मिश्र चवीचा फ्रुट भात
साहित्य॒: १ वाटी बासमती तांदूळ, १ शहाळे (मलईसह), सुका मेवा (अक्रोड, काजू, मनुके, बदाम, मगज), ३ मोठे चमचे मध, गरम मसाला (२ लवंगा, २ वेलची, ३ दालचिनीचे तुकडे), १/२ मोठा चमचा सुंठ, ताजी फळे (डाळिंब, द्राक्षे, चेरी, संत्र्याचा रस, पुदिना पाने), ४ मोठे चमचे साजूक तूप, मटार, लाल ढोबळी मिरची, चवीनुसार मीठ.
कृती॒: प्रथम तुपावर सुका मेवा हलकाच परतून बाजूला ठेवून द्या.आता तांदूळ धुऊन निथळत ठेवा.नंतर जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून खमंग फोडणी करा.त्यात लवंग, मिरी, दालचिनी घालून परता.मिरची घाला व पाणी उकळवून त्यात घाला.या पाण्याला चांगली उकळी आल्यावर त्यात मीठ घाला व निथळलेले तांदूळ घालून अर्धवट भात शिजवून घ्या.आता त्यात नारळाचे पाणी घाला व झाकण ठेवून भात पूर्ण शिजवून घ्या.वाफेवर सुका झाल्यानंतर तो सुटसुटीत झाला पाहिजे, जास्त मऊ होता कामा नये.आता यात संत्र्याचा रस घालून थोडा वेळ ठेवून द्या.मग हा भात फ्रीजमध्ये थंडगार होण्यासाठी ठेवा.नंतर त्यात मलई व सर्व फळांचे तुकडे, सुका मेवा, मध घालून एकजीव होऊ द्या.थोडा वेळ फ्रीजमध्ये पुन्हा ठेवा म्हणजे सुंदर लागेल व भात मुरलेला असेल.आता शहाळ्यात सर्व भात भरून वरून मध घाला.थंडगार सर्व्ह करा.वरून पुदिन्याची पाने, मलईचे तुकडे, चेरी, गुलाब पाकळ्या व मध घालून सजावट करता येईल.
टीप: आपल्या आवडीप्रमाणे फळे घेता येतील.
(या भातात तीन चवी आहेत. मधामुळे थोडी गोडसर, तर लाल मिरची व गरम मसाल्यामुळे तिखट चव, फळांमुळे आंबट-गोड चव. मलईचे पातळ तुकडे किंवा किसूनही घालता येईल.)
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
गंधार पाटील, ठाणे