गैरसमज | Exploring the Truth behind Mango and Egg Myths and Facts | All You Need to Know about Mango and Egg Myths and Facts

अ अंड्याचा, आ आंब्याचा: मिथ्य आणि तथ्य | पद्मश्री षण्मूगराज | Mango and Egg Myths and Facts: What You Should Know | Padmashri Shanmugaraj

अ अंड्याचा, आ आंब्याचा: मिथ्य आणि तथ्य

हल्लीच्या काळात आहाराबद्दल सजगता वाढत असल्याचे पाहायला मिळते. याचे कारण म्हणजे एकीकडे आहाराबद्दलचे नवनवीन ट्रेंड रोज येत असतात तर दुसरीकडे पोषणाबद्दलचे सल्ले ऐकायला मिळत असतात. इंटरनेट, समाज माध्यमांनी तर यात भरच घातली आहे. अशा परिस्थितीत काही पदार्थांबद्दल गैरसमज निर्माण झाले नसते तर नवलच. या गैरसमजुती बहुधा अपूर्ण माहितीवर, अतिशयोक्तीपूर्ण दाव्यांवर किंवा पिढ्यानपिढ्या असलेल्या पूर्वग्रहांमुळे तयार झालेल्या आहेत. परिणामी, काही पदार्थांना आपण जवळपास वाळीत टाकले आहे तर काहींचे फायदे वाढवून सांगितले जातात. पण, दैनंदिन आहाराचा विचार करता, वास्तव आणि कल्पना यातील फरक समजून घेणे खूप गरजेचे आहे. उदा. कर्बोदके आपल्या शरीरासाठी अपायकारक असतात असे बरेचदा कानावर पडते. पण त्यातील ऊर्जा आणि पोषक घटकांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येते. तसेच स्निग्ध पदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजे, असे जेव्हा सांगतात तेव्हा मेंदूच्या कार्यासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी उपयुक्त असलेले स्निग्ध पदार्थही वर्ज्य होतात.

हे गैरसमज दूर केले तर आपल्याला अचूक माहिती मिळेल आणि आहारासंदर्भातील अनेक गुंतागुंतीच्या सल्ल्यांमधून योग्य व अयोग्य असा फरक करणे आपल्याला शक्य होईल. त्याचप्रमाणे आपण काय खावे याबाबत आपल्याला योग्य माहितीवर आधारित निर्णय घेता येईल आणि आहाराबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगता येईल. काही पदार्थांबाबतची वस्तुस्थिती व गैरसमज यातील फरक आपण समजून घेणार आहोत आणि आपल्या पोषणाकडे संतुलित नजरेने पाहणार आहोत.

आंबे खाण्याबद्दलचे गैरसमज

गैरसमज: आंबे रात्री खाल्ले तर अपचन होते.

वस्तुस्थिती: प्रत्येक व्यक्तीची पचनक्षमता वेगवेगळी असते. कोणताही पदार्थ अतिप्रमाणात खाल्ला तर पचनाला त्रास होऊ शकतो किंवा एखाद्या व्यक्तीची पचनसंस्था नाजूक असेल तर त्याला कोणत्याही पदार्थामुळे अस्वस्थ वाटू शकते. असे असले तरी पचनक्रिया व्यवस्थित व्हावी यासाठी रात्रीचे जेवण आणि झोप यात किमान १.५ ते २ तासांचे अंतर असावे.

गैरसमज: आंबे उष्ण असतात, त्यांच्या सेवनाने शरीरात जास्त उष्णता निर्माण होते.

वस्तुस्थिती: काही पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये आंब्याला उष्ण मानले जाते. पण, शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता, आंब्यांमुळे शरीराचे तापमान खूप जास्त वाढत नाही किंवा शरीरात उष्णताही निर्माण होत नाही. हे एक पोषक फळ असून यात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व तसेच पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, झिंक, सेलेनिअम हे क्षार आणि फायबर (द्रावणीय, अद्राव्य) मुबलक प्रमाणात असतात. हे सर्व घटक आहारात असणे आरोग्यासाठी आवश्यक असते.

गैरसमज: आंबे आणि दूध एकत्र करणे अपायकारक असू शकते.

वस्तुस्थिती: आंबे व दूध एकत्र करणे काही खाद्य संस्कृतींमध्ये अपायकारक मानले जाते. तसे केल्यास पोटदुखी, त्वचेच्या समस्या उद्भवतात असा दावा केला जातो. मात्र या दाव्यांना पुष्टी देणारे एकही संशोधन आतापर्यंत झालेले नाही. किंबहुना, मँगो मिल्कशेक आणि स्मूदी लोकप्रिय आहेत आणि या पदार्थांचा आस्वाद घेणाऱ्या बहुतांश व्यक्तींना त्यामुळे काही त्रास झाल्याचा उल्लेख आढळत नाही.

गैरसमज: आंब्यांमध्ये खूप कॅलरीज असतात, त्यामुळे वजन वाढते.

वस्तुस्थिती: मध्यम आकाराच्या आंब्यात साधारण १३५ किलो कॅलरीज असतात आणि त्यापैकी ४ टक्के कॅलरीज त्यातील स्निग्धांशाच्या असतात.यातील ९३ टक्के कॅलरीज कर्बोदकांच्या असल्या तरी आंब्यामध्ये द्रावणीय आणि अद्राव्य फायबर मुबलक असतात, म्हणजे न पचणारी कर्बोदके असतात. त्यांची कॅलरीत भर पडत नाही. आंब्यात जीवनसत्त्वे, क्षार आणि अँटिऑक्सिडंट मुबलक असतात आणि संतुलित आहारात आंब्यांचा समावेश होऊ शकतो. तसेच उन्हाळ्यात उद्भवणारी मायक्रोन्यूट्रिअंटची कमतरता भरून काढण्यासाठी आंबे हितकारक ठरू शकतात.

गैरसमज: आंब्याची साल विषारी असते, ती टाळायला हवी.

वस्तुस्थिती: सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या आंब्याची साल खाण्यास सुरक्षित असते. बहुतेकदा आंब्याची साल खाल्ली जात नाही, कारण ती जाड असते, तंतुमय असते आणि गोड नसते. काही जणांना आंब्याच्या सालीची अॅलर्जी असू शकते. पण ही अॅलर्जी इतर एखाद्या फळाच्या अॅलर्जीसारखीच असते. तुम्हाला याबद्दल खात्री नसेल किंवा अॅलर्जी असल्याचे माहीत असेल तर आंबा सोलून (साल काढून) खाणे हितावह ठरते.

गैरसमज: आंब्यामध्ये साखरेचे प्रमाण खूप असल्याने मधुमेहींनी तो खाऊ नये.

वस्तुस्थिती: आंब्यामध्ये नैसगिक साखर असते, हे तथ्य असले तरी मधुमेहीसुद्धा आंबे प्रमाणात खाऊ शकतात. आंब्याची ग्लायसेमिक इंडेक्स (एखादा पदार्थ खाल्ल्यावर त्याचा रक्तातील साखरेवर कसा परिणाम होतो, हे मोजणारे परिमाण) मध्यम असते आणि त्याच्यातील फायबरमुळे रक्तप्रवाहात साखर शोषली जाण्याचा वेग कमी असतो. (वैयक्तिक आहाराबद्दल आहारतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)

गैरसमज: आंब्यामुळे अॅलर्जी होऊ शकते.

वस्तुस्थिती: आंब्याची अॅलर्जी होण्याचे प्रमाण अत्यंत दुर्मीळ आहे. काही जणांना आंब्याची अॅलर्जी असू शकते. आंबे खाल्ल्यावर कंड येऊ शकतो, दाह होऊ शकतो. पण हे प्रमाण अल्प आहे आणि जिवावर बेतणारी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अगदी क्वचितच निर्माण होते. फळांची अॅलर्जी असलेल्या किंवा फळे खाल्ल्यावर अस्वस्थ वाटणाऱ्या व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे. काही अनुचित प्रतिक्रिया झाली तर वैद्यकीय तज्ज्ञाचा तातडीने सल्ला घ्यावा.

गैरसमज: गरोदरपणात आंबे खाल्ल्यास गर्भपात होऊ शकतो.

वस्तुस्थिती: आंब्यामधील स्रावामुळे किंवा घटकामुळे गर्भपात होऊ शकतो, या दाव्यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. आंब्यामध्ये ‘अ’, ‘क’ जीवनसत्त्व, फायबर आणि अँटिऑक्सिडंट मुबलक असतात आणि गरोदरपणात त्यांचा फायदाच होतो.

अंड खाण्याबद्दलचे गैरसमज

‘अंड’ या अन्नपदार्थाविषयी जनमानसात गैरसमज पसरलेले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे त्यात कोलेस्ट्रॉल हा घटक जास्त असतो. पण अंडे आरोग्यासाठी, विशेषतः हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे, हे सिद्ध करणारे पुष्कळ पुरावे आहेत.

गैरसमज: अंडी खाल्ल्यामुळे रक्तातील डाएटरी कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.

वस्तुस्थिती: अंड्यातील कोलेस्ट्रॉलचा बहुतेक व्यक्तींच्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर नगण्य परिणाम होतो. संशोधनातून दिसून आले आहे की, कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर डाएटरी कोलेस्ट्रॉलचा नव्हे; तर सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्सचा परिणाम होतो. अंड्यात शून्य ट्रान्स फॅट्स असतात आणि सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण तर अत्यंत कमी असते.

गैरसमज: पांढऱ्या अंड्यांपेक्षा तपकिरी (ब्राउन) अंडी अधिक आरोग्यदायी असतात.

वस्तुस्थिती: कोंबडीच्या जातीवरून अंड्यांचा रंग ठरत असतो आणि त्याचा पोषणमूल्यांशी काहीही संबंध नसतो. तपकिरी आणि पांढऱ्या अंड्यांचे पोषणमूल्य समान असते. त्यामुळे रंगीत अंड्यांसाठी बाजारात अधिक किंमत मोजण्याची आवश्यकता नाही.

गैरसमज: कच्ची अंडी खाण्यास सुरक्षित असतात.

वस्तुस्थिती: कच्च्या अंड्यांमध्ये सॅल्मोनेला (आतड्यांमधील संसर्गजन्य जीवाणू) असण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे अंडे कच्चे न खाता, ते नीट शिजवून घेण्याची शिफारस करण्यात येते, जेणेकरून अन्नजन्य (अन्नपदार्थातील दूषित घटकांमुळे पसरणारे आजार) आजारांचा धोका कमी होतो.

गैरसमज: अंड्याच्या बलकात फॅट हा घटक जास्त असल्यामुळे तो टाळावा.

वस्तुस्थिती: अंड्याच्या बलकात अ, ड, ई, के, बी१, बी५, बी६, बी९ आणि बी१२ ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात आणि हेल्दी फॅट्ससुद्धा यात असतात. त्यामुळे सकस आहारामध्ये अंड्याचा बलकही समाविष्ट असलाच पाहिजे.

गैरसमज: रोज अंडी खाणे आरोग्यासाठी चांगले नसते.

वस्तुस्थिती: ज्या व्यक्ती मांस खात नाहीत, त्यांच्या आहारात रोज अंड्याचा समावेश असणे हितकारक असते. वर नमूद केल्याप्रमाणे अंड्यात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि क्षार भरपूर असतात.

गैरसमज: वजन कमी करायचे असेल तर अंड्याचा फक्त पांढरा भाग खाल्ला पाहिजे.

वस्तुस्थिती: संपूर्ण अंड्याच्या तुलनेने अंड्याच्या पांढऱ्या भागात कॅलरीज आणि फॅट्स (स्निग्धांश) कमी असतात, पण अंड्याच्या बलकामध्ये महत्त्वाचे पोषक घटक असतात, त्यामुळे पोट भरते. वजन प्रमाणात ठेवण्यासाठी संतुलित प्रमाणात संपूर्ण अंडे खावे.

गैरसमज: अंड्यामुळे हृदयविकार होतो.

वस्तुस्थिती: अंडी खाणे आणि हृदयविकार यांचा संबंध असल्याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी प्रक्रिया केलेले पीठ, पांढरी साखर, हायड्रोजनेटेड फॅट्स यांसारखे पदार्थ पूर्णपणे टाळावेत. त्याचप्रमाणे धूम्रपान टाळणे आणि व्यायाम करणे यांसारख्या चांगल्या सवयी अंगी बाणवाव्या.

गैरसमज: उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी अंडी वर्ज्य करावीत.

वस्तुस्थिती: उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींच्या आहारात अंडी समाविष्ट होऊ शकतात. कारण त्यात सोडियमचे प्रमाण कमी असते तर पोटॅशिअम व मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते. रक्तदाब योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी हे दोन्ही घटक उपयुक्त असतात.

गैरसमज: अंडी खाल्ल्याने मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

वस्तुस्थिती: अंडी खाणे आणि मधुमेह यांचा कोणताही संबंध असल्याचा पुरावा नाही. त्यामुळे, कर्बोदकांचे प्रमाण जास्त असलेल्या भारतीय आहारात अंड्यांचा समावेश होतो. अंड्यांमध्ये उच्च जैविक मूल्य असलेल्या प्रथिनांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याला प्रतिबंध होतो.

गैरसमज: अंड्याच्या फक्त पांढऱ्या भागात प्रथिने असतात.

वस्तुस्थिती: अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रथिने मुबलक असतात हे सत्य असले, तरी अंड्याच्या बलकामध्येही प्रथिने व इतर पोषक घटक असतात.पांढऱ्या भागात व पिवळ्या बलकात असलेली प्रथिने परस्परपूरक असतात, म्हणून संपूर्ण अंड खाणे आरोग्याला अधिक लाभदायक असते.

टीप: वैयक्तिक आहाराच्या गरजा आणि आरोग्य परिस्थिती यात फरक असू शकतो. त्यामुळे कोणतेही गैरसमज न बाळगता नोंदणीकृत आहारतज्ज्ञ किंवा वैद्यकीय तज्ज्ञाच्या सल्ल्याने आहाराचे नियोजन करावे.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


पद्मश्री षण्मूगराज

(लेखिका अनुभवी आहारतज्ज्ञ आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.