हे मन बावरे..!
डिप्रेशन’ म्हणजेच नैराश्य. जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानुसार, जगात ३० कोटी व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे नैराश्य जाणवत आहे. आत्महत्या आणि व्यसनाधीनता यांचे मुख्य कारण ‘डिप्रेशन’ हेच आहे. कोरोनानंतर तर हे प्रमाण खूप अधिक वाढले आहे.
‘डिप्रेशन’ (नैराश्य किंवा औदासिन्य) का येते, याबद्दल सध्या सर्वत्र संशोधन सुरू आहे. यातून असे लक्षात येत आहे, की माणसाचा मेंदू बाह्य परिस्थिती आणि शरीरातील घडामोडी यांना जाणून दोन निकषांवर प्रतिक्रिया व्यक्त करत असतो:
१. अनुभव चांगला की वाईट त्यानुसार प्रतिक्रिया देणे.
२. ‘अराउज्ड’ म्हणजे उत्तेजित होऊन लगेच कृती करणे आवश्यक आहे की शांत राहणे योग्य हा दुसरा निकष आहे. या दोन निकषांचा एकत्रित परिणाम म्हणून ‘सुखद शांत’, ‘सुखद सक्रिय’, ‘दुःखद शांत’ आणि ‘दुःखद सक्रिय’ अशा मनाच्या चार स्थिती निर्माण होतात. मनात भावनांच्या लाटा नेहमी नसतात, पण या चारपैकी कोणता ना कोणता ‘मूड’ (मनःस्थिती) प्रत्येक क्षणी असतोच.
माणूस निवांत (रिलॅक्स) असतो, त्या वेळी ‘सुखद शांत’ स्थिती असते. ‘सुखद सक्रिय’ म्हणजे तो काहीतरी करीत असतो आणि ती कृती आनंददायी असते. ‘दुःखद सक्रिय’ स्थिती त्रासदायक तणावाची आणि चिंतेची असते. ‘दुःखद शांत’ स्थिती औदासीन्याकडे झुकणारी असते. आपल्या रोजच्या आयुष्यात या चारही अवस्था कधी ना कधी येत असतात. निवांतपणा, उत्साह, काळजी आणि कंटाळा या मनःस्थिती म्हणजे चार नैसर्गिक भावना आहेत. आपल्या मनाचा लंबक या चार स्थितींच्या वर्तुळात फिरत असतो. मात्र तो ‘दुःखद सक्रिय’ आणि ‘दुःखद शांत’ या दिशांना अधिक दूरवर जाऊ लागला, की मानसिक अस्वस्थता वाढू लागते. हळूहळू याच दोन स्थिती अधिकाधिक वेळ राहू लागतात. सुखद स्थितीच्या अवस्थेत मन जातच नाही, गेले तरी फार काळ राहत नाही. मनात चिंता किंवा उदासी निर्माण करणारे विचार अधिकाधिक येऊ लागतात. या दोन्ही भावना आलटून पालटून जाणवू लागतात. काही जणांमध्ये लंबक एकाच ठिकाणी अधिक स्थिर राहू लागतो आणि केवळ चिंता किंवा औदासीन्य जाणवते.
दुःखद घटना, अपयश, प्रेमभंग झाला की माणूस सतत त्याच विचारात राहतो. त्यामुळे मनाचा हा लंबक दुःखद स्थितीत अधिक काळ राहतो. ‘न्यूरोप्लास्टी’ नियमानुसार मेंदूत त्याप्रमाणे बदल घडतात आणि चिंता, डिप्रेशनचा त्रास होऊ लागतो. कोरोनामुळे अनेकांच्या प्रिय व्यक्ती मृत्यू पावल्या, अनेकांचे व्यवसाय बंद पडले, नोकऱ्या सुटल्या, परिस्थिती अतिशय बिकट बनली. परिणामी, नैराश्य, आत्महत्या आणि व्यसनाधीनता यांचे प्रमाण वाढते आहे.
डिप्रेशन म्हणजे नेमके काय?:
मनासारखे झाले नाही की उदास वाटणे, दुःख होणे साहजिक आहे. पण दुःख होणे आणि ‘डिप्रेशन’ हा आजार यात फरक आहे. उदासी किंवा दुःख या नैसर्गिक भावना आहेत. काळाप्रमाणे हे दुःख कमी होते. पण तसे झाले नाही, तर त्रासदायक भावना अधिक काळ राहू लागतात आणि डिप्रेशन येते. कोणतीही भावना सतत राहू लागली, वारंवार निर्माण होऊ लागली किंवा खूप तीव्र होऊ लागल्यास त्याला भावनिक विकृती म्हटले जाते. चिंता आणि डिप्रेशन या अशाच भावनिक विकृती आहेत.
लक्षणे: डिप्रेशनमध्ये एक प्रकारची बधिर अवस्था असते. काही वेळा सर्व शरीरात किंवा ठरावीक भागात वेदना असतात. सतत निरुत्साह असतो. कोणताच आनंद अनुभवता येत नाही. सारखे रडू येते, एकाकीपणा आणि निराशा जाणवते.
उपचार: या भावनिक आजारावर मानसोपचार उपयुक्त ठरतात. माणसाला स्वतःच्या इच्छेने लक्ष देता येत असेल, मनात येणारे विचार जाणता येत असतील, तर कोणतेही औषध न घेता फक्त मानसोपचार उपयोगी असतात. डिप्रेशनची तीव्रता खूप अधिक असेल, तर फक्त मानसोपचार पुरेसे होत नाहीत. त्यावेळी मानसोपचार डॉक्टरला भेटून औषधोपचार घ्यायला हवेत.
संज्ञा: ‘डिप्रेशन’ हा शब्द ‘खाली दाबणे’ या अर्थाच्या लॅटिन शब्दावरून घेतलेला आहे. १९ व्या शतकात तो इंग्रजीत वापरला जाऊ लागला. १९५२ मध्ये मानसिक त्रासांचे वर्गवारी करणारे अमेरिकन सायकिअॅट्री असोसिएशनचे ‘डायग्नोस्टिक अॅण्ड स्टॅटिस्टिक’ मॅन्युअल प्रसिद्ध होऊ लागले, त्यामध्ये ‘डिप्रेसिव्ह रिअॅक्शन’ या नावाने ह्या आजाराचा समावेश झाला. तर १९६८ च्या दुसऱ्या मॅन्युअलमध्ये त्याला ‘डिप्रेसिव्ह न्यूरॉसिस’ असे नाव दिले गेले. त्यानंतर डिप्रेशन हा शब्द अधिक रूढ झाला.
आनुवंशिकता: या आजाराशी निगडित काही ‘जीन्स’ शास्त्रज्ञांनी शोधले आहेत, ज्यामुळे हा त्रास आनुवंशिक आहे हे ध्यानात आले. मात्र आई-बाबांना ‘डिप्रेशन’ होते, याचा अर्थ मुलांना ते होईलच असे नाही म्हणजे, शरीरात ‘जीन्स’ असले तरी ते कार्यरत होण्यासाठी जीवनशैलीतील घटक कारणीभूत ठरतात. शरीरातील रसायनांत बदल झाल्याने रक्तदाब वाढतो, तसेच मेंदूतील रसायने बदलल्याने ‘डिप्रेशन’ होते.
आजाराची तीव्रता: मेंदूतील ‘सेरोटोनिन’ हे रसायन कमी झाल्याने ‘मेजर डिप्रेशन’ हा आजार होतो. ही अवस्था तीव्र असेल, तर मानसोपचार उपयुक्त ठरत नाहीत. अशा वेळी मनोविकारतज्ज्ञांकडून औषधे घेणे गरजेचे असते. या ‘मेजर डिप्रेशन’मध्ये उदासीनतेसोबतच थकवा आणि निष्क्रियता असते. कोणतीही हालचाल करू नये, असे वाटते पण झोपूनही चैन पडत नाही. सारखे रडू येते, एकटेपणा आणि निराशेचे विचार मनात काहूर माजवत असतात. काही जणांना भीतिदायक दृश्ये दिसतात. प्रकाश चांगला असला तरी समोरील वस्तू मंद प्रकाश असल्यासारख्या गढूळ दिसतात. मनात येणाऱ्या विचारांचा आवर्त तीव्र असल्याने त्यांच्यापासून अलग होता येत नाही. या साऱ्या त्रासापासून पळून जावे असे वाटते आणि त्यामुळेच आत्महत्या घडतात.
अशा परिस्थितीत त्या माणसाला कोणताही उपदेश नको वाटतो. शारीरिक हालचाली केल्यानंतर बरे वाटते. पण हे माहीत असूनही प्रचंड थकवा वाटत असल्याने तेही शक्य होत नाही. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास आजार वाढत जातो. पित्त वाढले, की उलट्या होतात तसे ‘सेरोटोनिन’ कमी झाल्यावर सारखे रडू येते. पण असे रडू येणे दुर्बलता समजली जाते.
कारणे: व्यायामाचा अभाव, सतत विचारात राहणे, नैसर्गिक पदार्थ कमी खाणे, सामाजिक आधाराचा अभाव ही या आजारवाढीची कारणे आहेत. माणसाच्या आतड्यात असंख्य हितकारक विषाणू, जिवाणू असतात. त्यांची संख्या कमी झाली तरीही ‘डिप्रेशन’ येते, असे संशोधनात दिसून आले आहे.
औषधे: या आजारावरील नवीन औषधे खूप परिणामकारक आहेत. ती सुरू केल्यावर महिनाभरात फरक जाणवू लागतो. जग पुन्हा सुंदर आणि स्वच्छ दिसू लागते. त्यामुळे या आजारात औषधांची भीती न बाळगता ती घ्यायला हवीत. औषधांनी आत्मभान वाढले, की त्यानंतर मानसोपचार उपयोगी ठरतात. या आजारात लाजण्यासारखे काहीही नाही. तो नाकारल्याने वा लपवून ठेवल्याने बरा होत नाही, तर योग्य उपचारांनी बरा होतो.
प्रकार: डिप्रेशनचे अनेक प्रकार आता लक्षात आले आहेत. हिवाळ््यात सूर्यप्रकाश कमी झाल्याने, गर्भधारणा आणि प्रसूतीनंतर शरीरातील रसायने असंतुलित झाल्याने किंवा कर्करोग, हृदयविकार यांसारखा आजार झाल्याचे कळल्यानंतरही ‘डिप्रेशन’ येते. कोणताही शारीरिक, मानसिक आघात यासाठी कारण ठरू शकते. डिप्रेशनची तीव्रता कमी असेल, तरीही मानसोपचार घेणे आवश्यक असते अन्यथा त्याचे रूपांतर मेजर डिप्रेशनमध्ये होते.
मानसोपचारातील चिंतन चिकित्सेदरम्यान (कॉग्निटिव्ह थेरपी) विचारांच्या चाकोरी शोधून त्या बदलण्याचा प्रयत्न केला जातो. उदासीनता असणाऱ्या व्यक्तीला ठरावीक चाकोरीतील विचार येत राहतात. आयुष्यात दहा गोष्टींपैकी चार-पाच मिळतात. पण ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत, त्यांचेच विचार मनात येत राहतात. प्रत्येक माणसात काही गुण, काही दोष असतात. पण त्यांचे भान राहत नाही, त्यामुळे स्वतःला किंवा इतरांना पूर्णतः नालायक ठरवले जाते. ही चाकोरी अधिक खोल गेली, की सार्वत्रिकीकरण होऊ लागते. म्हणजे एका परीक्षेत यश मिळाले नाही किंवा प्रियकराने फसवले याचा अर्थ – ‘आता जगण्यासारखे काहीच नाही. मी पूर्णतः अपयशी आहे; माझ्यावर कुणीच प्रेम करीत नाही,’ अशा विचारांचा प्रवाह मनाचा ताबा घेतो. असे विचार येत राहिल्याने डिप्रेशन येते. चिंतन चिकित्सेमध्ये या विचारांना बदलण्याचे तंत्र शिकवले जाते.
काही जणांना हे विचार बदलणे शक्य होत नाही. अशा वेळी ‘साक्षीध्यान’ म्हणजे ‘माइंडफुलनेस’ वर आधारित मानसोपचार परिणामकारक ठरतात. यात वर्तमानातील क्षणात लक्ष द्यायला शिकवले जाते. मनात विचार येत राहिले, तरी त्यांच्या अर्थाला महत्त्व न देता त्या विचारांपासून अलग होण्याचे, त्यासाठी शरीरावर लक्ष देण्याचे तंत्र या मानसोपचार पद्धतीमध्ये शिकवले जाते. यामुळे विचारांचा त्रास कमी होतो. आयुर्वेदातही ‘सत्त्वावजय चिकित्सा’ या नावाने असे उपचार सांगितलेले आहेत.
डिप्रेशन म्हणजे आळशीपणा नाही, शिक्षा करून किंवा त्याकडे दुर्लक्ष करून ते बरे होत नाही. त्यावर वेळेत उपचार करायला हवेत!
अजून काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
डॉ. यश वेलणकर
(लेखक अनुभवी सायकोथेरपिस्ट आहेत.)