कृत्रिम विरुद्ध नैसर्गिक पोषकतत्त्वे
हल्ली काय, कधीपण डॉक्टरकडे जावे तर एका औषधाबरोबर २-३ मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या देतात…’’
‘‘आता काय, तर सगळ्यांनाच व्हिटॅमिन ‘बी-१२’ ची उणीव असते म्हणे…’’
‘‘अगं, गुडघे दुखत होते म्हणून विचारले तर म्हणे व्हिटॅमिन ‘डी’ कमी आहे. दर आठवड्याला एक औषध दिलंय.’’
असे बरेच प्रसंग / उद्गार आपण वरचेवर ऐकत असतो. तर हा ‘डेफिशयन्सी’ म्हणजे नेमका काय प्रकार आहे, तो कशामुळे होतो, पोषकतत्त्वे म्हणजे नक्की काय, सर्वसामान्य माणसाला ह्या पोषकतत्त्वांच्या औषधांची गरज का असते हे मुद्दे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
खरे तर आपल्या जेवणातून आपल्याला विविध प्रकारची पोषकतत्त्वे मिळत असतात. प्रथिने, कर्बोदके, आणि तेल / तूप / फॅट (स्निग्ध पदार्थ) यांचे प्रमाण आपल्या आहारात अधिक असते, तर जीवनसत्त्वे आणि खनिज तत्व (minerals) हे सूक्ष्म प्रमाणात आपल्याला अन्नातून मिळत असतात. हल्ली वरचेवर ज्या पोषकतत्त्वांची उणीव लोकांमध्ये दिसते, ती म्हणजे ह्या व्हिटॅमिन आणि मिनरल्सची (जीवनसत्त्वे आणि खनिज तत्व). म्हणून बरेचदा डॉक्टर / आहारतज्ज्ञ आपल्याला औषध रूपात ही ‘multivitamin’ घ्यायला सांगतात. वास्तवात, ही पोषकतत्त्वे आपल्याला अन्नातूनच प्राप्त होतात. आपल्या शरीरात ही बनू शकत नाहीत. म्हणून आपल्या आहारातून आपल्याला ही पोषकतत्त्वे मिळणे गरजेचे असते.
आपल्या देशात सगळ्यात जास्त आढळणाऱ्या पोषकतत्त्वांची कमतरता पुढे दिलेल्या घटकांची आहे :
१. लोहतत्त्व (iron): आज आपल्या देशात ५० टक्क्यांहून अधिक स्त्रिया आणि लहान मुलांना ‘अॅनिमिया’ हा आजार आहे. अॅनिमियामुळे लहान मुलांची वाढ खुंटणे, अभ्यासात लक्ष न लागणे, तब्येत खराब होणे, वजन न वाढणे, भूक न लागणे अशा समस्या उद्भवतात. वाढत्या वयातल्या मुलींना मासिक पीडा जास्त होते. शारीरिक वाढ नीट न होणे, कामात लक्ष न लागणे असे बरेच त्रास यामुळे निर्माण होतात. अॅनिमियाचे सगळ्यात मुख्य आणि महत्त्वाचे कारण म्हणजे आहारात पुरेशा प्रमाणात लोहतत्त्व नसणे. आपल्याला मांसाहारी पदार्थ आणि कडधान्यांतून सगळ्यात जास्त प्रमाणात लोहतत्त्व मिळत असते. ते जर आपण पुरेसे सेवन केले नाही, तर लोह तत्त्वाच्या अभावी iron deficiency) अॅनिमिया होतो.
२. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ‘डी’: सगळ्यात जास्त प्रमाणात अन्नात आढळणारे खनिजत॔व म्हणजे कॅल्शियम आणि सूर्यप्रकाशामुळे शरीरात बनणारे पोषकतत्त्व म्हणजे व्हिटॅमिन ‘डी’. असे असूनसुद्धा आपल्या देशात ४० टक्के लोकांना ह्या दोन्ही पोषक तत्त्वांची उणीव भासते. ह्यांच्या अभावी हाडे कमजोर, ठिसूळ आणि पोकळ होतात. एवढेच नाही, तर जरा पाय मुरगळला तरी फ्रॅक्चर होण्याची शक्यता बळावते. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ‘डी’ आपल्याला दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांसाहारी पदार्थ, ज्वारी, बाजरी, कडधान्य, तीळ, जवस, मशरूम अशा पदार्थांतून मिळतात. हे पदार्थ जर आपण अपेक्षित प्रमाणात खाल्ले नाही, तर हाड मोडल्यावरच कॅल्शियम व व्हिटॅमिन ‘डी’ची उणीव असल्याचे लक्षात येते.
३. व्हिटॅमिन ‘बी १२’: ह्या पोषकतत्त्वाच्या अभावी आपल्याला अशक्तपणा, चक्कर येणे, हातापायाला मुंग्या येणे, हातात कंप जाणवणे, उत्साह न वाटणे असे त्रास सतावतात. ‘बी १२’ हे जीवनसत्त्व अगदी थोड्या प्रमाणात आपल्या शरीरात बनते, तर बाकी आपल्याला अन्नपदार्थांतूनच मिळवावे लागते. सर्व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मासे, मटण अशा पदार्थांतून आपल्याला व्हिटॅमिन ‘बी १२’ मिळत असते. हल्ली आपल्या आहारात ह्या पदार्थांचे तसेच फळे आणि भाज्यांचे प्रमाण कमी झाल्याने ह्या पोषकतत्त्वांची उणीव वरचेवर आढळते.
ह्याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन ‘सी’, झिंक, मॅग्नेशियम, फॉलेट अशा पोषकतत्वांची कमीसुद्धा अनेकांमध्ये आढळून येते. ही पोषकतत्त्वे का महत्त्वाची असतात, कुठल्या पदार्थांतून ते आपल्याला मिळू शकतात हे आपण आतापर्यंत पाहिले. आपल्या शरीरात पोषकतत्त्वांची उणीव एवढी जास्त असेल, की त्याने आपल्या तब्येतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण होईल तर अशा वेळी डॉक्टर आपल्याला सप्लिमेंट किंवा गोळ्यांच्या रूपात ही पोषकतत्त्वे घेण्यास सांगतात.
व्हिटॅमिन व खनिज तत्त्वांची सप्लिमेंट्स किंवा गोळ्या / औषध दोन प्रकारची असतात: नैसर्गिक आणि रासायनिक (synthetic). नैसर्गिक सप्लिमेंट्स म्हणजे विशिष्ट पोषकतत्त्व ज्या अन्नपदार्थात जास्त असेल, ते अन्नपदार्थ वाळवून, त्याची पूड करून बनवलेल्या गोळ्या. उदाहरण : आवळ्याची पूड किंवा गोळ्या ह्या व्हिटॅमिन ‘सी’चे नैसर्गिक सप्लिमेंट म्हणून वापरल्या जातात.
रासायनिक पोषकतत्त्व प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या बनवली जातात. प्रयोगशाळेत बनवल्यामुळे ह्या गोळ्यांमध्ये विशिष्ट पोषकतत्त्वाचे प्रमाण बरेच जास्त असते. ह्याचा एक फायदा असा असतो, की आपल्याला कमी वेळेत जास्त उणीव भरून काढता येते. पण रासायनिक पोषकतत्त्वे आपल्या शरीराला पूर्णपणे पचवून (absorb) घेता येत नाहीत. नैसर्गिक पोषकतत्त्वाचे सेवन करताना एका पोषकतत्त्वाबरोबर आपल्याला इतरही पोषक घटक मिळत असतात. उदा. अंड्यातून आपल्या व्हिटॅमिन ‘डी’ आणि ‘बी १२’
हे दोन्ही मिळतात. नैसर्गिक पोषकतत्त्वांचा दुसरा फायदा असा, की शरीराला ज्या रूपात त्याचे पटकन शोषण करता येईल, अशाच रूपात निसर्गतः अन्नपदार्थांत ही पोषकतत्त्वे आढळून येतात.
कृत्रिम पोषकतत्त्व घेताना अजून एक मह॔वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे त्याचे प्रमाण (dosage). आपल्याला जेवढ्या डोसची गरज असते, तेवढ्याच विशिष्ट प्रमाणात ही पोषकतत्त्वे घेतली, तर त्याचा आरोग्याला फायदा होतो. कृत्रिम पोषकतत्त्वांचा कमी डोस घेतला तर जी कमतरतेची लक्षणे असतात ती जात नाहीत किंवा कमी होत नाहीत. या कृत्रिम पोषकतत्त्वांचा डोस जर अती प्रमाणात घेतला तर ते नुकसानदायक ठरू शकते. उदा. व्हिटॅमिन ‘डी’च्या अतिप्रमाणामुळे उलटी, चक्कर, मळमळ अशा समस्या उद्भवतात.
मग कृत्रिम रासायनिक पोषकतत्त्वे टाळावीत का, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. पण ह्या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. पण जर तुमच्यात विशिष्ट जीवनसत्त्व किंवा खनिजाची कमतरता नसेल, तर उगीच सप्लिमेंटस घेऊ नयेत. पण काही विशिष्ट गटातल्या लोकांना सप्लिमेंट्सचा उपयोग जास्त होतो किंवा त्याच्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. जसे की –
१. वृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिक: वयोमानाप्रमाणे कॅल्शियम, व्हिटॅमिन ‘डी’ ह्याचे प्रमाण अशा व्यक्तींमध्ये कमी होते. म्हणून ज्येष्ठांनी पोषकतत्त्व कमी असल्यास जरूर घ्यावे.
२. व्हीगन किंवा शाकाहारी व्यक्ती: अशा व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन ‘डी’ आणि ‘बी १२’ची उणीव जास्त आढळते, तर त्यांनी सप्लिमेंटस घेण्याचा विचार करावा.
३. गरोदर व स्तनपान करणाऱ्या स्त्रिया: ांना लोहतत्त्व, कॅल्शियम, व्हिटॅमिन ‘डी’, ‘बी १२’, ओमेगा ३, फॉलिक अॅसिड ह्याची गरज जास्त असते.
४. तरुण मुली (१३-२१ वर्षे गटातील): ह्यांना अॅनिमिया होण्याची शक्यता खूप जास्त असते, त्यामुळे ह्यांना आयर्न, फॉलिक अॅसिड सप्लिमेंटस दिलेच पाहिजेत.
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, रक्ताची तपासणी केल्याशिवाय शक्यतोवर मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट्स घेऊ नयेत. त्याचे दोन फायदे असतात – १. पोषकतत्त्वाची उणीव किती जास्त / कमी आहे, त्यावर तुमचा डोस ठरवता येतो. जर उणीव नसेल, तर उगीच सप्लिमेंट्स घेऊन होणारे नुकसान टाळता येते.
अजून काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
अमिता गद्रे
(लेखिका अनुभवी आहारतज्ज्ञ आहेत.)