लसूणपातीचे आयते
साहित्य : १-११/२ वाटी लसूण पात, १ छोटी गड्डी ओला ताजा लसूण, थोडी कोथिंबीर, ११/२ वाटी नवीन तांदूळ, ३-४ हिरव्या मिरच्या, १/४ छोटा चमचा हळद, मीठ, तेल.
कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन पाच-सहा तास भिजवा. लसूण सोलून घ्या. लसूणपात, कोथिंबीर, मिरच्या चिरून घ्या. तांदूळ बारीक वाटून घ्या.सोललेला लसूण, लसूणपात, कोथिंबीर आणि मिरच्या बारीक वाटून घ्या. वाटलेले तांदूळ आणि वाटलेला हिरवा मसाला एकत्र करा. त्यात हळद आणि मीठ घाला. डोशासाठी करतो त्यापेक्षा पातळ पीठ होईल इतके पाणी घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या.
तवा तापू द्या व त्यावर सगळीकडे तेल लावा. एखाद्या काठाच्या भांड्यात पीठ घ्या. तापलेल्या तव्यावर थोडे वरून पीठ सोडून आयते घाला.आयते घालताना कडेनी सुरुवात करून मध्यभागापर्यंत यावे (असे केल्यामुळे जाळीदार आणि एकसारखा भाजलेला आयता तयार होतो.) त्यावर झाकण ठेवा. खालच्या बाजूने छान शेकल्यावर तेल सोडून आयता उलटवा. दोन्ही बाजू झाल्यावर उतरवा.
आयता इतका चवदार लागतो, की त्याबरोबर खाण्यासाठी इतर काहीच लागत नाही. जानेवारीत नवीन तांदूळ आणि लसूणपात दोन्ही असते तेव्हा हे आयते करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
कांचन बापट