hair care | hair treatment

नैसर्गिक ते सर्वोत्तम | डॉ. ऋजुता हाडये | Natural at its best | Dr. Rujuta Hadaye

नैसर्गिक ते सर्वोत्तम

व्यक्तींचे केस सरळ, कुरळे, भुरभुरीत, दाट, विरळ, कोरडे वा तेलकट असू शकतात. आपल्या मस्तकावर साधारण पन्नास हजार ते एक लाख केस असतात. यातील शंभर ते दीडशे केस दररोज गळून पडतात. केस धुतल्यानंतर अधिक प्रकर्षाने ते आपल्या लक्षात येते. तर दर महिन्याला एक ते दीड सेंमी या गतीने केस वाढत असतात.

कशी असते केसांची रचना ?

कुठल्याही रसायनांचा वापर न केलेले नैसर्गिक केस हे सर्वांत स्वस्थ व मजबूत असतात. प्रसाधनांच्या वापराने केसांची अंतर्गत रचना बिघडते.आपल्या डोळ्यांना दिसतात ते असतात केसांचे तंतू. केसांच्या मुळाशी असलेल्या फुगीर अशा केसांच्या बीजकोशात या तंतूंची निर्मिती होत असते.बीजकोशातील पेशींमध्ये केस उगवण्याची क्षमता असल्यामुळेच केस तुटला किंवा गळला तरी त्या जागी नवीन केस उगवतो. आजारपणामुळे, गरोदर-पणामुळे किंवा अगदी किमोथेरपी (कर्करोगांवरील रासायनिक उपचार) नंतरही केस गळले तरी पुन्हा नवे केस उगवतात.

केसांचे तंतू हे प्रथिने (८०%), स्निग्ध पदार्थ (५%), पाणी (१४%), सूक्ष्म घटक व धातू (१%) यांनी बनलेले असतात. त्यात प्रामुख्याने तीन थर असतात. बाह्य आवरणात केराटिन नामक प्रथिनांचा थर असतो. हे आवरण केसांचे संरक्षण करते. केसांना पोत आणि चमक बहाल करण्याचे काम केराटिन करते. मधला थर सर्वात मोठा असून तो केसांना लवचीकपणा व मजबुती देतो. याच थरात केसांना रंग देणारे मेलॅनिन हे रंगद्रव्य असते. सर्वात आतला थर असतो मेड्यूला किंवा
मज्जा. केसांच्या मुळाशी सीबम नावाचा तेलकट पदार्थ पाझरणाऱ्या ग्रंथी असतात. केसांचे, मुख्यतः टाळूचे रक्षण करण्याचे काम सीबम करते. घर्षण, प्रखर प्रकाश, जिवाणू यांना रोखून केसांचे आरोग्य सीबम राखते.

रासायनिक प्रक्रियांचा केसांवर परिणाम :

. केस रंगवणे :

आपल्या केसांना नैसर्गिकरीत्या रंग प्राप्त झालेला असतो, तो मेलॅनिन या रंगद्रव्यामुळे. वाढत्या वयाबरोबर मेलॅनिनचे प्रमाण व केसांचा रंग बदलत जातो. रंगद्रव्य संपले की केस करडे किंवा पांढरे दिसतात. कोणाचे केस कुठल्या वयात पिकावेत ते आनुवंशिकता आणि त्या व्यक्तीच्या प्रकृतीनुसार ठरते. एकदा पिकलेले केस तेल किंवा औषधाने काळे होत नाहीत.

केस रंगवण्याकरिता बाजारात मेंदी, कोहल अशा नैसर्गिक रंगांपासून ते शेकडो छटांच्या रासायनिक रंगांपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. घरीच किंवा सलोनमध्ये जाऊन केस रंगवले जातात. एका धुण्यात जाणारे, चार-आठ महिने टिकणारे, धुण्यागणिक फिके होत जाणारे किंवा कायम टिकणारे अशा सर्व प्रकारात केसांचे हे रंग मिळतात. काहींना विरंजन (ब्लीच) केलेले पूर्ण पांढरे केस हवेसे वाटतात, तर काहींना काळेभोर तर काहींना रंगीत.

केस रंगवल्याने व्यक्ती आकर्षक व तरुण दिसते. परिणामी, त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. अर्थात केस रंगवताना संचावर दिलेल्या सूचनांचे व्यवस्थित पालन करणे आवश्यक असते. हे रंग संच लहान मुलांपासून दूर ठेवायला हवेत, कारण अॅलर्जी, डोळे चुरचुरणे, त्वचेला डिवचणाऱ्या घटकांपासून सांभाळावे लागते. रंगवलेल्या केसांची निगा राखावी लागते. रंगांचा वारंवार मारा करण्याने केसांना हानी पोहचू शकते. म्हणून संपूर्ण केस पुन्हा पुन्हा रंगवण्याऐवजी नव्याने आलेले तेवढेच केस रंगवावेत. रंग निवडताना आपल्या नैसर्गिक रंगाशी व व्यक्तिमत्त्वाशी जुळणारा रंग निवडावा.

. हेअर स्ट्रेटनिंग, पर्मिंग :

केस कृत्रिमरीत्या कुरळे करण्याच्या क्रियेला पर्मिंग किंवा वेव्हिंग म्हणतात. या प्रक्रियेत आधी पर्मिंग लोशन लावून केस मऊ केले जातात. मग त्यांना रोलरच्या मदतीने इच्छित आकार देऊन, तो आकार तसाच राहावा म्हणून फिक्सिंग लोशन लावून केस ताठर केले जातात. हा ताठरपणा कालांतराने निघून जातो. कुरळ्या, नागमोडी केसांना सरळपणा देण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींना हेअर स्ट्रेटनिंगचा पर्याय उपलब्ध आहे. या प्रक्रियेत उष्णता व यांत्रिक दाब या दोहोंचा उपयोग केला जातो. केसांना या प्रक्रिया व रसायनांचा मारा मानवत नाही.

. रसायनांचा वापर :

केसांच्या विविध रचना, स्पाइक्स, स्टायलिंग यासाठी एरोसॉल स्प्रे (फवारे), जेल, क्रीम, पोमेड, सिलिकॉन व मेणयुक्त प्रसाधने, सीरम असे अनेक पर्याय उपलब्ध असतात. मात्र त्यांचा अतिवापर टाळायला हवा. दीर्घकाळ वापराने ही रासायनिक द्रव्ये केसांत साठतात व त्यावर धूळ, कचरा चिकटून केसांत गुंतागुत होते. प्रसाधनांच्या दीर्घ/चुकीच्या वापराने केस निस्तेज होऊन तुटू शकतात. कोंड्यासारखे कण केसांत दिसू लागतात. म्हणून हे पर्याय तात्पुरत्या स्वरूपात, प्रसंगानुसार व योग्य पद्धतीने वापरावेत.

. टक्कल पडण्याची समस्याः केस विरळ झाले की टक्कलसदृश दिसू नये म्हणून अनेक तात्पुरत्या किंवा कायमच्या क्लृप्त्या वापरण्यात येतात.रंगीत जेल, मूस, फवारे, पावडरी वापरून केसांमधील विरळपणा झाकता येतो. डोक्यावर विशिष्ट ठिकाणी लावता येतील असे केसांचे पुंजके, लडी आज बाजारात मिळतात.

टक्कल पडले तर ते झाकण्याकरिता मानवी तसेच कृत्रिम केसांचे आकर्षक टोप (विग) उपलब्ध आहेत. मानवी केसांचे टोप अधिक नैसर्गिक दिसतात. पण ते महाग असतात. तसेच त्यांची योग्य निगा राखावी लागते. कृत्रिम केसांचे टोप वापरायला सोपे असतात, पण ते वारंवार बदलावे लागतात.

मायक्रो पिगमेंटेशन व केसांचे प्रत्यारोपण या दीर्घकालीन उपाय-योजना आहेत. मायक्रो पिगमेंटेशन ही काहीशी गोंदणासारखी प्रक्रिया असते व दोन ते चार सत्रांत करावी लागते. केसांचे प्रत्यारोपण ही थोडी वेळखाऊ व गुंतागुंतीची प्रक्रिया असून प्रशिक्षित शल्यविशारदाकडून करून घ्यावी लागते.

शाम्पूची निवड:

केस धुण्यासाठी प्रखर साबण वापरणे हितावह नसते म्हणून शाम्पूचा वापर केला जातो. केसांतील अतिरिक्त चिकटपणा घालवणारे साबणासारखे घटक व केस खूप कोरडे व भुरभुरीत होऊ नयेत म्हणून घातलेले संरक्षक घटक शाम्पूमध्ये असतात. केसांच्या गरजेनुसार विविध प्रकारचे शाम्पू बाजारात उपलब्ध आहेत. सर्वसाधारण, खरखरीत, नाजूक, कोरड्या, तेलकट किंवा तुटक केसांसाठी वेगवेगळे शाम्पू असतात. केसांच्या प्रकारानुरूप विविध रसायनांचे शाम्पूतील प्रमाण ठरवलेले असते. शाम्पूने केस धुताना डोळे नेहमी बंद ठेवावेत, अन्यथा शाम्पू डोळ्यांत जाऊन चुरचुरतो.

काही शाम्पू नैसर्गिक किंवा हर्बल म्हणून विकले जातात. यात शिकेकाई, रिठे, घायपात, अनंतवेल (उपरसाळ) असे वनस्पतिजन्य पदार्थ वापरले जातात. हे अतिशय सौम्य साबण असतात. बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक शाम्पूमध्ये ते नामपात्र प्रमाणात, हर्बल म्हणवण्यापुरते आढळून येतात.ते मूळ स्वरूपात घरीच वापरणे उत्तम.

हल्ली शाम्पूविरहित शाम्पू (नो-पू) वापरण्याचा एक प्रवाह आहे. शाम्पूऐवजी अॅपल सायडर व्हिनेगर (सिरका), चहाचे तेल (टी ट्री ऑइल) किंवा केवळ पाण्याने केस धुण्यामागे केसांचे नैसर्गिक तेल जपणे व रसायनांचा वापर टाळणे हा उद्देश असतो. कमीत कमी रसायनांचा वापर असलेले लो-पू शाम्पूही बाजारात उपलब्ध आहेत. मात्र या लोपू किंवा नोपूंच्या वापराबद्दल फार शास्त्रीय अभ्यास झालेला दिसत नाही.

काही व्यक्तींना शाम्पूचे वावडे (अॅलर्जी)असते. अशा व्यक्तींना केस धुतल्यानंतर चेहऱ्याच्या व मानेच्या दोन्ही बाजूंना व कानाजवळ पुरळ उठू शकते. नवीन शाम्पू वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर अगदी पातळ केलेला शाम्पू लावून अॅलर्जीसाठी तपासणी (पॅच टेस्ट) करता येते.

कंडिशनरचे फायदे:

शाम्पूबरोबर कंडिशनर वापरणे उपयुक्त असते. कंडिशनर शाम्पूसह अथवा स्वतंत्रपणेही उपलब्ध असतात. कंडिशनर हे केशतंतूवर सूक्ष्म थराचे आवरण चढवतात. त्यामुळे केस मुलायम, विंचरण्यास सोपे होतात, गुंतत नाहीत. रासायनिक प्रसाधनांचा मारा झालेल्या केसांना संरक्षक म्हणून कंडिशनरचे अवगुंठन आवश्यक असते. कंडिशनरने टाळूला म्हणजे डोक्याच्या त्वचेला काही इजा होत नाही. परंतु कंडिशनरचे कार्य टाळूसाठी आवश्यक नसून केशतंतूंना संरक्षण, मऊपणा व लकाकी देणे हे असल्याने ते केसांना लावायचे असते. त्यात साबणाचे गुणधर्म नसल्याने केसांच्या मुळाशी कंडिशनर लावण्याचे प्रयोजन नसते, तेथे शाम्पू उपयुक्त असतो. केसांना लावले जाणारे तेल हे एक नैसर्गिक कंडिशनरसारखे काम करते. कोरड्या केसांसाठी माफक प्रमाणात तेल वापरण्यास हरकत नाही. मात्र केस उगवणे, वाढणे, घनदाट होणे हे तेलाशी संबंधित नाही.

केसांचे सौंदर्य राखताना ‘नैसर्गिक ते सर्वोत्तम’ हा मंत्र लक्षात ठेवावा. स्वतःच्या रूपाचा व व्यक्तिमत्त्वाचा स्वीकार व आत्मविश्वास आपल्याला सुंदर बनवतो. टक्कल असणारी देखणी व्यक्तिमत्त्वे जशी अवतीभवती आढळतात तसेच ‘सॉल्ट अँड पेपर लुक’ म्हणून वयानुरूप करडे झालेले केस अतिशय डौलदारपणे मिरवणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

केसांचे आरोग्य केवळ बाह्य गोष्टींवर नव्हे, तर योग्य आहार-विहार, ताणतणावांचे व्यवस्थापन, थायरॉइड आदी ग्रंथीतून पाझरणारे अंतस्राव, आपली प्रतिकारशक्ती, आनुवंशिकता व आपण केसांची घेत असलेली काळजी या सर्व घटकांवर अवलंबून आहे.

केसात चाई, केस खूप गळणे इ. तक्रारी असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पण दैनंदिन काळजी आपणच घ्यायची आहे. केस धुण्याची वारंवारता विचारपूर्वक ठरवावी. केस बांधताना खूप घट्ट, मुळे ताणली जातील इतके कसून बांधू नयेत. ओले केस विंचरू नयेत. केसांवर केल्या जाणाऱ्या रासायनिक प्रक्रिया केसांचे नुकसान करतात. नैसर्गिक ते सर्वोत्तम हे लक्षात ठेवावे!

अशी होते केसांची हानी:

१. तापमानातील बदल, उच्च तापमान, अतिनील किरणे व फ्री रॅडिकल्स यांच्यामुळे केसांच्या रचनेत रासायनिक बदल होतात व केसांतील प्रथिनांस इजा पोहोचते. केसांचा अपक्षय होतो, केसांची टोके दुभंगतात. ती काही केल्या जुळून येत नाहीत. दुभंगलेली केसांची टोके कापून टाकावी लागतात.

२. अस्वच्छ केसांमध्ये उवा, लिखा, बुरशीचे आजार होऊ शकतात. दररोज केस व्यवस्थित विंचरले तर जटा होत नाहीत. मात्र केस सतत विंचरत राहू नयेत. ऊठसूठ विंचरण्याने केस घासले जाऊन खराब होतात.

अशी घ्या केसांची निगा:

१. टोपी किंवा स्कार्फ वापरून प्रखर सूर्यकिरणांपासून केसांचे संरक्षण करावे.

२. अगदी लहान मुलाचे केस रंगवणे टाळावे.

३. ब्युटी पार्लरमध्ये ग्राहकांचे केस रंगवणाऱ्या कारागिरांनाही अॅलर्जीचा धोका असतो. हातमोजे वापरणे व अॅलर्जीचा पूर्वेतिहास असेल तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

४. अनेकांना केस रंगवल्याने कर्करोगाचा धोका उद्भवेल, अशी भीती वाटत असते. या भीतीला शास्त्रीय आधार सापडलेला नाही. सूचनांचे पालन करून तारतम्य बाळगून सुरक्षितपणे केस रंगवणे आज शक्य व सामान्य झाले आहे.

५. केस वारंवार धुऊ नयेत.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. ऋजुता हाडये

(लेखिका नायर रुग्णालयातील कम्युनिटी मेडिसीन विभागाच्या प्रमुख आणि प्राध्यापिका आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.