while selecting brush and toothpaste

टूथपेस्ट आणि टूथब्रश निवडताना…| रश्मी वीरेन | How to choose toothpaste and toothbrushes | Rashmi Viren

टूथपेस्ट आणि टूथब्रश निवडताना

एखाद्याचे व्यक्तिम॔व त्याच्या हास्यामुळे अधिक सुंदर भासते. ते हास्य निर्मळ बनवण्यात दातांचा वाटा मोठा असतो. एवढेच नव्हे, तर आपला आहार, त्याचे चर्वण, पचनक्रिया, शब्दोच्चार म्हणजेच एकंदर आपले आरोग्य मोठ्या प्रमाणात दातांवर अवलंबून असते. म्हणूनच आपल्या दातांची निगा घेणे आवश्यक असते. मात्र निगा घ्यायची म्हणजे नेमके काय तर सकाळी आणि रात्री झोपताना ब्रश करणे, खाल्ल्यावर चूळ भरणे एवढ्याच गोष्टी आपल्याला माहीत असतात किंवा एवढेच नियम आपण पाळत असतो. परंतु, दातांची काळजी घेण्यासाठी, त्यांना जपण्यासाठी इतरही काही मूलभूत नियम आपण पाळायले हवेत. त्यापैकीच एक म्हणजे टूथपेस्ट आणि टूथब्रशची योग्य निवड आणि वापर. दात घासण्यासाठी कोणती टूथपेस्ट आणि टूथब्रश निवडावा, असा संभ्रम अनेकदा निर्माण होतो. हा संभ्रम दूर करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

टूथपेस्ट घेताना प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. काही जणांना दातांचा पिवळेपणा घालवायचा असतो, तर काही जणांना दातांवर येणारे किटन म्हणजे प्लाक, टार्टर दूर करण्यासाठी टूथपेस्ट हवी असते. तसेच अनेकांचे दात आणि हिरड्या संवेदनशील झालेल्या असतात, त्यासाठी त्यांचा योग्य पेस्टचा शोध सुरू असतो. तर कित्येकांना तोंडाची दर्गंधी दूर करणारी टूथपेस्ट हवी असते. पुण्यातील दंतवैद्य डॉ. भूषण शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, वरील समस्यांपैकी आपल्याला कोणती सतावते ते जाणून आपण आपली टूथपेस्ट निवडायला हवी. योग्य टूथपेस्ट आणि टूथब्रश कसा निवडायचा याबद्दल डॉ. भूषण यांनी पुढील काही सूचना केल्या आहेत :

* पांढरी टूथपेस्ट चांगली किंवा जेल टूथपेस्ट चांगली किंवा अन्य चांगली असे म्हटले जाते. मात्र व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. त्याचप्रमाणे व्यक्ती तितक्या आवडीनिवडी. त्यामुळे आपल्याला आवडेल आणि परिणामकारक वाटेल अशा टूथपेस्टची निवड करावी.

* जवळजवळ सर्व टूथपेस्टमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात फ्लोराइड असते. फ्लोराइडमुळे दातात कॅव्हिटी (कीड लागण्यास) होण्यास प्रतिबंध होतो. जर एखाद्या टूथपेस्टमध्ये फ्लोराइड नसेल तर ती टूथपेस्ट घेणे टाळावे. सामान्य टूथपेस्टमध्ये सरासरी १००० पीपीएम (पार्ट्स पर मिलियन) फ्लोराइड असते. फ्लोराइड टूथपेस्टचा दैनंदिन वापर दातांची निगा राखण्यात प्रभावी ठरू शकतो. परंतु, लहान मुले टूथपेस्ट खाण्याची शक्यता असल्याने फ्लोराइडचे अधिक प्रमाण असलेली टूथपेस्ट त्यांच्यासाठी वापरू नका. दोन वर्षांच्या मुलांसाठी २५० ते ६०० पीपीएम फ्लोराइडचे प्रमाण असणारी टूथपेस्ट निवडावी. तर तीन वर्षांपुढे वयापासून ५०० आणि १०० पीपीएम दरम्यान फ्लोराइडचे प्रमाण असणारी पेस्ट वापरावी. सहा वर्षांपुढील मुलांना प्रौढांसाठीची मात्र सामान्य टूथपेस्ट वापरण्यास देण्यास हरकत नाही.

* अनेकदा मुखदुर्गंधी घालवण्यासाठी त्यात लवंग, मिंट, लिंबू किंवा अन्य घटक वापरण्यात येतात. एखादी टूथपेस्ट वापरताना त्यातील घटकामुळे जर हिरड्यांची आग होणे किंवा तोंड येण्यासारखे (अल्सर) प्रकार घडल्यास ती टूथपेस्ट वापरणे तत्काळ थांबवावे. अशी टूथपेस्ट आपल्यासाठी योग्य नाही, हे लक्षात घ्या.

* दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी वापरण्यात येणारे सोडिअम पेरॉक्साइड, टिटॅनिअम डायऑक्साइड हे घटक असलेल्या टूथपेस्ट दीर्घ कालावधीसाठी वापरल्यास दातांवरील इनॅमलची झीज होऊ शकते. या रसायनांचे अधिक प्रमाण हे दातांसाठी तसेच आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असल्यामुळे हे घटक असणाऱ्या टूथपेस्ट शक्यतो दीर्घकाळ वापरणे टाळावे.

* अनेकदा दात आणि हिरड्या संवेदनशील होतात. अशा दातांसाठी आणि हिरड्यांसाठी असणाऱ्या खास टूथपेस्टचाच वापर करावा. त्याचा डेंटिनच्या सुरक्षेसाठी फायदा होतो. मात्र, अशा टूथपेस्ट या दोन ते तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी वापरू नयेत. दोन ते तीन महिन्यांनंतर पुन्हा सामान्य टूथपेस्ट वापरावी.

* वर्षानुवर्षे एकच टूथपेस्ट वापरण्याऐवजी अधेमधे बदल करणेही चांगले.

* टूथपेस्टमध्ये गोडवा येण्यासाठी रासायनिक पदार्थ (स्वीटनर) वापरतात. तसेच त्यात रंग, चव येण्यासाठी वेगवेगळ्या रसायनांचा वापर होतो. त्यामुळे अशी टूथपेस्ट दातांवर अधिक काळ म्हणजे दोन मिनिटांवर राहणार नाही, याची खबरदारी स्वतः करून घ्यावी. म्हणजेच दोन मिनिटांवर दात घासू नयेत. तसेच दोनपेक्षा अधिक वेळाही टूथपेस्टचा वापर करू नये.

टूथब्रशचा वापर

* भारतात सामान्यतः तीन प्रकारचे टूथब्रश मिळतात. एक अतिशय कडक (हार्ड), मध्यम कडक (मीडिअम हार्ड) आणि सौम्य (सॉफ्ट) ब्रिसल्स असणारे. सामान्यतः कोणताही त्रास नसेल तर सॉफ्ट ते मीडिअम ब्रिसल्स असणारे ब्रश वापरावेत.

दात किंवा हिरड्या संवेदनशील झाल्या असतील तर सौम्य म्हणजेच सॉफ्ट ब्रिसल्स असणारे ब्रश वापरावेत. शक्यतो, हार्ड म्हणजे कडक ब्रिसल्सचे ब्रश वापरू नयेत.

* ब्रशचा आकार प्रत्येकाला वापरायला योग्य वाटेल, ब्रश तोंडात फिरवताना दातांवर, हिरड्यांवर आपटला जाणार नाही, फिरवताना त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन निवडावा.

* लहान मूल शक्यतो तीन ते चार वर्षांचे झाले की त्यांना ब्रशचा वापर करायला शिकवावे. तसेच त्यांच्यासाठी लहान आकाराच्या ब्रशचाच वापर करावा.

* तसेच प्रत्येक तीन ते चार महिन्यानंतर टूथब्रश बदलावा. ब्रशचे ब्रिसल्स फाकले गेले असतील किंवा तुटले असतील तर त्यापूर्वीच ब्रश बदलणे हितावह ठरते.

* आपल्याला एखादा आजार झाला असेल तर त्या आजारामधून बरे झाल्यावर आजारपणादरम्यान वापरलेला ब्रश टाकून देऊन नवीन ब्रश वापरण्यास घ्यावा. (करोना काळात करोना झालेल्या रुग्णांना आम्ही हा सल्ला प्रकर्षाने दिला होता, असेही डॉ. भूषण यांनी सांगितले.)

* बाजारात मिळणाऱ्या प्रत्येक टूथब्रशची हेड साइज वेगळी असते. लहान डोके असलेला ब्रश निवडल्याने हा ब्रश तोंडाच्या मागच्या भागाची व्यवस्थित स्वच्छता करू शकतो. या कारणामुळे अनेक दंतवैद्य गोल डोके असलेला टूथब्रश वापरण्याचा सल्ला देतात.

* दात किमान दोन मिनिटे तरी घासावेत. यासाठी आरामदायी आणि सुरक्षित पकड असणाऱ्या हँडलचे ब्रश खरेदी करा.

* ब्रशवर भरपूर टूथपेस्ट घेण्याची अनेकांना सवय असते. त्यामुळे तोंड अधिक स्वच्छ होईल असे त्यांना वाटते. पण हा गैरसमज आहे. ब्रशवर थोडी टूथपेस्ट घेतली तरी ती पुरेसे आहे. मात्र दात स्वच्छ घासणे मह॔वाचे असते.

* दर तीन-चार महिन्यांनी तुमचा टूथब्रश बदला.

* हळुवारपणे दात घासावेत आणि दात घासताना दातांवर जास्त दाब देऊ नका.

* मध्यम ते मऊ ब्रिसलचा टूथब्रश वापरावा.

* दातांच्या स्वच्छतेसाठी दोनदा (सकाळ-रात्री) ब्रश करण्यासोबतच फ्लॉस करणे आणि जीभ स्वच्छ करण्यासाठी टंग क्लिनर वापरणे आवश्यक आहे.

* दर सहा-आठ महिन्यांनी दंतवैद्याकडून दातांची तपासणी करून घ्या.

सकाळी दात घासण्याचे महत्त्व

रात्रीच्या साधारण सात ते आठ तासांच्या झोपेनंतर सकाळी उठल्यावर तोंडात बराच प्लाक आणि बॅक्टेरिया जमा झालेले असतात, यामुळे दात किडू शकतात. म्हणूनच ब्रश करायला हवे. सकाळी ब्रश केल्यावर ताजेतवाने वाटते.

रात्री दात घासण्याचे महत्त्व

आपण दिवसभरात अन्नपदार्थ खातो, त्याचे कण आपल्या दातांत अडकतात. ब्रश न करता आपण तसेच झोपलो, तर तोंडातील सूक्ष्मजीव दातांत अडकलेले हे अन्न आंबवतात. परिणामी, दात किडतात म्हणूनच रात्री ब्रश करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


रश्मी वीरेन

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.