हिमालयन चाड धान (तांदळाची खीर)
साहित्य: १०० ग्रॅम हिमालयन चाड धान लाल तांदूळ, २ कप दूध, १ मोठा चमचा बदामाचे तुकडे, १ मोठा चमचा अक्रोड, १० बेदाणे, केशराच्या १० काड्या, एका दालचिनीच्या काडीची पूड, १ मोठा चमचा तूप, स्टेव्हिया/एरिथ्रिटॉल किंवा माँकफ्रुट/एरिथ्रिटॉल.
कृती: तांदूळ एक तास भिजवून घ्या व प्रेशर कुकरमधून तीन शिट्ट्या काढून घ्या. आता एका कढईत तूप गरम करा. त्यात बदामाचे तुकडे घाला आणि बाजूला काढून ठेवून द्या. त्यानंतर कढईत शिजवलेला लाल भात घाला आणि काही मिनिटे परतवा. त्यानंतर त्यात दूध घालून दहा मिनिटे उकळत ठेवा.आता यात बेदाणे आणि बदाम घाला. कोमट पाण्यात केशराच्या काड्या घाला आणि ते कढईत ओता. त्यात स्टेव्हिया/एरिथ्रिटॉल पावडर किंवा माँकफ्रुट/एरिथ्रिटॉल पावडर (साखरेऐवजी) घाला आणि चांगल्या प्रकारे ढवळून घ्या. गरम किंवा थंड वाढा. वाढताना वरून दालचिनीची पूड व अक्रोडचे तुकडे घालून सजावट करा.
महत्त्व: लाल तांदूळ हिमालय, ईशान्य भारत, कोकण आणि केरळमध्ये प्रामुख्याने होतो. चाड धान तांदूळ उत्तराखंडमधील आहे. त्याचा पोत खूप सुंदर असतो. मुबलक लोह असलेली माती व हिमालयाच्या झऱ्यांमधील पाण्यामुळे या तांदळाचे पोषणमूल्यही अधिक आहे. त्याचा स्वाद दाण्याच्या कुटासारखा आहे. लाल भातामध्ये प्रथिने व फायबर मोठ्या प्रमाणात असते. या भातामध्ये असलेल्या अँथोसियानिनमुळे त्याला लाल रंग प्राप्त होतो. पांढऱ्या तांदळापेक्षा या तांदळाची ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. त्यामुळे पांढऱ्या तांदळाच्या तुलनेने लाल तांदळामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण तुलनेने कमी वाढते. दालचिनीचा इन्सुलिन संवेदनशीलतेवर परिणाम होतो हे छोटेखानी अभ्यासावरून दिसून आले आहे. भाताच्या पुडिंगमध्ये दालचिनी घातल्याने रक्तातील शर्करा कमी झाली आहे, असे एका अभ्यासातून दिसून आले आहे. बदाम आणि अक्रोड हे ओमेगा फॅट ३ चे उत्तम स्रोत आहेत. रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्यासाठी या फॅटची मदत होते.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
डॉ. मनीषा तालीम