही झाली सर्वसाधारण मासिक पाळीची रचना.

एंडोमेट्रिओसिसमध्ये थोडी वेगळी स्थिती असते. गर्भाशयाच्या आत असलेल्या अस्तराला ‘एंडोमेट्रियम’ म्हणतात. यात एंडोमेट्रियल पेशी आणि ग्रंथी असतात. दर महिन्याला प्रत्येक स्त्रीचे गर्भशयातील हे अस्तर वाढते व जर स्त्रीबीज फलित झाले तर ते त्या गर्भाशयाच्या अस्तराला चिकटून तिथे गर्भधारणा होऊ शकते. तसेच जर गर्भधारणा नाही झाली तर त्या स्त्रीला मासिक पाळी येते व ते अस्तर त्याद्वारे बाहेर पडते. एंडोमेट्रिओसिसचे नेमके कारण अद्याप कळू शकले नसले, तरी ही हार्मोन्ससंबंधित समस्या आहे. या समस्येमध्ये महिलांच्या गर्भाशयातील अस्तर जे आतील बाजूने असणे अपेक्षित असते, ते त्या महिलेच्या गर्भाशयाच्या बाहेरील बाजूला असते. या उती गर्भाशयावर किंवा त्याभोवती, अंडाशयावर आणि फॅलोपियन ट्यूबवर असू शकतात. क्वचित गुदाशय आणि गर्भाशयाच्या मागे, उदर आणि श्रोणि (पेरिटोनियम) च्या अस्तरावर देखील आढळतात. ही सर्व क्षेत्रे मासिक हार्मोनल बदलांना प्रतिसाद देतात. अशा स्त्रीला मासिकपाळी येते तेव्हा तिचा रक्तस्राव कधी कधी अतिप्रमाणात देखील होऊ शकतो, ज्यामुळे एंडोमेट्रीओसिसची तीव्र वेदना स्त्रीला सहन करावी लागते.

अमेरिकन फिजिशिअन डॉ. जॉन ए. सॅमसन यांनी पहिल्यांदा ही व्याधी शोधून काढली आणि तिला ‘एंडोमेट्रिऑसिस’ हे नाव दिले. मासिक पाळीदरम्यान एका स्त्रीवर शस्त्रक्रिया करताना त्यांना उदराच्या आतील वेष्टनाला झालेल्या जखमेतून रक्तस्राव होत असल्याचे त्यांना दिसले. सामान्य मासिक पाळीमध्ये गर्भाशयाच्या अस्तराला जे होते, तसाच हा प्रकार होता. म्हणजे गर्भाशयाबाहेरील उती गर्भाशयातील एंडोमेट्रिअल अस्तरातून बाहेर येत होत्या. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या झडणीदरम्यान नलिकेच्या प्रत्यावर्तनामुळे व विखुरणामुळे गर्भाशयाच्या बाहेर एंडोमेट्रिअल पेशी दिसून येतात असे निरीक्षण १९२७ मध्ये सॅमसन यांनी प्रथम नोंदविले. या महत्त्वाच्या निरीक्षणानंतर या संदर्भात अनेक सिद्धांत मांडण्यात आले. पण सॅमसन यांचा सिद्धांत आजतागायत मूलभूत सिद्धांत मानला जातो. एंडोमेट्रिऑसिससाठी अनेक घटक कारणीभूत असतात असे मानले जाते. जसे की – संप्रेरकांच्या प्रभावातील गुंतागुंत, अनुवंशशास्त्र आणि संभाव्य पर्यावरणीय दूषके इत्यादी अनेक घटक.

याचाच अर्थ गर्भाशयाचे अस्तर (एंडोमेट्रिअम) गर्भाशयाच्या बाहेर उदरातील पोकळी, अंडाशय, गर्भाशयाच्या मागील भाग, पिशवी, आतडे, पटल यासारख्या अवयवांमध्ये असू शकते. एंडोमेट्रिऑसिस हा फुफ्फुसांमध्ये आढळल्याचीही नोंद आहे! जगभरातील प्रजननक्षम वयातील (१९-५०) सुमारे दहा टक्के स्त्रियांना हा आजार होतो. ‘एंडोमेट्रिऑसिस सोसायटी ऑफ इंडिया’नुसार आजच्या घडीला भारतातील २.५ कोटी स्त्रियांना हा आजार आहे.वंध्यत्व असलेल्या स्त्रियांची संख्या २० ते ५० टक्के आहे. भारतीय लोकसंख्येच्या विविध प्रकारच्या अभ्यासातून दिसून आले आहे, की लॅपरोस्कोपीने निदान केल्यावर भारतातील ३४ ते ४८ टक्के स्त्रियांना ही समस्या सतावत आहे. तरीही दुर्दैवाने, मासिक पाळीबद्दल असलेल्या अवघडलेपणामुळे कदाचित याबद्दल खूपच कमी चर्चा होते.

लक्षणे:

मासिक पाळीदरम्यान, लैंगिक संभोग करताना, मलविसर्जन आणि मूत्रविसर्जन करताना वेदना होणे; श्रोणिभागात तीव्र वेदना होणे, पोट फुगणे, मळमळ, थकवा आणि काही वेळा नैराश्य, चिंतातुरता आणि वंध्यत्व ही एंडोमेट्रिऑसिसची लक्षणे आहेत.

ही वेदना इतकी तीव्र असते, की तिचा दैनंदिन आयुष्यावर परिणाम होतो. मासिक पाळी सुरू झाल्यावर ही समस्या सुरू होते आणि जसजसे वय वाढत जाते तसतसे याचे स्वरूप गंभीर होत जाते. मात्र अनेकदा लक्षणे अस्पष्ट असल्यामुळे या समस्येचे निदान उशिरा होते. परिणामी, उपचारही उशिराने होतात. तर काही महिलांमध्ये कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. वंध्यत्वाचे निदान करताना किंवा इतर कोणत्याही कारणास्तव करण्यात येणाऱ्या लॅपरोस्कोपीमध्ये या समस्येचे निदान होते.

एंडोमेट्रिऑसिस आजारात या आजाराचा परिणाम झालेल्या अवयवामध्ये चिकटणी तयार होते, ज्यामुळे वेदना वाढतात. जखम / दुखापत आकाराने लहान असली तरी ती श्रोणिभागाच्या नसांजवळ असल्यास  तीव्र वेदना होतात. मुख्य एंडोमेट्रिऑटिक दुखापत पुढीलप्रमाणे :

* वरवरचा एंडोमेट्रिओसिस प्रामुख्याने पेल्विक पेरिटोनियमवर (श्रोणिभागातील पडदा जो तुमच्या ओटीपोटाच्या आणि श्रोणीच्या आतील बाजूस असतो) आढळतो.

* सिस्टिक ओव्हरिअन एंडोमेट्रिऑसिस (एंडोमेट्रिओमा / चॉकलेट सिस्ट) अंडाशयात असतो.

* डीप एंडोमेट्रिऑसिस गर्भाशय आणि आतडे, मूत्राशय, आंत्रपुच्छ एवढ्या आतपर्यंत आढळते.

* काही दुर्मीळ प्रकरणांमध्ये ती श्रोणिभागाच्या बाहेरही आढळते.

पूर्वी एंडोमेट्रिऑसिसचे निदान करण्यासाठी लॅपरोस्कोपी आणि बायोप्सी हे मापदंड होते. पण नाइस (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल एक्सलन्स, यूके) आणि वर्ल्ड एंडोमेट्रिऑसिस सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या एकमतानुसार एंडोमेट्रिऑसिसचे निदान करण्यासाठी क्लासिकल सायक्लिकल लक्षणे (वारंवार दिसणारी) आणि एमआरआय स्कॅनचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजे, प्रजननक्षम वयातील स्त्रीच्या श्रोणिभागात वेदना होत असतील आणि आतड्याच्या / मूत्राशयाच्या आजारामध्ये होणारी वेदना थांबत नसेल तर एंडोमेट्रिऑसिस झालेला असू शकतो, असे निदान करता येते.अंडाशयात एंडोमेट्रिऑटिक  गाठ असेल किंवा तपासणी करताना तीव्र वेदना झाल्या तर काही वेळा अल्ट्रासाउंडचीही मदत होते. एंडोमेट्रिऑसिसचे निदान करण्यासाठी रक्ताची तपासणी आवश्यक नसते.

एंडोमेट्रिओसिस फ्लेअर ही एक चक्रीय घटना आहे, जी ओव्हुलेशन (प्रत्येक चक्रात अंडाशयातून अंडी बाहेर पडणे) मुळे म्हणजेच एस्ट्रोजेन या संप्रेरकामुळे होते. शरीरातील एस्ट्रोजेन संप्रेरकाला प्रोजेस्टरॉन हा नैसर्गिक रोधक असतो. त्यामुळे आधुनिक एंडोमेट्रिऑससिस उपचारांचा भर वेदना कमी करण्यावर किंवा प्रोजेस्टरॉनने एस्ट्रोजेनला विरोध करून या एंडोमेट्रिक गाठी कमी करण्यात येतात. सुरुवातीला पॅरासिटामॉल, इबुप्रोफेन आणि डायलोफेनॅक आदी औषधे देऊन वेदना कमी करण्यात येते. तोंडावाटे घेण्यात येणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या किंवा फक्त प्रोजेस्टेरॉन गोळ्या यासाठी उपचारात वापरल्या जातात. या उपचारांचा फायदा झाला नाही, तर दुसऱ्या पातळीवरील उपचार म्हणून मायरेनासारख्या उपकरणांचा गर्भाशयांतर्गत वापर करण्यात येतो.

इतके करूनही वेदना थांबत नसतील आणि उपचारांचा फायदा होत नसेल तसेच त्या जोडप्यामध्ये वंध्यत्वाचे निदान झाले असेल तर पुढची पायरी म्हणजे रोगाचे निदान करण्यासाठी एमआरआय स्कॅन करणे. काही डॉक्टर एकाच भेटीत या रोगाचे निदान व उपचार करण्यासाठी लॅपरोस्कोपी करण्याला प्राधान्य देतात. एंडोमेट्रिऑसिसची शस्त्रक्रिया करताना उदरातील पोकळी, डिंबाशय, मूत्राशय, आतडी किंवा आंत्रपुच्छातून एंडोमेट्रिऑसिसच्या गाठी काढून टाकण्यात येतात. शस्त्रक्रिया साधी असते. पण आजाराची लक्षणे गंभीर असतील आणि रुग्णाची इच्छा असेल तर विस्तृत स्वरुपाची शस्त्रक्रिया करावी लागते. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असून त्यामुळे इतर व्यंग उत्पन्न होऊ शकत असल्यामुळे शस्त्रक्रियेचा पर्याय निवडण्यापूर्वी बाकीच्या पर्यायांचा विचार करावा लागतो. ती स्त्री जर रजोनिवृत्तीपूर्व वयात असेल तर एंडोमेट्रिऑसिसची समस्या पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक वेळा शस्त्रक्रिया करावी लागू शकते. शारीरिक समस्यांना तोंड देताना इच्छाशक्तीचा वापर करण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी अॅक्युपंक्चर, समुपदेशन, योगासने यांचा आधार घेतला जातो. तसेच विनाऔषध उपचारपद्धतींचा वापरही आता केला जात आहे. एंडोमेट्रिऑसिसवर सकारात्मक व नकारात्मक परिणाम करणाऱ्या आहाराच्या संशोधनातून आढळून आले आहे, की फिश ऑइल कॅप्सूल, व्हिटॅमिन बी१२ यांचा एंडोमेट्रिऑसिसच्या लक्षणांवर (विशेषतः मासिक पाळीमध्ये वेदना होणे) सकारात्मक परिणाम होतो. तर अल्कोहोल व लाल मांस (सस्तन प्राण्याचे मांस) यांचा नकारात्मक परिणाम होतो.

दर दहापैकी एका स्त्रीमध्ये ही समस्या आढळून येते. या आजाराबद्दल आता बहुतेकांना माहिती झाली आहे. याबाबतची जागरूकता वाढत आहे. पद्मा लक्ष्मी, सुमोना चक्रवर्ती, हाल्से, लीना डनहॅम, व्हूपी गोल्डबर्ग आदी कलाकार त्यांच्या या आजाराशी लढ्याबद्दल उघडपणे चर्चा करत आहेत, जनजागृती करत आहेत. मार्च हा ‘एंडोमेट्रिऑसिस जागरुकता महिना’ म्हणून पाळला जातो आणि पिवळ्या रंगाची रिबीन हा त्याचा प्रतीक आहे.

एंडोमेट्रिऑसिस हा कर्करोग नाही. तो इतर अवयवांमध्ये पसरत नाही. पण त्याचा मोठ्या प्रमाणावर मानसिक परिणाम होतो. यामुळे चिंतातुरता, न्यूनगंड, नैराश्य यांसारख्या इतर मानसिक समस्या उत्पन्न होतात. काही वेळा रुग्णाला या आजाराशी जुळवून घेता आले नाही तर नोकरीही जाऊ शकते.त्यामुळे या रुग्णांवर शारीरिक व मानसिक उपचार करणे गरजेचे असते.

जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा प्रयत्न यासाठी करायला हवा. सामान्य मासिक पाळीमध्ये तीव्र वेदना होत नाहीत, पण एंडोमेट्रिऑसिसमध्ये होतात. या संदर्भात मदतीसाठी काही उपयुक्त लिंक :

एंडोमेट्रिऑसिस यूके :  https://www.endometriosis-uk.org

एंडोमेट्रिऑसिस असोसिएशन  https://endometriosisassn.org

Endometriosis.org : https://endometriosis.org

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. प्रियांका देशपांडे

(लेखिका प्रसुती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ असून सध्या केंब्रिज विद्यापीठात क्लिनिकल फेलो आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.