संतुलित आहारातील षड्रसांचे महत्त्व
आहार कसा असावा, याचे योग्य ते मार्गदर्शन आयुर्वेदात केलेले पाहायला मिळते. पंचमहाभूतांपासून तयार झालेल्या आपल्या शरीराचे पोषण षड्रसात्मक म्हणजे गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट आणि कडू या चवींनी परिपूर्ण आहाराने होत असते. आहारातील याच सहा चवींचे अर्थात रसांचे महत्त्व आपण जाणून घेणार आहोत.
षड्रस म्हणजे काय?
रस म्हणजे चव होय. आयुर्वेदानुसार रसना म्हणजे जीभ. जीभ या इंद्र्रियाने ज्या अर्थाचे ज्ञान होते त्याला रस म्हणतात. रस ही संकल्पना फक्त पदार्थाची चव इतकीच मर्यादित नाही. भारतीय आयुर्वेद शास्त्रात आहाराविषयक काही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला सापडते. यात षड्रसांचे (चव) वर्णन केले आहे. आपल्या आहारात या षड्रसांचा समावेश असणे आरोग्याच्या दृष्टीने अतियश महत्त्वपूर्ण आहे. हे सहा रस म्हणजे गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट आणि कडू. जिभेद्वारे या चवींचा आस्वाद घेता येतो, या समान भावामुळेच या सर्वांना रस असे म्हणतात. एखाद्या पदार्थाला चव नसेल तर त्याचे कार्य समजणे कठीण आहे. पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी व त्याच्या परिचयासाठी रसच कारणीभूत असतो. कोणत्याही पोषक घटकांची शरीराला कमतरता पडू नये, यासाठी आहार हा षड्रसात्मक म्हणजेच सहा चवींनी युक्त असावा.
पंचमहाभूते आणि षड्रस
सृष्टीतील प्रत्येक वस्तू ही पंचमहाभूतांच्या संयोगानेच बनलेली आहे. आपले शरीरदेखील या पंचमहाभूतांपासूनच बनले आहे, म्हणून त्याचा समतोल राखण्यासाठी घेतला जाणारा आहार आणि बिघडल्यास केली जाणारी चिकित्सा द्रव्ये ही पंचमहाभूतांपासूनच बनलेली आहेत. पंचमहाभूतांपासून तयार होणारा हा आहार संतुलित म्हणजेच कर्बोदके, प्रथिने, स्निग्धपदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे, क्षार, पाणी यांनी युक्त असतो. विविध चवींचे अन्नपदार्थ हेसुद्धा पंचमहाभूतांच्या एकत्रीकरणातूनच तयार होतात. उदा. गोड (पृथ्वी, जल), आंबट (पृथ्वी, अग्नी), खारट (जल, अग्नी), कडू (वायू, आकाश), तिखट (वायू, तेज), तुरट (वायू, पृथ्वी).
षड्रसांचे कार्य
विविध चवींचे अन्नपदार्थ आपल्या आहारात रुची निर्माण करण्याबरोबरच शरीरक्रिया व चलनवलन यासाठी मदत करतात. जसे की, गोड चवीचे पदार्थ शरीराचे पोषण करणे, शरीर मजबूत करणे, रोगप्रतिकार क्षमता वाढवणे, इंद्रियांमध्ये प्रसन्नता आणणे तसेच डोळे, केस, त्वचेचे पोषण करणे यासाठी साहाय्यक ठरतात. आंबट चवीचे पदार्थ रुची निर्माण करतात, पाचक असून भूक वाढवतात, स्राव निर्माण करतात. खारट चवीचे पदार्थ अन्नाला चव आणतात, पाचक असून लठ्ठपणा कमी करतात, स्राव तयार करण्यास मदत करतात. तिखट चवीचे पदार्थ शरीरातील अतिरिक्त स्राव शोषून घेतात, पचनक्रिया सुधारतात, कफदोषांचा नाश करतात आणि
शरीरातील जठराग्नी प्रज्वलित करतात. कडू चवीचे पदार्थ पचनानंतर अन्नघटक शोषून घेतात, अतिरिक्त स्निग्धता कमी करतात, अन्नाला रुची प्रदान करतात आणि शरीरातील साखरेचे प्रमाण कमी करणे या कामात मुख्य भूमिका निभावतात. तर तुरट चवीचे पदार्थ कफ, पित्त व रक्तशामक असतात. शरीरातील अतिरिक्त स्राव शोषून घेतात, तसेच मनाला तृप्ती देण्याचे कार्य करतात. गोड, कडू व तुरट हे रस सौम्य गुणधर्माचे आहेत, तर तिखट, आंबट व खारट हे रस उष्ण गुणधर्माचे आहेत.
आहार रसांचा क्रम
आहारात योग्य प्रमाणात, योग्य स्वरूपात प्रत्येक रस महत्त्वाचा असतो. त्यामुळे आहार प्रकृतीनुसार वेगवेगळा असला तरी त्यात षड्रस असेलच पाहिजेत. भोजनाची सुरुवात गोड रसाने करावी तर मध्यावर आंबट, खारट व शेवट कडू, तुरट, तिखट रसांनी करावा. तुम्ही म्हणाल सुरुवात गोडाने कशी करायची? आपण तर डेझर्ट शेवटी घेतो. परंतु या मागचा विचार समजून घेतला, की सहज पटेल. जेवणापूर्वी पोट रिकामे असते, म्हणजे अग्नी तीव्र झालेला असतो. गोड रस पचायला जड असल्याने तो सुरुवातीला घेतल्याने पचायला मदत होते. आपण रोज गोड पदार्थ खात नसल्याने जेवणाची सुरुवात तूप वरणभाताने केली जाते. पोटभर जेवण केल्यानंतर गोड पदार्थ किंवा फळे खाल्ल्याने पचनशक्तीवर ताण निर्माण होतो. गोड रसानंतर आंबट, तिखट आणि खारट पदार्थ खावेत. हे दोन्ही रस अग्नेय असल्यामुळे अग्निवर्धन होऊन पचनकार्य सुधारते. त्यामुळे वरणभातानंतर आमटी आणि हिंग-मेथीयुक्त भाजी यांचे सेवन केले जाते. जेवणाच्या शेवटी कडू पदार्थ घ्यावेत, ज्याने अग्नी प्रदीप्त होतो. अन्नग्रहणानंतर कफ वाढलेला असतो, त्याचे शमन यामुळे होते. तर जेवणानंतर तुरट पदार्थ खावेत. त्यामुळेच जेवणानंतर ताक पिण्याची किंवा सुपारी खाण्याची पद्धत प्रचलित असावी. षड्रसांचा हा क्रम स्वस्थ व्यक्तींना लागू होतो.
आजारपणात आहार रसांत करावा बदल
आजारी व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारात बदल करावेत. चिकित्सेतही दोषांनुसार रसांचा वापर केला गेला आहे. वातदोषांच्या चिकित्सेत प्रथम खारट, नंतर आंबट व शेवटी गोड रसांचे सेवन करावे. पित्तासाठी पहिला कडू, नंतर गोड व शेवटी तुरट. तर कफ दोषाच्या चिकित्सेत तिखट, कडू व तुरट या क्रमाने पदार्थांचे सेवन करावे. ज्यांना मंदाग्नि (भूक न लागणे), अग्निमांद्य, आमविकार असे आजार आहेत, त्यांनी जेवणाची सुरुवात खारट रसाने करावी. आले-मिठाच्या मिश्रणाने जठराग्नी चांगला प्रज्वलित होतो. यामुळे पाचन, मुखजिव्हा शुद्ध होते व जेवण करण्याची इच्छा निर्माण होते. तसेच कफनाश होण्यास मदत होते. एखादे वेळी भोजनाचा बेत तिखट, मसालेदार असेल तर जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ खावा. विशेषतः मांसाहारानंतर गोड पदार्थ खावेत जेणेकरून वात, पित्त, कफ दोषांचा समतोल बिघडणार नाही.
अतिसेवन म्हणजे आजाराला निमंत्रण
निरोगी राहण्यासाठी कोणत्याही एकाच रसाचे सेवन न करता सहाही रसांनीयुक्त अशा पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये केला जाणे आवश्यक आहे. एकाच चवीचे पदार्थ म्हणजे अतिगोड, अतिआंबट, अतिखारट, अतितिखट, अतिकडू असा आहार घेणे आपल्या शरीर व मनाच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असते. रसांचा योग्य वापर हा जसा उपयुक्त आहे तसाच अतिरेक विविध आजारांना आमंत्रण देणारा ठरतो. उदा., गोड चवीचा पदार्थ बल, स्निग्धता देणारा आहे. परंतु, त्याचा अतिरेक स्थूलता, खोकला, दमा इ. आजारांसाठी कारणीभूत ठरतो. आंबट पदार्थ पचन करणारे, वाताचे अनुलोमन करणारे असून त्याच्या अतिसेवनाने रक्ताचे आजार, शरीराला खाज व दाह उत्पन्न होतो. खारट पदार्थांच्या अतिसेवनामुळे रक्तदोष, सर्वांगास खाज सुटणे, शरीराची आग होणे, तहान लागणे, शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवणे आदी समस्या उद्भवतात. तिखट पदार्थांच्या अतिसेवनामुळे चक्कर येणे, शरीरात उष्णता वाढणे, घशात जळजळणे, घाम येणे, तोंड येणे अशा तक्रारी सतावतात. कडू पदार्थांच्या अतिसेवनामुळे चक्कर येणे, छातीत जड वाटणे, तोंड शुष्क होणे. तर तुरट पदार्थांच्या अतिसेवनामुळे तोंड कोरडे होणे, पोट फुगणे असे त्रास होतात.
(लेखिका आयुर्वेदिक डॉञ्चटर
क्वहणून कार्यरत आहेत.)