एक घास काऊचा एक घास चिऊचा
लहान मुलांना खाऊपिऊ घालायचे म्हणजे आई–आजीची परीक्षाच असते.चिऊकाऊच्या गोष्टी सांगत बच्चे कंपनीला खायला घालताना घरातल्या सगळ्यांचीच तारेवरची कसरत होत असते.ही कसरत मुलांसाठी आरोग्यदायी आणि हितकारक व्हावी यासाठी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.मुलांना खाण्याच्या चांगल्या सवयी लावण्याची सुरुवात वयाच्या सहाव्या महिन्यापासून होते.त्यामुळे चांगल्या सवयी लावण्याच्या दृष्टीने पहिल्या काही दिवसातच मुलांच्या भरविण्याकडे डोळसपणे पाहायला हवे. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यानुसार याचा विचार करू या.
६ महिने ते १ वर्ष : पोषणदृष्ट्या सहा महिन्याच्या बाळासाठी आईच्या दुधाबरोबरच वरचा आहार देणे आवश्यक असते.साधारणतः वरणाच्या पातळ पाण्यापासून सुरुवात करून हळूहळू खिमटाचे विविध प्रकार, खीर, शिरा, नाचणीसत्त्व, विविध फळांचे गर, सूप्स असे पदार्थ बाळाला द्यावेत.बाळाच्या आहारात मीठ-साखर घालू नये.मसाले तर वयाच्या दोन वर्षांनंतरच देणे चांगले.कोणताही नवीन पदार्थ बाळाला देताना आधी एक–दोन चमचेच द्यावा.नंतर हळूहळू त्याचे प्रमाण वाढवावे.एकाच दिवशी खूप वेगवेगळ्या चवींची ओळख बाळाला करू देऊ नये.साधारण ७-८ दिवसांच्या अंतराने बाळाला दुसरा नवीन पदार्थ द्यायला हरकत नाही.बाळाला ञ्जारविण्याची वेळ घाईगडबडीची नसावी.रोज शक्यतो एकाच वेळेस बाळाला खायला द्यावे.बाळाला सुरुवातीला एकाच वेळेला, तर ८-९ महिन्यांनंतर दिवसातून दोनदा वरचा आहार द्यावा.या दोन खाण्यांशिवाय बाळाला स्तनपान चालू ठेवावे.साधारण १२ ते १५ महिन्यांपर्यंत तीनदा वरचे खाणे आणि मागेल तेव्हा स्तनपान योग्य ठरते.वरचा आहार सुरू केल्यावर बाळाला पाण्याची गरज भासू लागते.आधी चमच्याने किंवा छोट्या पेल्याने बाळाला पाणी पाजा.
बाळाला आहारातून प्रथिने, जीवनस॔व, चरबी (फॅट्स), कर्बाेदके आणि खनिजे मिळायला हवीत.मुलांना भासू शकणारी प्रथिने आणि ऊर्जेची कमी भरून काढण्यासाठी डाळी, भाज्या आणि स्थानिक फळांबरोबरच मुलांच्या आहारात तेलबियांचे प्रमाण वाढायला हवे.विशेषतः सोयाबीनच्या आहारातल्या वापरामुळे तेल आणि प्रोटिनची गरज पूर्ण होते.सोयाबीन्स भाजून त्याचे पीठ करून मुलांच्या आहारात वापरावे.भाजल्यामुळे सोयाबीन्स पचायला सोपे होतात.सोयाबीनचे पीठ मुलांच्या आहारात विविध प्रकारे वापरले तर मुलांना आवश्यक ते पोषण मिळते.आहारात विविध धान्य, डाळी, फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्ये, तेलबिया, सुका मेवा, फळे, दूध-दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असावा.या चौरस आहाराला जोड म्हणून सोयाबीनचा वापर व्हावा‧
दुधातून मुलांना ‘बी १२’ हे जीवनस॔व मिळते, पण दह्यात ते अधिक असते.पालेभाज्यांमधून फॉलिक अॅसिड मिळते.लोखंडी कढईत पदार्थ शिजवले, तर त्यातून शरीराला लोह मिळते.सूर्यप्रकाशामुळे ‘ड’ जीवनस॔व प्राप्त होते‧
बाळ जसजसे वरचे खाणे खायला लागेल तसे त्याचे दुधाचे प्रमाण कमी करत जावे.एक वर्षाच्या आतल्या बाळाला साधारण दर २ ते ३ तासांनी थोडे खाणे किंवा दूध द्यायला हवे‧
एक ते दोन वर्ष: सव्वा ते दीड वर्षाच्या बाळाला बरेचसे दात आलेले असतात.या वयानंतर मुलांना पोळी-भात मिक्सरमधून बारीक करून देणे टाळा.दात आल्यावर पोळी-भाजी, वरण-भात, कोशिंबीर असे चौरस जेवण मुलांनी दातांनी व्यवस्थित चावून खाल्ले तर त्यांना त्याची चव लागते आणि पाचक रस स्रवून अन्नाचे पचन अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते.दीड वर्षाच्या मुलाला सकाळी नाश्ता, दुपारी आणि रात्री असे दोनदा जेवण द्यावे.याशिवाय मधल्या वेळात बाळाला भूक लागत असल्यास फळे, सलाड, चीज, दाणे-गूळ, खोबरे यासारखे पौष्टिक खाणे द्यावे‧
मुलांवर सतत खाण्याचा भडिमार करू नये.मुलांना भूक लागली असेल तर मुले स्वतःहून व्यवस्थित जेवतात.या वयाच्या मुलांना रोज एका विशिष्ट जागेवर बसून खाण्याची सवय लावावी.मुलांसाठी शक्यतो त्यांची स्वतःची ताटली असावी.घरातले मोठे जेव्हा एकत्र बसून जेवतात त्याच वेळेला सगळ्यांमध्ये बसवूनच बाळाला आपल्या हाताने थोडे तरी जेवू द्यावे‧
एक ते दोन वर्ष वयाच्या मुलांना एखादी बिनतिखट भाजी, छोट्या पोळ्या, साधे वरण व भात, तूप, मीठ, लिंबू, कोशिंबीर असा आहार दिवसातून दोन वेळेस द्यावा.मुलांचे जेवण ताजे, अगदी पहिल्या वाफेचे असलेले चांगले.त्यांच्या आहारात घरच्या साजूक तुपाचा पुरेसा वापर असावा.कधीतरी तेलाऐवजी तुपाची फोडणी देऊन भाजी बनवावी.मुलांच्या भाजीत तिखट मुळीच वापरू नये.पण त्या त्या भाजीनुसार लसूण, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, जिरे, धणे, धणे-जिरे पूड, अगदी थोड्या प्रमाणात आले-मिरे असे आरोग्यदायी आणि सौम्य मसाले वापरायला हरकत नाही.मुलांना याच वयात सगळ्या भाज्या खायची सवय करावी.प्रत्येक शेंगभाजी, फळभाजी तसेच पालेभाजी, उसळी, विविध सार, कढी, सूप्स, वरण यांसारखे पदार्थ नियमितपणे मुलांच्या आहारात असावे.त्यांच्या आहारात आमट्या, विविध प्रकारचे भात, वेगवेगळ्या साइड डिशेस, कोशिंबीर, रायते अशा सात्त्विक, चविष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा समावेश असावा.विशेष प्रसंगी खीर, लाडू, इतर पञ्चवान्न, पापड-कुरडया यांसारखे जोडपदार्थ मुलांच्या आहारात असू द्यावे‧
मुलांसाठी करण्याची भाजी ताजी, कोवळी असावी व शक्यतो वाफेवर शिजवावी.भाजीत मीठ, साखर, तेल, मसाले यांचे प्रमाण कमीतकमी ठेवा.मुलांसाठी पोळ्या बनवताना कणकेत भाजलेले सोयाबीन, राजगिरा, हरभरा डाळ, मेथ्या, नाचणी यांचा योग्य प्रमाणात समावेश करावा.मुलांसाठी शक्य असेल तर प्रत्येक वेळेस अगदी ताजी पोळी करावी.दिवसातून दोनदा तरी मुलांनी वरणभात, पोळीभाजी, कोशिंबीर, दही, ताक असा चौरस व्यवस्थित आहार घेणे पोषणाच्या दृष्टीने योग्य ठरते.वरणभातावर तूप, मीठ, लिंबू अवश्य घाला.वरणभाताशिवाय मुलांच्या आहारात दहीभात, मेतकूटभात, खिचडी, वेगवेगळ्या भाज्या घातलेला पुलाव अशा पारंपरिक प्रकारांचाही समावेश करता येईल‧
मुख्य जेवणाशिवाय या वयोगटातल्या बाळांसाठी विविध धिरडी, पॅनकेक्स, उत्तप्पे, आलू-टिक्की, स्मायली, फें्रच फ्राईज, खिरी, शिरा, उपमा असे पौष्टिक पदार्थ अधूनमधून द्यायला हरकत नाही‧
सव्वा वर्षानंतर मुलांचे स्तनपान बंद करून दिवसातून दोनदा गाईचे दूध दिलेले चालेल.पण या दुधात वरून चॉकलेट घालण्याऐवजी घरी बनवलेला ड्रायफ्रूट मसाला घालावा.शञ्चयतो दुधामध्ये साखर घालू नये किंवा घातल्यास कमी प्रमाणात घालावी‧
दुधाबरोबरच दही, ताक, पनीर, लोणी, चीज हे सगळे पदार्थ मुलांच्या आहारात समाविष्ट करावेत.बाळाला सगळे दात आल्यावर फळे, कोशिंबीर, अंडी, ड्रायफ्रूटस्, चिकन या सगळ्या पौष्टिक पदार्थांचा समावेश मुलांच्या आहारात आवर्जून करावा‧
१ ते २ वर्षाच्या मुलांसाठी आहाराचा नमुना:
* सकाळी उठल्यावर केळे आणि आंब्याच्या फोडी (साधारण १/२ ते पाऊण वाटी बारीक फोडी किंवा मॅश करून)
* साधारण २ तासांनी एक वाटी सांजा आणि मसाला दूध.
* दुपारी साधे वरण, तूप, मीठ, भात, लिंबू, पोळी, सिमला मिरची–बटाटा भाजी, काकडीची दह्यातली कोशिंबीर असे जेवण‧
* दुपारी ४ च्या आसपास स्क्रबंल्ड एग आणि टोस्ट लगेच किंवा साधारण तासाभराने दूध संध्याकाळी ७-८च्या आसपास पालक पराठा, लोणी, दाण्याची चटणी, सांडगी मिरचीच्या फोडणीचा दहीभात, रात्री झोपताना दूध (दुपारी प्यायले नसल्यास)‧
वर्ष ३ ते ५: या वयात मुलांच्या अॅक्टीव्हीटीजमध्ये प्रचंड वाढ होते.त्यामुळे १ ते २ वर्षांच्या मुलांसाठी असलेल्या आहाराचा मूळ गाभा तसाच ठेवला तरी त्यातून जास्त पोषण मिळेल असा आहार या मुलांना द्यावा.या वयात मुले घरात बनलेले सगळे साधे जेवण जेवू शकतात, फक्त फार तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ त्यांना देऊ नये.
या वयापर्यंत दात आणि पचनशक्ती बऱ्यापैकी मजबूत झालेली असल्यामुळे आधीच्या तुलनेत अधिक कडक तसेच पचनाला जड पदार्थ दिलेले चालू शकतात.मुलांना या वयात बाहेरच्या खाण्याचीही चटक लागते.त्यामुळे सजग पालकांसाठी हा काळ कसोटीचा ठरतो.मुलांनी बाहेरचे पदार्थ मागू नयेत म्हणून घरीच त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवावेत.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
कांचन बापट
(लेखिका खाद्य अञ्जयासक व शेफ आहेत)