लाल पोहे
साहित्य: २ वाट्या लाल पोहे, १ कांदा, १ मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे, १/२ छोटा चमचा मोहरी, १/२ छोटा चमचा हळद, चिमूटभर हिंग, थोडासा कढीपत्ता, २ चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ मोठा चमचा तेल, चवीनुसार मीठ.
कृती: पोहे चाळणीमध्ये धुऊन घ्या व त्यातील पाणी निथळून काढून पाच मिनिटे बाजूला ठेवून द्या. तेल तापवा. त्यात मोहरी, हळद व हिंग घाला. मोहरी तडतडली आणि हिंगाचा वास आला, की मग त्यात कढीपत्ता घाला आणि तोही तडतडू द्या. त्यानंतर कांदा घालून तो पारदर्शक होईपर्यंत परतवून घ्या. आता त्यात भाजलेले शेंगदाणे घाला. शेवटी भिजलेले पोहे घालून चांगले ढवळून घ्या आणि काही मिनिटे शिजवा. त्यावर कोथिंबीर व खवलेले खोबरे भुरभुरा.
महत्त्व: मधुमेह असलेल्या व्यक्ती भात किंवा पोहे प्रमाणात खाऊ शकतात. पांढऱ्या भातापेक्षा उकडा भात, हातसडीचा तांदूळ किंवा लाल तांदूळ हा अधिक चांगला पर्याय आहे. पांढऱ्या भातात कोंडा काढलेला असतो. उकडा भात हा असा भात असतो, जो त्याच्या कोंड्यासह (टरफलासह) अंशतः शिजवला जातो. त्यामुळे कोंड्यातील खनिजे व जीवनसत्त्वे क्षारांमध्ये उतरतात. ब्राउन राइसमध्ये फक्त कोंडा (टरफल) काढले जाते. त्यात अधिक तंतू, प्रथिने, क्षार व जीवनसत्त्वे असतात. लाल भात अजून चांगला असतो. या तांदळात अँथोसियानिन अधिक प्रमाणात असल्यामुळे तो लाल होतो. त्यात प्रथिने आणि ब्राउन राइसप्रमाणे फायबर मुबलक प्रमाणात असतेच, त्याचप्रमाणे लोह व सेलेनिअमही असते. याची फोलपटे पूर्णतः किंवा अंशतः काढतात. याची चव दाण्यासारखी असते. म्हणूनच पांढऱ्या तांदळापासून तयार केलेल्या पोह्यापेक्षा लाल तांदळाचे पोहे अधिक आरोग्यदायी असतात. कोकणातील पदार्थ मिळणाऱ्या दुकानांमध्ये ते मिळतात. हे पोहे शिजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो, पण ते चविष्ट असतात. गरमागरम खाल्ल्यास त्यांची चव अधिकच सुंदर लागते.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
डॉ. मनीषा तालीम