प्लास्टिक | plastic | environment

सूक्ष्म प्लास्टिकचा वाढता धोका | रेश्मा आंबेकर | The growing threat of Microplastics | Reshma Ambekar

सूक्ष्म प्लास्टिकचा वाढता धोका

एन्व्हॉयर्न्मेण्ट इंटरनॅशनलया वैज्ञानिक जर्नलमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात मानवी रक्तामध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. मायक्रोप्लास्टिकने हवा, पाणी, मातीत शिरकाव केल्याचे आपल्याला ज्ञान असले तरी मानवी रक्तात मायक्रोप्लास्टिक आढळण्याची ही पहिलीच घटना असल्याने या समस्येने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. बदलत्या आधुनिक जगाची ही समस्या आता आपल्या सगळ्यांना गाठल्याशिवाय राहणार नाही, हे ओघाने आले, म्हणूनच याबद्दल तपशीलवार जाणून घ्यायला हवे.

मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय?

मायक्रोप्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचे सूक्ष्म कण. हे कण पाच मिलीमीटरपेक्षा (तिळाच्या आकाराचे) लहान व्यासाचे असतात त्यांना मायक्रोप्लास्टिक म्हणतात. मायक्रोप्लास्टिक हे पॉलिथिलीन, पॉलीप्रॉपिलिन किंवा पॉलिस्टीरिन यांसारख्या घन आणि अविघटनशील प्लास्टिकचे बनलेले असतात. त्याला सिंथेटिक पॉलिमर म्हणून ओळखले जाते. आताआतापर्यंत या सूक्ष्म कणांचा प्रदूषणकारी घटकांमध्ये समावेश केला जात नव्हता. पण, मागील दशकभरात जगभरात प्लास्टिकच्या सूक्ष्म कणांबाबत झालेल्या अभ्यासानंतर (२०१९ पासून) मायक्रोप्लास्टिकचा समावेश प्रदूषणकारी घटक असा केला जाऊ लागला.

मायक्रोप्लास्टिक कसे तयार होते ?

सिथेंटिक कपडे, टायर, कॉन्टॅक्ट लेन्स, पाण्याच्या बाटल्या, पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, प्लास्टिकचे कप, डिशेस, चमचे, पिशव्या आणि प्लास्टिकच्या कचऱ्याचे मोठे तुकडे तुटून त्याचे छोटे-छोटे प्लास्टिकचे तुकडे होतात. सूर्यप्रकाश आणि हवामानामुळे या तुकड्यांचे विघटन होऊन प्लास्टिकचे सूक्ष्म कण तयार होतात. आरोग्य आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरले जाणारे मायक्रोबीड्सहेसुद्धा एक प्रकारचे मायक्रोप्लास्टिकच आहे.या मायक्रोबीड्सबाबत ग्राहकांमध्ये फारशी जागरूकता नसल्याने अनेक देशांमध्ये मायक्रोबीड्स असलेली उत्पादने सर्रास विकली जातात. 

मायक्रोप्लास्टिक कुठे आढळते ?

आजच्या घडीला जगात असे एकही ठिकाण नसेल जेथे मायक्रोप्लास्टिक आढळणार नाही. हे कण जगातल्या सर्वांत उंच ग्लेशिअर्स (हिमनद्यांमध्ये तयार झालेला बर्फाचा उंचवटा) ते समुद्राच्या खोल तळातही आढळतात. काही वर्षांपूर्वी फ्रान्समधील अतिशय शुद्ध हवामान असलेल्या पायरिणी पर्वतावर (समुद्रसपाटीपासून ४५०० फूट  उंचीवर) हवेत तरंगणारे प्लास्टिकचे बारीक कण (०.०२५ ते ०.३ मिलीमीटर व्यासाचे) आढळले होते. शास्त्रज्ञांनी येथे सलग पाच महिने मोजणी केली असता दिवसाला दर चौरस मीटरला ३६५ कण अशा मोठ्या संख्येने येथील हवेत प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळून आले. वाऱ्यासोबत हे कण किती लांब जाऊ शकतात, या संदर्भात मात्र अद्याप फारशी माहिती उपलब्ध नाही. (सहारा वाळवंटातून येणारे वाळूचे सूक्ष्म कण हजारो किलोमीटरवर जाऊ शकतात, हे सिद्ध झाले आहे. वाळूच्या तुलनेत प्लास्टिकच्या सूक्ष्म कणांचे वजन लक्षात घेता ते वाऱ्यासोबत कित्येक हजार किलोमीटर प्रवास करू शकतील, याचा अंदाज लावता येत नाही.) आजच्या घडीला प्लास्टिकच्या कोट्यवधी तुकड्यांमुळे पॅसिफिक महासागरात एक तरंगते बेट तयार झाले आहे. प्लास्टिकच्या या बेटाचे क्षेत्रफळ फ्रान्सच्या तिप्पट असल्याचे सांगितले जाते.

पर्यावरणाला धोका

माणसाचे महासागराशी गुंतागुंतीचे नाते आहे. पृथ्वीवरील ५० टक्के जीवन महासागरात आहे. पृथ्वीवरील ७० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा सागरी वनस्पती करतात. पण, मानवी हस्तक्षेपामुळे महासागरातील ऑक्सिजन मिनिमम झोन (ओएमझेड) हळूहळू वाढत आहे. संपूर्ण जगभरातील समद्रावर जवळपास १७० लाख कोटी प्लास्टिकचे तुकडे पसरले आहेत. त्याचे वजन अंदाजे दोन दशलक्ष मेट्रिक टन इतके आहे. समुद्रात वाहून जाणाऱ्या प्लास्टिकवर वेळीच रोख लावला नाही तर २०४० पर्यंत ही संख्या तिपटीने वाढू शकते. एका संशोधनानुसार

महासागरांमध्ये ५ हजार कोटी प्लास्टिकचे सूक्ष्म कण तरंगत आहेत. यातील कित्येक कोटी सूक्ष्म कण अन्नसाखळीतून सजीवसृष्टीत जमा होत आहेत.सागरी प्राण्यांनी प्लास्टिक गिळणे, त्यांच्या अवयवांत प्लास्टिक गुंतल्यामुळे गुदमरून त्यांचे मृत्यू होणे अशा अनेक घटना नोंदवण्यात आल्या आहेत.प्रवाळांच्या भित्तिकांवर प्लास्टिकचे कण पसरल्याने त्यांची जगण्याची क्षमता कमी होते. दुसरीकडे सागरी जीव अन्न समजून चुकून प्लास्टिकचा कचरा खातात. प्राण्यांनी प्लास्टिक गिळण्यामुळे किंवा प्लास्टिकमध्ये गुंतल्यामुळे गुदमरून प्राण्यांचे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत.मायकोप्लास्टिकची ही समस्या फक्त सागरी प्राण्यांपर्यंत मर्यादित न राहता अन्नसाखळीच्या माध्यमातून त्याचा प्रसार सर्वात वरच्या भक्षकांपर्यंत पोहोचला आहे. micro plastics in ocean

मायक्रोप्लास्टिक शरीरात कसा प्रवेश करतात?

मायक्रोप्लास्टिक कशा प्रकारे आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात हे अद्याप स्पष्टपणे समजले नाही. पण हे सूक्ष्मकण केवळ माती, पाणी आणि सागरी प्राण्यांमध्ये नाही. हवेतही सर्वत्र मोठ्या प्रमाणात ते पसरले आहेत. नाकावाटे जरी  हे कण शरीरात जाण्याची शक्यता नसली तरी या कणांचे वेगवान वाऱ्यांमध्ये आणखी अतिसूक्ष्म कणांमध्ये रूपांतर झाले तर ते फुफ्फुसात जाऊन बसू शकतात. प्राणी त्यांच्या शरीरात मायक्रोप्लास्टिक नेतात.आपण जेव्हा मासे खातो तेव्हा मायक्रोप्लास्टिकही खाल्ले जाते. या प्रक्रियेला मायक्रोप्लास्टिकचे ट्रॅफिक ट्रान्सफरअसे म्हटले जाते. पण, केवळ सागरी मासे खाल्ल्याने प्लास्टिक पोटात जाते का? तर नाही, आपल्या आजूबाजूच्या परिसरात उगवल्या जाणाऱ्या भाजीपाल्यांमध्येही प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळले आहेत.

मायक्रोप्लास्टिकचे दुष्परिणाम

मायक्रोप्लास्टिकचा प्राणी आणि माणसांच्या आरोग्यावर नेमका कसा आणि कोणता दुष्परिणाम होतो या संदर्भात अद्याप संशोधन सुरू आहे. पण हे सूक्ष्मकण पेशींमध्ये प्रवेश करून दाहक प्रतिक्रिया निर्माण करतात. (शिंपल्यांमध्ये हे दिसून आले) एका संशोधनात मायक्रोप्लास्टिक प्राण्यांची वाढ आणि पुनरुत्पादन क्षमतेवर परिणाम करू शकते, असे समोर आले आहे.

प्लास्टिकमध्ये इतर रसायनांना आकर्षित करण्याची आणि सोडण्याची क्षमता आहे, यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. प्लास्टिकचे सूक्ष्म कण हे रासायनिकदृष्ट्या चिकट असल्याने त्यांना पारा, शिसे यांसारखे अतिधोकादायक जड धातूंचे कण, हायड्रोकार्बनचे बारीक कण चिकटून बसू शकतात.असे झाल्यास श्वसनाच्या, मेंदूच्या गंभीर आजारांना निमंत्रण दिल्यासारखे होईल. सूक्ष्मकणांपेक्षा अतिसूक्ष्म कण हे अधिक क्रियाशील असतात. एका टाचणीच्या टोकावर एकावेळी १०० कोटी अतिसूक्ष्म कण मावू शकतात. हे अतिसूक्ष्म कण सजीव पेशीच्या भित्तिकेतून दुसऱ्या पेशीत सहज प्रवेश करू शकतात. १३० मायक्रोमीटरपेक्षा छोटे कण व्यक्तीच्या पेशींमध्ये जाऊन रोगप्रतिकारक्षमतेवर परिणाम करू शकते.

एका क्रेडिट कार्डात जेवढे प्लास्टिक असते, तेवढे प्लास्टिक वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या शरीरात प्रवेश करते. आपल्या शरीराची उत्सर्जक संस्था ही बहुतांशी प्लास्टिक कण बाहेर फेकू शकली तरी हे कण शरीरात कुठे साचून राहतील, त्यांचे दुष्परिणाम काय होतील हे आताच सांगणे कठीण आहे.याबद्दलच संशोधन सध्या सुरू आहे.

मायक्रोप्लास्टिकवर बंदी आणणे गरजेचे

मायक्रोप्लास्टिकच्या परिणाम-बाबत संशोधन सुरू असले, तरी जगभरात यामुळे होणारे प्रदूषण पाहता आपल्याला प्लास्टिकच्या सूक्ष्म कणांचे प्रदूषण कसे टाळता येईल, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. प्लास्टिकच्या वापरावर आपले वैयक्तिक नियंत्रण असणे शक्य नाही. त्यामुळे कायद्याच्या स्वरूपात येथे सरकारी हस्तक्षेप आवश्यक आहे. बहुतेक देशांमध्ये हवेतील दहा मायक्रॉन्सपेक्षा अधिक मोठ्या कणांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. प्लास्टिकचे सूक्ष्म कण याहीपेक्षा लहान असतात. त्यामुळे त्यांच्या नियंत्रणासंबंधी वेगळे कायदे व उपाययोजना करण्याची गरज आहे.


मायक्रोबीड्स म्हणजे काय?

विविध प्रकारच्या साफसफाईच्या उत्पादनांमध्ये (मेकअप, परफ्यूम, डायपर, डिटर्जंट, साबण, क्लीन्झर, टूथपेस्ट) प्लास्टिकचे लहान कण असतात.हे कण आपल्या डोळ्यांना सहज दिसतात, त्यांना मायक्रोबीड्स असे म्हणतात. १९८० मध्ये या लहान कणांचा शोध लागला आणि त्याचा उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला. आपल्या त्वचेला सैल करण्यासाठी विविध क्रीम किंवा साबणांचा वापर केला जातो. या उत्पादनांमध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कण वापरले जातात. वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये रंग किंवा पोत देण्यासाठीही मायक्रोबीड्सचा वापर केला जातो. या उत्पादनांच्या वापरातून हे मायक्रोबीड्स मानवी शरीरात प्रवेश करत नसले तरी हे कण सांडपाण्याच्या गाळण्याच्या प्रक्रियेतून सहज पार होत असल्याने अखेर महासागरात जात आहेत.

युरोपमध्ये दरवर्षी सौंदर्य-प्रसाधनांमधून ८.६२७ टन प्लास्टिक कचरा समुद्रात जात आहे. तर दरवर्षी समुद्रात फेकल्या जाणाऱ्या आठ दशलक्ष टन प्लास्टिकच्या तुलनेत ही आकडेवारी अगदीच नगण्य आहे. प्लास्टिकमुळे सर्वाधिक प्रदूषित होणारी नदी म्हणून टेम्स नदीचा उल्लेख केला जातो.प्लास्टिकच्या या गंभीर समस्येला तोंड देत असलेले अनेक देश सौंदर्य उत्पादने तयार करताना मायक्रोबीड्स वापरण्यावर बंदी आणण्याचा विचार करत आहेत.

२०१५ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ओबामा यांनी मायक्रोबीड-फ्री वॉटर अॅक्टवर स्वाक्षरी केली. त्यामुळे अमेरिकेत साबण, टूथपेस्ट, सौंदर्यप्रसाधने यांसारख्या उत्पादनांमध्ये प्लास्टिक वापरण्यास मनाई  करण्यात आली आहे. तर, ब्रिटननेही या साहित्यांच्या वापरावर बंदी घातली आहे.


‘‘निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक जीवांच्या विघटनाची व्यवस्था निर्माण केली आहे. मातीतून निर्माण झालेले सर्व जीव पुन्हा मातीतच मिसळतात, त्यामुळे त्याचे प्रदूषण होत नाही. उलट प्रदूषणविरहित निसर्गाचे हे चक्र चालू राहते. आपणही निसर्गाच्या या व्यवस्थेचे पालन करायला हवे. एखाद्या पदार्थाचा शोध लावतानाच त्याच्या विघटन व्यवस्थेची पद्धत शोधली पाहिजे. प्लास्टिकबाबत तसे न झाल्याने जागोजागी प्लास्टिकचा ढीग साचलेला दिसतो. त्यामुळे प्लास्टिकविरोधात फक्त कठोर कायदे करून फायदा नाही. याबाबत लोकांमध्ये व्यापक जनजागृती झाली पाहिजे. प्लास्टिकच्या वस्तू (किमान कमी मायक्रॉनच्या प्लास्टिकच्या वस्तू) न वापरणे ही प्रत्येक व्यक्तीला आपली जबाबदारी वाटली पाहिजे.’’

संगीता जोशी, सेक्रेटरी, पर्यावरण दक्षता मंच


रेश्मा आंबेकर

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.