स्वच्छता | household deep cleaning | full house clean | deep cleaning room | house detail cleaning | deep cleaning | house cleaning

आवश्यक, पण दुर्लक्षित स्वच्छता | कोमल दामुद्रे | Essential, but neglected cleanup | Komal Damudre

आवश्यक, पण दुर्लक्षित स्वच्छता

घर म्हटले, की स्वच्छता ओघाने आलीच. पण कामाच्या गडबडीत रोजच्या रोज घरात स्वच्छता राखणे कठीण होऊन बसते. परिणामी, अनेक आजारांना सामोरे जावे लागते. रोज सफाई न केल्यामुळे घरात धुळीचे साम्रज्य पसरते ज्यामुळे अनेकांना अॅलर्जी होते. अनेकदा तर काही गोष्टींकडे आपण फारशा गांभीर्याने पाहतसुद्धा नाही. मात्र अप्रत्यक्षपणे त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होत असतो. म्हणूनच रोजच्या जीवनात स्वच्छतेची काळजी कशी घ्यायची हे जाणून घ्यायला हवे.

बेडशीट: खरेतर बेडशीटमुळे खोलीचे सौंदर्य वाढते. पण आपण वापरत असलेली बेडशीट महिन्यातून किती वेळा बदलतो अथवा किती वेळा धुतो, हा प्रश्न आरोग्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे. एकच बेडशीट सतत वापरत असाल तर तुमची रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन तुम्हाला अनेक आजारांना, संसर्गांना तोंड द्यावे लागू शकते. श्वसनाचे आजार, अॅलर्जी, झोपेशी संबंधित समस्यादेखील होऊ शकतात. बेडशीटवर उतरलेल्या मृत पेशी, धूळ, तेल अशा गोष्टींमुळे आपण कालांतराने आजारी पडू शकतो. त्यामुळे दर आठवड्याला बेडशीट धुवायला हवी. तसेच किमान ३ ते ४ आठवड्यातून एकदा तरी बेडशीट बदलणे आवश्यक आहे.

उशांचे अभ्रे: आपण झोपण्यासाठी जी उशी वापरतो त्यावर (त्या उशीच्या अभ्य्रावर) काही प्रमाणात बॅक्टेरिया लपलेले असतात. शरीरातून निघणारा घाम, केसावरील तेल, चेहऱ्यावरील न काढलेला मेकअप, मृत त्वचा / पेशी, केसातील कोंडा हे उशीवर उतरत असतात. सततच्या या अभ्य्राच्या वापराने त्वचासंसर्ग होऊ शकतो. म्हणूनच उशीचे अभ्रे (पिलो कव्हर) नियमितपणे धुवायला हवेत. आठवड्यातून दोनदा तरी हे अभ्रे धुतले पाहिजे व दोन महिन्यातून एकदा तरी बदलले पाहिजेत.

टॉवेल: टॉवेल हे जंतूंचे माहेरघरच म्हणा ना. टॉवेलवर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, बुरशी, मृत पेशी/ त्वचा व शरीरातून बाहेर पडणारे विषारी स्राव चिकटलेले असतात. कधी कधी एकच टॉवेल घरातील सर्व सदस्य वापरत असतात. अशा वेळी तर जंतुसंसर्ग पसरण्याची शक्यता दुणावते. एकतर आपला टॉवेल दर तीन दिवसांनी धुवायला हवा. तसेच दोन महिन्यातून एकदा तरी तो बदलायला हवा. मुख्य म्हणजे आपला टॉवेल आपल्याशिवाय इतर कुणी वापरणार नाही, याची काळजी घ्या.

टूथब्रश: सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी आपण दात घासतो. पण दात घासण्यासाठी जो ब्रश आपण वापरतो तो साधारण किती काळ वापरत आहोत हेदेखील तपासायला हवे.  टूथब्रशवरदेखील अनेक जंतू पसरलेले असतात. ब्रश केल्यानंतर तो स्वच्छ धुऊनच ठेवावा. ब्रश करण्यापूर्वी शक्यतो कोमट पाण्याने तो धुवा, ज्यामुळे त्यावरील जंतू तोंडातून आपल्या पोटात जाणार नाहीत व होणारे आजार टाळता येतील. ब्रश हा साधारणतः दोन ते तीन महिन्यातून एकदा बदलायलाच हवा.

भांडी घासण्याचा स्पंज: आपण दररोज किमान चार ते पाच वेळा भांडी घासतो. पण ज्या स्पंजने किंवा स्क्रबरने ही भांडी घासतो त्यावर चिकटलेले अन्नपदार्थ साफ  करतो का? जरी केले तरी त्यावर असणाऱ्या जंतूंचे काय? हा विचार साधारणतः कोणीही करत नाही. त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना बळी पडावे लागते. म्हणूनच प्रत्येक वेळी भांडी घासून झाल्यावर हा स्पंज स्वच्छ करून ठेवावा, तसेच दर १५ दिवसांनी तो बदलावा.

चॉपिंग बोर्ड: चॉपिंग बोर्ड आपण नियमित वापरत असतो व स्वच्छदेखील करत असतो. पण त्यावर काही अंशी बॅक्टेरिया जमा होण्याचा धोका असतो.हे जंतू चॉपिंग बोर्डवर कापलेल्या भाज्यांच्या माध्यमातून आपल्या शरीरात जाऊन त्यामुळे आपण आजारी पडू शकतो. म्हणूनच हा चॉपिंग बोर्ड प्रत्येक वेळी वापरताना आणि वापरानंतर धुऊन ठेवावा. तसेच नियमितपणे तो बदलणेही तेवढेच गरजेचे आहे.

स्वयंपाकघरातील रुमाल: स्वयंपाक करताना बऱ्याचदा हात पुसण्यासाठी, भांडी पुसण्यासाठी किंवा डायनिंग टेबल पुसण्यासाठी आपण रुमाल / टॉवेल वापरत असतो. पण सततच्या वापरामुळे यावर जंतू चिकटतात. त्यामुळे हे रुमाल / टॉवेल रोजच्या रोज धुणे आवश्यक आहे व किमान महिन्यातूनएकदा तरी बदलला पाहिजे.

कार्पेट-हॉलवे रग: यावर सर्वात अधिक प्रमाणात धूळ व माती बसते. हीच धूळ व माती कोणत्याही अडथळ्यांशिवाय घरात सर्वत्र पसरते. आपण जरी हा रग नियमित स्वच्छ करत असलो, तरी दर तीन ते सहा महिन्यांनी एकदा तरी बदलला पाहिजे.

पडदे: घरातील पडदे हे फार कमी वेळा धुतले किंवा बदलले जातात. बहुतांश वेळा हे पडदे किचन किंवा खिडकीजवळ असल्यामुळे त्यावर बाहेरची धूळ, अन्नपदार्थांची वाफ, तेलकटपणा सहज पसरून त्यावर जंतू चिकटून राहतात. हे जंतू साध्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाहीत. महिन्यातून एकदा तरी आपण हे पडदे स्वच्छ धुवायला हवेत. तसेच ते वेळोवेळी बदलले पाहिजेत.

हेअर ब्रश: टूथब्रश तर आपण बदलतोच, पण कंगवा वर्षभर तोच वापरत असतात. काही जण तर आपला आवडता कंगवा म्हणून वर्षानुवर्षे तोच वापरत असतात. काही घरांमध्ये तर सगळे सदस्य हा एकच कंगवा कित्येक वर्षे वापरत असतात. सतत एकच कंगवा वापरल्यामुळे त्यात केस, धूळ, कोंडा आणि तेल जमा होऊन राहते. त्यामुळे केसांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कंगवा नियमितपणे स्वच्छ करावा. तसेच दर सहा महिन्यांनी तो बदलावा. शक्यतो प्रत्येकाने आपला (वैयञ्चितक) कंगवा घ्यावा, सगळ्यांनी एकच कंगवा वापरू नये.

मेकअप ब्रश आणि ब्युटी ब्लेंडर: लग्न किंवा पार्टी असेल तर क्वचितच आपण मेकअप करतो. नियमित वापरात न आल्यामुळे किंवा मेकअप ब्रश किंवा ब्युटी ब्लेंडर स्वच्छ न केल्यामुळे त्यात बॅक्टेरिया जमा होतात व तशा वस्तूंचा वापर केल्यावर त्वचेला खाज व जळजळ यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच प्रत्येक वापरा-नंतर या वस्तू स्वच्छ करून ठेवणे जेवढे गरजेचे तेवढेच ते बदलणेसुद्धा.

घरातील काही वस्तूंच्या बाबतीत बदल हा सातत्याने हवा असतो. घरात काही गोष्टींमध्ये बदल करताना मुलांनादेखील सोबत घ्या. त्यामुळे या गोष्टीची आवड त्यांच्यात निर्माण होईल व तुम्हाला त्यांची मदतही होईल. अशा प्रकारे स्वच्छता राखण्याची त्यांना सवयही लागेल. वेळोवेळी घराची स्वच्छता झाली तर धूळ जमा होणार नाही व घर सुंदर दिसेल. तसेच आरोग्याच्या समस्यांपासून सुटका होईल.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


कोमल दामुद्रे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.