इअरफोनचा वापर, कानास काळ!
सध्याच्या काळात सतत इअरफोन / ब्लू टूथ वापरणे हे आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले आहे. फोनवर बोलण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी, प्रवासात ओटीटी प्लॅटफॉर्मवर कार्यक्रम पाहण्यासाठी इअरफोन / ब्लू टूथचा सर्रास वापर केला जातो. स्टाइल स्टेटमेंट म्हणूनही असा वापर करण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. इअरफोन / ब्लू टूथमधून येणारा आवाज कानाच्या पडद्यावर थेट आदळतो. काही वेळासाठी इअर-फोनचा असा वापर करणे ठीक आहे, पण त्यांचा दीर्घकाळ अशा प्रकारे वापर केल्यास कानांवर दुष्परिणाम होऊ शकतो.
मधल्या काळात संपूर्ण जगच ऑनलाइन झाले होते. परिणामी, अशा उपकरणांचा वापर वाढला. विद्यार्थी, तरुणमंडळी, कॉर्पोरेट प्रोफेशनल्सचा हेडफोन, ब्लू टूथचा वापर प्रचंड आहे. इअरफोनच्या अतिवापरामुळे कानाच्या पडद्याला हानी पोहोचते. अधिक वेळ इअरफोनचा वापर केल्यास कानातील पेशी मृत होऊ शकतात. सततच्या आवाजामुळे हायपर टेन्शन, डिप्रेशन, मधुमेह, मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
त्यामुळे लहान-मोठ्या सगळ्यांनीच इअरफोनचा वापर मर्यादित प्रमाणात करायला हवा.
इअरफोनचा वापर केव्हा ठरू शकतो हानिकारक ?
* इअरफोन / ब्लू टूथमधून आठ तास तुमच्या कानावर ८५ किंवा त्यापेक्षा अधिक डेसिबल आवाज कानावर पडल्यास.
* १०५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज अगदी १५ मिनिटे कानांवर पडला तरी.
* बाहेरच्या कोलाहलामुळे मोबाइलवर नीट ऐकू येत नसल्यास कॉल, गाणी, वेबसीरीज ऐकताना-पाहताना इअरफोनचा आवाज वाढवला जातो. असे केल्यास श्रवणक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
* सतत (२४ X ७) वापर करत राहिल्यास.
इअरफोनच्या सततच्या वापरामुळे
कानावर होतो दुष्परिणाम :
* गरजेपेक्षा जास्त वेळ हेडफोन / इअरफोन / ब्लू टूथचा वापर केल्यास आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. कान वाजायला लागणे, कानात घू घू असा आवाज येणे ही कान खराब व्हायला लागल्याची लक्षणे आहेत. कानाच्या समस्येची ही पहिली पायरी असे समजायला हरकत नाही.
* याचबरोबर मोठ्या आवाजामुळे कान सुन्न पडण्याचे दुष्परिणामही अनेक जणांमध्ये पहायला मिळाले आहेत. काही काळासाठी कान सुन्न होऊन ऐकण्याची क्षमता बंद होते. थोड्याचवेळाने श्रवण क्षमता सामान्य होते. मात्र हळूहळू हा त्रास वाढत जाऊन कायमस्वरुपी बहिरेपण येऊ शकते. कायमचे बहिरेपण आल्यास त्यावर कोणत्याही प्रकारचे औषधोपचार किंवा सर्जरीचा पर्याय उपलब्ध नाही. अशा वेळेस फारतर श्रवणयंत्र वापरण्याचा एकमेव पर्याय आहे.
* हेडफोन किंवा इअरफोनच्या अतिवापराचा परिणाम हृदयावरही होतो. इअरफोन लावून तासनतास गाणे ऐकण्यामुळे हृदयाची धडधड वेगाने वाढते. तसेच हृदयाचे खूप नुकसान होऊ शकते.
* आपले इअरफोन इतरांबरोबर शेअर करत असल्यास कानात जंतुसंसर्ग होण्याचा धोका वाढतो. कानाच्या संसर्गामुळे मेंदूवरही परिणाम होतो.
* अतिवापर तसेच कानात योग्यरीत्या फीट न होणारा इअरफोन वापरल्यामुळे कानात वेदना निर्माण होतात. यामुळे कानाच्या पडद्याला दुखापत होऊ शकते. तसेच कानाभोवतालच्या भागात असह्य वेदना निर्माण होणे, डोकेदुखी आदी समस्या उद्भवतात.
* इअरफोन आपल्या कानात हवेची ये-जा होण्यापासून रोखतो, ज्यामुळे कानाचे संक्रमण होऊ शकते. इअरफोनच्या सततच्या वापरामुळे कानाच्या त्वचेला रॅश किंवा फोड येणे, कानात बुरशी होणे, तयार झालेला मळ बाहेर न पडणे अशा समस्या सतावतात.
* खूप जास्त आवाजामुळे नॉइज इंड्यूस्ड् हिअरिंग लॉस (NIHL) हा आजार होतो व कानांची ऐकण्याची क्षमता हळूहळू नाहीशी होते. परिणामी बहिरेपण येते. हा आजार होण्यासाठी सतत इअरफोन वापरण्याची सवय कारणीभूत ठरते.
* मर्यादेपेक्षा जास्त काळ इअरफोन वापरला आणि त्याचा आवाज मोठा असेल तर कानावर ताण पडतो. यामुळे मेंदूच्या गतीवर परिणाम होऊन चक्कर येऊ शकते.
* इअरफोनमुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज तयार होतात. या वेव्हज मेंदूवर परिणाम करतात. त्यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेन तसेच झोपेचा त्रास, निद्रानाश किंवा स्लीप अॅप्निया यांसारख्या समस्या उद्भवतात.
* ताणतणाव आणि चिंता यात वाढ होऊ शकते.
कानाला होणारा त्रास, श्रवण क्षमतेवर होणाऱ्या दुष्परिणामापासून असा करा बचाव :
उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा हे अनुभवाचे बोल या समस्येवर तंतोतंत लागू पडतात.
* गरज असेल तेव्हाच इअरफोन किंवा हेडफोनचा वापर करा.
* दिवसभरात ६० मिनिटांपेक्षा अधिक काळ इअरफोनचा वापर करू नका.
* वापर करायचा झाल्यास इअरफोनऐवजी हेडफोनचा वापर करा.
* दुसऱ्या व्यक्तीने वापरलेले हेडफोन / इअरफोन शक्यतो वापरू नका. वापरायचे झाल्यास स्वच्छ करून मगच वापरा.
* स्वस्त इअरफोनऐवजी चांगल्या दर्जाचे इअरफोन वापरा.
* कमी आवाजात संगीत ऐका.
* इयरफोन कानाच्या एकदम आत घालू नका.
* मध्ये मध्ये ब्रेक घ्या.
* ऑनलाइन क्लास, झूम मीटिंग दरम्यान इअरफोन / ब्लू टूथवर आवाजाची तीव्रता कमी ठेवावी.
* इयरबड्सवाले हेडफोन वापरा, त्यामुळे कान सुरक्षित राहू शकतात.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
दिवसाला आठ तासांपेक्षा अधिक इअरफोन / हेडफोन / ब्लू टूथचा वापर करणे कानांसाठी हानिकारक आहे. असा वापर करत असल्यास मधून मधून ब्रेक घ्या.
* इअरफोन / हेडफोन / ब्लू टूथच्या सततच्या वापरापासून कानांना रेस्ट टाइम द्यायला हवा.
* आपल्या इअरफोन / हेडफोन / ब्लू टूथ / इअर पॉड्समधून आवाज बाहेर येणार नाही इतपत तो कमी असू दे.
* नॉइज कॅन्सलिंग इअरफोनचा वापर करा.
* इअरफोन / हेडफोन / ब्लू टूथ / इअर पॉड्स हे चांगल्या कंपनीचेच वापरा.
* मोबाइलमध्ये आवाजाचे सेटिंग ८५ डेसिबल करा. हे सेटिंग आवाज नसणाऱ्या (शांतता असणाऱ्या) ठिकाणी बसूनच करा.
* इअरफोनच्या सततच्या वापरामुळे कानाला संसर्ग झाल्यास त्वरित डॉक्टरची भेट घ्या. पुढील काही दिवस इअरफोन वगैरे वापरू नका. तसेच कान कोरड राहिल, याची काळजी घ्या. कानात पाणी जाऊ देऊ नका. केस धुऊ नका, पोहणे टाळा. डॉक्टरांनी दिलेली औषधे व अँटिबायोटिक्स नियमितपणे घ्या.
अशा प्रकारे कानाला संसर्ग झाल्यास मधुमेह झालेल्या व्यक्तींच्या मेंदूला इजा होऊ शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी काळजी घ्यायला हवी.
डॉ. दिव्य प्रभात
(लेखक अनुभवी ईएनटी सर्जन, एण्डोस्कोपी आणि लेझर सर्जन आहेत.)
शब्दांकन : मिताली तवसाळकर